गंजिफा – सावंतवाडीचा सांस्कृतिक मानबिंदू

2
102
carasole

गंजिफा हा पत्त्यांच्‍या साह्याने खेळला जाणारा खेळ. सावंतवाडीत त्‍या खेळाची परंपरा तीन शतकांहून जुनी असल्‍याचे आढळते. तो राजेरजवाड्यांच्या काळात मनोरंजनाचे साधन म्हणून खेळला जात असे.

आंध्र व तेलंगण प्रांतांतील ब्रह्मवृंद धर्मशास्त्रातील चर्चेत भाग घेण्यासाठी सतराव्या व अठराव्या शतकामध्ये सावंतवाडीत येत असत. तेव्हा राजेबहाद्दर खेमसावंत तिसरे हे गादीवर होते. ब्रह्मवृंदामुळे लाखकामाची कला सावंतवाडीत येऊन पोचली होती. विशेषत्वाने, त्या कलेची शैली आकृतिबंधात्मक रंगकामाच्या बाबतीत तेथे रुजली आणि पुढे, ती विकसित झाली. सावंतवाडीच्या राजघराण्याने सतराव्या शतकात या लाखकामाच्या कलेला राजाश्रय दिला; तसाच, ‘गंजिफा’ खेळासही.

‘दशावतारी गंजिफा’ ब्रिटिश म्युझियम, लंडन येथे शतकापूर्वी जाऊन पोचला होता! गंजिफा या कलाप्रकाराच्या चित्रशाळा अठराव्या व एकोणिसाव्या शतकात सावंतवाडीत होत्या. त्यामध्ये कै. नारायण केळकर व कै. विष्णू म्हापसेकर यांच्या चित्रशाळा विशेष प्रसिद्ध होत्या. त्या चित्रशाळांमधून ‘गंजिफा संच’ मोगल सम्राटापासून ते पेशवे दरबारापर्यंत भेटीदाखल सन्मानपूर्वक पाठवल्याच्या नोंदी आढळतात. दशावतारी गंजिफाबरोबर एकशेचव्वेचाळीस पानांचा राशी गंजिफा, नवग्रह गंजिफा, बाराखडी गंजिफा हे तेथील वैशिष्ट्य.

समाजातील सर्व स्तरांतील कलाकारांची नेमणूक करून त्यांच्याकडून कलाकृती तयार करून घेतल्या जात. पंचम खेमराज तथा बापुसाहेब महाराज यांनी जाणीवपूर्वकतेने व गांभीर्याने १९३०च्या दरम्यान त्या कलेला चालना देऊन तिचा विकास केला. त्यांच्या कालखंडात गोव्यातील ‘चितारी (चित्रकार)’ कुटुंबातील लोकांना सावंतवाडीच्या चित्रशाळांमध्ये आणून, त्यांना प्रशिक्षण देऊन त्या कलेचा विकास करण्यात आला. कालौघात, त्या कुटुंबातील कलाकारांनी आपापसांतील गैरसमजाने व योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे त्यांची अभिजात कला सोडून, बाजारी स्वरूपाच्या वस्तूंची निर्मिती करून त्या गावजत्रांतून विकण्यास सुरुवात केली. कलेला एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर अवकळा प्राप्त झाली आणि ती फळे, खेळणी त्या जत्रेमध्ये विकल्या जाणाऱ्या बाजारी वस्तूंच्या स्वरूपात शिल्लक राहिली.

शिवरामराजे भोसले व राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांचे त्या कलेच्या दुरवस्थेकडे लक्ष गेले व त्यांनी त्या कलेला पुनश्च उर्जितावस्था देण्याचा निर्णय १९५९ मध्ये केला. त्यांनी जुन्या-जाणत्या कलाकारांचा शोध घेतला. त्यांत नव्वदीचे पुंडलिक चितारी नामक कलाकार त्यांना आढळले. ते गंजिफांचा संच करत असत. शिवरामराजे यांनी त्यांच्याकडून कलेचे वैशिष्ट्य जाणून घेऊन ते आत्मसात केले. राजेसाहेब स्वत: उत्तम चित्रकार होते. राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांनी त्यांच्या माहेरी बडोद्याला प्रसिद्ध चित्रकार राव यांच्याकडे लहान वयात चित्रकलेचे धडे गिरवले होते व त्यांनी अनेक चित्रेही काढली होती.

त्यांनी समाजातील सर्व थरांतील लोकांना त्या कलेचे प्रशिक्षण दिले. त्यांनी ‘सावंतवाडी लॅक्सवेअर्स’ संस्थेची स्थापना केली. त्याद्वारे प्रशिक्षित कलाकारांच्या कलाकृतींना आणि विशेषत्वाने तेथील गंजिफा कलेला १९७३ मध्ये जगाच्या बाजारपेठेत मोलाचे स्थान प्राप्त करून दिले. राजेसाहेब व राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले यांनी जपान, जर्मनी या देशांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. तेथील कलादालनात, प्रदर्शनात कलावस्तूंची मांडणी केली. त्यामुळे हस्तकलेला जगात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. नंतरच्या कालखंडात, त्यांनी जर्मनी, जपान, अमेरिका इत्यादी देशांतूनही गंजिफाच्या वैशिष्ट्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

गंजिफाचे विविध प्रकार असले, तरी कोकणातील, विशेषत्वाने सावंतवाडीतील पारंपरिक रीतीने सुबक दशावतार चित्रित केलेला गंजिफा हा आकर्षक असून त्यातील पारंपरिकता व रंगकाम यांनी तो जाणकारांचे लक्ष वेधून घेतो. ‘सावंतवाडी लॅक्सवेअर्स’ संस्थेत ‘दशावतार गंजिफा’बरोबर दरचित्री, सोनेरी, दशरंगी, राशी, नवग्रह, चंगकांचन, एकरंगी (आयव्हरी कलर) मुळाक्षरे इत्यादी विविध प्रकारचे आकर्षक गंजिफा संच तयार केले जात. शिवाय, त्या कलाप्रकाराकडे विशेष लक्ष देऊन धनलक्ष्मी, संतमालिका, प्राणी, पक्षी इत्यादी गंजिफा संचही विकसित केले गेले आहेत. विविध स्वरूपातील ते संच राजवाड्यात विक्रीसाठी उपलब्ध असून देशात व विदेशांतही त्या संचांना मागणी आहे.

कोकणातील ‘दशावतार’ व ‘दशावतारी गंजिफा’ या कला म्हणजे या भूमीच्या आध्यात्मिक पार्श्वभूमीचे सबळ पुरावे आहेत असे मानले जाते.

गंजिफा खेळण्‍याची रित –

गंजिफा हा मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की अशा दहा अवतारांच्या कथांच्या स्वरूपात खेळला जाई. प्रत्येक अवताराची राजा किंवा मीर (अमीर), वजीर आणि एक्का ते दश्शा अशी बारा-बारा पाने असतात. तो एकूण एकशेवीस पानांचा संच त्यात असतो. त्यातील चित्रे रंगवण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जाई. आधुनिक काळात रासायनिक रंगाचा वापर गंजिफा रंगवण्यासाठी केला जातो.

पहिल्‍या पाच पानांवर मत्स्य, कच्छ, वराह, नरसिंह, वामन अशा पहिल्या पाच राजांची चित्रे असतात. त्या पाच अवतारांत वजिरानंतर एक्का ते दश्शा असा उतरता क्रम असतो. परशुराम ते कल्की यांची चित्रे उरलेल्या राजांच्या पत्त्यांवर असतात. त्या अवतारांत राजा आणि वजीर यांचा दर्जा पहिल्या पाच अवतारांच्या पत्त्यांइतकाच असला, तरी त्यानंतर दश्शा वरिष्ठ असून त्याच्या खाली नव्वी, अठ्ठी अशा क्रमाने एक्क्याला सर्वात खालचे स्थान असते. प्रत्येक अवताराच्या चित्रांबरोबर असणारा घोडेस्वार म्हणजे वजीर. त्या त्या अवताराचे चित्र आणि एक ते दहा क्रमांक असलेले दहा पत्ते खेळात असतात.

गंजिफा खेळताना प्रथम पाने वांटली जातात. पाने वाटणा-याने जमिनीवर पानांचा गंज ठेवून हाताने पानाची गल्लत (पाने पिसणे) करावी. नंतर पाने पुन्हा एकत्र करुन त्यांचा गंज तयार करून ठेवावा. मग वाटणा-याने गंजांतून काही पाने काढून बाजूला ठेवावी. अशाप्रकारे गंज काटल्यानंतर वाटणा-याने प्रथम काटलेल्या पानांखाली पाने खेळाडूंना वांटावी. ती वाटून झाल्यावर काटलेली पाने वाटावी.

पाने वाटणा-याच्‍या उजवीकडे बसलेल्‍या खेळाडूपासून पाने वाटण्‍यास सुरूवात करतात. प्रत्‍येकास चार पाने दिली जातात. वाटणारा सर्वात शेवटी स्‍वतःला चार पाने वाटतो. पाने वाटून झाल्यावर, ज्याच्याकडे सुरख्या असेल त्याने खेळास आरंभ करावा, म्हणजे त्याने सुरख्याचें आसन उतरावे. एकाने पान उतरल्यावर त्याच्या उजव्या हाताकडे जो खेळणारा असेल, त्याने पुढचे पान उतरावे व त्याने पान उतरल्यावर तिस‌-या खेळणाराने पान उतरावे अशी पद्धत आहे. प्रत्येक खेपेस पहिल्या खेळणा-याकडून जितकी पाने उतरली जातील, तितकीच पाने बाकीच्यांनीही उतरली पाहिजेत; तसेच पहिल्या खेळणा-याने एकच पान उतरले असून दुस-य अथवा तिस-या खेळणा-याने विशेष हेतू साधण्यासाठी त्याच्यावर दोन पाने उतरल्यास बाकीच्यांनीही दोन दोन पाने उतरणे आवश्‍यक ठरते. त्‍या खेळात पानाच्‍या रंगास रंग दिलाच पाहिजे असा नियम नाही. कोणत्याही रंगाच्या पानावर कोणत्याही रंगाचे पान उतरले तरी चालते. जिंकलेल्‍या डावातून गोळा केलेल्‍या पानांच्‍या संचाल हात असे म्‍हटले जाते. ते हात खेळाडू स्‍वतःजवळ एकत्र करून ठेवतो. ती पाने पुन्‍हा त्‍या डावात वापरली जात नाहीत.

सुरख्या खेळल्यानंतर मुरख्या खेळणाराने त्‍याच्‍या दुकली खेळाव्या व मग देणी द्यावी. नंतर ज्याच्याकडे दिलेली देणी, येणी होईल, त्याने खेळावे. त्यानेही प्रथम आपल्या दुकली खेळाव्या व मग देणी द्यावी. याप्रमाणे एकमेकांच्या देण्या देऊन खेळ पुढे चालवावा. राजकीय देण्या संपल्यावर खालच्या देण्या द्याव्या. खेळता खेळता साधेल त्याप्रमाणे झोडणे, ओढणे, उतरून सर, नातवानी तवानी, हरद्, सोक्त वगैरे प्रकारांनी खेळावे व खेळण्याचे इतर मार्ग बंद झाले की उतारी करावी. खेळाडूने उतरून सर, नातवानी-तनावी हरद् किंवा सोक्त खेळतांना अमुक प्रकारचे खेळतो म्हणून सांगाणे आवश्‍यक आहे. प्रत्येक खेळणारा अखेरी मारण्याचा प्रयत्न करत असतो. एक डाव संपल्यानंतर प्रत्येकाने आपापली किती पाने झाली आहेत व कोणास इतरांची किती पाने लागली आहेत (हात ओढणे) ती पाहावी. नंतर पुन्‍हा पाने वाटून दुस-या डावास आरभ करावा. दुस-या डावास सुरुवात करण्यापूर्वी खेळाडू पहिल्या डावात खेळाडू त्याची पाने ज्‍या इतर खेळाडूला लागली होती त्‍यास ती पाने देतो. नंतर खेळास आरंभ होतो.

गंजिफा खेळताना वस्‍तूंची देवाणघेवाण केली जात असे.

– प्रा. जी. ए. बुवा

About Post Author

Previous articleरवींद्रनाथ टागोर यांचे ब्रिटीश राणीला लिहिलेले पत्र
Next articleराम पटवर्धन – साक्षेपी संपादक
डॉ. गंगाधर बुवा हे सावंतवाडीचे राहणारे. ते 1997 सालापासून 'यशवंतराव चव्‍हाण महाराष्‍ट्र मुक्‍त विद्यापीठ' नाशिक, येथे केंद्र संयोजक म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी आजपर्यंत भाषा, साहित्‍य, इतिहास, सांस्‍कृतिक संरचना, पर्यावरण, ग्रंथालय चळवळ या विषयांवर विविध नियतकालिकांमधून तीनशेहून अधिक लिहिले आहेत. त्‍यांचे 'सावंतवाडी संस्‍थान', 'राजमाता', 'राजेसाहेब', 'मॉंसाहेब', 'कोकणातील देवदेवस्‍कीची देवस्‍थाने' अशी अनेक पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. त्‍यासोबत त्‍यांनी काही दिवाळी अंक आणि स्‍मरणीका यांचे संपादनही केले आहे. सावंतवाडी तालुक्‍यात सार्वजनिक ग्रंथालय उभारण्‍यात त्‍यांचा सहभाग होता. त्‍यांच्‍या कामाबद्दल त्‍यांना 'आदर्श ग्रंथपाल', अखिल भारतीय मराठी वाङ्मय मंडळाचा 'उत्‍कृष्‍ठ वाङ्मय पुरस्‍कार', 'राजमाता ग्रंथमित्र पुरस्‍कार' अशा अनेक पुरस्‍कारांनी गौरवण्‍यात आले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422054978 / 02363 273478

2 COMMENTS

  1. खुप छान माहीती मिळाली

    खूप छान माहिती मिळाली. या पोर्टलमुळे नवनवीन माहिती मिळत आहे.

  2. आपला लेख वाचला अधीक सवीस्तर…
    आपला लेख वाचला अधीक सवीस्तर माहीती साठी फोनवर संपर्क केला आहे व ईमेल ,पत्ता पाठवला आहे
    अविनाश मराठे

Comments are closed.