‘विद्यानिकेतन’ ही डोंबिवलीमधील इंग्रजी माध्यमातील शाळा. समाजकार्याची आवड म्हणून विवेक पंडित यांनी ती सुरू केली. शाळेला चाळीस वर्षे झाली. मराठी माणसाने ध्येयवृत्तीने चालवलेली शाळा म्हणून तिचे डोंबिवलीच्या शैक्षणिक आणि सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रात वेगळे स्थान निर्माण झाले आहे. वास्तविक विवेक पंडित यांचे शिक्षण वाणिज्य व व्यवस्थापन ह्या क्षेत्रांमधील आणि त्यांचा कामाचा अनुभव इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, केमिकल, एण्टरटेनमेंट अशा क्षेत्रांमधील. ते तेथे आघाड्यांच्या कंपन्यांचे प्रकल्प सल्लागार होते. त्यातून त्यांना बऱ्यापैकी उत्पन्न मिळत असे, पण त्यांना त्यांची समाजधारणा स्वस्थ बसू देत नव्हती. त्या अस्वस्थतेतूनच ‘राजेंद्र शिक्षण संस्था’ ह्या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ‘विद्यानिकेतन’ ह्या शाळेचा जन्म 16 जून 1985 रोजी झाला.
‘विद्यानिकेतन’ ह्या शैक्षणिक संस्थेची वेगळी ओळख तेथे प्रवेश करताक्षणी लक्षात येते. सर्व ठिकाणी साधेपणा, शिस्त व मूलभूत तत्त्वांशी तडजोड न करण्याची भूमिका दिसून येते. पंडितसरांची वैचारिक बैठक व त्यालाच धरून कृती हे त्यांचे वैशिष्टय मानले जाते. ते म्हणाले, की शाळा सुरू करण्यामागे डोंबिवली शहरात ‘विद्यार्थीकेंद्रित’ आणि ‘पालक-अनुकूल’ शाळा सुरू करण्याची इच्छा होती. सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक परिस्थितीत बदल झाला असल्यामुळे विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक व बौद्धिक शिक्षण देणाऱ्या, त्यांना जबाबदार भारतीय नागरिक बनण्यास मदत व मार्गदर्शन करणाऱ्या शाळेची उणीव शहरांच्या ठिकाणी आहे ह्याची जाणीव झाली. ऋग्वेदातील “आ नो भद्राः ऋतवो यन्तु विश्वतः” ही ऋचा त्यांना मोह घाली. त्या श्लोकाचा अर्थ असा, की समाजातील वाईट प्रथांविरुद्धची लढाई जिंकण्यास आपल्याला मदत करणारे उदात्त विचार सर्व दिशांनी माझ्याकडे येऊ द्या !

डोंबिवली शहरात 1980 च्या दशकात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आणि त्याही मराठी माध्यमाच्या शाळा होत्या. पंडित यांनी इंग्रजी माध्यमाची शाळा बावीस विद्यार्थ्यांसह नवरे बिल्डिंगमध्ये सुरू केली. इंग्रजी माध्यमाचे महत्त्व त्यांच्या लक्षात आले होते. ती काळाची गरज होती. पंडितसरांच्या डोक्यात त्याहून मोठी स्वप्ने होती. शाळा म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील शिक्षण देणारी संस्था न राहता विद्यार्थ्यांना संस्कार, सामाजिक भान, श्रमप्रतिष्ठा, गुरुजनांबद्दल आदर, लहानांची काळजी, देशभक्ती असे गुणविशेष विकसित करता येतील अशी ‘घरकुल’ व्हावी हा त्यांचा ध्यास होता. त्यांनी 1989 मध्ये मानपाडा गावात चार एकर जागा विकत घेतली; बसेसना जाण्यायेण्यासाठी रस्ता केला. शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ते बांधकाम स्टील स्ट्रक्चरचा वापर करून उभे केले जात आहे. बांधकाम कमी खर्चिक आहे. शाळेच्या आरंभ काळात, डोंबिवलीचे नवरे परिवार, प्रमोद काणे, मिलिंद सहस्रबुद्धे ह्यांची भक्कम मदत संस्थेला झाली.

विद्यार्थी व शिक्षक ह्यांच्यासाठी वाचनाची जागा, प्रयोगशाळा- तेथे आठवीनंतर विद्यार्थ्यांना स्वतःहून प्रयोग करण्याची मुभा असे काही शाळेचे विशेष आहेत. त्यांची पत्नी शिल्पा यांनी आर्थिक स्वरूपाचे पाठबळ दिल्यानेच ही शाळा उभी करणे शक्य झाल्याची भावना विवेक पंडित यांच्या मनात आहे. शिल्पा यांचे शाळेसाठीचे आर्थिक व्यवस्थापन, निधीचा विनियोग यांबाबत मार्गदर्शन असते.
शाळेचे वर्ग टप्याटप्याने दहावीपर्यंत वाढवले गेले. पंडितसर हे व्यक्तिशः फीवाढीच्या विरोधात आहेत. शाळा फीवाढ करताना पालकांकडून मते मागवते. त्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष काढून सर्वांना परवडेल अशी फीवाढ शाळा करते. विद्यार्थ्यांच्या फीचे पैसे काटेकोरपणे त्यांच्यासाठीच वापरण्याचे धोरण पाळले जाते.
‘विद्यानिकेतन’ने विद्यार्थ्यांना शाळेतून डबा देण्याची कल्पना राबवली आहे. ज्युनिअर केजी ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतून डबा मिळतो. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेह संमेलन, क्रीडा, सहल एक वर्ष आड आदी गोष्टींचे आयोजन केले जाते. त्यासाठी शाळा वेगळे शुल्क आकारत नाही. विद्यार्थ्यांचा निखळ आनंद हा त्यामागील उद्देश आहे. सिव्हिल डिफेन्स, विविध क्रीडाप्रकार हेही विद्यार्थ्यांना शिकवले जातात. दर महिन्यातील एका शुक्रवारी ‘हॉबी डे’ साजरा केला जातो. त्यात विद्यार्थी पत्ते खेळणे, बागकाम, वर्ग सजावट, संगीताची आवड जपणे इतकेच काय प्रशिक्षित श्वानाबरोबरही खेळतात.
शिक्षक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील धडे विषय सहज सोप्या पद्धतीने आकलन व्हावे अशा भाषेत शिकवतात. कालानुरूप त्याला तंत्रज्ञानाची जोड शाळेने दिली आहे. पंडितसरांचे चिरंजीव अतुल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ‘डिजिटल टिचिंग सिस्टिम’ सुरू करण्यात आली आहे. विज्ञानातील प्रकल्प, इतिहासातील घटना-प्रसंग हेदेखील विद्यार्थ्यांना स्क्रीनवर दाखवले जातात. शाळेने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याना प्लंबिंग, सिव्हिल, इलेक्ट्रिकल फिटिंग यांची प्राथमिक माहिती देण्यास सुरुवात केली. गांडूळ खतासारखे प्रकल्पही शाळेच्या आवारात आहेत.
समाजातील घटकांसाठी थेट मदत करता येत नसली तरी त्यांचे जगणे सुसह्य करता यावे यासाठी शाळा प्रयत्नशील असते. प्रत्येक विद्यार्थी दरवर्षी आदिवासींसाठी एक मूठ तांदूळ व डाळ देतो. पनवेल नजीकच्या एका आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत येजा करण्यासाठी एस टी वर अवलंबून राहण्यास लागू नये यासाठी ‘विद्यानिकेतन’ने त्यांना सायकली दिल्या आहेत.
शाळेने पन्नासहून अधिक ग्रामीण शाळांना ‘डिजिटल टिचिंग सिस्टिम्स’ दिल्या आहेत. शाळेने कारगिल युद्धावेळी विद्यार्थ्यांच्या सहली रद्द करून, ती रक्कम युद्धनिधीस दिली; कोरोना काळात मास्क/सॅनिटायझर/कॅप्स यांचे वाटप केले; चिपळूणला महापूर आला तेव्हा शाळेने औषधे तेथे पाठवली; डोंबिवली परिसरातही पूर आला असता पिण्याचे पाणी आणि धान्य ह्यांचे वाटप केले.

पंडित यांचे स्वत:चे शाळेत व शाळेबाहेर विविध उपक्रम चालू असतात. त्यांना वृद्धांबद्दल कळवळा आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आजीआजोबांसाठी ‘आजीआजोबा संमेलन’ भरवले जाते. त्यांचे काका सखाराम ऊर्फ बापू पंडित यांनी ‘स्नेहबंधन’ वृद्धाश्रम सुरू केला. त्या वृद्धाश्रमाची धुरा विवेकच सांभाळतात. तो वृद्धाश्रम जांभुळपाड्यात आहे. त्याशिवाय त्यांचे नगर जिल्ह्यातील भापकर गुरुजींना- त्यांनी शाळेला दिलेल्या शिक्षकयोगदानापोटी ऋणी म्हणून सहाय्य असते.
विवेक पंडित ह्यांच्याबरोबर त्यांचे चिरंजीव अतुल आणि स्नुषा गौरी हेही ‘विद्यानिकेतन’चा व्याप सांभाळत आहेत. अतुल हे शाळेचे सीईओ आहेत. ते चौथीत असताना शाळा सुरू झाली. त्यांचा सुट्टीच्या काळात शाळेत येणे हा दिनक्रम असायचा. त्यामुळे त्यांना शाळेबद्दल आपुलकी आहे. ते कॉलेज पूर्ण करत असतानाच वाहनचालकांचा तुटवडा होता. तेव्हा त्यांनी शाळेची बस चालवण्याची कामेही केली आहेत. बी ए मानसशास्त्र, एम बी ए (Human Resource) आणि कॉम्प्युटर क्षेत्रातील शिक्षण घेतल्यानंतर, त्यांच्यावर शाळेचे प्रशासन, माहिती तंत्रज्ञान ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. गौरी पंडित ह्या शाळेच्या मुख्याध्यापक आहेत. त्यांनी बी एड (मानसशास्त्र), बी एड (स्पेशल एज्युकेशन), एम एड असे शिक्षण घेतले आहे. पंडित कुटुंबीय पालकांचा शाळेवरील विश्वास हीच त्यांची सर्वात मोठी पावती मानतात.
– बिपीन हिंदळेकर 9920485590 bipinh72@gmail.com
श्री. विवेक पंडित सरांनी सुरू केलेली विद्यानिकेतन शाळा म्हणजे समृद्ध विचारांचं मुर्त रूप आहे. अशा आदर्श व्यक्ती व संस्थांची जाणिवपूर्वक दखल घेऊन थिंक महाराष्ट्र एक सामाजिक चळवळ चालवत आहे. बिपीनजी सोशल नेटवर्किंग उत्तम प्रकारे हाताळत आहेत.