उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का?

0
122

माझ्या मुलाची- नातवाची मुंज

प्रसंग 1
आम्ही (माझी पत्नी शैला व मी) आमच्या मुलाची मुंज सुमारे चाळीस वर्षांपूर्वी लावली. मला आठवत आहे, की त्यासाठी शैलाचा अतिशय आग्रह; किंबहुना, ‘रणजीतची मुंज लावायची’ हा तिचा निर्णयच होता ! त्याबद्दल आमच्यात थोडी चर्चापण झाली. मला मुंज लावण्यामागील तिची ‘समजूत’ (Her Rationale) जाणून घ्यायची होती. पण तिच्याकडून मला तर्कशुद्ध काहीच उत्तर मिळाले नाही. तरीही तिने सांगितलेली दोन कारणे अशी- 1. “माझी आणि तुझी आई, दोघी जिवंत आहेत, तोपर्यंत मुलांची (रणजीतबरोबरच माझा पुतण्या अमर ह्याचीपण मुंज लावण्याचा विचार घरात चर्चिला जात होता) मुंज लावली तर त्या दोघींना किती समाधान वाटेल ! म्हणून आपण मुलाची मुंज लावू या.” व 2. “मुंजीत भटजी श्लोक व मंत्र म्हणून बटूला समजावून त्याचा अर्थ सांगतात. हे मंत्र कानी पडलेले चांगले. तीच आपली संस्कृती आणि आपले संस्कार आहेत आणि आपण आता USA मध्ये राहणार, मग त्याला आपल्या संस्कृतीचा गंधसुद्धा लागणार नाही. ही छान संधी आहे, आपण त्याची मुंज केलीच पाहिजे.”

त्या काळी मला जरी ‘मुंज हा एक बिनजरूरी उपद्व्याप’ वाटत असला तरी ती नाहीच करायची असा माझा आग्रह नसल्याने व ‘गृहशांती’ टिकवून ठेवणे जास्त महत्त्वाचे वाटल्याने आम्ही बऱ्यापैकी थाटात रणजीतची मुंज केली.

भारतात प्रवासात असताना शैला अशोक विद्वांस हे दांपत्य

प्रसंग 2

Fast Forward पस्तीस वर्षे. रणजीत-संजीवनी यांना दोन मुले, अनामिका तेव्हा अकरा वर्षांची व तालिन आठ वर्षांचा. ती आमची नातवंडे. रणजीत-संजीवनी यांनी ठरवले, की त्या दोघांची ‘घरातल्या घरात’ मुंज करायची. त्याप्रमाणे केली !

मला खात्री नाही, की अनामिका व तालिन यांना ‘हा काय प्रकार आहे?’ हे तेव्हा – किंवा आतादेखील पूर्णपणे कळले होते व आहे का ! मला माहीत आहे, की रणजीतच्या मुंजीत माझी जी भूमिका होती तीच भूमिका रणजीतची त्याच्या मुलांच्या मुंजीत होती. मी सरळ संजीवनीलाच विचारले, “तुझ्या मुलांची मुंज केली पाहिजे असे तुला का वाटले?” तिचे स्पष्ट व सरळ उत्तर असे, “माझ्या वडिलांचा ह्या गोष्टींवर संपूर्ण विश्वास होता (संजीवनीचे वडील बारा वर्षांपूर्वी दिवंगत झाले; व तिला दोन बहिणीच आहेत – भाऊ नाही). आम्हाला जर भाऊ असता तर त्यांनी त्याची मुंज नक्कीच केली असती. ते आज असते तर त्यांनी ‘संजीवनी, तू तालिनची मुंज केली पाहिजे’ असा आग्रह धरला असता. माझ्या मुलांची मुंज करण्याचे हे जरी मुख्य कारण आहे तरी मला असेही वाटते, की आमची मुले अमेरिकेत वाढणार व आम्ही त्यांना इतर कोणतेही ‘हिंदू’ किंवा ‘भारतीय’ संस्कार देऊ शकणार नाही. निदान एवढे जरी केले तरी मला तेवढेच समाधान वाटेल !” मी तिला नव्या जगात मुंजीला काहीही अर्थ राहिलेला नाही व यज्ञोपवित संस्कार कालबाह्य झाला आहे असे समजावले. ती हसली व आम्ही विषय तेथेच संपवला !

भाष्य

उपनयन संस्कार कालबाह्य झाला आहे का?

‘उपनयन’ हा हिंदू सोळा संस्कारांपैकी एक धार्मिक संस्कार आहे. त्याची सुरुवात कुटुंबातील बालकाचा ‘विधीपूर्वक शिक्षण-प्रवेश’ व्हावा या हेतूने झाली असावी. ती प्रथा कायमस्वरूपी व शिष्टसंमत होण्यासाठी ती एक ‘धर्मसंस्कार’ म्हणून स्वीकारली गेली.  प्राचीन ग्रंथांतून नमूद केले आहे त्या प्रमाणे त्या काळातील भारतात शिक्षण घेणे याचा अर्थ गुरूगृही राहून वेद, उपनिषद आदी धर्मग्रंथांचा अभ्यास करणे असा अर्थ होता. ती जीवनप्रणाली केव्हाच संपुष्टात आली आहे. तसा अभ्यास करणाऱ्या माणसांची संख्याही नगण्य असेल !

मानवधर्माला मुख्य दोन अंगे असतात. एक म्हणजे धर्म-विचार, धार्मिक चिंतन, किंवा धर्माचे तत्त्वज्ञान; व दुसरे म्हणजे धार्मिक प्रथा किंवा रूढी. सर्व धर्मांचे त्यांच्या अनुयायींना त्यानुसार आदेश असतात. काही गोष्टी अनुकरणीय तर काही गोष्टी निषिद्ध ठरवल्या जातात. तशा आदेशांपोटीच प्रथा, सण व ‘संस्कार’ यांची उत्पत्ती झाली असावी. अमक्या सोमवारी एकवेळ जेवावे, एकादशीला उपास करावा ह्या झाल्या धर्मप्रथा; तर जन्म झाल्यावर बाराव्या दिवशी मुलाचे बारसे व आठव्या वर्षी बटूची मुंज हे हिंदू धर्मानुसार करण्याच्या सोळा संस्कारांपैकी दोन संस्कार. धर्माची अशी चौकट समाजाला एकसंध व व्यवस्थित ठेवण्यासाठी आवश्यक असते. धर्मधुरंधरांची अशी इच्छा असते, की धर्माची बंधने शाश्वत असावी व धर्मात बदल होऊ नये; कारण त्यात त्यांचे स्वहित असते.

परंतु समाज सतत बदलत असतो, किंबहुना सतत बदल हा समाजाचा स्थायिभाव असतो. समाज केवळ धर्माधारित नसतो. अर्थव्यवस्था व राज्यव्यवस्था हीसुद्धा समाजाची महत्त्वाची अंगे असतात. अर्थव्यवस्था जसजशी बदलते तसतशी राज्यव्यवस्था व त्याला अनुसरून संपूर्ण समाज बदलत असतो; त्याप्रमाणे समाजाची जडणघडणसुद्धा बदलत असते. त्या अनुषंगाने कायदेकानू व दंडसंहिता हेदेखील बदलतात. तसेच, नैतिक दृष्ट्या काय स्वीकारार्ह व काय त्याज्य ह्या कल्पनासुद्धा बदलतात. ह्या सर्व बदलांचे दडपण धार्मिक प्रथांवर सतत येते. तात्पर्य, सर्व सामाजिक प्रथांविषयी साधकबाधक विचार करून, धर्मात आवश्यक बदल करणे योग्य ठरते.

पूर्वीच्या काळी विद्याभ्यासासाठी बटूला गुरूजींच्या घरी – आश्रमात – पाठवण्याची प्रथा होती. त्याचे मुख्य कारण हे असावे, की समाजातील ज्ञानी माणसे गाव किंवा शहर सोडून अरण्यात राहत असत. ज्ञानी माणसांनी भौतिक संपत्तीचा मोह करू नये असा प्रघात होता. ज्ञानी व्यक्ती प्रत्यक्षात त्या प्रथेचा विचारपूर्वक, स्वेच्छेने आदर करून दूर जंगलात आश्रम बांधून वास्तव्य करत असत. अर्थातच, ज्याला ज्ञानोपार्जन करण्याचे असेल त्याने घर सोडून गुरूच्या आश्रमात जाऊन राहणे आवश्यक होते. त्यामुळे ज्या वयात मुलगा स्वावलंबी होईल, त्या वयात त्याला गुरुगृही पाठवणे ही पद्धत शिष्टसंमत झाली. त्या प्रथेमुळे, आठ-दहा वर्षांच्या मुलाने आईवडिलांच्या घरापासून दूर जाणे ही ’गुरूकुल’पद्धत प्रचलीत झाली असावी. मुलाला अशा कठीण परिस्थितीत पाठवण्याच्या आधी आई-वडिलांच्या मनाचे समाधान करण्याला व मुलाचे धैर्य वाढवण्याला, ह्या प्रसंगाचा सोहळा करणे ओघाने आले असावे. त्यातून, ‘मुंज लावणे’ व ‘यज्ञोपवित घालणे’ किंवा थोडक्यात ‘उपनयन संस्कार करणे’ हा प्रकार आधी सामाजिक प्रथा म्हणून व नंतर काही काळ लोटल्यावर धार्मिक संस्कार म्हणून अस्तित्वात आला असावा. त्यातील ‘मातृभोजन’ हा कौटुंबिक सोहळा, तर ‘गायत्री-मंत्राचा जप’ हा धार्मिक भाग झाला. माणसाच्या जीवनातील चार आश्रमांपैकी ब्रह्मचर्याश्रमाची सुरुवात तेथे झाली असे म्हणता येईल.

गुरूगृही गेलेला बालक किंवा बटू अध्ययन संपवून व सज्ञान युवक म्हणून घरी परत येत असे. त्या संक्रमण काळात आणि तारुण्यात शिरकाव करताना त्याच्या मनात सर्व प्रकारची प्रलोभने येणे साहजिक आहे. त्याने अशा प्रलोभनांना बळी पडू नये यासाठी उपनयन संस्काराचा भाग म्हणून, त्याच्यावर कांही बंधने लादणे आवश्यक झाले. तीच ‘व्रतबंधने’ झाली. ती बंधने स्वीकारणाऱ्या बटूला ‘व्रतबद्ध’ अशी उपाधी देण्यात येत असावी. ‘मी गुरुंची सेवा करेन’, ‘मी गुरुपत्नीला मातेसमान मानेन’ ही त्यांपैकीच काही व्रते होती. विद्याग्रहण संपले, की बटू पुरूषाच्या रूपात घरी येत असे व लग्न करून वैवाहिक जीवनात प्रवेश करत असे. त्याप्रसंगी त्याची ‘सोडमुंज’ करून त्याला काही व्रतबंधनांतून मुक्त करण्यात येत असे आणि त्याच वेळी वेगळी बंधने, उदाहरणार्थ ‘मी माझ्या आई-वडिलांसकट सर्व कुटुंबीयांचे पोषण करेन’, ‘मी समाजात एक जबाबदार नागरिक म्हणून व्यवहार करेन’ इत्यादी सुद्धा त्याला स्वीकारावी लागत.

 ‘शेतीप्रधान’ समाजाची घडी व्यवस्थित व कायम ठेवण्यासाठी अशी व्यवस्था अस्तित्वात आली असावी. तशाच काही कारणास्तव हिंदू समाजातील ‘वर्णव्यवस्था’सुद्धा अस्तित्वात आली असावी. परंतु ती कालबाह्य झाली आहे.

पूर्वीच्या काळात शिक्षणाचे आवश्यक विषय मोजके (वेदाभ्यास, गणित, शेती-शास्त्र, वैद्यकी व खूप अल्प प्रमाणात खगोलशास्त्र असे) होते. समाज बराच बदलला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात तर आमूलाग्र बदल झाला आहे. नोकरी किंवा व्यवसाय करण्याकरता विविध विषयांत नैपुण्य प्राप्त करणे आवश्यक झाले आहे. अशी परिस्थिती असताना, केवळ श्रद्धेपायी उपनयन प्रथेला, ती अस्तित्वात येण्याची कारणे काय असतील ह्याचा विचार न करता, अनुसरत आहोत. ‘जानवे’ घालणाऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे. तीच परिस्थिती संध्या करण्याच्या बाबतीत आहे. उपनयन-संस्करण करताना तर मंत्रोच्चारणाकडे एकमात्र गुरूजी सोडून दुसऱ्या कोणाचेच लक्ष नसते व गुरूजींचेसुद्धा केवळ नाममात्र लक्ष असते. दीर्घ काळापासून ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णांच्या मुलांची मुंज करणे प्रचलीत होते व आहे. काही धर्मग्रंथांनुसार पूर्वीच्या काळी मुलींवरसुद्धा उपनयन संस्कार होत, परंतु गेली अनेक शतके मुलींची मुंज करण्यात येत नाही. तर मनुस्मृतिअनुसार, शूद्र वर्णाच्या मुलांची मुंज करणे पूर्वीपासून निषिद्ध आहे. असे असूनसुद्धा स्त्रियांचे वा शूद्रवर्णियांचे वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक जीवन सुरळीत चालते. ह्यावरूनदेखील असे वाटते, की मुंज न केल्याने माणसाच्या जीवनात कसलीच आडकाठी येत नाही.

उपनयन संस्कारापासून व्यक्तीच्या ‘ब्रह्मचर्याश्रम’ कालाची सुरुवात होत असे. आधुनिक समाजात चारही आश्रम (ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम) पूर्वी अपेक्षिलेल्या स्वरूपात अस्तित्वात राहिले नाहीत. संन्यासाश्रम तर पूर्वीच्या काळीसुद्धा खरोखर आचरला जात असेल की नाही ह्याची शंका आहे. वरील विवेचन लक्षात घेता केवळ ब्रह्मचर्याश्रमाचा आरंभ सुचवणाऱ्या ‘यज्ञोपवित’ संस्काराला जोपासून ठेवणे योग्य आहे का असा विचार मनात येतो. उपनयन संस्कार व त्याचे प्रतीक म्हणून जानवे घालणे ह्या प्रथा कालबाह्य झाल्या आहेत हेच खरे !

प्रसंग 3

माझे एक जिवलग मित्र आहेत. ते पन्नासपेक्षा अधिक वर्षे अमेरिकेत राहिलेले आहेत. ते कोकणस्थ ब्राह्मण असून त्यांची संपूर्ण श्रद्धा हिंदू धर्म, संस्कार व संस्कृती यांवर आहे. त्यांचा वैदिक साहित्याचा ‘दांडगा’ म्हणता येईल असा अभ्यास आहे. त्यांनी उत्तर अमेरिकेतील बऱ्याच हिंदू मुला-मुलींची लग्नेसुद्धा लावली आहेत. अशा गृहस्थांनी त्यांच्या स्वत:च्या दोन मुलांची मुंज लावलेली नाही ! मी जेव्हा त्यांना त्याचे कारण विचारले, तेव्हा ते म्हणाले, “हा (उपनयन) संस्कार जर सर्व हिंदूंना उपलब्ध नाही, तर केवळ मी ब्राह्मण आहे ह्या नात्याने तो माझ्या मुलांसाठी मला नको आहे.” मी मनातल्या मनात त्यांना नमस्कार करून गप्प झालो !

– अशोक विद्वांस ashok@vidwans.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here