सह्याजीराव सतीश चाफेकर (Satish Chaphekar – Man with Thousands of Autographs)

1
316

स्वाक्षऱ्यांसाठी डोंबिवलीला एक घर आहे ! घराचे नाव आहे ‘हे माझे घर, शब्दाचे’; अन् या अवलिया घरमालकाचे नाव आहे सतीश चाफेकर. ते घर म्हणजे आहे एका छोट्या फ्लॅटची टुमदार खोली, पण तिच्या भिंती भरल्या आहेत सह्यांनी मान्यवरांच्या, ‘स्टार्स’च्या, खेळाडूंच्या. अगदी सचिनची आई रजनी तेंडुलकर आणि कवी ग्रेस यांनी त्या खोलीत येऊन त्यांची त्यांची सही केली आहे. त्या खेरीज, चाफेकर यांनी पस्तीस-छत्तीस डायऱ्या, क्रिकेटच्या कितीतरी बॅटा, टी शर्ट, छत्र्या, मास्क अशा संबंधित अनेकविध साहित्यावर सह्या घेतलेल्या आहेत आणि त्या तेथे जपून-राखून ठेवल्या आहेत. त्यांचे मोल कोट्यवधी रुपयांचे, खरे तर अनमोल आहे.

त्यांनी पहिली स्वाक्षरी वयाच्या अकराव्या वर्षी लष्करप्रमुख जनरल करिअप्पा यांची घेतली होती. पण ती कोठेतरी हरवली. त्यांच्या शाळेजवळ ठाणे येथे नाट्यगृह होते. तेथे नट मंडळी नेहमी दिसत. चाफेकर मित्रांना ‘मी अमक्यातमक्यांना पाहिले’ असे सांगत. मित्रांना ते खरे वाटत नसे. ते म्हणत ‘चल, काहीही खोटं बोलू नको…’ सतीश मग नट, कलाकार मंडळी यांना भेटल्याचा पुरावा म्हणून त्यांच्या सह्या घेऊ लागले. त्यांना छंद हा असा जडला ! ते म्हणाले, की सह्या कशासाठी घ्यायच्या याचे ठोस काही कारण नव्हते. पण पुढे पुढे, ती नशा… वेड लागल्यासारखे, झपाटल्यासारखे झाले.

सतीश चाफेकर यांचे नाव ‘लिम्का बुक’च्या विक्रमवीरांच्या यादीत सहा वेळा नोंदले गेले आहे. त्यांनी सचिन तेंडुलकर यांनी शंभर शतके ठोकली म्हणून तेवढ्या सह्या घेतल्या. त्यांच्या संग्रहात दहा हजारांच्या वर स्वाक्षऱ्या आहेत. त्यात कोण कोण आहेत? राष्ट्रपती, पंतप्रधान, चंद्रावर पाय ठेवणारा पहिला अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग, दलाई लामा, डॉन ब्रॅडमन, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, दुर्गा भागवत आणि त्यांच्या भगिनी कमला सोहोनी – दोघींच्या सह्या आजूबाजूला त्यांच्या घराच्या भिंतीवर आहेत. तसेच, बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांच्याही स्वाक्षऱ्या सोबत, पण डायरीत आहेत. दिलीपकुमार यांची त्यांच्या दुर्मीळ फोटोवर सही आहे.

त्यांचा हा सिलसिला सतत पन्नास-पंचावन्न वर्षे चालू आहे. सतीश चाफेकर यांचा सह्यांचा प्रवास त्यांच्या डोंबिवली व ठाणे येथील घरांत पाहण्यास मिळतो. त्यांचा ‘मी सह्याजीराव’ नावाचा कार्यक्रम आहे. त्यात चाफेकर एकेक सही आणि त्या त्या वेळचा प्रसंग सांगत जातात. अंगावर शहारे येतात, रोमांच उठतात, काही वेळा गलबलून जायला होते. आपण जणू त्या त्या वेळी हजर असल्याचा भास होतो. सारे किस्से ऐकत राहवे असे. चाफेकर ते पुन्हा पुन्हा सांगतात आणि तसेच्या तसे पुन:पुन्हा जगत राहतात.

अमर्त्य सेन, बाबा आमटे यांच्या सह्या… किती किती नावे सांगावी? या ‘सह्याजीरावां’नी या वेडापायी पैसा आणि वेळ किती बहाल केला आहे ! त्याकरता पैसे मिळवण्यासाठी नाना कामे केली. बायकोला नोकरी करायला देऊन स्वत: घर सांभाळले. मुलांना शिकवण्याचे काम केले. ‘मुंबईजवळ राहिल्याने हा छंद जपता आला’ असे चाफेकर कृतज्ञतेने सांगतात. ते म्हणाले, की प्रत्येक नामवंत माणूस मुंबई येथे कधी ना कधी येत असतोच. त्या आगमनाची माहिती वर्तमानपत्रात आली की चाफेकर यांचे त्याप्रमाणे वेळेचे आणि प्रवासाचे नियोजन सुरू होते अन् तेथे स्वाक्षरी मिळवल्याशिवाय चाफेकर परत येत नाहीत. ते म्हणतात, की या छंदासाठी फक्त पाहिजे असते धैर्य, सहनशीलता आणि छंद विकसित करण्याची जबर इच्छा.

सलमान रश्दी, शास्त्रज्ञ रॉजर पेंरोस्ट, गणितज्ञ जॉन नॅश, संगीतकार झुबीन मेहता, अल्लारख्खा, झाकिर हुसेन, हरिवंशराय बच्चन, अरुंधती रॉय, अनिता सुभाषचंद्र बोस… असे कितीतरी जण सह्यारूपाने चाफेकरांकडे आहेत. ते म्हणतात, सह्या घेताना त्या व्यक्तीचा स्वभाव अभ्यासता येतो; तो स्वतःच्या स्वभावात उतरवता येतो. स्वाक्षरीवरून माणसाचे स्वभाव गुणधर्म ओळखता येतात. तसे एक शास्त्र आहे. चाफेकर यांनी ते शिकून घेतले आहे. त्यांनी ‘अक्षरशिल्प’ नावाचे स्वाक्षरी व स्वभाव यांचे विवरण करणारे लेखी सदर एका वर्तमानपत्रात चालवले होते. त्यात मराठी कवी, लेखक प्रामुख्याने आहेत.

त्यांच्याकडे क्रीडा, कला क्षेत्रातील व्यक्तींच्या सह्या भरपूर होत्या, पण अशा काही व्यक्ती ज्यांनी जगाला नवी दिशा दिली, त्यांच्या सह्या मिळाल्या तर… ती संधी त्यांना पवईच्या ‘आयआयटी टेकफेस्ट’ने दिली असे चाफेकर सांगतात. चाफेकर कोण पाहुणा अमक्यातमक्या दिवशी येणार आहे याची माहिती घेऊन त्याची सगळी कुंडली इंटरनेटवरून काढायचे. त्यानंतर ते त्यांना गाठून त्याचा ऑटोग्राफ घ्यायचे. अशाच प्रकारे, त्यांनी पेन ड्राईव्हचा शोध लावणाऱ्या के.स. पुआ यांचा पेन ड्राईव्हवर तर एमपीथ्रीचा शोध लावणाऱ्या ब्रेडन वर्ग यांचा एमपीथ्रीच्या जुन्या मॉडेलवर ‘ऑटोग्राफ’ घेतला. त्यांनी ‘ब्ल्यु ट्युथ’चा शोध लावणारे झॅप आणि इंटरनेटचा शोध लावणारे वीण्ट सर्फ यांच्या सह्या त्यांच्या फोटोवर घेतल्या. चाफेकर दरवर्षी त्या ‘टेकफेस्ट’ला जातात.

चाफेकर सांगतात – ‘मला क्रिकेटचे, क्रिकेट खेळाडूंचे भारीच वेड !’ त्यात क्रिकेट संघातील टीमच्या अकराही खेळाडूंच्या सह्या एका बॅटवर घेण्याचा अनोखीपणा डोक्यात घुसला. सुनील गावस्कर, अजित वाडेकर, कपिल देव, बिजोंन बोर्ग, गॅरी सोबर्स, सचिन तेंडुलकर अशा देशविदेशांतील खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या कधी बॅटवर, कधी टी शर्टवर, कधी चेंडूवर, कधी हॅण्ड ग्लोव्हजवर तर कधी शीतपेयांच्या बाटल्यांवरही घेऊन ठेवल्या आहेत. चाफेकर यांच्याकडे रणजी सामने खेळणाऱ्या संघांतील खेळाडूंच्याही सह्या आहेत.

त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पुढील कारणांसाठी नोंदले गेले आहे –

  1. स्वाक्षरीसंग्रह असलेले डोंबिवलीतील घर.  
  2. राहुल द्रविड यांची क्रिकेट कारकिर्दीत अठ्ठेचाळीस शतके झाली, तेव्हा सतीश चाफेकर यांनी द्रविड यांच्या अठ्ठेचाळीस स्वाक्षऱ्या घेतल्या.
  3. सचिन तेंडुलकर यांच्या 1990 पासूनच्या-शंभर शतके तितक्याच स्वाक्षऱ्या आहेत.
  4. कल्याणच्या प्रणव धनावडे याने 323 चेंडूंत 1009 धावा पूर्ण केल्या. तेव्हा तेहेतीस बॅटवर 323 स्वाक्षऱ्या घेतल्या.
  5. सचिन तेंडुलकर यांच्या 241 शतकांच्या निमित्ताने भारतीय पोस्ट विभागाने केलेला फर्स्ट डे कव्हरचा संग्रह चाफेकर यांनी केला.
  6. अजित वाडेकर यांच्या सदतीस शतकांच्यानिमित्ताने सदतीस स्वाक्षऱ्या.

सतीश चाफेकर यांचे अनेकानेक अनुभव नोंदून ठेवावे असे आहेत. पैकी दोन येथे वर्णन करतो.

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात क्रिकेट सामन्याची लढत होती. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर कसोटी सामना होता. सतीश चाफेकर त्या सामन्याला गेले होते. बाळासाहेब ठाकरे हेही तो सामना पाहण्यास आले होते. चाफेकर त्यांच्याकडे गेले आणि तुमची सही हवी असे म्हणाले. त्यांनी तेथे खूप गर्दी असल्याने सही नंतर देतो असे सांगितले. काही वेळातच, बाळासाहेबांची गाडी बाहेर जाताना दिसली. चाफेकर यांची धावपळ झाली… त्यांना सही हुकणार असे वाटले. सतीश चाफेकर यांनी बॅट उंच करून बाळासाहेबांचे लक्ष वेधले. गाडी थांबली. गाडीत चाफेकर यांना बोलावले गेले. त्यांना तेथे बॅटवर सही आणि फोटोही मिळाले !

काही वर्षांपूर्वी ठाण्यात ‘वस्त्रहरण’ हे नाटक होते. त्या नाटकाने इतिहासच घडवला आहे. चाफेकर यांनी अभिनेते मच्छिंद्र कांबळी असताना कितीतरी वेळा ते नाटक बघितले. त्या विनोदाच्या छत्राने म्हणा छत्रीने म्हणा सतत मनाला सावली दिली. त्यामुळे चाफेकर यांनी वेगळाच प्रयोग केला, म्हणजे त्या संपूर्ण टीमच्या स्वाक्षऱ्या छत्रीवर घेतल्या. त्यात प्रसाद कांबळी यांच्यापासून सर्व कलाकार, मेकअप करणारे, इस्त्री करणारे… बहुतेक सर्वांच्या स्वाक्षऱ्या आहेत. चाफेकर म्हणतात, ‘हे विनोदाचे छत्र असेच राहू दे हीच इच्छा.’

सतीश चाफेकर एरवी कुटुंबवत्सल गृहस्थ आहेत. त्यांची पत्नी नीलिमा आणि मुलगा करण यांना सतीश यांच्या छंदाचे कौतुक आहे. नीलिमा यांनी या छांदिष्ट पतीला छान सांभाळून घेतले आहे. त्यांना गिरगावातील माहेरापासून सामाजिक-सांस्कृतिक वातावरणाची, विशेषत: नाटकांची आवड होती. मुलगा करणचा स्वत: ॲप्स बनवण्याचा व्यवसाय आहे. तो पत्नीसह कल्याणला राहतो.

सतीश म्हणाले, की मी छांदिष्ट म्हणून स्वच्छंदी आहे, पण उनाड नाही. त्यामुळे मी व पत्नीने एकमेकांना सांभाळून घेतले. पत्नीने नोकरी केली व मी घर सांभाळले. अगदी ओटा पुसण्यापासून सर्व घरकाम मी करतो. मी स्वत:ला सौभाग्यपती असेच म्हणतो. सतीश यांचे शिक्षण बी कॉम व एम ए (लिटरेचर) असे झाले आहे. त्यामुळे गरज पडेल तेव्हा ते विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेतात. सतीश यांचे स्वत:चे जीवन फार संयमी आहे. ते म्हणाले, की मी माझ्या गरजा खूप मर्यादित ठेवल्या आहेत. मला जगण्याच्या पलीकडे काही नकोच असते.

सतीश चाफेकर यांचे वय अडुसष्ट वर्षांचे आहे. त्यांना काचबिंदूचा खूप त्रास आहे. ते म्हणाले, की त्यांना फक्त आठ टक्के दृष्टी आहे. दिवसातून आठ-दहा वेळा डोळ्यांत ड्रॉप्स घालावे लागतात. त्यांना त्यांच्या सह्यांच्या संग्रहामुळे ते खूप संपत्तीवान असे निर्देशित करताच ते उद्गारले, की मी सह्या विकण्यासाठी गोळा करत नाही. पैशांच्या दृष्टीने बघितले तर सर्वच स्वाक्षऱ्या, बॅट, स्वाक्षरी केलेले बॉल्स, फोटो हे सर्व मौल्यवान आहेत. जगभर लोक त्याचा व्यवसाय करतात, पण मला त्यात गम्य नाही. माझ्याकडील सह्यांच्या संग्रहातून माणसाची कर्तबगारी प्रत्ययाला येते. माझ्यासाठी ते व तेवढेच पुरेसे आहे.

सतीश चाफेकर 9820680704 satishchaphekar5@gmail.com

– श्रीकांत पेटकर 9769213913 shrikantpetkar13@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. सगळंच काही वाईट नाही.
    भवताल बघितलं तर अनेक चांगली माणसं, चांगली कामं होत आहेत… त्यापैकी एक आज सतीश चाफेकर यांचा अनुकरणीय
    छंद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here