महाराष्ट्रात तेरा शासकीय कला/वस्तू संग्रहालये आहेत. ती शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालये विभागाच्या अधिपत्याखाली येतात. त्यामध्ये एकट्या कोल्हापुरात दोन संग्रहालये आहेत. बाकी गावे अशी – नागपूर, औरंगाबाद, सिंदखेडराजा, तेर, पैठण, नाशिक, औंध, माहूरगड, सातारा, सांगली, रत्नागिरी. त्याशिवाय खासगी संग्रहालये व संग्राहक यांची संख्या ही वेगळीच आहे. वस्तू संग्रहालयांतील कलावस्तू या महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा, सांस्कृतिक बहुविधतेचा आणि कलासंपन्न जीवनशैलीचा वारसा सांगत असतात. त्यामुळे संग्रहालये जपली जाणे- त्यांचे संवर्धन होणे हे महत्त्वाचे होय. त्यासाठी त्यांना लोकाश्रय मिळाला पाहिजे.
सांगली वस्तू संग्रहालयाचा इतिहास वेगळाच आहे. मुंबईचे व्यापारी पुरुषोत्तम मावजी यांनी प्रसिद्ध इतिहास संशोधक पारसनीस, राजवाडे, खरे यांच्या सहाय्याने सांगलीच्या ‘विश्रामभुवन’ या वस्तू संग्रहालयाची स्थापना 1914 सालच्या आसपास केली ! पण मावजी यांनी ते संग्रहालय फार काळ सांभाळले नाही. त्यांनी संग्रहालयाचा ऐतिहासिक दृष्ट्या बहुमोल असा एक भाग मुंबईच्या छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालयास विकला आणि उर्वरित भाग त्यांनी सांगली संस्थानाकडून मोठे कर्ज घेतले होते त्या पोटी त्यांना देऊन टाकला ! तो काळ पहिल्या महायुद्धानंतरचा. सांगली संस्थानिक श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी मात्र मिळालेल्या त्या वस्तूंमध्ये आणखी काही मौल्यवान कलावस्तूंची व कलाकृतींची भर घालून त्यास ‘सांगली स्टेट म्युझियम’ असे नाव दिले. संस्थानाच्या विलिनीकरणानंतर ते म्युझियम मुंबईस नेण्याचा मुंबई सरकारचा मनोदय होता. परंतु महाराजांनी (चिंतामणराव पटवर्धन) संग्रहालय सांगलीत ठेवून ते सांगलीच्या वैभवात भर घालणारे ठरावे यासाठी प्रयत्न केला. मुंबईच्या सरकारने त्यास अनुमती दिली आणि संग्रहालयाचे उद्घाटन 9 जानेवारी 1954 रोजी भारताचे उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. मौल्यवान व दुर्मीळ वस्तू असलेल्या त्या संग्रहालयात तैलचित्रे, जलरंगचित्रे, क्रेऑनमधील चित्रकृती, प्लास्टर–संगमरवर व धातूतील शिल्पाकृती व पुतळे, मूर्ती, हस्तिदंत व चंदनावरील कोरीव काम, निरनिराळ्या धातूंचे ओतकाम व त्यावरील नक्षीकाम, भुसा भरलेले जंगली प्राणी, चीन व जपान यांसारख्या ठिकाणचे उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने असणारी निरनिराळी भांडी, तबके, ताम्रपट इत्यादींचा समावेश आहे.
संग्रहालयास चित्रकलेच्या दृष्टीने ऐतिहासिक असे महत्त्व आहे. ब्रिटिश राजवटीतील जर्मन वंशीय प्रसिद्ध चित्रकार आर्चिबाल्ड हर्मन तथा ए.एच. मुल्लर (1878 -1960) यांची वीसहून अधिक तैलरंग, जलरंग आणि पेस्टल माध्यमातील चित्रे या संग्रहालयाचे महत्त्व वाढवणारी आहेत. ऐतिहासिक व पौराणिक विषयांवरील ती चित्रे पाश्चिमात्य वास्तववादी शैलीतील आहेत. विशेषत: रामायण, महाभारत आणि ऐतिहासिक प्रसंगांवरील त्यांची चित्रे ‘फिगरेटिव्ह कंम्पोझिशन’ या कलाप्रकारात मोडतात. बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक प्राप्त (1911) ‘राजकन्या ब्राह्मणाच्या मुलास सुवर्णाची कर्णफुले दान देत असताना’ हे तैलचित्र या संग्रहालयात विराजमान झालेले आहे. त्याबरोबरच रावण जटायूचे पंख छाटताना, कमलजा लक्ष्मी, कैकेयी विलाप, राम आणि लक्ष्मण यांचे जल पर्यटन, गंगावतरण, कैकेयी आणि मंथरा यांचे संभाषण, राम-लक्ष्मण आणि सीता यांची वनवासातील पहिली संध्याकाळ, जनक राजाच्या दरबारी विश्वामित्र अशी पौराणिक विषयांवरील मुल्लर यांची चित्रे गंगेचा पाताळ प्रवेश त्यांच्या प्रतिभेची साक्ष देणारी आहेत.
स्कॉटिश चित्रकार जेम्स वेल्स (1747-1795) यांनी 1790 मध्ये नाना फडणीस आणि सवाई माधवराव पेशवे यांना समोर बसवून काढलेली तैलचित्रे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवतात. तर ब्रिटिश चित्रकार हॅरोल्ड कॉपिंग (1863-1932) यांनी बायबलमधील दृश्यांवर रेखाटलेल्या जलरंगातील सुमारे दहा लिथो प्रिंट तेथे आहेत. या युरोपीयन चित्रकारांबरोबरच श्रेष्ठ व ख्यातनाम भारतीय चित्रकारांची चित्रे संग्रहालयाच्या वैभवात भर घालतात. चित्रकार आबालाल रहेमान (1856-1931) यांची ऐतिहासिक प्रसंगांवरील तैलचित्रे लक्षवेधी आहेत. त्यामध्ये ‘जिजाबाईंचा छत्रपती शिवरायांना आशीर्वाद’ आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारोहणाचे शिक्षण’ ही तैलचित्रे विशेष प्रसिद्ध आहेत. चित्रकार रावबहादुर एम.व्ही. धुरंधर (1867-1944) यांच्या सुमारे पंचवीसहून अधिक दुर्मीळ व अभिजात कलाकृती त्या संग्रहालयात पाहण्यास मिळतात. जलरंग, तैलरंग आणि क्रेऑन माध्यमातील या कलाकृतींचे विषय ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक आणि काल्पनिक अशा स्वरूपाचे आहेत. धुरंधर यांनी ऐतिहासिक वास्तव आणि कल्पकता यांची सांगड त्यात घातली आहे. त्यांची पुढील प्रसिद्ध चित्रे म्युझियमच्या संग्रहात आहेत – हिंदू नववधू , विवाह समारंभाचे दृश्य (जलरंग), विजयनगरचा पाडाव, टिपू सुलतानबरोबरची लढाई (जलरंग), सूर्यास्तसमयी विलाप करणारी स्त्री (जलरंग), शिंपी दांपत्य (जलरंग), विष्णू आणि साधू (जलरंग), कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण आणि अर्जुन, सोमनाथवरील स्वारी, अफजलखानाच्या वधानंतरचे दृश्य, छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर केलेला हल्ला, औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज, तानाजीचा सिंहगडावरील रात्रीचा हल्ला, सवाई माधवरावांचा 6 ऑगस्ट 1790 चा दरबार.
चित्रकार जे.पी. गांगुली यांची निसर्गचित्रे ही संग्रहालयास आगळी व समकालास अनुरूप अशी शोभा आणतात. त्यांची ‘धुक्यातील रेल्वे’ आवर्जून पाहण्यासारखी आहे. चित्रकार व्ही.व्ही. साठे यांची पेस्टल माध्यमातील दोन स्थिरचित्रे माध्यमावरील हुकूमत दर्शवणारी आहेत. त्यामध्ये त्यांनी सुरई, फुलदाणी आणि फळे यांची उत्कृष्ट रचना केली आहे. त्यांचीही निसर्गचित्रे संग्रहालयाची शोभा वाढवणारी आहेत.
संग्रहालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पावडर शेडिंगमध्ये केलेली ऐतिहासिक व्यक्तींची व्यक्तिचित्रे. पावडर शेडिंगमध्ये सफाईदारपणे केलेला पांढऱ्या जलरंगांचा वापर पाहण्यासारखा आहे. मात्र ज्या कलावंताने ती व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत त्याचे नाव तेथे नाही ! पावडर शेडिंगमधील त्या व्यक्तिचित्रांत मातब्बर ऐतिहासिक चरित्रव्यक्ती आहेत – मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, नाना फडणीस, रणजित सिंग, अलिबहादुर, थोरले माधवराव पेशवे, रघुनाथराव पेशवे, शहाजहान बादशाह, महाराणा प्रताप, टिपू सुलतान, निजाम उलमुल्क, सादत खान, चांदबिबी, राजा सुरजमल, तंजावरचा सरफोजी, छत्रपती शिवाजी महाराज, राजा तोडरमल, सिराज उद्दोल्ला, महंमद आदिलशहा, बाळाजी बाजीराव पेशवा, छत्रपती शाहू, राजा मानसिंग, इब्राहिम अदिलशहा, महंमद अली…
वस्तू संग्रहालयात ग्रीक व रोमन तत्त्ववेत्त्यांचे व योद्धयांचे प्लास्टरमधील अर्धपुतळे लक्षवेधक आहेत. त्यामध्ये पुढीलांचा समावेश आहे – पीटर द ग्रेट, सॉक्रेटिस, डेमॉस्थेनिस, अलेक्झांडर द ग्रेट, पेरिक्सिस, ट्रोजन, क्लिरटी, न्युरो, ज्युलियस सीझर, क्लिओपात्रा, अमेन होटेप, ज्युलिया इम्प्रेस. ‘धनगराचा पोर’ आणि ‘धनगराची मुलगी’ ही दोन उठावशिल्पे अप्रतिम आहेत. प्रसिद्ध शिल्पकार गणपतराव म्हात्रे यांनी 1895-96 मध्ये साकारलेले ‘शबरीच्या वेशातील पार्वती’ हे सुवर्णपदकप्राप्त शिल्प संग्रहालयाची प्रतिष्ठा वाढवते.
संग्रहालयात दस्तावेज व ताम्रपट आहेत. त्यामध्ये विजयनगर कृष्णदेवरायाचा ताम्रपट अतिशय दुर्मीळ असा आहे. त्या ताम्रपटाचा काळ इंग्रजी तारीख 25 सप्टेंबर 1512 हा नमूद आहे. शालिवाहन शक 1934 अंगिरस, अश्विन शुद्ध 15 असा आहे. त्याची संग्रहालयात असणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंमध्ये पुढील नोंद करता येईल – इटालीमधील पिसाच्या झुकत्या मनोऱ्याची संगमरवरी प्रतिकृती, फत्तेपूर सिक्री या ठिकाणी असणाऱ्या सलीम चिस्ती यांच्या कबरीची संगमरवरी प्रतिकृती, जामा मस्जिद (आग्रा) तसेच ताजमहालची संगमरवरी प्रतिकृती. चीन, जपान येथून आणि युरोप खंडातून आणलेले मोठमोठे नक्षीयुक्त पोर्सेलिन फ्लॉवर पॉट्स.
संग्रहालय 30 जून 1976 पासून राज्य शासनाच्या पुरातत्त्व व वस्तू संग्रहालय संचालनालयाच्या अंतर्गत आले. संग्रहालय जुन्या राजवाड्याच्या मागील बाजूस दुसऱ्या मजल्यावर छोट्याशा जागेत आहे. संग्रहालयाला स्वतंत्र इमारत नाही.
संग्रहालय सांगलीत असूनही त्यामध्ये स्थानिक सांस्कृतिक व कलात्मक वारसा प्रतिबिंबित होत नाही. स्थानिक कलावंतांच्या कलाकृती संग्रहालयात असण्यास हव्या होत्या. संग्रहालयात पुरेशी प्रकाशयोजनादेखील नाही. कलाकृतींचे संरक्षण व देखभाल करण्यासाठी आवश्यक कर्मचारी वर्ग नाही.
– बाळासाहेब पाटील 9960379272 bbpatilsangli@gmail.com