सांगली जिल्ह्यात कराडपासून जवळ कृष्णा नदीच्या खो-यात असलेले सागरेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे सातशे-आठशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा समूह आहे. त्यात सुमारे सत्तेचाळीस मंदिरे असून त्यापैकी सागरेश्वर हे शंकराचे मुख्य मंदिर आहे. तेथे एकूण एकशे आठ शिवलिंग असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते. समुद्राच्या कृपेने गंगा तेथे वास करते अशी धारणा आहे. त्यावरूनच त्या परिसरास सागरेश्वर असे नाव पडले.
देवराष्ट्रे गावाच्या हद्दीत येणारे सागरेश्वर मंदिर प्राचीन आहे. आख्यायिका अशी आहे की, कुंडलचा राजा सत्यवान याला ऋषिमुनींकडून शाप मिळाल्यामुळे त्याच्या शरिरावर जखमा झाल्या. सत्यवान सागरेश्वरच्या जंगलात शिकारीसाठी गेला असता त्याने तेथील कुंडात आंघोळ केली. त्या स्नानाने त्याच्या शरिरावरील जखमा बऱ्या झाल्या. त्यानंतर सत्यवानाने तेथे मंदिराची उभारणी केली. त्यावेळी तेथे एकशेआठ पिंडी निर्माण झाल्या. त्या तेथे पिंडी आजही पाहण्यास मिळतात.
मंदिराच्या परिसरात अन्य देवदेवतांचीही मंदिरे आहेत. तेथे अंबाबाई, उजव्या व डाव्या सोंडेचे गणपती, कार्तिकस्वामी, करकटस्वामी, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमेश्वर, सत्यनाथ, ओंकारेश्वर, वीरभद्रेश्वर, विठ्ठल रुक्मिणी, नंदिकेश्वर, केदारेश्वर, सत्येश्वर, सिध्देश्वर, धोपेश्वर आदी ज्योतिर्लिंगाच्या मंदिरांबरोबरच इतर देवतांची मंदिरे पाहता येतात. तेथे एकूण सत्तेचाळीस मंदिरे व तेरा ओवऱ्या आहेत. सर्व मंदिरांची बांधणी सारखीच आहे. मध्यभागी असणारे देऊळ सर्वात प्राचीन असून ते समुद्रेश्वराचे अर्थात सागरेश्वराचे आहे. सागरेश्वराच्या मंदिरातील पिंडीवर ठेवलेली शाळुंका बाजूला केल्यानंतर खाली पाणी दिसते. मुख्य मंदिराशेजारी पाण्याची तीन कुंडे आहेत. मंदिर परिसरात आंघोळीचे व पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. कुंडात वर्षभर पाणी असते. मंदिरामागे कर्कटक ऋषींची समाधी आहे.
दसरा व महाशिवरात्रीच्या वेळेस तेथे पालखी सोहळा असतो. त्या पालखी लिंगेश्वरचे दर्शन घेऊन पुन्हा सागरेश्वर येथे येतात. श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी तेथे मोठी यात्रा भरते. मुंबई–पुणे त्याचबरोबर पंचक्रोशीतील लाखो भक्तगण सागरेश्वर दर्शनासाठी गर्दी करतात आणि तो परिसर भक्तीरसात चिंब भिजून जातो.
सागरेश्वर देवस्थानापुढे असलेले सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे. ते भारतातील पहिले आणि महाराष्ट्रातील एकमेव मानवनिर्मित अभयारण्य आहे.
– आशुतोष गोडबोले
हे माझे गाव आहे. माझे वडील…
हे माझे गाव आहे. माझे वडील कै.सोपान जो.हरणे. माझी आई कै.साक्रुबाई सो.हरणे.
Comments are closed.