मुचकुंदी : विशाळगडापासून पूर्णगडापर्यंत !

3
301

मुचकुंदी ही कोकणातील नदी. तिला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. तिचा जन्म होतो विशाळगडाजवळ आणि ती समुद्राला मिळते पूर्णगडाशेजारी ! एका गडाजवळ उगम पावत अन्य एका गडाजवळ समुद्रात अंतर्धान पावणारी ही एकमेव नदी असावी. मुचकुंदी नदी अनेक गावांना सुजलाम सुफलाम करत पूर्णगड खाडीत उतरून अरबी समुद्राला मिळते.

तिच्या जन्माची कथा अशी. नदीचे जन्मदाते मुचकुंद ऋषी हे सम्राट मांधाता याचे पुत्र होते. त्यांचा इक्ष्वाकू वंशातील महापराक्रमी राजा असा लौकिक होता. ते देवदानव युद्धात बराच काळ लढल्याने त्यांना विरक्ती आली. ते तपश्चर्येसाठी सह्य पर्वतावरील एका गुहेत जाऊन राहिले. तेथे त्यांनी नदी निर्माण केली. तीच मुचकुंदी नदी होय. ऋषींसंबंधी आणखीही एक कथा आहे. त्यांना वरदान असे होते, की जो कोणी त्यांचा तपोभंग करेल तो भस्म होऊन जाईल. हे कृष्णाला माहीत होते. म्हणून जेव्हा कालयवन राक्षस कृष्णाच्या मागे लागला तेव्हा कृष्ण मुचकुंद ऋषींच्या गुहेत जाऊन लपला. त्याने स्वतःचा शेला ऋषींच्या अंगावर पांघरला. त्यामुळे कालयवन फसला. तो ऋषींनाच कृष्ण समजला. त्याने ऋषींना धक्का दिला. त्याबरोबर ऋषींनी डोळे उघडले आणि कालयवन भस्मसात झाला !

मुचकुंद ऋषींची गुहा लांजा तालुक्यातील माचाळ या गावात आहे. माचाळ हे गाव ढगांचे माहेरघरमिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. गिर्यारोहक माचाळ-विशाळगड असा ट्रेक करतात. माचाळ येथे उगम पावलेली मुचकुंदी नदी माचाळवरून खाली उतरताना पाच छोट्यामोठ्या रांजण धबधब्यांच्या माध्यमातून पायउतार होत ‘हरीचं कातळ’ या ठिकाणी जमिनीवर येते. तेथून समोर वर पाहिले की छातीत धडकी भरवणारी माचाळ ते विशाळगड अशी सह्याद्रीची सरळसोट पर्वतराजी दिसते. त्याच पर्वतराजीच्या मध्यावर दसमाहीचा कडा आहे. तो सवतीचा कडा या नावानेसुद्धा ओळखला जातोतो पावसाळ्यात अत्यंत उंचावरून खाली कोसळतो. अशा वेळी धुक्याचे आवरण वरून पांघरलेले असेल तेव्हा साक्षात गंगा अवतीर्ण होऊन खाली कोसळत असल्याचा भास होतो !

सवतीच्या कड्याच्या बाबतीत एक दंतकथा अशी आहे, की माचाळ येथील एका शेतकऱ्याला दोन बायका होत्या. दोघी सवतींपैकी मोठी सवत ही लहान सवतीला कायम पाण्यात पाहायची, तिचा दुस्वास करायची. एके दिवशी, ती लहान सवतीला शेतीच्या कामासाठी डहाळ भरून पातेरा घेऊन ‘दसमाहीच्या कड्या’वर असलेल्या शेताजवळ आली. तिने गोड गोड बोलून सवतीला कड्यालगत आणून, डोक्यात ‘उवा’ झाल्याचे सांगून त्या मारण्याचे काम दिले. मोठ्या सवतीच्या मनात वेगळे काही तरी शिजत आहे याचा छोटीला अंदाज आला. तिने हळूच, मोठीच्या नकळत तिचा पदर स्वत:च्या पदराला बांधला. काही कळण्याच्या आत मोठीने लहान सवतीला कड्यावरून ढकलून दिले. पण तिच्या साडीचा पदर छोट्या सवतीने स्वत:च्या पदराला अगोदरच बांधलेला असल्याने तिच्याबरोबर मोठी सवतही कड्यावरून ढकलली जाऊन, त्यामध्ये दोघींचा अंत झाला !

मुचकुंदी नदीच्या काठाशी प्रभानवल्ली गावाजवळ तीन भुयारे आढळतात. तिन्ही भुयारे ही काळ्या दगडांनी व एकसारख्या रूपात बांधलेली आहेत. त्यांतील डावीकडील दोन भुयारांवर दोन वेगवेगळे शिलालेख कोरण्यात आलेले आहेत. भुयारांची प्रवेशद्वारे चार ते पाच फूट रुंद आहे. आतमधील व्यास प्रवेशद्वारांएवढा मोठा आहे. प्रत्येक भुयार पाच-सहा व्यक्ती सहज बसू शकतील एवढे मोठे आहे. त्या सर्व भुयारांचा नेमका मार्ग कोणालाही माहीत नाही. भुयारे अंतर्गत भागात बंद स्थितीत आढळतातग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ती भुयारे विशाळगडाकडे जातात. संकटकाळात त्या भुयारांमधून पलायन केले जात असावे. भुयारांवर कोरण्यात आलेल्या शिलालेखांवरील भाषा ही अरबी भाषेशी साधर्म्य सांगणारी असली तरी ती अरबी नाही. त्यामुळे त्या शिलालेखांचा अर्थ कळलेला नाही. तिन्ही भुयारांपैकी केवळ दोन भुयारांवर शिलालेख कोरण्यात आलेले आहेत, ही गोष्टही अभ्यासकांना गोंधळात टाकणारी वाटतेशत्रूला गुंगारा देण्यासाठी त्या तीन भुयारांची निर्मिती केली गेली असावी. त्या तीन भुयारांपैकी एक भुयार विशाळगडाकडे जातेउर्वरित दोन भुयारे ही शत्रूला चकवा देण्यासाठी तयार करण्यात आली असल्याचे जुन्याजाणत्या ग्रामस्थांकडून कळते.

भुयारांपासून काही मीटर अंतरावर नदीच्या पात्रात पाटकोंड नावाची खोल कोंड (डोह) आहे. ती कोंड बाराही महिने पाण्याने भरलेली असते. संपूर्ण नदीपात्र उन्हाळ्यात कोरडे पडलेले असताना त्या पाटकोंडीतील पाणी मात्र आटत नाही. पाटकोंडीवरील भुयारांतून बाहेर पडण्याचा मार्ग असल्याचे सांगण्यात येते. तो सुरक्षित व छुपा मार्ग असल्याचे मानले जाते. त्या मार्गाने पुढे थोडे अंतर पोहून जाऊन नदीच्या पलीकडे जाता येते. नदीच्या पलीकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा तुडवत गेल्यानंतर थेट विशाळगड गाठणे शक्य होते असेही स्थानिक जाणकार सांगतात. प्रभानवल्ली गावापासून विशाळगड दोन ते तीन तासांच्या अंतरावर आहे.

मुचकुंदी नदी जेथे अरबी समुद्रास मिळते तेथील संगमस्थानापाशी शेख अली पीर बाबांचा दर्गा आहे. तो गावखडी गावाच्या खाडीकिनारी आहे. तो हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो. जवळच आहे साटवलीची गढी- छोटेखानी किल्ला. तो किल्ला अखेरच्या घटका मोजत मुचकुंदी नदीच्या उत्तर काठावर साटवली बाजारपेठेत जाणाऱ्या रस्त्यावर तग धरून उभा आहे.

साटवली गाव हे मुचकुंदी नदीच्या काठावर असल्यानेपूर्वी ते एक दुय्यम व्यापारी बंदर होते. त्यामुळे तेथील व्यापारावर नजर ठेवण्यासाठी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. किल्ला आकारमानाने छोटा आहे. किल्ल्याच्या तटबंदीवर रचलेले चिऱ्याचे मोठमोठे दगड लक्ष वेधून घेतात. किल्ल्याचे प्रवेशद्वार अस्तित्वात आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर भलेमोठे झाड वाट रोखते. त्याच वृक्षासमोर आयताकृती विहीर आहे. किल्ल्यात वाड्याच्या चौथऱ्याचे अवशेषही आहेत. शाहू महाराज व कान्होजी आंग्रे यांच्या 1713 मध्ये झालेल्या तहात जे सोळा किल्ले कान्होजींना मिळाले त्यांत तो किल्ला होता. त्या बरोबरच नदीकिनार्‍यावर आणखी एक महत्त्वाचा सागरी किल्ला आहेतो आहे पूर्णगड. मुचकुंदी नदी ही पूर्णगडाजवळ असलेल्या खाडीमार्गे समुद्रास मिळते.

– मानसी चिटणीस 9881132407 manasichitnis1978@gmail.com

About Post Author

3 COMMENTS

  1. छान लेख. एका नकाशावर लेखातील ठिकाणे दाखवली असती तर नीट अंदाज आला असता.

  2. सुंदर लेख,अतिशय सुंदर लेखन आणि उपयुक्त माहितीने परिपूर्ण आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here