चतुरगडच्या विनोदी स्त्रिया (पाच अंकी प्रहसन)

0
60
carasole

शेक्सपीयरच्या नाट्यकृती मराठीत अनेकवार अवतरल्या. हॅम्लेट, मॅकबेथ, ऑथेल्लो, रोमियो अँड ज्युलिएट या नाटकांचे अनुवाद मान्यवरांनी केले. काही वर्षांपूर्वी ‘मिडसमर नाईट्स ड्रीम’ याचे रूपांतर ‘ऐन वसंतात अर्ध्या रात्री’ या नावाने आले होते. (त्याचे आणखी एक रूपांतर १९१३ साली ‘मधुयामिनी स्वप्नदर्शन’ या नावाने आले होते). ‘टेमिंग ऑफ द श्रू’ या नाटकाचीही दोन रूपांतरे झाली आहेत. तुलनेने, शेक्सपीयरचे अपरिचित असलेले नाटक म्हणजे ‘मेरी वाइव्हज ऑफ विंडसर’. त्या नाटकाचे मराठीत रूपांतर केले होते, पां.गं. लिमये यांनी. ‘चतुरगडच्या विनोदी स्त्रिया’ म्हणजे हा अनुवाद.

परभाषेतील कलाकृती स्वभाषेत आणताना कोठला रस्ता स्वीकारावा म्हणजे – मूळ पुस्तकाचा शब्दाबरहुकूम अनुवाद करायचा, नावे, प्रसंग बदलायचे हा एक मार्ग. दुसरा, भावानुवाद/रूपांतर. तेथे लेखक मूळ भाव तसाच ठेवतो, मात्र व्यक्तिरेखांची नावे, प्रसंग, घडण्याचे ठिकाण, या भाषेतील, या प्रांतातील. दोन्ही मार्गांत अडचणी असतात. पहिला मार्ग साधारणपणे वैचारिक पुस्तके, निबंध वा तांत्रिक विषयांवरील मजकुराबाबत स्वीकारला जातो. काव्य, नाटक, कादंबरी यांत दुसरी पद्धत स्वीकारण्याकडे कल असतो. रूपांतर करताना स्थानिक वातावरण, त्याला सुसंगत, प्रसंग निर्माण करताना मूळ कथानकाचा रोख/आशय फार दूर जात नाही ना हे बघणे रूपांतरकारापुढचे आव्हान असते. त्याबरोबरच शब्दाबरहुकूम अनुवाद करताना तो कृत्रिम भासत नाही ना याचे भान सांभाळणेही आवश्यक असते.

‘चतुरगडच्या विनोदी स्त्रिया’ वाचताना अनुवाद/रूपांतरकारांनी ही आव्हाने यशस्वीरीत्या पेलली आहेत. अनुवाद/रूपांतरकार असा शब्दप्रयोग हेतुश: केलेला आहे. कारण ज्या काळात अनुवाद झाला, त्यात ‘प्रयोग’ रंगभूमीवर केला जावा या हेतूने तो केला जात असेल असे खात्रीपूर्वक सांगता येत नाही. अनुवादांच्या प्रेरणा हा बराच मोठा व वेगळा विषय आहे. मात्र शेक्सपीयरच्या मराठीतील अनुवादासंबंधी समीक्षक/अभ्यासक यांच्यात फारसा अनुकूल ग्रह नव्हता. इंग्रजी वांङ्मयाच्या अध्ययनाने शेक्सपीयरसारख्या श्रेष्ठ नाटककाराचा परिचय मराठीतील नाट्यलेखनाच्या आरंभीच्या काळातच झाला. शेक्सपीयरच्या नाटकांचे मराठी लोकांना जे आकर्षण वाटले ते त्याच्या व्यक्तिदर्शनापेक्षा चमत्कृतिपूर्ण कथानकाचेच (मराठी वांङ्मयाचा इतिहास – खंड ४ ). गं.बा. सरदार यांनी त्यांच्या ‘अर्वाचीन मराठी गद्याची पूर्वपीठिका’ या ग्रंथात अनुवादकांच्या विषयपंसंतीसंबंधी काढलेले उद्गार फारसे प्रशंसनीय नाहीत.

अशा पार्श्वभूमीवर हे नाटक अनुवादित वा रुपांतरीत स्वरूपात प्रसिद्ध झाले याचे कारण बहुधा मनोरंजनाचे प्रधान ध्येय असावे.

मूळ इंग्रजी नाटकाची संहिता ‘केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस’ने १९२१ साली छापलेल्या प्रतीतून वाचली, तेव्हा त्या प्रतीत दीर्घ प्रस्तावना वाचायला मिळाली. त्यातील तांत्रिक तपशिलाचा भाग वगळून आपल्याला तोंडओळख होण्यापुरती जी माहिती सांगता येईल ती अशी –

राणी एलिझाबेथने शेक्सपीयरला पंधरा दिवसांत एक नवे नाटक लिहून रंगमंचावर आणण्याचे फर्मान काढले. राणी शेक्सपीयरच्या ‘हेन्री द फोर्थ’ या दोन भागांतील नाटकातील फालस्टाफ या व्यक्तिरेखेवर खूष झाली आणि तिने शेक्सपीयरला ती व्यक्तिरेखा आणखी एका नाटकात घालून ‘फालस्टाफ प्रेमात पडला आहे’ असे दाखवावे असे सुचवले. प्रस्तावनेत पुढे म्हटले आहे, की कथानकात अनेक कच्चे दुवे राहिले आहेत. शेक्सपीयरच्या इतर नाटकांत असतात त्या मानाने पद्य भाग फारच कमी (जेमतेम दहा टक्के) आहे. पंधरा दिवसांचा अत्यल्प निर्मितीकाळ आणि कथानकात राहिलेले कच्चे दुवे हे बहुधा शेक्सपीयरने ते नाटक मूळ इटालियन नाटकावरून – ‘जेलस कॉमेडी’वरून – सुधारणा करून निर्माण केले असल्याने झाले असावे असा एक सिद्धांत मांडला जातो. त्याला आधार म्हणून दोन्ही नाटकांतील सुखवस्तू मध्यमवर्गीय वातावरण, घटनांमधील जागा यांचा उल्लेख केलेला आहे. प्रस्तावनेत पुढे असेही म्हटले आहे, की कदाचित शेक्सपीयरने हात फिरवण्यापूर्वी मूळ नाटकाची आणखी एक रंगावृत्ती रंगमंचावर आली असावी.

प्रश्न असा पडतो, की अनुवादकारांना (रूपांतरकारांना) ही सर्व माहिती होती का? पुस्तक १९०५ सालातील आणि ‘केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस’ची आवृत्ती १९२१ मधील. अर्थात, रूपांतरकारांनी मूळ आवृत्तीतून ही माहिती गोळा केली असेल, ही शक्यता नाकारता येत नाही. मग तरीही त्यांना हा अनुवाद का करावासा वाटला असेल?

एक कारण असे संभवते, की रंगभूमीवर लोकप्रिय होण्यासाठी संगीत नाटकांची गरज नाही असे लेखकाला (रूपांतरकाराला) वाटले असेल. १८८३ साली अण्णासाहेब किर्लोस्करांचे ‘सौभद्र’ आल्यावर संगीत नाटकांचा बहर १९००-१९१० मध्ये परिपक्व होता. कदाचित मूळ नाटकात पद्य कमी असल्याने गाणा-या पात्रांच्या अभावातही रंजक वाटेल असे नाटक निवडावे असे रूपांतरकारांना वाटले असेल.

काहीशा कोड्यात या अनुवादाचे कथानक काय? ते नाटक होते की प्रहसन (फार्स) याकडे आता वळू.

नाटकाच्या सुरुवातीस नाटकातील पात्रांची नावे व त्यांची एकमेकांशी नाते आणि गुण-अवगुणविशेष दिलेले आहेत. साधारणपणे त्याकाळी नाटकात असे पात्रपरिचय दिले जात असत, पण गुण/स्वभावविशेष यांचा उल्लेख नसे. येथे मात्र, ‘एक लटपट्या गृहस्थ’, ‘लफंगे लोक’ असे उल्लेख आहेत.

यातील कथानक असे –

चतुरगडचा एक खुशालचेंडू व काहीसा पैसेवाला गृहस्थ अधिक पैसे मिळवण्याच्या उद्योगात आहे. तो गावातील दोन सद्गृहस्थांच्या पत्नी त्याला वश आहेत असे समजतो. त्याच्यावर त्यांच्या नव-यांचा विश्वास आहे आणि त्याचा फायदा घेऊन, त्यांना (स्त्रियांना) वश करून घेऊन, त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा त्याचा डाव आहे. त्यासाठी तो त्यांना खोटी प्रणयपत्रिका पाठवतो. एकाच वेळी, एकाच मजकुराची. दोघी एकमेकींना भेटून ते सांगतात आणि त्याची खोड मोडण्याचे ठरवतात. त्यासाठी त्या जे विविध उपाय योजतात आणि अखेर, त्याची फजिती करतात. ते उपाय/प्रसंग म्हणजे या नाटकातील घटना.

मात्र तेच या नाटकातील एकमेव घटित नव्हे. त्यात दोघांपैकी एका सद्गृहस्थाच्या मुलीच्या विवाहाचे उपकथानकही आहे. तिच्या आईच्या मनात तिला एका श्रीमंत (पण मूर्ख) मुलाला द्यायचे आहे, तर तिच्या वडिलांना तिचे लग्न एका कानडी डॉक्टरशी करून द्यायचे आहे. त्यामागे प्रांतीय एकात्मता असा उद्देश आहे. प्रत्यक्ष मुलगी मात्र शिकवायला येणा-या शिक्षकाच्या प्रेमात आहे. तोही तिच्यावर प्रेम करत आहे. अखेर लग्न कोणाशी होते? ते प्रत्यक्ष वाचण्याची उत्सुकता लंपट/धनलोभी माणसाच्या फजितीच्या समारंभात काहीशी मागे पडते, हे खरे.

नाटकाच्या शीर्षकात ‘प्रहसन’ असा उल्लेख आहे. प्रहसन हा प्रतिशब्द फार्स या प्रकारासाठी वापरला जातो. पण फार्सला वेग अपेक्षित असतो. तेवढा वेग या नाटकाला राहत नाही. मात्र विनोदी संवादांची पखरण सर्वत्र आहे. उदा. –

सखू : कल्लेदार मिशा, अन् मोठी थोरली शेंडी न् कमानदार घेरा ठेवला आहे, तेच ना तुझे यजमान?

बाळू :  नायबा! मक्याच्या कनसापरमान् भुरक्या रंगाची शेंडीची योकच बट त्यांच्या डोईवरती. आन् मिशी बिल्कूल त्याच रंगाची हाय्, वाईच वाईच.

सखू :  कुबड काढून उडत उडत चालतात तेच न्हवं का?

विनोदी नाटकांत आवश्यक म्हणून एक पात्र बोलण्यात मधूनमधून इंग्रजी शब्द वापरते आणि अनेकदा चुकीच्या पद्धतीने. डॉक्टर कानडी दाखवल्याने त्याने त्या ढंगाचे व व्याकरणाचे मराठी बोलावे हे स्वाभाविक. त्याची शुद्ध मराठीच्या पार्श्वभूमीवर हंशा पिकवण्यासाठी योजना आहे. (मूळ नाटकात अस्सल ब्रिटिश लोक आणि डॉक्टर असे योजले आहे.)

मूळ नाटकाचे भाषांतर अनेकदा शब्दाबरहुकूम केले आहे. उदा. –

मूळ इंग्रजी – Let us consult together against this grassy knight

मराठी – चला जाऊ आपण माडीवर अन् त्या चरबी रावसाहेबांची कणीक कशी नरम करायची त्याचा विचार करत बसू.

मूळ इंग्रजी – Shall I vouchsafe your worship a word or two.

मराठी – काही नाही, एरवीच आले होते. एक-दोन शब्द बोलायचे आहे आपल्याशी.

मूळ इंग्रजी – Two thousand fair women I will vouchsafe free the hearing

मराठी – दोन सोडून दोन हजार का बोलानात, मी ऐकायला तयार आहे.

येथे वाचकाला सहज जाणवते, की रूपांतर की अनुवाद असा संभ्रम अनुवादकाच्या मनात दिसत आहे आणि जेथे अनुवाद प्रभावी होतो, तेथे भाषा उपरी भासण्याचा संभव बराच असतो. ‘चरबी उतरवणे’ असा वाक्प्रचार मराठीत आहे पण ‘चरबी रावसाहेब’ हा प्रयोग नैसर्गिक वाटत नाही.

असेच काहीसे खटकते ते सखू या व्यक्तिरेखेचे बोलणे. तिचा उल्लेख ‘बामणाची आवा’ असा येतो, पण तिच्या बोलण्याचे वळण संपूर्ण ब्राह्मणी नाही. शिवाय कानडी डॉक्टरकडे ती सर्व प्रकारची कामे करते. हेही शंभर वर्षांपूर्वीच्या वातावरणात थोडे असंभवनीय असेच वाटते.

नाटकात त्यावेळच्या समाजाला भेडसावणारे आणखी काही मुद्दे येतात. वराने हुंड्याकडे पाहून लग्न करणे, ‘लग्नानंतर प्रेम करता येईल’, लग्नाआधी प्रेम असण्याची गरज नव-याला न वाटणे, आईबापांनी मुलीचे लग्न तिच्या पसंतीचा विचार न करता ठरवू बघणे आणि सर्वांत महत्त्वाचे, नव-याला पत्नीबद्दल अविश्वास वाटण्याचे झटके येणे (जो चिरकाल संघर्षबिंदू आहे) असे मुद्दे त्यांना केवळ स्पर्श होणे अशा स्वरूपात येतात. ते महत्त्वाचे म्हणायचे अशासाठी, की मनोरंजनार्थ लिहिलेल्या फार्ससदृश नाटकातही त्याचे अस्तित्व मांडल्यावाचून लेखकाला राहवत नाही. कदाचित मराठीत हे नाटक ‘आधारे लिहिले’ असे म्हणताना रूपांतराचा घाट लेखकाने मनाशी पक्का केला होता. त्यामुळे ब-याचशा मराठमोळ्या वातावरणात हे मुद्दे येणे अपरिहार्य वाटले असेल.

शेक्सपीयरच्या प्रसिद्ध आणि महत्त्वाच्या नाटकांचा अनुवाद वाचतानाच प्रस्तुत अनुवाद या वांङ्मयप्रकारातील एक चर्चाबिंदू निश्चित ठरू शकतो.

चतुरगडच्या विनोदी स्त्रिया (एक पाच अंकी प्रहसन)
लेखक :  पांडुरंग गंगाधर लिमये, (बी.ए.)
प्रथमावृत्ती :  १९०५, प्रकाशक : मनोरंजक ग्रंथ प्रसारक मंडळी

– मुकुंद वझे

About Post Author