तू सिंगल आहेस?…

1
336

एकटे राहणारे लोक आणि समूहात किंवा कुटुंबात असून एकटे असणारे लोक भवताली आपण बघतो. एकटेपणा ही संकल्पना ‘इंटरेस्टिंग’ आहे. एकटे असणे म्हणजे एकाकी असणे नव्हे. एकटे असणे म्हणजे भरपूर वेळ आहे, कोणी कधीही या, त्या व्यक्तीकडे वेळच वेळ आहे, असे नव्हे. एकट्या व्यक्तीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन, मानसिकता याचा क्वचित त्रास होऊ शकतो; तो एकटे असल्यामुळे नव्हे तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात दुसरे कोणी लुडबुड करत आहे या गोष्टीचा. ‘तू सिंगल आहेस?’ या प्रश्नामागे असलेली उत्सुकता, कुतूहल, कदाचित आकर्षण किंवा बोटचेपेपणाची वृत्ती, या साऱ्याला प्रामाणिकपणे समोर ठेवून ऋता बावडेकर हिने नेमकेपणाने केलेला विचारांचा उहापोह या लेखात आहे. ‘सिंगल’ हे स्टेटस नाही, तर स्वतःच्या स्वातंत्र्यावर आपल्या मनाविरुद्ध इतर कोणी घाला घालत असेल तर त्याला थोपवणे आहे.

एकटेपणाची समीकरणे व्यक्तीनुरूप बदलत जातात, हे निःसंशय ! काही वेळा एकटेपण लादले जाते, तीही गोष्ट वेगळी. पण एकटे राहण्याचा मार्ग ज्यांनी आवडीने निवडलेला आहे, त्यांची स्वतःबरोबर जगण्याची सकारात्मकता, धाडसीपणा, धीटपणा सहिष्णुतेने जाणवून घेतल्यास प्रत्येकाला आपल्या आयुष्यासाठी अनुकरणीय असे काही गवसेल. यासाठी हा लेख अवश्य वाचा.

-अपर्णा महाजन

तू ‘सिंगल’ आहेस?…

लग्न करायचं नाही, एकटं राहायचं हे मी कधी ठरवलं, हा माझा ‘होशो हवास में लिया हुआ’ निर्णय होता का, हे मला आठवत नाही. आईबाबांनी ‘स्थळं’ बघायला सुरुवात केली होती. तोपर्यंत मी जर्नालिझम करून ‘सकाळ’मध्ये नोकरी करायला लागले होते. फार नाही, पण सहा-सातच मुलं बघितली असतील. एखाद-दुसरा अपवाद वगळता प्रत्येक ठिकाणी हेच प्रश्न – ‘स्वयंपाक येतो का?’, ‘नोकरी करून घर सांभाळणं जमणार आहे का?’, ‘वेळ आली तर नोकरी सोडावी लागेल’… वगैरे वगैरे… त्यांचे प्रश्न किंवा भावना चुकीच्या नव्हत्या; पण मला त्या मान्य नव्हत्या.

एक तर मुलीचं किंवा बाईचं क्षेत्र म्हणजे फक्त चूल आणि मूल; त्यातून वेळ उरलाच तर नोकरीचा विचार- तीही संसाराला मदत म्हणून आणि मिळेल ती! आवड, करिअर वगैरे गोष्टी दूरच… असं आमच्या घरात मूळात वातावरण नव्हतं. माझं लग्न व्हावं, अशी आईबाबांची इच्छा असली, तरी आपल्या मुलीला आपण केवळ यासाठी शिकवलेलं, तिच्या पायावर उभं केलेलं नाही यावर ते ठाम होते. त्यामुळं मी जेव्हा त्यांना एकटं राहण्याचा माझा निर्णय सांगितला, तेव्हा त्यांना साहजिकच त्रास झाला, पण ते माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले. एकटं राहताना काय अडचणी येऊ शकतात, कसे अनुभव येऊ शकतात, याबरोबरच त्यावर कशी मात करायची किंवा त्यातून कसा मार्ग काढायचा, याबद्दल ते माझ्याबरोबर बोलत असत. पण शिकवणी घेतल्यासारखं नाही.

बाबा गेल्यानंतर तीन वर्षांपूर्वी जेव्हा आई गेली, अशा दोन्ही वेळी माझा फार मोठा मानसिक, भावनिक आधार गेला; पण त्यांच्या समजूतदार सोबतीमुळं मला एकटं– एकाकी पडल्यासारखं वाटलं नाही. अजूनही वाटत नाही… ते आहेतच ना माझ्याबरोबर!

आम्ही एकत्र राहात नसलो, तरी माझी मोठी बहीण, एक मोठा एक लहान भाऊ आणि त्यांचे कुटुंबीय माझ्याबरोबर असतात. तो फार मोठा आधार मला अजूनही आहे. कोणी कितीही म्हटलं, तरी एकटं राहणाऱ्या बाईला असा आधार लागतोच. आईबाबा, भावंडं यांच्यामुळं मला या पहिल्या टप्प्यावर तसा संघर्ष करावा लागला नाही.

जवळचे, ओळखीचे लोक भरपूर आहेत. माझ्या सुदैवानं काही अपवाद वगळता कुटुंबाबाहेरचेही खूप लोक मला चांगले भेटले – अजूनही भेटतात. मला मित्र (मैत्रिणी) फार नाहीत. सुरुवातीला एका ‘चांगल्या मैत्रिणी’नं असा काही दणका दिला की ‘मैत्री – मैत्र’ या संकल्पनेवरचा विश्वास डळमळीत झाला. तरी बऱ्यापैकी जवळचे मित्र-मैत्रिणी आहेत.

तसं बघितलं, तर घरच्यांच्या पाठिंब्यामुळं एकटं राहणं माझ्यासाठी तितकं अवघड अजूनतरी गेलं नाही. पण एका गोष्टीची मला प्रचंड चीड येते. एकटी राहते म्हणून माझी कीव करणं, हा प्रकार मी सहनच करू शकत नाही. समोरच्यानं उच्चार न करताही माझ्याबद्दलचे ‘गरीब’, ‘बिच्चारी’ असे सगळे भाव, मला त्यांच्या डोळ्यात दिसू लागतात. मी पूर्ण विचार करून माझा मार्ग, माझी लाइफस्टाइल ठरवली आहे. माझ्या मर्जीनं मी माझं आयुष्य जगते आहे, तर मला ‘बिचारी’ वगैरे ठरवणारे हे लोक कोण? आयुष्यात जोडीदार महत्त्वाचा असेलही, किंबहुना आहेच; पण मला तसं वाटत नाही. माझी ती प्रायॉरिटीच नाही, हे त्यांना समजतच नाही. समजत असलं, तरी ते मान्य करायला ते तयार नसतात. ‘असं कसं?’ हा त्यांच्या डोळ्यातला पुढचा प्रश्न असतो. अशा अनुभवांनंतर माझं एक मत झालं आहे. दुसऱ्याची (विनाकारण) काळजी करणं ही अशा लोकांची मानसिक गरज असते. एकदा एखाद्यावर विशिष्ट शिक्का मारला की यांचं समाधान होतं.

सगळ्या गोतावळ्यातही आपण एकटेच असतो, हे वैश्विक सत्य आहे. या अनुषंगानं बोलायचं, तर आम्ही चारही भावंडं शिक्षणासाठी मॅट्रिकनंतर येवल्याहून पुण्याला आलो. सुटीत घरी जाताना एकट्यानं प्रवास करायचो. पत्रकारितेत तर रिपोर्टिंग, असाइन्मेंट्सना वगैरे एकटंच जावं लागतं. रिव्ह्यूसाठी मी एकटी नाटकाला जायचे… आता तर मी सिनेमा, हॉटेल-रेस्टॉरंट्समध्येही एकटी जाते. अगदी लांबच्या सहलींनाही एकटी जाते आणि मुख्य म्हणजे एकटीनं एंजॉयही करते. पण अशी एकट्यानं मजा करता येते, हेच अनेकांना कळत नाही.

‘सकाळ’मध्ये सलग बत्तीस वर्षं नोकरी केल्यानंतर मी स्वेच्छानिवृत्ती घेतली. पुस्तक लेखन, चरित्र लेखन, संपादन, अनुवाद, समुपदेशन अशी कामं मी आता स्वतंत्रपणे करते. हे समजल्यावर, ‘मला बरं वाटलं तू काहीतरी करते आहेस…, ‘असंच स्वतःला गुंतवून ठेवत जा’, ‘आता मला तुझी काळजी नाही’ असं मला ऐकवलं जाऊ लागलं. मी परत अवाक्! तुम्हाला कोणी माझी काळजी करायला सांगितली, असं विचारावंसं वाटतं… पण पुन्हा तेच! ही माझी काळजी नसते, तर त्यांची गरज असते, ती ते माझ्यावर लादत असतात.

माझं आयुष्य माझ्या मनाप्रमाणं जगण्यासाठी, त्यात कोणी ढवळाढवळ करू नये, कोणी मला डिक्टेट करू नये वगैरे कारणांसाठी मी एकटं राहण्याचा निर्णय घेतला… आणि आता हे वेगळंच सुरू झालं आहे. माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘माझ्या स्पेस’मध्ये ते घुसू पाहात आहेत. माझ्या आयुष्याचा ताबा घेऊ पाहताहेत. तोही त्यांच्या सोयीनं, त्यांना वेळ असेल तेव्हा, त्यांची गरज असेल तेव्हा! मी जर त्यांना म्हटलं, ‘इतकी माझी काळजी आहे, तर माझ्याबरोबर राहायला या,’ तर स्वतःचा घरसंसार सोडून येणार आहेत का माझ्याबरोबर राहायला? अर्थात, माझी तशी अजिबात इच्छा नाही, पण त्यांच्या अशा काळजीमुळं (?) माझं आयुष्य ते चमत्कारिक करत असतात. समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना ते समजून घ्यायचंच नसतं. अन्यथा असा क्षणाचा विरंगुळा ते इतर कुठं शोधणार?

सवयीमुळं म्हणा, वैतागामुळं म्हणा, आता हे अंगवळणी पडत चाललं आहे. मात्र यातून वेगळ्या प्रकारचा अलिप्तपणा, दुरावा निर्माण होऊ लागला आहे. तरीही माझ्या मनात कडवटपणा येऊ नये यासाठी मी नेहमीच जागरूक राहते. कारण मला माझं आयुष्य आनंदात जगायचं आहे.

अर्थात प्रत्येक गोष्टीला चंदेरी किनार असतेच… माझे आईवडील, भावंडं यांच्या आधारावरच एकटं राहाण्याचं धाडस मी करू शकले. भरीला पत्रकार म्हणून माझी ‘सकाळ’मधली नोकरी.. या गोष्टी माझ्या निर्णयाला पूरक ठरल्या. जोडीला माझी पर्सनॅलिटी! त्यामुळं माझ्याजवळ फिरकायलाही लोक घाबरायचे – घाबरतात. हे मी मुद्दाम करत नाही. माझ्या जवळचे, मित्रमंडळी यांच्याबरोबर मी धमाल करते – करू शकते. पण एरवी मी ‘No nonsense’ मुलगी/बाई आहे. कोणीही खांद्यावर हात ठेवलेला मी सहन करू शकत नाही आणि हा मेसेज माझा खडूस (?) चेहरा त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचवतो.

त्याचबरोबर आपल्याला काही गोष्टी आवडत नाहीत, आपल्याला निवांतपणे आपल्या टर्म्सवर जगायचं आहे; मग आपणही काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी, असं मला वाटतं. स्वातंत्र्यही जबाबदारीनंच पेललं पाहिजे. त्यासाठी मी स्वतःपुरत्या काही गोष्टी ठरवल्या आहेत. मी उगाचंच धाडस करायला जात नाही. विनाकारण रिस्क घेत नाही. कोणाबरोबर मुद्दाम भांडायला जात नाही. रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहात नाही, तसं राहावं लागलंच तर माझ्या परतीची सोय करते, सोय झाली नाही तर तो कार्यक्रम रद्द करते. माझं वागणं-बोलणं-लिहिणं मर्यादेत असतं. याचा अर्थ, ‘मी घाबरट आहे’ असा कोणी काढला तरी माझी हरकत नसते. कारण मी कशी आहे, हे कोणाला सांगण्याची गरज मला वाटत नाही. मात्र, वेळप्रसंगी मी माझं रौद्र रूपही दाखवू शकतो, तेवढी ताकद माझ्यात नक्कीच आहे. एरवी माझं आयुष्य जगताना मला कसलेही अडथळे नको आहेत. कोणाचीही लुडबूड नको आहे. मी कोणाच्या अध्यात मध्यात नाही, तसंच इतर कोणीही माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे.

एवढी काळजी घेऊनही ‘वेगळे’ अनुभव येतातच आणि ते परिचितांकडूनच अधिक येतात. अशावेळी कसं वागायचं, हे प्रत्येक बाईला माहिती असतं. संबंधित व्यक्तीला त्यातून व्यवस्थित मेसेज जातो. नाहीच गेला, तर स्पष्ट बोलावं लागतं. अनेकदा मला म्हटलं जातं, ‘तू फार कर्टली बोललीस/वागलीस.. माणसं दुखावतात अशानं!’ ते दुखावले जात असतील तर त्यांनी असं घाणेरडं वागू नये. मला माझी मनःशांती हवी असेल, तर समोरच्याला तशी समज द्यायलाच हवी, असं मला वाटतं.

पण या सगळ्या गोष्टी वाटतात तितक्या सोप्या अजिबात नसतात. कुठल्याही कारणानं, मनाप्रमाणं, मनाविरुद्ध एकट्या राहणाऱ्या – एकटं राहावं लागणाऱ्या बायका मी बघते. काळजीनं चौकशी करणाऱ्यांची नजर आणि विनाकारण केलेले स्पर्श फार भयानक असतात. त्यात त्या बाईला कोणाचाच आधार नसेल, तर ती ‘पब्लिक प्रॉपर्टी’च होते. हे जरी खरं असलं, तरी एकटं राहण्याचा प्रसंग आलाच, तर महिलांनी प्रथम मनानं स्ट्राँग व्हायला हवं. कारण असल्या प्रसंगांचा फार त्रास होतो. आपल्याच शरीराची किळस वाटायला लागते, पण एकट्या बाईला या गोष्टी टाळता येत नाहीत. कधी कळत, कधी नकळत या गोष्टी सगळ्याच बायकांच्या वाट्याला येतातच.. आणि एकट्याच का? विवाहित स्त्रियादेखील यातून सुटत नाहीत.

अर्थात, एकटं राहायचं म्हणजे घरातल्यांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर, जगाबरोबर फटकून राहायचं असं अजिबात नाही. हे सगळं सांभाळून, सगळ्यांबरोबर राहून आपल्याला आपलं एकटेपण छान जपता येतं, एंजॉयही करता येतं. मात्र, एकटं म्हणजे एकाकी नव्हे, हे स्वतःला आणि भोवतालच्या सगळ्यांनाच सतत सांगायला लागतं..

ऋता बावडेकर 9922913364 ruta.bawdekar@gmail.com

About Post Author

1 COMMENT

  1. स्वतः निर्णय घेऊन एकटी राहणारी स्त्री ही संकल्पना आपल्या समाजात अजून तितकीशी रुजलेली नाही. त्यामुळे स्वीकारली जाण्याचा प्रश्नच नाही. तरीही लेखिकेचे खूप कौतुक आहे. आपल्या स्वतःबद्दल एखादा धाडसी निर्णय घेणे आणि तो अमलात आणणे हे वाटते तेवढे सोपे नाहीय. एकटेपणा लादल्या गेलेल्या स्त्रियांचे प्रश्न अजून वेगळे आहेत. तेही लेखामध्ये समर्पकरीत्या मांडले गेले आहेत. त्या स्त्रीच्या अडचणी समजावून घेण्यापेक्षा ‘सल्ले’ देण्यात लोकांना जास्त आनंद येतो. आपण स्वतः मानसिक आणि शारीरिकरीत्या खंबीर असणे हा उत्तम पर्याय आहे. खूप छान लेख आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here