सोलापूर जिल्ह्याचे भूतपूर्व पोलिस कमिशनर शहीद अशोक कामटे यांच्या कार्याची प्रेरणा व आठवण म्हणून 19 ऑक्टोबर 2009 रोजी सांगोला शहरात ‘शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटने’ची स्थापना झाली. उपेक्षित लोकांच्या अडीअडचणी सोडवणे आणि प्रशासन व सर्वसामान्य नागरिक यांच्यामधील दुवा प्रस्थापित करणे हे कार्य संघटनेने केले आहे. रेल्वेबाबत असणाऱ्या समस्या, तहसील कार्यालयाबाबत असणाऱ्या समस्या, नगरपालिकेबाबत असणाऱ्या समस्या यांसंबंधी वेळोवेळी आवाज उठवण्याचे कार्य संघटनेमार्फत होतेे. त्याचबरोबर तरुणांसाठी मार्गदर्शन शिबिरे, पाणी बचाव अभियान, सार्वजनिक पाणपोई, रेल्वे स्टेशनवरील वेळापत्रक, साथीचे रोग जनजागृती अभियान, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, वर्तमानपत्र वाचनालय, बचत गट, नद्या जोड प्रकल्पासाठी मागणी, थोर महापुरुषांच्या जीवनावरील चित्रफिती दाखवणे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करण्याबाबत मागणी, कारगील विजय दिन, अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकास पाठिंबा व रॅली यांबरोबरच अनेक उपक्रम राबवले आहेत.
संघटनेचे संस्थापक सदस्य व अध्यक्ष नीलकंठ शिंदे यांनी प्रसाद खडतरे, उमेश जाधव, किरण शिंदे, महेश सुर्वे, नितीन सुरवसे, श्रीनिवास केदार, सचिन शिंदे आणि महेश जगताप अशा सहकाऱ्यांना बरोबर घेऊन संघटनेच्या कार्यास सुरुवात केली. नीलकंठ शिंदे स्थानिक माध्यमिक कन्या प्रशालेत मराठी शिकवतात. ते म्हणाले, की कामटे पुणे जिल्ह्यातील हे खरे, पण ते सोलापूर जिल्ह्यात पोलिस आयुक्त होते. त्यामुळे आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. म्हणूनच त्यांच्या नावाने संस्था सुरू केली.
संघटनेकडून दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी शहीद अशोक कामटे यांचा स्मृतीदिन आयोजित करण्यात येतो. त्यादिवशी रक्तदान शिबीर घेतले जाते. संघटनेने 2015 साली आयोजित केलेल्या त्या कार्यक्रमात ‘ब्लड ऑन कॉल’ या उपक्रमाची घोषणा केली. त्यानुसार संघटनेच्या क्रमांकावर फोन केल्यास रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. काही रुग्णांना बाटलीतील रक्ताऐवजी ताज्या रक्ताची गरज असते. अशा वेळी संघटनेकडून रक्तदाता रुग्णाकडे पाठवला जातो. त्यासाठी संस्थेने रक्तदात्यांची नोंदणी करण्यास सुरूवात केली. असे एकूण वीस रक्तदाते संघटनेकडे नोंदवले आहेत. त्यांना सांगोला शहर, मोहोळ, पंढरपूर आणि मंगळवेढा अशा ठिकाणांहून प्रतिसाद मिळाला. रुग्णाकडून रक्तदात्याच्या प्रवासाचा खर्च घेतला जात नाही. अशा प्रकारे संपर्ण महाराष्ट्रात केवळ फोनवर रक्त उपलबध करून देता यावे असा संघटनेचा मानस आहे. संघटनेकडून आयोजित केल्या जाणा-या रक्तदान शिबीरातील जमा रक्त ‘मिरज फिरॉलॉजिकल ब्लड बँके’कडे सुपूर्त केले जाते. संघटना गरजू रुग्णांना रक्ताचा मोफत पुरवठा करण्याचा प्रयत्न करते.
प्रख्यात व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित करण्यासोबत भरकटलेल्या युवकांना मार्गदर्शन करण्याचे कार्य संघटना करत असते. संघटनेने शेतक-यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेल्या ‘नाम फाउंडेशन’ला दहा हजार रुपयांची मदत केली आहे.
संघटनेने सांगोला शहराच्या स्वच्छतेसाठी शहीद अशोक कामटे यांच्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छता दूत आपल्या दारी’ या उपक्रमाची सुरूवात केली आहे. यासाठी संघटनेची वीस ते तीस वयोगटातील सुमारे वीस तरुणांची टिम काम करते. त्यानुसार शहरातील नागरिकांची वेळ घेऊन संघटनेचे कार्यकर्ते त्यांच्या घरी जातात. तेथे त्यांची कौटुंबिक परिस्थिती आणि स्वच्छतेबाबतच्या अडचणी समजून घेतात. त्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगतात. ती कशी राखावी याचे उपाय कळवतात. विशेष म्हणजे कुटुंबातील सर्व व्यक्ती स्वच्छता राखतील अशा स्वरुपाचे प्रतिज्ञापत्र लिहून देतात. संघटनेकडे पस्तीस कुटुंबांनी अशी प्रतिज्ञापत्रे लिहून दिली आहेत. या उपक्रमाचे सहा महिन्यांनंतर अवलोकन करण्यात येईल अशी माहिती संघटनेचे संस्थापक सदस्य प्रसाद खडतरे यांनी दिली.
लहान मुलांच्या मनात भारतीय संस्कृतीची आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून किल्ला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यायोगे त्यांच्यात प्रेरणा निर्माण करणे व इतिहासाबाबत आवड निर्माण करणे असे कार्य संघटनेमार्फत होत आहे. संस्थेतर्फे बाळगोपाळांबरोबर गौरी-गणपती सजावट स्पर्धा ठेवून महिला गृहिणींना प्रोत्साहित केले जाते. समाजासाठी थोर महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथींचे स्मरण करणे, त्याचबरोबर पर्यावरणाचे भान राखण्यासाठी रोपवाटप करण्याचे कार्य वेळोवेळी होत असल्याचे दिसून येते. संघटनेकडून ‘समस्या निवारण केंद्रा’ची स्थापना करण्यात आली आहे. दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्त शहरातील शहरातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांचा ‘उत्कृष्ट व्यवसाय सेवा’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.
संघटनेस सहा वर्षें पूर्ण झाली आहेत. संघटनेत अनेक कार्यकर्ते सहभागी झाले असून ते सक्रिय असतात.
संस्थेने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. त्यात सांगोला शहरातील व बाहेरील प्रवाशांसाठी सांगोला, पंढरपूर, मिरज, कुर्डुवाडी जंक्शन येथील रेल्वे वेळापत्रकाचे फलक व भारत देशातील रेल्वेचे माहितीपुस्तक सर्वांसाठी विनामूल्य अखंड उपलब्ध आहे. महारक्तदान शिबीर, सार्वजनिक पाणपोई, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान व रक्तदात्यांना आकर्षक बक्षीस योजना, विविध महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्टेशन रोड येथील सार्वजनिक शौचालयाबाबत पाठपुरावा, रेल्वेच्या विविध मागण्यांसाठी पाठपुरावा, परिसरातील गरजूंना आवश्यकतेप्रमाणे रक्तपेढीकडून किंवा रक्तदात्यांकडून रक्त पुरवठा करणे, अतिरेकी कसाबसाठी दयेचा पर्याय नको या संदर्भात राष्ट्रपती यांना निवेदन, भारत देशातील नद्याजोड प्रकल्पाची मागणी करणारे आग्रही अशोक कामटे यांच्या जीवनावरील प्रबोधनात्मक चित्रफित दाखवणे, शहिद दिनी श्रद्धांजलीपर कार्यक्रम. त्याचबरोबर अन्य विविध समाजोपयोगी उपक्रम संस्थेने राबवले आहेत.
संघटनेच्या कामाची दखल घेऊन सर्व कार्यकर्त्यांना ‘रोटरी व्यवसाय सेवा’ पुरस्काराने 2014 साली सन्मानित करण्यात आले आहे.
– नीलकंठ शिंदे
Last Updated On – 23rd May 2016
आपले उपक्रम खूप सुंदर आहेत
आपले उपक्रम खूप सुंदर आहेत
आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!
पुजारी आर.एस
मो.न.9922774355
9657155683
शहीद अशोक कामटे ही संघटना एक
शहीद अशोक कामटे ही संघटना एक नविन पिधीला प्रेरणा संस्था आहे. जास्तीत जास्त बांधवानी संस्थेत येऊन सामाजिक कार्य करावे. जय हिंद जय महाराष्ट्र.
Comments are closed.