मला लातूर, कानापूर-मोहा आणि मुंबई ही गावे व्यक्तिगत जिव्हाळ्याची वाटतात. लातूर हे माझे जन्मगाव. लातूर सध्या शिक्षणवर्गांसाठी ‘लातूर पॅटर्न’ म्हणून गाजत असते. माझे लातूरशी भावनिक नाते आहे. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथे झाले. बीड जिल्ह्यातील कानापूर-मोहा हे माझे वडिलोपार्जित गाव. मी उच्च शिक्षण व व्यवसायक्षेत्र म्हणून मुंबई महानगराशी ममत्वाने जोडला गेलो आहे.
देश आणि राज्य स्तरावर नोंद घेता येईल असा भौगोलिक वा नैसर्गिक समृद्धीचा वारसा न लाभलेले लातूर गाव ! मात्र ते भूकंपामुळे सर्व जगास परिचयाचे झाले. मी व्यवसायाने आर्किटेक्ट असल्याने लातूर गावाचा वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन आढावा घेत आहे.
लातूर गावास प्रागैतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. ती तेथे प्राप्त झालेल्या शिलालेखांतून सिद्ध होते. त्या शिलालेखांत लातूरचा उल्लेख लत्तलौर, लत्तनूर, लातनूर असा आढळतो. लातूरचा उल्लेख पापविनाश (भूतनाथ) मंदिरातील दोनांपैकी एका शिलालेखात आढळतो, तो असा- “अस्ति दिव्यं पुरस्त्रेष्ठ लत्तलौराभिधानकं।”
राष्ट्रकूट घराण्यातील अमोघवर्श राजाने वसवलेले मूळ गाव होते लत्तलौर. म्हणजे वर्तमान लातूर ! बदामीच्या चालुक्याने राष्ट्रकूटांचा पराभव इसवी सन 753 मध्ये केला आणि स्वत: तेथे राज्य इसवी सन 773 पर्यंत केले. ते गाव ‘रत्नापूर’ या नावानेसुद्धा ओळखले जात असे. दोन ऐतिहासिक महत्त्वाच्या घटना लातूरशी संलग्न आहेत : एक ब्रिटिशकालीन घटना म्हणजे, बार्शी लाईट रेल्वे (BLR). लातूर-मिरज हा नॅरो गेज तीनशेपंचवीस किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग जोडण्याचे काम एव्हरार्ड काल्थ्रॉप (Everard Calthrop) या ब्रिटिश इंजिनीयरने 1897 साली पूर्ण केले. तत्कालीन नाशिक व बार्शी लाईट रेल्वे या दोन नॅरो गेज मार्गिकांचे काम क्रांतिकारक समजले जाते. बी.एल.आर. रेल्वे लाईन खाजगी तत्त्वावर 1954 पर्यंत चालवली जात असे. स्वतंत्र भारत सरकारने ते हक्क GIPR कडून विकत घेतले. लातूर-बार्शी-मिरज ही ऐतिहासिक रेल्वेलाईन आता इतिहासजमा झाली आहे.
लातूर-मुंबई शहरे ब्रॉडगेजने 2008 साली जोडली गेली. त्यामुळे वर्तमान प्रवास सुकर झाला आहे. ब्रॉडगेज सुरू होण्याआधीचा एस टीच्या लाल डब्बा गाडीतून उभ्याने केलेला प्रवास कोणीच विसरू शकत नाही. त्यांपैकी मुंबई-लातूर प्रवास… मग तो बोचऱ्या थंडीतील असो, की कडक उन्हाळ्यातील तप्त असो, तापदायक होता खरा, पण लातूर सीमेवरील पहिली इमारत दिसली, की गावाच्या ओढीने सलग सोळा तास केलेल्या प्रवासाचा शीण व त्रास विसरण्यास होत असे. दुसरी घटना, मराठवाडा मुक्ती संग्रामाची. उस्मानाबाद जिल्ह्यातील लातूर हे हैदराबाद संस्थानाच्या निजामी सत्तेखाली 1905 पासून 1948 पर्यंत होते. निजाम संस्थानाचा कर वसुली अधिकारी आणि रझाकार फौजेचा मुख्य कासिम रिझवी हा मूळ लातूरचा. भारत सरकारने हैदराबाद निजामाविरूद्ध पोलिस कारवाई करून त्याच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा 17 सप्टेंबर 1948 रोजी मुक्त केला. लातूरही अर्थातच तेव्हा स्वतंत्र झाले.
लातूर हा भौगोलिक दृष्ट्या मराठवाड्यातील बालाघाट पठाराचा भूभाग. लातूर समुद्रसपाटीपासून सहाशेएकतीस मीटर उंचीवर वसलेले आहे. भाग पठारी असल्या कारणाने त्याला नैसर्गिक वारसा खूप कमी आहे. वने कमी म्हणून तुरळक वृक्षसंख्या. पावसाचे प्रमाण कमी म्हणून काटेरी वृक्ष अधिक. मांजरा, तावरजा, तेरणा, रीणा या मुख्य नद्या; रजा, तिरू व धरनी या उपनद्या. लातूरला पिण्याचे पाणी मांजरा नदीतून मिळते. गावाचे तापमान हिवाळ्यात तेरा ते उन्हाळ्यात एकेचाळीस डिग्री सेल्सियसच्या दरम्यान असते. हवा थंड व कोरडी, सरासरी पर्जन्यमान हे साडेसातशे मिलिमीटरच्या आसपास. लातूरच्या सामाजिक महत्त्वाच्या घटना म्हणजे स्वातंत्र्यपूर्व पोलिस कारवाई, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेला भूकंप आणि सलग तीन वर्षांचा कोरडा दुष्काळ व त्यातून ओढवलेले पाणी संकट अशा नोंदता येतात. लातूर-किल्लारी भागात 31 सप्टेंबर 1993 रोजी शक्तिशाली भूकंप झाला. त्यामुळे लातूर गाव जागतिक नकाशावर आले.
लातूर सिद्धेश्वर बँकेच्या संचालकांनी पुढाकार घेऊन लातूर नगरपालिकेसमोर पहिला मजला बांधण्याचा प्रस्ताव1980 च्या दरम्यान मांडला. प्रस्तुत वास्तुविशारद/ लेखकाने त्या ऐतिहासिक इमारतीच्या पहिल्या मजल्याचे आराखडे बनवण्याचे काम 1984 च्या दरम्यान केले आहे. सर्वप्रथम, बाजारपेठेच्या पहिल्या मजल्यावरील पंचवीस टक्के जागेत सिद्धेश्वर बँक उघडण्यात आली. तर अतिरिक्त जागा इतर व्यावसायिक कार्यालयांनी व्यापल्या आहेत. धार्मिक स्थळ व बाजारपेठ हे दोन वेगळे क्रियाकलाप आहेत. तरीदेखील अनेक वर्षे इमारतीच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेत किरकोळ भाजीपाला विक्री होत असे. पहिला मजला पूर्ण झाल्यानंतर इमारतीच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेत अंबामातेचे मंदिर उभारण्यात आले. वास्तविक, देवदर्शनासाठी गरजेची शांतिप्रिय वास्तू बाजारपेठेसारख्या वर्दळीजवळ असू नये असे शास्त्र सांगते ! असो. मंदिराच्या घुमटामुळे गंजगोलाईच्या हवाई दृश्यास एक आगळावेगळा आयाम प्राप्त झाला आहे ही त्यातल्या त्यात जमेची बाजू होय.
गंजगोलाईच्या पूर्वेस लातूर-नांदेड सीमेवर दगडी कमानवजा वेस होती. कमानीच्या पाठी उंच दगडी मनोऱ्यावर घड्याळ व जमिनीलगत पोलिस चौकी होती. ती दोन्ही शिल्पे मुगल स्थापत्यशैलीचा नमुना होती. ती शिल्पे म्हणजे तत्कालीन काळातील स्मृतिचिन्ह असलेल्या महत्त्वपूर्ण गाववारशाचा पुरावा होत. पण तो काळाच्या ओघात नष्ट झाला आहे ! लातूरमध्ये वीरशैव लिंगायत समाजाचे वर्चस्व दिसून येते. त्या पाठोपाठ प्रामुख्याने मराठा, रेड्डी व मुस्लिमधर्मीय यांचा समावेश आहे. कालांतराने व्यापारउदिमाच्या निमित्ताने मारवाडी, गुजराती व जैन समाज तेथे येत गेला आहे. बहुधर्मीय सामाजिक रचनेतून लातूरची जडणघडण झालेली असल्यामुळे तेथे सर्वधर्मीय मंदिरे आढळतात. त्यात प्रामुख्याने सिद्धेश्वर, पापविनाश, केशवराज ही हिंदू मंदिरे आहेत.
सिद्धेश्वर हे लातूरचे ग्रामदैवत. सिद्धरामेश्वर स्वामी हे बाराव्या शतकातील वीरशैव लिंगायत समाजातील तत्त्वज्ञानी संत व कविपुरुष होते. त्यांनी कन्नड भाषेत अनेक वचने लिहिली आहेत. ते निवर्तल्यावर ताम्रद्धाज या राजाने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिद्धेश्वर मंदिर बांधले. ते मंदिर काळ्या घडीव दगडात आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यास लागून दगडी पायऱ्यांत असलेली अंदाजे 60x100x20 फूट खोल आयताकृती पुष्करणी (तीर्थ कुंड) आहे. मंदिर परिसरात; तसेच, कुंडाच्या दगडी भिंतीत असलेल्या कोनाड्यात अनेक देव-देवतांच्या कोरीव दगडातील मूर्ती आहेत. प्रतिवर्षी मंदिरालगतच्या परिसरात माघ-फाल्गुन महिन्यांतील महाशिवरात्रीस मोठी यात्रा भरते.
लातूर येथील पापविनाश (भूतेश्वर) मंदिर हे दुसरे महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. ते चालुक्य घराण्यातील सोमेश्वर (तिसरा) राजाने 1128 मध्ये बांधले. मंदिर परिसरात दोन शिलालेख जतन केले आहेत. मंदिरास जोडून दगडी पायऱ्या असलेली भव्य आकारातील पुष्करणी आहे. तशा रचनेस ‘बारव’ म्हणतात. सिद्धेश्वर व पापविनाश मंदिरांतील बारवा जवळपास सारख्याच आकाराच्या आहेत. आख्यायिका अशी आहे, की त्या मंदिरात वास्तव्यास असलेल्या भारद्वाज ऋषींकडून गाईची हत्या घडल्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना पुष्करणीत विधिपूर्वक स्नान-पूजा करण्याची आज्ञा केली. त्यावरून पुष्करणीत विधिपूर्वक स्नान-पूजा केल्याने पापक्षालन होते ! बारवेच्या उत्तरेकडील दगडी भिंतींत ऐसपैस बसता येईल अशा आकारातील कोनाडे आढळतात. दूरच्या प्रदेशातून येणाऱ्या साधकांना साधना करण्यासाठी कोनाडे बांधले जात. शेतीसाठी बारवेतून पाणी काढण्यासाठी दगडी भिंतीला लागून मोटेची रचना व बारवेचे एकूण दगडी बांधकाम हा वास्तुशिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
श्री केशवराज देवस्थान साधारणतः बाराव्या शतकात बांधले असावे. केशवराज हे विष्णूचे अवतार. याचा अर्थ पूर्वीचे स्थानिक लोक वैष्णव असावेत. देवस्थान हेमाडपंथी शैलीत असून दगडी चिऱ्यात बांधलेले आहे. तसेच, गाभाऱ्यासमोरील मंडपात दगडी खांब आहेत. काळ्या पाषाणात घडवलेली आकर्षक अशी भगवान विष्णूची मूर्ती साधारणतः तीन फूट उंच आहे. ती चांदीचा मुलामा दिलेल्या मखरात सुशोभित केली आहे. मूर्ती भगवान विष्णू यांनी धारण केलेल्या विविध अवतारांतील प्रतिमांत सुशोभित करण्याची प्रथा सबंध वर्षभर चालते. त्या प्रथेमुळे देवस्थानाच्या आवारात वातावरण सदोदित चैतन्यमय असते. प्रतिवर्षी धनत्रयोदशीला दीपोत्सवाचे आयोजन करण्याची प्रथा आहे. महाराष्ट्र सरकारने केशवराज मंदिरासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती अशोक गोविंदपूरकर यांनी दिली. ते केशवराज मंदिराचे ट्रस्टी; तसेच, लातूर महानगरपालिकेचे स्थानिक नगरसेवक आहेत.
त्याशिवाय जैन मंदिर; तसेच, राजस्थानी मारवाडी समाजाचे बालाजी मंदिर, खंडोबा मंदिर ही धार्मिक स्थळे लातूरमध्ये प्रसिद्ध आहेत. जैन मंदिर हीदेखील पुरातन वास्तू आहे. मंदिरात शांतिनाथ भगवानाची मूर्ती आहे. तेथे यक्ष व यक्षिणीच्या मूर्तीपण आढळतात. दुमजली मंदिराचा दर्शनी भाग कोरीव आहे; तसेच, वरच्या मजल्यावर सभामंडप आहे. मारवाडी समाजाने बांधलेल्या जुन्या बालाजी मंदिराचा जीर्णोद्वार काही वर्षांपूर्वी दोन टप्प्यांत पूर्ण झाला आहे. बालाजी मंदिर राजस्थानी चुनखडी व ढोलपूर दगडात बांधले आहे. ते कोरीव कामाचा अप्रतिम नमुना असलेले त्या परिसरातील एकमेव मंदिर असावे. राजस्थानातून आलेला मारवाडी समाज लातूरमध्ये मोठ्या संख्येने आहे.
सुरतशहाअली दर्गा मुस्लिम संत सैफउल्लाह शाह सरदारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1939 मध्ये बांधला. तो पुनरुज्जीवित 1970 मध्ये करण्यात आला. दुसरा दर्गा आहे तो मुस्लिम संत हजरत सुरतशाहावली यांची कबर म्हणून 1669 साली बांधला. तेथे यात्रा जून-जुलै महिन्यांत पाच दिवस भरते. सिद्धेश्वर संस्थान कमिटीतर्फे दर्ग्यावर चादर चढवली जाते तर सुरतशाहावली दर्गा कमिटीतर्फे सिद्धेश्वर मंदिरास श्रीफल, पुष्पहार अर्पण केला जातो. याप्रसंगी परस्पर धर्मांच्या ध्वजांची देवाणघेवाण करण्याची प्रथा आहे.
लातूरमधील वस्त्यांची ओळख देवदेवतांच्या स्थानमहात्म्यावरून ठरलेली दिसते. ते वस्त्यांच्या नामावलीतून स्पष्ट होते. उदाहरणार्थ; पोचम्मा गल्ली, खंडोबा गल्ली, खडक हनुमान, मधला मारुती, औसा मारुती, राम गल्ली, पटेल चौक इत्यादी.
पोचम्मा गल्लीत एका दगडी चौथऱ्यावर शेंदूर लावलेल्या दोन ओबडधोबड पाषाण प्रतिमांना सटवाई म्हणून पूज्य मानले जाते. सट किंवा सटू हा शब्दप्रयोग ‘षष्ठी’ ह्या मुळ शब्दाचा अपभ्रंश आहे. बाळाचा जन्म झाल्यानंतर सहाव्या दिवशी त्याचे नशीब (भविष्य) लिहिणारी देवता म्हणजे षष्टीआई. सटवाई म्हणजे ब्रह्मदेवाची बहीण. ‘सटीचा लेखाजोखा न चुके ब्रह्मादिका’ अशी म्हण या देवीबाबत प्रसिद्ध आहे. या देवीच्या देवळाचे सहसा बांधकाम करत नाहीत. त्यामुळे पोचम्मा गल्लीतील पाषाण प्रतिमांना आगळेवेगळे महत्त्व. देवीच्या पाषाण प्रतिमेवर माथा टेकवल्याने बालकाचे भाग्य उजळते अशी श्रद्धा आहे. एक कोरा पांढरा कागद व पेन असे साहित्य पूजेच्या ठिकाणी ठेवले जाते. पुरातन प्रथेमध्ये आधुनिक काळात पडलेली ही भर. या देवीच्या देवळाचे सहसा बांधकाम करत नाहीत. ही प्रथा नेपाळ तथा भारतातील काही प्रांतांतही पाळली जाते. उत्तर भारतात या देवीस छटीअम्मा असे संबोधले जाते.
लातूरमध्ये अनेक सार्वजनिक उत्सव व धार्मिक सण पाडव्यापासून शिमग्यापर्यंत साजरे केले जातात. होळीनंतर येणाऱ्या रंगपंचमीदिवशी बैलगाड्यांत रंग भरलेले पिंप ठेवून मिरवणूक 1980 पर्यंत निघत असे. पिंपातील रंग मोठ्या पिचकारीच्या माध्यमातून घरांच्या गच्च्यांवर उभ्या असलेल्या गावकऱ्यांवर उडवले जात. घरातील लोकदेखील मिरवणूकीत सामील झालेल्यांवर रंग-मिश्रित पाणी ओतून स्वागत करत असत. ती मिरवणूक दुपारपर्यंत चालत असे. ती प्रथा बंद झाली आहे. तसेच नागपंचमीचा उत्सव टिपऱ्या खेळत (गुजराती गरबा) साजरा केला जात असे. स्थानिक भाषेत या खेळास ‘कोल खेळणे’ असे म्हणतात. शेकडो लोकांच्या उपस्थितीत दोन गटांत शिट्टीच्या सुरावर गोलाकार फिरक्या घेत टिपऱ्या वाजवत चालणारी जुगलबंदी तासन् तास पाहण्यात वेगळीच मजा असे.
स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबईत आर्य समाज पंथाची स्थापना 10 एप्रिल 1887 रोजी केली. पाठोपाठ औरंगाबाद व लातूर; तसेच, मराठवाड्यातील प्रमुख शहरांत आर्य समाज शाखा स्थापन करण्यात आल्या. हैदराबाद मुक्तिलढ्यात आर्य समाजातील जागृत सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आर्य समाज चळवळीमध्ये सर्व जातींचे लोक सहभागी झाले व आंतरजातीय विवाह मोठ्या प्रमाणात होऊ लागले. आर्य समाजी व्यापारी माफक नफा घेऊन उत्तम दर्ज्याच्या वस्तू देत. काही कुटुंबांनीही ती परंपरा शंभरपेक्षा जास्त वर्षे जपली आहे.
लातूरला सामाजिक कार्याची परंपरा मोठी आहे. ‘विवेकानंद हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र’ ही नामांकित संस्था 1966 मध्ये उभी करण्याचे श्रेय डॉ. अशोक लक्ष्मणराव कुकडे, डॉ. रामकृष्ण अलूरकर व डॉ गोपीकिशन भराडिया यांना जाते. स्वांतत्र्यसैनिक व शिक्षण प्रसारक बाबासाहेब परांजपे, स्वांतत्र्यसैनिक व दखनी भाषेचे अभ्यासक देवीसिंग चौहान, हैदराबाद मुक्तिसंग्रामास मुक्त हस्ते देणग्या देणारे व लातुरात शिक्षणसंस्थांची पायाभरणी करणारे उद्योगपती दानशूर पूरणमल लाहोटी, यांनी लातूर घडवले.
भीमाशंकर पंचाक्षरी यांच्यामुळे लातुरात संगीतसभा सातत्याने होत गेल्या. त्यांचा देशातील सर्व गायक-वादकांशी थेट संवाद होता व त्यामुळे अनेक नामवंत कलाकार लातुरात येऊन गेले. शांताराम व शकुंतला चिगरी, मन्मथ बोळंगे, विठ्ठल जगताप, राम व बाबुराव बोरगावकर यांच्यामुळे उत्तम संगीत शिक्षण दिले जाते. लातूर येथील शशिकांत, वृषाली देशमुख, संदीप जगदाळे, हरी जोशी ह्या संगीत प्रसारकांनी ‘आर्वतन’ ही संस्था स्थापली आहे. ती दरमहा शास्त्रीय संगीत मैफिलीचे आयोजन गेल्या दहा वर्षांपासून करत आहे. ‘कलोपासक नाट्य मंडळ’ ही लातूरमधील पहिली नाट्य संस्था 1956 मध्ये सुरू झाली. त्यानंतर ‘नवयुग’ नाट्यसंस्थेने अनेक नाटके रंगमंचावर सादर केली. ‘रसबहार’ नाट्यसंस्थेने अनेक बहारदार नाटके सादर करून नाट्यरसिकांची मने 1968 मध्ये जिंकली. तर सद्य लातूरमधील वैद्यकीय व्यावसायिकांनी मिळून तयार केलेल्या ‘नाट्यस्पंदन’ ग्रूपने नाट्यक्षेत्रात प्रसिद्धी मिळवली आहे.
लातूरला मारवाडी समाजाची संख्या भरपूर असल्याने तेथे गोसेवेला अनन्य महत्त्व आहे. बाजार कमिटीतील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेऊन ‘गोरक्षण’ संस्थेची स्थापना 1950-60 च्या दरम्यान केली. त्या कार्यासाठी आर्थिक मदतीच्या स्रोतात खंड पडू नये म्हणून बाजारपेठेत लिलाव होणाऱ्या विविध वस्तूंच्या विक्री रकमेवर ‘गोसेवाकर’ आकारण्यात आला होता ! गोरक्षण संस्थेच्या माध्यमातून नागरिकांसाठी उत्कृष्ट दर्ज्याचे दुध/तूप इत्यादी पुरवले जात असे.
लातूर व आजूबाजूचा परिसर कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लोकमान्य टिळक यांनी काळाची गरज ओळखून 1891 मध्ये स्वबळावर लातूर येथे पहिली जीनिंग मील उभी केली. त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाप्रित्यर्थ कारखान्यालगतच्या वसाहतीस ‘टिळक नगर’ नाव देण्यात आले. लातूरमध्ये भूईमुग शेंगांची उलाढाल खूप मोठी होते. त्यामुळेच लातूरमध्ये वनस्पती तेलापासून तूप बनवण्याचा कारखाना उभा राहिला. तो कारखाना ‘डालडा फॅक्टरी’ नावाने प्रसिद्ध होता.
राजकीय दृष्ट्या कर्तबगारी मिळवलेले स्थानिक व्यक्ती माजी सहकार मंत्री केशवराव सोनवणे, शिवराज पाटील हे भारत सरकारमध्ये संरक्षण खाते व गृहमंत्रीपदावर होते. शिवाजीराव निलंगेकर व विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यांनी लातूरमध्ये काही विकासकामे केली. त्यांनी अनुक्रमे लातूर-मुंबई ब्रॉडगेज रेल्वे व लातूर एम.आय.डी.सी. प्रस्थापित केली. त्यांनी लातूर, हवाई मार्गानेदेखील जोडले आहे.
पर्यावरण अभ्यासक व लेखक अतुल देऊळगावकर हे जागतिक नकाशावर पोचलेले नाव. त्यांनी जागतिक पर्यावरणावर अनेक अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत. त्यांना अनेक साहित्यकृतींसाठी पुरस्कारित करण्यात आले आहे. मुख्यत: शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले डॉ. जनार्दन माधवराव वाघमारे यांचे योगदान मोठे आहे. ते निग्रो साहित्याचे भाष्यकार, दलित पुरोगामी साहित्य चळवळीचे अभ्यासक आणि नांदेड विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात अनेक उच्चपदे भूषवली. ते राज्यसभा खासदार होते. ते प्रसिद्ध ‘लातूर पॅटर्न’ शैलीचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. सु.ग. जोशी यांनी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांतील ताम्रपट/शिलालेखांच्या अभ्यासासाठी उभे आयुष्य खर्ची घालून ऐतिहासिक दस्तावेज संकलित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साधले आहे.
लातूरमध्ये अनेक पुरातन इमारतींचा जीर्णोद्धार करणे शक्य आहे. मात्र त्या वास्तू या ना त्या कारणांमुळे जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहेत ! अशा जुन्या इमारती व नव्या स्थापत्य वास्तू यांच्या जडणघडणीतून नवीन लातूर शहर मिश्र स्वरूपाला आले आहे. परिणामत: शहराच्या बाह्यरूपात रुक्षपणा आला आहे. अतिविकास योजनेमुळे लातूरचे गावपण हरवले आहे !
लातूरपासून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर परिपूर्ण असलेल्या खरोसा या गावात सहाव्या शतकात कोरलेली बारा लेण्यांची शृंखला आहे. त्यातील काही लेणी दुमजली आहेत. या लेण्यास बालाघाट डोंगराची रांग तसेच आकर्षक नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. लेण्यांपासून थोड्या अंतरावरील डोंगरमाथ्यावर रेणुका देवीचे मंदिर आहे. वन विभागाने लेण्यांपर्यंत पोचण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वृक्षमाला मनोवेधक आहे. संभाजीनगर, वेरूळ येथील धर्तीवर ती जागा विकसित झाली तर एक दिवसीय पर्यटनासाठी ती उत्तम अशी होईल.
– चंद्रशेखर बुरांडे 9819225101 fifthwall123@gmail.com
लातूर व आजुबाजूच्या परिसरा बद्दल जुन्या काळापासून ची माहिती देणारा अतिशय अभ्यासपूर्ण लेख श्री. बुरांडे यांनी लिहिला आहे. अभ्यासकांनी जपून ठेवला पाहिजे असा हा ठेवा आहे. ते सातत्याने निरनिराळ्या व्यक्तिंची व ऐतिहासिक स्थळांची माहिती देत असतात, त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद व पुढील लेखांबद्दल शुभेच्छा