आमची कशेळी – शहरी वातावरणापासून दूर !

0
19

कशेळी हे कोकणातील रत्नागिरीजवळचे जुने प्रसिद्ध गाव. ते कऱ्हाड्यांचे गाव असेही म्हणत. तेथील पाच ‘क’ प्रसिद्ध आहेत, म्हणे. त्यांतील एक ‘क’ कऱ्हाड्यांचा.

गावगाथा या ‘थिंक महाराष्ट्र’च्या लोकप्रिय सदरासाठी लेखन शोधत असताना न्यूयॉर्कचे जयंत कुळकर्णी यांच्यापर्यंत पोचणे झाले आणि खजिनाच हाती आला. जयंत स्वतः उत्साही लेखक-संकलक. त्यांचे वडील वि.ह. हे समीक्षक कुळकर्णी वर्गातील. पण वि.ह. ललित लेखनही उत्तम लिहीत. त्या वि.ह. यांनी त्यावेळच्या साहित्यिक समीक्षकांची ट्रीप कशेळीला नेली होती. तिचे वर्णन अनंत काणेकर यांनी करून ठेवले आहे. तशा साहित्य संस्कृती क्षेत्रातील दोन ‘ट्रिप’ गाजल्या. एक वसंतराव आचरेकर यांच्यासाठी पुलं, कुमार गंधर्व वगैरे मंडळींनी दोन दिवस गाजवले आणि नंतर दापोलीजवळच्या मुर्डीचे श्री ना पेंडसे त्यांच्या गावी दादरच्या शिवाजी पार्क भागातील माधव मनोहर, शशी मेहता अशा बसभर माणसांना घेऊन गेले होते. हे दोन्ही लेख मिळवण्याचा प्रयत्न करू.

कुळकर्णी पितापुत्र यांनी कशेळीबद्दल लिहिले आहे, त्या नंतरच्या काळात विशेषतः कनकादित्य हे सूर्यमंदिर भरभराटीस आले आहे व त्यामुळे ते पर्यटनस्थळ बनत आहे. तेथील काही वैशिष्ट्यांबद्दलही त्यांनी लिहिले आहे : ‘आमची कशेळी– शहरी वातावरणापासून दूर’ !, ‘कशेळी : उगवत्या सूर्याचे गाव’, ‘अमृत्या – आमच्या कशेळीचा फणस’, देवीहसोळची देवीभेट कातळशिल्पावर आणि ‘कशेळीचे आम्ही कुळकर्णी‘ या लेखांत.

आमची कशेळी – शहरी वातावरणापासून दूर !

कशेळी हे गाव रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यात आहे. गाव राजापूरपासून सोळा मैलांवर वसले आहे. गावाची लोकसंख्या सुमारे अडीच हजार आहे. कशेळी हे गाव एका बाजू‌ने अरबी समुद्रकाठी आहे. परंतु किनाऱ्याला डोंगरवजा टेकड्यांचा तट असल्यामुळे गावातून समुद्र दिसत नाही. गाव आटोपशीर आणि देखणे व निसर्गरम्य आहे. गावाचे दोन मुख्य भाग, वरचा वाडा व खालचा वाडा असे आहेत. वरचा वाडा उंच व खालचा वाडा सपाट आहे. खालच्या वाड्यात जो डोंगरवजा उंच भाग आहे त्याला दुर्ग म्हणतात. वरच्या वाड्यात गावातील चावडीच्या पुढील दोन डोंगरांच्या कोपऱ्यात वसलेल्या भागाला कोनी असे म्हणतात. सावरे हा भाग खालच्या वाड्याला लागून, पण एका खोऱ्यात आहे.

गावाच्या पलीकडील मुचकुंदी नदीच्या मुखावरील खाडीतून भरतीचे पाणी गावात भरे आणि शेते पाण्याखाली जात. ते पाणी थोपवण्यासाठी मोठा बांध घातला आहे. त्या बांधाला मोठे दरवाजे बांधलेले असून ते भरतीच्या वेळी आपोआप बंद होतात व ओहोटीच्या वेळी उघडतात. त्याच बांधावरून एस टी च्या गाड्या पूर्णगडाकडे जातात. एस टी चा नाका व बांधावरील दुकाने यामुळे त्या भागाला महत्त्व प्राप्त झाले आहे. बांधाला लागूनच कोमे नावाचा गावाचा एक भाग वसला आहे. शेतीखालील जमिनीत मुख्यतः भात व काही भागात नागली व कुळीथ यांचे पीक घेण्यात येते. नारळी, पोफळी, केळी, आंबे, फणस, चिंच, रातांबा, काजू व अननस वगैरेंची लागवड होते.

कशेळीत कनकादित्य व लक्ष्मीनारायण ही दोन मोठी देवळे असून जाखादेवी, आगवादेवी ही दोन छोटी देवळे आहेत. त्यांत कनकादित्य हे सर्वांत प्रसिद्ध व मोठे देवालय. कनकादित्य म्हणजे सूर्य, सूर्याची फार थोडी देवळे भारतात आहेत. सौराष्ट्रात वेरावळजवळ प्रभासपट्टण येथे एक प्राचीन सूर्यमंदिर होते. दुसरे ’मोढेरा’ या गावी, अहमदाबादपासून सत्तर-ऐशी मैलांवर गुजरातेत आहे. पण ते भग्नावस्थेत आहे. तिसरे कशेळी येथे आहे. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व नेपाळ या भागांत काही थोडी सूर्यमंदिरे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरजवळही एक सूर्यमंदिर असून ते पोंक्षे घराण्याचे कुलदैवत आहे.

प्रभासपट्टण येथील अतिप्राचीन सूर्यमंदिरात सूर्याच्या बारा मूर्ती निरनिराळ्या आसनांवर बसवलेल्या होत्या. अल्लाउद्दीन खिलजी 1293 साली सौराष्ट्रावर चाल करून आला आणि त्याने तेथील सर्व देवालये उध्वस्त करून टाकली, मूर्ती फोडून टाकल्या आणि अगणित संपत्ती लुटून नेली. त्याच्या हल्ल्याचा सुगावा लागल्यामुळे पुजाऱ्यांनी त्यांपैकी काही मूर्ती पुरून किवा बुडवून ठेवल्या असाव्यात. त्या संबंधीची आख्यायिका अशी: वेरावळच्या एका व्यापाऱ्याने त्या मूर्तींपैकी काही मूर्ती जहाजात ठेवल्या व इतर माल घेऊन तो प्रवासाला निघाला. जहाज कशेळी-किनाऱ्याजवळ आले तेव्हा त्याला दृष्टांत झाला. त्याप्रमाणे त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत ठेवली. दुसरी आख्यायिका अशी की कशेळी किनाऱ्याजवळ वादळ झाले. व्यापाऱ्याला दृष्टांत झाला. त्याप्रमाणे त्याने एक मूर्ती समुद्रात सोडली. ती किनाऱ्याला लागली व गुहेत नेऊन ठेवण्यात आली. कशेळीला कनका नावाची गुरव बाई सूर्योपासक होती. तिला दृष्टांत झाला. सूर्यदेव गुहेत उभा आहे. तिने ग्रामस्थांना तसे सांगितले. तिने हट्टच धरला तेव्हा लोकांनी शोध केला. दृष्टांत खरा ठरला. गुहेत साडेतीन फूट उंचीची मूर्ती आढळली. नंतर मुहूर्तावर वाजतगाजत आणून तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. पुढे, तिच्यावर लहानशी घुमटी बांधली. ती पाहण्यास मिळते. मग ग्रामस्थांनी भोवती मोठे देऊळ बांधले.

या देवतेला तत्कालीन शिलाहार राजाच्या वंशातील भोजराजाने शके 1113 साली दानपत्र लिहून त्याचा ताम्रपट करून दिला, तोही उपलब्ध आहे. त्या ताम्रपटावरून देवस्थान किमान आठशेहून अधिक वर्षांचे जुने असावे. मात्र ते देऊळ त्यापूर्वी शंभर ते दीडशे वर्षे अस्तित्वात असावे असेही एक अनुमान आहे. दृष्टांत झालेल्या बाईच्या कनका या नावावरून त्या मूर्तीचे कनकादित्य असे नाव ठेवण्यात आले आणि कनकाबाईचे स्मारक म्हणून देवाच्या सन्मुख असलेल्या आर्या दुर्गेच्या मंदिरात लहानशी घुमटी बांधून तिच्या नावे शिलाखंड ठेवण्यात आला. त्यालाच कनका असे संबोधण्यात आले आणि त्याचीही पूजा करण्यात येऊ लागली. व्यापारी जहाजावरील दुसरी मूर्ती भारताच्या पूर्व किनाऱ्यावर ओरिसात कोणार्क वा कोणारक येथे उतरवण्यात आली आणि तेथे भव्य देवालय बांधण्यात आले. यात्रेकरू तेथे दर्शनासाठी अखिल भारतातून बारमाही जातात.

कशेळीचे गोविंदराव भागवत त्या दंतकथेचा खरेपणा पडताळण्यासाठी तेथे गेले होते. त्यांना कशेळीची व ओरिसातील या दोन्ही मूर्ती सारख्याच मापाच्या असल्याचे दिसले. मात्र मूर्तीच्या शिळा भिन्न प्रकारच्या आहेत. कशेळीच्या मूर्तीची शिळा शाळिग्राम जातीची असून तिच्यातून एक प्रकारचे दिव्य तेज बाहेर पडत असल्याचे दिसते. भागवत हे प्रभासपट्टणलाही जाऊन आले. तेथे त्यांना सूर्यमंदिराचा फक्त चौथरा आढळला. चौकशी करता, तेथील म्युझियममध्ये फुटलेल्या मूर्ती एकत्र बांधून ठेवलेल्या दिसल्या ! त्यांतील काही मूर्ती कनकादित्याच्या आकाराच्या व मागील प्रभावळ एकाच प्रकारची असल्याचे आढळून आले. मूर्तीच्या पायथ्याच्या विटेवर ’श्री सूर्यदेवता’ असे देवतेचे नाव कोरलेले आढळले. गोविंदराव भागवत यांनी अशा रीतीने दंतकथेचा खरेपणा अजमावून खात्री करून घेतली, हे विशेष.

एके काळी, कशेळीच्या या देवस्थानावर यावनी हल्ला झाला होता. त्या वेळी कनकादित्याची मूर्ती उचलून विहिरीत बुडवून ठेवण्यात आली होती. ती मिळाली नाही म्हणून मुसलमान सैनिकांनी रागाने द्वारपालाच्या पायाचे अंगठे कापून टाकले. तेथे असलेली गणपतीची मूर्ती सोंड तोडून, विद्रूप करून टाकली. ती तेथे पाहण्यास मिळते.

कनकादित्याचा उत्सव माघ शुद्ध सप्तमी म्हणजे रथसप्तमीला सुरू होतो. तो द्वादशीपर्यंत पाच दिवस चालू असतो. यात्रा भरते. त्या पाच दिवसांपैकी पहिले चार दिवस गाभाऱ्यातील देवाची पूजा स्त्रियांनाही करण्याची मुभा असते. त्या वेळी कनकादित्याची पत्नी कालिकादेवी (आडिवरे) कनकादित्याच्या रथात येऊन बसते. स्त्रिया त्यावेळी तिची ओटी भरण्यासाठी गाभाऱ्यात जाऊन पूजा करतात. इतर वेळी त्यांना गाभाऱ्यात जाण्याची बंदी असते. अनेक भाविकांनी नवस फेडून देवाला पुतळ्या वगैरे दागिने चढवले आहेत. तो देव मुंबईचे नाना शंकरशेट यांनाही पावला. त्यांच्याकडे कशेळीच्या भागवत घराण्यातील एक गृहस्थ पुजारी होते. नाना शंकरशेट यांस पुत्रप्राप्तीसाठी नवस बोलायचा होता. नवस बोलण्याची ही कामगिरी त्यांनी पुजाऱ्यावर सोपवली. त्याप्रमाणे पुजारी कशेळीला जाऊन, नवस बोलून प्रसाद घेऊन गेले. यथाकाळ, नाना यांना पुत्रलाभ झाला. त्यांनी संकल्पाप्रमाणे देवळाचे सभामंडप बांधून दिले. ते काम 1872 साली झाले. देवालयावर तांब्याचे जे पत्रे बसवले आहेत, ते सावऱ्यातील बाबुशास्त्री गुर्जर यांनी त्यांच्या मुंबईतील दानशूर गुजराती यजमानांकरवी.

कनकादित्याचे आवार प्रशस्त आहे. सभोवती चिरेबंदी पोवळी असून आतली सर्व पापडी ही फरशीची आहे. देवाच्या उजव्या बाजूला लहानशी खोली असून तेथे समाराधना अगर अन्य कारणासाठी स्वयंपाक करण्याची सोय आहे. देवळाच्या प्रवेशद्वारावरील दुमजली इमारतीत वाचनालय आहे. उत्सवात पुराण, कीर्तन, एखादे नाटक वा तमाशा करण्यात येतात, भजनही होते. शिवाय दर रविवारी रात्री भजन केले जाते. मी स्वतः लहानपणी रथसप्तमीच्या उत्सवाला जात असे. त्या वेळी देवळाच्या सभोवती पोवळीला लागून स्थानिक व बाहेरील दुकानदार दुकाने मांडत असत. साखरेच्या रंगीबेरंगी माळा व इतर खाण्याचे जिन्नस वगैरेंमुळे ती दुकाने आकर्षक दिसत. ‘कशेळीं जाउनी कनकोबा पाही’ ही एका गाण्यातील ओळ मला अजूनही आठवते.

कनकादित्याव्यतिरिक्त कशेळीतील दुसरे देवालय म्हणजे श्री लक्ष्मीनारायणाचे. कनकादित्याचे मंदिर खालच्या वाड्यात तर हे लक्ष्मीनारायणाचे देऊळ वरच्या वाड्यात आहे. त्या देवळाचे आवार लहान आहे. सभोवती चिरेबंदी पोवळी आणि पापडी आहे. सभामंडपाच्या टोकाला गरुडाची घुमटी आहे. त्याच्या बाजूला छोटे नाटकगृह बांधलेले आहे. ते देऊळ डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे, वर हमरस्त्याकडे जाण्यासाठी चिरेबंदी घाटी बांधलेली आहे.

लक्ष्मीनारायणाचे मंदिर कनकादित्यापूर्वीपासूनचे आहे असे म्हणतात. देवळातील मानकऱ्यांच्या हक्कासंबंधीची कागदपत्रे आहेत. कशेळीचे कुळकर्णी, कळके, नाटेकर, हर्डिकर, ठाकूर व नाफडे या आडनावांच्या मंडळींचे ते कुलदैवत. देवालयाच्या समोर भजनाची व पुराणाची जी जागा आहे तेथे चौकोनी मोठाले खांब असून कोणत्या खांबाला कोणत्या मानकऱ्याने टेकून बसावे हे ठरलेले असे. कुळकर्णी घराण्यातील बाबुराव केशव हे पेशवे दरबारात मोठे हुद्देदार होते. त्यांनी कशेळी गावी घाट्या व फरसबंदी करवून घेतली. त्यांची आई कनकादित्याच्या देवदर्शनाला जात असताना शेतातील मातीच्या बांधावरून पडली. त्यामुळे त्यांचे मन व्यग्र झाले. तेव्हा त्यांनी त्यांच्या घरापासून कनकादित्याच्या देवळापर्यंत म्हणजे सुमारे पाच-सहा फर्लांग चिरेबंदी वाट तयार करून, त्यांच्या मातोश्रींना देवदर्शनाला जाणे सुलभ करून दिले. त्या वाटेला फरसबंदी असे म्हणतात. त्याच कुळकर्णी यांनी दोन्ही देवस्थानांच्या आवाराची चिरेबंदी पापडी करवून घेऊन सभोवती दहा फूट उंचीची तटबंदी बांधून घेतली. त्यात सिमेंट वगैरे न वापरताही दोन-अडीचशे वर्षे त्या तटबंदीला चीर किंवा भेगही गेलेली नाही. त्या कामासाठी पोर्तुगीज गवंडी वापरल्याचे ऐकिवात आहे.

लक्ष्मी-नारायण देवस्थानाला समुद्रावरून येण्यासाठी एक चोरवाट आहे असे म्हणतात. ती ज्या ठिकाणी समुद्रावरून सुरू होते त्याला ‘नारायण घळ’ असे म्हणतात. गाभाऱ्याच्या मागे बुजलेले एक गवाक्ष आहे. तेथे समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो असे सांगतात. लक्ष्मी-नारायणाचा उत्सव चैत्र महिन्यात पाच दिवस पौर्णिमेपर्यंत चालू असतो. जत्रा वगैरे भरत नाही. परंतु गावच्या आसपासचे लोक येतात. पुराण, भजन, भवती, कीर्तन, तमाशा, दशावतार वगैरे कार्यक्रम होतात. आवारात बांधलेल्या नाट्यगृहात नाटकेही करण्यात येतात. दर शनिवारी रात्री ग्रामस्थ मंडळी जमून भजन करतात.

कशेळीला स्त्रीदेवताही आहेत. त्यांत जाखादेवी ही प्रमुख. त्या देवतेचा इतिहास उपलब्ध नाही. मात्र त्या देवीचा उत्सव आश्विन महिन्यात नवरात्रात दहा दिवस चालतो. देवळामागे दाट जंगल आहे. तेथे पूर्वी लोक शिकारीसाठी जात असत. शिकारीला जाण्यापूर्वी देवीचा कौल मागितला जाई. तेथील श्वापदे नाहीशी झाल्यामुळे ती प्रथा बंद पडली आहे. त्याशिवाय वरच्या वाड्यात आगवादेवीचे छोटे देऊळ आहे. त्या देवीचा उत्सव फाल्गुनात होतो.

– वि. ह. कुळकर्णी
जयंत कुळकर्णी, न्यूयॉर्क jvkny1@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here