बोरी बुद्रुकचे आकर्षण सर्वांगांनी !

1
171

जुन्नर हा एकमेव पर्यटन तालुका महाराष्ट्र राज्यात मानला जातो; म्हणजे तो अनेकानेक आकर्षणांनी भरलेला आहे. तो पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतरांगांच्या कडेकपाऱ्यांत वसलेला आहे. जुन्नर ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी. अष्टविनायकांतील ओझरचा विघ्नेश्वर आणि लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज ही श्रद्धास्थाने त्याच तालुक्यात आहेत. भारतातील सर्वात जास्त बौद्ध लेणी समूह (तीनशेपंचवीस) तेथेच पाहण्यास मिळतात. ऐतिहासिक किल्ले, हेमाडपंती मंदिरे, निसर्गरम्य घाट, प्रसिद्ध धबधबे, नद्या-धरणे, गिर्यारोहकांना आव्हान देणारी दऱ्या घाटातील लिंगीसारखी उंच शिखरे, जंगलातील बिबटे, तमाशाची पंढरी, समृद्ध खाद्यसंस्कृती अशी सारी ख्याती जुन्नर तालुक्याच्या खात्यात आहे. आधुनिक काळात जगातील सर्वात मोठी रेडिओ इलेक्ट्रॉनिक दुर्बीण – जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) जुन्नर तालुक्यातच खोडद या गावी उभारली गेली आहे.

बोरी बुद्रुक हे निसर्गसंपन्न गाव जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या तीरावर वसलेले आहे. तेथे अश्मयुगाच्या खुणा सापडल्यामुळे त्या गावाच्या ऐतिहासिकतेच्या खजिन्यात अपूर्व अशी भर पडली आहे. जगातील निवडक गावांमधील एक असे पुणे जिल्ह्यातील जुन्नर होऊन गेले आहे- मानवाच्या पुरातत्त्वीय इतिहासातील अश्मयुगाची ही ओळख पटली जुन्नर तालुक्याच्या बोरी बुद्रुक गावी. अश्मयुग हे पाच ते दहा लाख वर्षांपूर्वी होते असे मानतात. ते साधारण चारशे लक्ष वर्षे टिकले.

बोरी बुद्रुक हे गाव पुणे-नाशिक हायवेवरील नारायणगावपासून पंधरा किलोमीटर अंतरावर आणि कल्याण-नगर हायवेवरील आळेफाटा गावापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. गावाचा इतिहास तब्बल सात लाख वर्षांपूर्वी इंडोनेशियात झालेल्या ज्वालामुखीचा उद्रेक आणि त्यांतून बाहेर पडलेल्या राखेपासून ते अश्मयुगीन आदिमानवाचे अस्तित्व ते अगदी आधुनिक गाव… असा प्रचंड मोठा वारसा जतन आणि समृद्ध होत आहे बोरी बुद्रुक गावी.

इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या उद्रेकातील राखेचे पुरावशेष डेक्कन कॉलेज (पुणे) यांच्या पुरातत्त्वीय संशोधनातून तेथे आढळून आले. ज्वालामुखीच्या राखेला टेफ्रा असे संबोधतात. टेफ्रा राखेचे दहा ते पंधरा मीटर उंचीचे थर जवळपास पाच ते दहा किलोमीटरपर्यंतच्या सभोवतालात कुकडी नदीच्या परिसरात विखुरले आहेत. मानवाने प्रागैतिहासिक काळात उपयोगात आणलेली अश्मयुगीन दगडी हत्यारे, प्राण्यांचे पुरावशेष, हत्तीचे दोन मीटर लांबीचे सुळे, शहामृगाच्या अंड्यांचे कवच अशा विविध वस्तू त्या टेफ्रा राखेत सापडल्या ! त्यामुळे बोरी गावाला जागतिक ओळख प्राप्त झाली. त्या भूमीत जसा लाकडी नांगर, लोखंडी नांगर फिरला आहे तसा हाडांचा नांगर लाखो वर्षांपूर्वी बोरीतील कुकडी किनारी फिरला. ती हकिगत अश्मयुगीन काळाची. तशा अनेकविध वस्तू बोरी ग्रामपंचायतीच्या इमारतीतील वस्तू संग्रहालयात ठेवल्या आहेत. ते संग्रहालय पुष्पा कोरडे यांच्या सरपंच काळात उभे राहिले.

गावाने ऐतिहासिक ठेवाही जपला आहे. बाराव्या शतकातील हेमाडपंती मंदिर म्हणजे काशी विश्वेश्वराचे (महादेवाचे) आणि जोडीला रेणुकामाता मंदिर. गावातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले ग्रामदैवत बायजामाता सोबत आहे अशी ही जुनी मंदिरे.

हनुमान, राम, काळभैरवनाथ, दत्त ही मंदिरे नव्याने बांधली गेली आहेत. त्या आधुनिक भाविकतेच्या खुणा होत. त्यामुळे गावाची शोभा वाढली आहे. वेदप्रणित रेड्याची समाधी आळे गावी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या भावंडांसह बोरी गावातील रेणुकामाता मंदिरात विसावा घेतला होता. त्याची ओळख म्हणजे रेणुका माता मंदिरासमोरील रेड्याची मूर्ती होय. त्या मंदिराला हजारो भाविक दरवर्षी भेट देतात.

बायजामाता यात्रा हा सांस्कृतिक उत्सव होऊन गेला आहे. महाशिवरात्र महोत्सव, पारंपरिक बैलपोळा आणि पीर बुवासाहेबांची यात्रा अशा वार्षिक घटनांबरोबर हनुमान मंदिरातील सप्ताह, सिद्धेश्वर महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह या परंपरा गावाने जपल्या आहेत. काळभैरवनाथ यात्रेवेळीदेखील अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

जुन्नर तालुक्यातील पहिली सुवर्णपेढी बोरी गावात सुरू झाली. गावात विविध कारखाने नांगर, बैलगाडी, रेवडी-बत्तासे असे होते. बोरी ही कल्याण-पैठण या पुरातन राजमार्गावरील ऐतिहासिक काळापासून मोठी बाजारपेठ राहिली आहे. गावातील मुख्य बाजारपेठेची रचना आणि त्याच्या दुतर्फा असलेले ऐतिहासिक वाडे त्या पुरातन वैभवाची साक्ष देतात. बोरी गाव कापड बाजार आणि किराणा बाजार यांसाठी पंचक्रोशीत ओळखले जाते. पारंपरिक बलुतेदार पद्धतीचा पगडा गावात रुजलेला दिसून येतो. गाव गाडगी-मडकी, चुली, मातीच्या विविध वस्तू, दोरखंड, झाडू, चपला, विविध लाकडी वस्तू, कासार, शिंपी काम, न्हावी काम, लोहारकाम, मासेमारी इत्यादींनी स्वयंपूर्ण होते आणि आहे.

दत्तोबा तांबे यांनी तमाशा या लोककलेला देशपातळीवर प्रतिष्ठा मिळवून दिली. ते राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे पहिले तमाशा कलावंत. परंतु तत्पूर्वी दोन पिढ्या त्यांच्या घराण्यात तमाशा होता. विठाबाईपासूनचे अनेक कलावंतांना त्यांच्यापासून स्फूरण मिळाले आहे.

सिद्धेश्वर मंदिर

बोरी गाव पर्यटन आणि वारसा संवर्धन समिती स्थापन झालेली आहे. समितीमार्फत कुकडी नदीच्या जलाशयात होडीची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नदी पात्रातील टेफ्रा पॉर्इंट जवळून पाहता येतील. मासेमारीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. लोक गावात कृषिप्रधान संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी येत असतात. ‘बटरफ्लाय गार्डन’ आणि बत्तीस एकरांत पसरलेले राखीव वनक्षेत्र यांचा विकास करण्याचे काम वन विभाग आणि बोरी गाव संयुक्त व्यवस्थापन कमिटी यांच्यामार्फत सुरू आहे

बोरी गाव सेंद्रिय भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. ताज्या भाज्या, सेंद्रिय गूळ, मांस-मासे आणि दुग्धजन्य पदार्थ शेतकऱ्यांकडून थेट विकत घेता येतात. बोरी बुद्रुक ग्रामीण शेतकरी उत्पादक कंपनीची तशी व्यवस्था आहे. मासवडी, शेंगुळे, बुळग आणि मिसळ हे तेथील स्थानिक खाद्यपदार्थ विशेष आवडते आहेत.

– अमोल कोरडे 9960007008 korde.amol1@gmail.com

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here