टीच – माणसे घडवणाऱ्या व्यवस्थेचा दिशादर्शक (TEACH Tool for School Inspection)

0
557

वर्गात शिकवण्याच्या पद्धतींच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातच कोणतीही प्रमाणित साधने वापरली जात नाहीत. असे साधन विकसित करण्याची गरज जागतिक स्तरावरील अभ्यासकांना तीव्रतेने जाणवली. त्यामधून जागतिक बँकेच्या शिक्षण गटाने TEACH हे प्रमाणित वर्गनिरीक्षण साधन विकसित केले आहे.

या साधनामुळे शिक्षकांच्या अध्यापनाची गुणवत्ता मोजण्यासाठी, एवढेच नव्हे तर जिल्हा, राज्य, देश पातळीवरील शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी, शिक्षणसुधारणेचा कोणताही कार्यक्रम-अभ्यासक्रम-पाठ्यपुस्तके यांची परिणामकारकता तपासण्यासाठी एक समान आणि विश्वसनीय अशी मोजपट्टी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने ऑक्टोबर 2023 मध्ये राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पथदर्शी स्वरूपात या साधनाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्ड बँकेच्या निकषानुसार प्रशिक्षित झालेल्या ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ या संस्थेतील दहा प्रशिक्षकांनी या आठ जिल्ह्यांतील एकशेचौदा अधिकाऱ्यांना या साधनाच्या वापराबाबतचे प्रशिक्षण दिले.

हे साधन विकसित करण्यामागचा दृष्टिकोन ‘इनस्पेक्शन नावाच्या प्रक्रियेत शाळांची, शिक्षकांच्या कामाची तपासणी करण्याचा प्रमुख हेतू केवळ ‘उणीवा शोधणे’ हा नाही तर ‘गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करणे आणि दिशा देणे’ हा आहे. या साधनाविषयी सांगत आहेत सुजाता लोहकरे, निवृत्त विभाग प्रमुख, भाषा विभाग, स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, पुणे. ‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

टीच- माणसे घडवणाऱ्या व्यवस्थेचा दिशादर्शक

आपली मुले चांगली शिकावी यासाठी जगातील प्रत्येक आईबाप त्यांच्या त्यांच्या समजुतीनुसार आणि ताकदीनुसार धडपडत असतात. त्या शिकण्याचा बरे-वाईटपणा ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक असतो शाळा आणि शाळेतले शिक्षकाचे शिकवणे…! शिक्षणाची गुणवत्ता हा जगभरातील शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ व विचारवंतांसाठी कायमच अभ्यासाचा व संशोधनाचा विषय राहिला आहे. जगभरात झालेल्या अद्ययावत संशोधनातून सिद्ध झाले आहे, की शाळेतील अध्यापन हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील सर्वात महत्त्वाचा गुणवत्ता निर्धारक आहे.

शिक्षणाची गुणवत्ता – आपल्या भोवतालच्या जगाचा शोध घेणे, त्याचा अर्थ लावणे व त्याच्याशी जुळवून घेणे या प्रक्रियांमधून मुलांचे ‘शिकणे’ होत असते. हे सारे त्यांच्या परिस्थितीतील अनेक घटकांशी होणाऱ्या आंतरक्रियांमधून घडते. मुलांच्या भोवतालची परिस्थिती सतत बदलत असते. त्या बदलांना अनुसरून मुलांचे ‘शिकणे’ योग्य दिशेने व्हावे म्हणून औपचारिक शिक्षण व्यवस्थेत जाणीवपूर्वक बदल केले जातात. विषयरचना, आशय, पाठ्यक्रम, अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती, पाठ्यपुस्तके हे सारे ठराविक कालावधीनंतर, नियोजनपूर्वक बदलत असते. हा बदल समजून घेऊन वर्गातील शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रिया घडवून आणण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची, मध्यवर्ती असते. म्हणूनच शिक्षकांसाठी सातत्याने सेवांतर्गत प्रशिक्षणे आयोजित केली जातात. मात्र अगदी केंद्रीय पातळीपासून आखलेल्या व्यापक प्रमाणातील सेवांतर्गत प्रशिक्षणाच्या प्रयत्नानंतरही शिक्षकांच्या शिकवण्याच्या पद्धतीत जाणवण्याइतपत बदल आढळला नाही” अशी नोंद देशपातळीवरील ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005’ मध्ये केलेली आहे.

महाराष्ट्रातील प्रयत्न – प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी महाराष्ट्र राज्यात 1998 पासून अनेक प्रयत्न आणि प्रयोग होत आहेत. स्मार्ट पी.टी. या 1998 मधील प्रशिक्षण कार्यक्रमाची राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा आणि अनुकरणही झाले. त्यानंतर दर पाच वर्षांनी बदललेला अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके समजून घेण्यासाठी झालेली प्रशिक्षणे, ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र चळवळ’, ‘मूलभूत वाचन व गणित क्षमता विकास कार्यक्रम’ असे कार्यक्रम आणि त्यांची प्रशिक्षणे झाली. जिल्हा पातळीपर्यंत शिक्षक प्रशिक्षणासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला. हळुहळू शिक्षक प्रशिक्षणांची संख्या वाढली. मात्र वर्गातल्या शिकण्या-शिकवण्याची गुणवत्ता त्या प्रमाणात वाढली नाही. त्याची दोन महत्त्वाची कारणे जागतिक स्तरावरील अलीकडच्या संशोधनातून पुढे आली आहेत.

  1. प्रशिक्षणातून शिकवलेल्या गोष्टी वापरून वर्गात अध्यापन करताना अनेक शिक्षकांना जी मदत लागते ती मिळत नाही. जगभरातील शिक्षकांना अध्यापनात सुधारणा करण्यासाठी व त्यांच्या अध्यापन कौशल्यांचा विकास करण्यासाठी सातत्यपूर्ण अभिप्राय, सराव आणि योग्य मदतीची आवश्यकता असते.
  2. व्यवस्थेतील केंद्रप्रमुखांपासून ते शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंतचे अधिकारी वर्ग तपासणी करतात मात्र त्यांचा दृष्टिकोन आणि हेतू सर्वसाधारणपणे ‘तपासणी’चा अधिक आणि मदत व मार्गदर्शनाचा कमी असतो. शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेत वर्गात काय घडते हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील सर्वात महत्वाचा पैलू आहे. मात्र वर्ग निरीक्षण करताना सर्वसाधारणपणे या प्रक्रियेला कमी महत्त्व दिले जाते. वर्गनिरीक्षण करणारे अधिकारी शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या त्यांच्या समजुतींवर आधारित अभिप्राय देतात. तपासणी करण्यासाठीचे निकष, मुद्दे त्यांच्या समजुतीनुसार ठरवले जातात. त्यामुळे वर्गातल्या अध्यापनाची गुणवत्ता आणि सुधारणेची गरज ठरवण्याच्या प्रक्रियेत कमालीची व्यक्तिनिष्ठता येते. परिणामी सुधारण्यासाठी नेमकी दिशा शिक्षकांना मिळू शकत नाही.

TEACH Tool वर्गनिरीक्षणाचे प्रमाणित साधन: वर्गात शिकवण्याच्या पद्धतींच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेवण्यासाठी जगभरात कोणतीही प्रमाणित साधने वापरली जात नाहीत. वर्गात मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत काय घडते आहे याची नेमकेपणाने नोंद घेता यावी, विकसनशील देशातील अध्यापनाच्या गुणवत्तेचा मागोवा घेता यावा आणि ती सुधारण्यास मदत करता यावी असे साधन विकसित करण्याची गरज जागतिक स्तरावरील अभ्यासकांना तीव्रतेने जाणवली. त्यामधून जागतिक बँकेच्या शिक्षण गटाने TEACH हे प्रमाणित वर्गनिरीक्षण साधन विकसित केले आहे.

जागतिक स्तरावरील शिक्षण तज्ज्ञ, अध्यापनशास्त्र तज्ज्ञ, मूल्यमापन तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ आणि शिक्षक यांच्या सहभागाने सन 2017 ते 2021 या कालावधीत या साधनाच्या विकसनाची व प्रमाणीकरणाची पद्धतशीर प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर छत्तीस देशांमध्ये या साधनाचा वापर करण्यास सुरुवात झाली. शिक्षकांच्या सध्याच्या अध्यापन पद्धतीचे मूल्यमापन करून त्यात निर्विवाद सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेने त्यांना मदत करण्यासाठी उचललेले हे पहिले पाऊल आहे. पूर्व प्राथमिक स्तरासाठीही टीच टुल, हे Teach ECE या नावाने उपलब्ध आहे. Teach Secondary आणि Teach Remote ही साधने विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे.

मुले शिकावीत यासाठी शिक्षक काय करतात? हे साधन म्हणजे वर्गात शिक्षक शिकवत असताना निरीक्षण करून नोंदवण्याची अठ्ठावीस मुद्यांची एक सूची आहे. शिक्षकांचे कोणकोणते वर्तन मुलांच्या शिकण्यावर परिणाम करते याचा शास्त्रशुद्ध विचार यामध्ये केलेला दिसतो. शिकण्यासाठी पुरक वातावरण, शिकवण्याची पद्धती आणि सामाजिक व भावनिक कौशल्यांचा विकास हे तीन प्रमुख विभाग आहेत. प्रत्येक विभागात हे घडावे यासाठी शिक्षकाने वर्गात नेमके काय करणे अपेक्षित आहे हे सांगणारी स्पष्ट विधाने दिलेली आहेत. त्यामुळे वर्ग निरीक्षण करताना नेमके काय बघायचे ते निरीक्षकाला स्पष्टपणे समजते. उदाहरणार्थ- मुलांना शाळेत आणि वर्गात यावेसे आणि शिकावेसे वाटावे यासाठी वर्गातील वातावरण पूरक (Conducive) असणे आवश्यक असते. ते वातावरण मुख्यतः शिक्षकाच्या वर्तनावर अवलंबून असते. त्यासाठी 1. शिक्षक मुलांशी आदराने वागतात. 2. मुलांनी वर्गात काय करायचे आहे हे (वर्तन अपेक्षा) स्पष्टपणे सांगतात. 3. मुलांच्या गरजांना प्रतिसाद देतात आणि 4. मुलांमध्ये लिंग/अपंगत्व अशा मुद्यांवरून भेदभाव करत नाहीत (मुलांमधील रुढ कल्पनांना आव्हान देतात.) या चार वर्तनांचा समावेश आहे. हे वाचल्यावर एक प्रश्न साहजिकच मनात येतो. शिक्षक मुलांशी आदराने वागतात हे वीस मिनिटांच्या वर्ग निरीक्षणावरून ठरवायचे कसे? त्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीतील अनेक वर्गांचे निरीक्षण करून ठरवलेले निदर्शक पुस्तिकेत दिले आहेत. उदाहरणार्थ त्या वीस मिनिटांच्या कालावधीत शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या नावाने संबोधतात का? मुलांशी बोलताना सांस्कृतिक दृष्ट्‍या आदर/आपुलकी दर्शवणारे शब्द (बाळ/बेटा) वापरले का? याचे निरीक्षण करून नोंद घेता येते. प्रत्येक घटकाच्या वर्तनाला कमी, मध्यम आणि उच्च अशा तीन पैकी एक श्रेणी दिली जाते. प्रत्येक श्रेणीसाठी त्या त्या वर्तनाचे निकष निश्चित करून दिलेले असल्यामुळे नोंदी वस्तुनिष्ठपणे करता येतात. शिक्षक मुलांशी बोलताना सहजपणे काही नकारात्मक शब्द वापरत असेल तर त्याची नोंद घेतली जाते. एकाच निरीक्षणावरून शिक्षकाच्या वर्तनाविषयी निष्कर्ष न काढता किमान तीन ते चार वेळा निरीक्षण केल्यानंतर शिक्षकाला त्याच्यातील चांगल्या बाबी व सुधारणा करणे आवश्यक असलेल्या बाबी या दोन्हीचा समावेश असलेले अभिप्राय दिले जातात.

अध्यापन पद्धतीच्या विभागात, नवीन घटकांचा परिचय करून देताना, शिक्षक सादरीकरण कसे करतो? मुलांच्या विचाराला चालना देणाऱ्या कृती करायला देतो का? मुलांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन  त्यांचे योग्य कौतुक करतो का? धडपडणाऱ्या मुलांना विषय समजण्यासाठी मदत करतो का? या वर्तनांचे निरीक्षण केले जाते. विशेष म्हणजे शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेतील ही सर्व वर्तने विषय निरपेक्ष आहेत. म्हणजे कोणत्याही विषयाचा तास चालू असेल तरी शिक्षकाच्या शिकवण्याची गुणवत्ता या एकाच मापदंडाने मोजता येते.

चांगला माणूस म्हणून निरोगी आणि संवादी जगण्यासाठी केवळ परीक्षेतल्या मार्कांवरून सिद्ध होणारी हुशारी पुरेशी नसते हे सगळेच जाणतो. त्यासाठी सहकार्य, संवाद, सहयोग, चिकाटी, संघभावना, इतरांचा दृष्टिकोन समजून घेणे, समानानुभूती, सामाजिक समस्यांबद्दलची संवेदनशीलता, भावनांचे व्यवस्थापन इत्यादी सामाजिक व भावनिक कौशल्याच्या विकासाला संधी मिळणे आवश्यक असते. वास्तविक पाहता यासाठी कोणत्याही वेगळ्या अभ्यासक्रमाची गरज नसते. कोणत्याही विषयाच्या दैनंदिन शिकण्या-शिकवण्याच्या प्रक्रियेत ही कौशल्ये विकसित करण्याच्या संधी निर्माण करता येतात. अशा संधी शिक्षक वर्गात कशा निर्माण करू शकतो हे या विभागातील वर्तनाची विधाने वाचताना आपसूक लक्षात येते. मुलांना एकमेकांसोबत/गटात काम करण्याच्या संधी दिल्या आहेत का? गटात काम करताना मुले त्यांच्या कल्पना, विचार एकमेकांना सांगत आहेत का? एकमेकांना मदत करत आहेत का? कोणी भांडत, चिडवत असेल तर शिक्षक काय करतात? महत्त्वाचे म्हणजे वर्गात काम करताना मुलांना निवड करण्याच्या आणि अर्थपूर्ण सहभागाच्या संधी निर्माण केल्या आहेत का? या बाबींचे निरीक्षण करण्यासाठीचे नेमके निदर्शक या साधनाने दिलेले आहेत.

या साधनामुळे शिक्षकाच्या अध्यापनाची गुणवत्ता मोजण्यासाठी, (ज्यामुळे प्रत्येकाला त्याच्या गरजेनुसार त्याला सुधारणेसाठी नेमकी दिशा दाखवत येईल) एवढेच नव्हे तर जिल्हा, राज्य, देश पातळीवरील शिक्षणाची गुणवत्ता तपासण्यासाठी, शिक्षणसुधारणेचा कोणताही कार्यक्रम, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके यांची परिणामकारकता तपासण्यासाठी समान आणि विश्वसनीय अशी मोजपट्टी उपलब्ध झाली आहे. शिक्षणाशी संबंधित शिक्षक, पालक, अधिकारी, अभ्यासक आणि शिक्षण विभाग या सर्वच घटकांसाठी हे साधन दिशादर्शक ठरू शकते.

या साधनाद्वारे छत्तीस देशांमधील एक लाख ऐंशी हजार शिक्षकांच्या अध्यापनाचे निरीक्षण करण्यात आले. भारतामध्ये आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, ओरिसा आणि नागालँड या राज्यांनी हे साधन वापरण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने राज्यातील आठ जिल्ह्यामध्ये पथदर्शी स्वरूपात या साधनाचा वापर करण्याचा निर्णय ऑक्टोबर 2023 मधे घेतला आहे. वर्ल्ड बँकेच्या निकषानुसार प्रशिक्षित झालेल्या ‘लीडरशिप फॉर इक्विटी’ या संस्थेतील दहा प्रशिक्षकांनी या आठ जिल्ह्यातील एकशेचौदा अधिकाऱ्यांना पुण्यात या साधनाच्या वापराबाबतचे प्रशिक्षण दिले. हे प्रशिक्षण आजवरच्या प्रशिक्षणांपेक्षा अनेक अर्थाने वेगळे होते.

जे घडते तेच नोंदवूया – चांगला म्हणजे पात्र आणि विश्वसनीय निरीक्षक होण्यासाठी “मला काय वाटते” यापेक्षा “काय घडले” याच्या नोंदी करणे आवश्यक असते. वस्तुनिष्ठ निरीक्षण करायचे मुद्दे समजून घेतल्यानंतर Real classroom situations चे चित्रीकरण केलेले व्हिडीओ पाहून नोंदी करण्याचा, श्रेणी निश्चित करुन गुणांकन देण्याचा सराव अधिकाऱ्यांना दिला गेला. आपली नोंद कोठे व का चुकली हे समजून घेण्यासाठी मुक्त चर्चा झाल्या आणि हळुहळू जे घडते किंवा दिसते ते वस्तुनिष्ठपणे नोंदवायला बहुतेक मंडळींना जमायला लागले. जवळपास सर्वच अधिकाऱ्यांनी विद्यार्थी होऊन शिकताना ‘त्यांचे उत्तर बरोबर आल्याचा आनंद’ या प्रशिक्षणात अनुभवला.

जुन्या धारणांना तपासून दुरुस्त करण्याच्या संधी- माणसाच्या शिकण्याच्या प्रक्रियेत नव्याने येणाऱ्या गोष्टी जुन्या तयार झालेल्या रचनेच्या संदर्भातच स्वीकारल्या किंवा नाकारल्या जातात किंवा सुधारणा करून स्वीकारल्या जातात. ज्ञानरचनेची ही प्रक्रिया शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांनाही लागू पडतेच. त्यामुळे ‘शिस्त म्हणजे पिनड्रॉप सायलेंस,’ किंवा ‘स्वतः उत्तम स्पष्टीकरण देणारा शिक्षक म्हणजे उत्तम शिकवणारा शिक्षक’ यासारख्या लहानपणापासूनच्या अनुभवांनी पक्क्या झालेल्या धारणांना तपासून घेण्याच्या त्यावर विचार आणि चर्चा करून त्या सुधारून घेण्याच्या संधी या प्रशिक्षणांत निर्माण करता आल्या. वादविवाद, हमरीतुमरी सुद्धा झाली. पण त्यातून शिकणे घडले.

पात्रतेची परीक्षा – प्रशिक्षणात शेवटच्या दिवशी हे साधन वापरण्याची तयारी झाली आहे की नाही हे प्रात्यक्षिक स्वरूपातील चाचणी घेऊन  तपासले गेले. ज्यांच्या समजुतीत उणीवा राहिल्या होत्या त्या त्यांना सांगून, काही वेळ देवून पुन्हा एकदा चाचणी देण्याची संधी दिली गेली. त्यामुळे हे साधन वापरून वर्गनिरीक्षण करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याची निरीक्षक म्हणून पात्र झाल्याची वर्ल्ड बँकेच्या शिक्षण तज्ञांनी घालून दिलेल्या निकषानुसार खात्री केली गेली.

वर्गनिरीक्षणाचा हेतू आणि दृष्टीकोन पारखून घेण्याची संधी – वर्गनिरीक्षणात काय आणि कसे बघायचे हे समजून घेण्याबरोबरच मुळात ते का बघायचे यावर विचार करण्याची संधी प्रशिक्षणात मिळाली. ‘इन्स्पेक्शन नावाच्या प्रक्रियेत शाळांची, शिक्षकांच्या कामाची तपासणी करण्याचा प्रमुख हेतू केवळ ‘उणीवा शोधणे’ नसून ‘गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत करणे आणि दिशा देणे’ हा आहे याची उजळणी झाली. उणिवा शोधायच्या त्या मार्गदर्शकाची भूमिका प्रभावीरीत्या पार पाडण्यासाठी ही जाणीव जागी होताना दिसली. आधिकाऱ्यांनी आत्मविश्वासपूर्वक मार्गदर्शन केले आणि शिक्षकांनी ते निःशंकपणे स्वीकारून अंमलात आणले असे सहसा घडत नाही. त्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे गुणवत्ता या संकल्पनेबाबतची ‘व्यक्तिनिष्ठता’. या प्रशिक्षणामध्ये उपस्थित एकशेचौदा अधिकाऱ्यांना या साधनाच्या रूपाने गुणवत्तेचे प्रमाणित आणि विश्वसनीय असे निकष आणि दर्शक मिळाले. ते समजून घेता आले. त्यामुळे आपली मार्गदर्शकाची जबाबदारी आनंदाने आणि आत्मविश्वासपूर्वक पार पाडता येईल अशी प्रतिक्रिया बहुतेकांनी दिली.

पुढे जाताना – महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यातील एकशेचौदा अधिकारी आता हे साधन वापरून प्रायोगिक स्तरावर किमान एक हजार एकशे चाळीस शिक्षकांच्या शिकवण्याचे निरीक्षण करतील. त्यातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करुन शिक्षकांना व्यक्तिगत आणि समान अडचणींसाठी मदत आणि मार्गदर्शन करणे हे पुढचे टप्पे असतील. या टप्प्यांवरही पध्दतशीर आणि वस्तुनिष्ठ दृष्टिकोन ठेवून काम करण्यासाठी अधिकाऱ्यांना मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध करुन द्यावे लागेल. राज्य स्तरावरील संस्थांनी सातत्याने पाठपुरावा करावा लागेल.

पुढे जाताना प्रामुख्याने अधिकाऱ्यांना आलेल्या अडचणी, शिक्षकांचे प्रतिसाद आणि प्रतिक्रिया विचारात घेऊन पुढील कामाची आखणी झाली तर टिकाऊ स्वरूपाच्या अपेक्षित बदलाकडे वाटचाल सुरू होईल.

शिक्षकांची स्वायत्तता – सामन्यात बहुसंख्य शिक्षक त्यांच्या वर्गातल्या मुलांसाठी त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार झटत असतात. मात्र बऱ्याच वेळा ‘अधिकाऱ्यांना हे लागते’ म्हणून तेच करण्याची मानसिकता होते. मग सारा आटापिटा केवळ ‘दाखवण्यासाठी’ होतो. या साधनाच्या मापदंडाने वर्ग निरीक्षणे झाली तर अधिकारी मुले ‘शिकत आहेत ना’ हेच पाहतील. शिक्षकांना त्यांच्या त्यांच्या पद्धती वापरण्याची स्वायत्तता मिळेल. पद्धतींची गुणवत्ता ठरवणारे निकष अधिकारी या साधनाच्या माध्यमातून वापरतील. ठरावीक पध्दती किंवा ठरावीक उपक्रमांचा आग्रह धरला जाणार नाही. पाढे किंवा स्पेलिंग पाठांतर यांसारख्या कोणत्याही उपक्रमांची गुणवत्ता आधिकारी स्वतःच ठरवू शकतील.

आधार देणारे अधिकारीपण – शिक्षण खात्यातील अधिकारी शिक्षणशास्त्र पदवीधारक, शिकवण्याचा किमान अनुभव असलेले आहेत. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या प्रयत्नांमुळे गेल्या वीस-पंचवीस वर्षात विद्यार्थी, शिक्षक, शाळा आणि योजनांच्याही संख्येत वरचेवर वाढ होते आहे. त्यामुळे वाढत्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडताना स्वतःची शैक्षणिक गुणवत्ता तपासून, सुधारून घेण्याची अपेक्षा असली तरी तसा अवकाश त्यांना मिळत नाही. वर्गनिरीक्षणाचे हे साधन समजून घेण्याच्या निमित्ताने अधिकाऱ्यांच्या या एका गटाला वर्गात नेमके काय बघायचे हे समजले त्याचबरोबर ‘अधिकारीपण’ अधिकाराने मदत आणि मार्गदर्शन करण्यात असते हे उमगायला सुरवात तरी नक्की झाली. राज्यातील इतर बहुतांश अधिकाऱ्यांमध्येही हळुहळू हा दृष्टिकोन Teachच्या निमित्ताने निर्माण करता येवू शकतो. अधिकारी खऱ्या अर्थाने मार्गदर्शक झाले तर बहुसंख्य शिक्षक निर्भयपणे आणि आत्मविश्वासाने शिकवण्याचे काम करू शकतील.

शिक्षणाच्या गुणवत्तेसाठीची प्रक्रिया ही शिक्षक आणि व्यवस्थेतील अधिकारी या मानवी घटकांच्या ‘शिकण्याचीच’ प्रक्रिया आहे. शिकण्यासाठी पूर्वानुभव आणि परिस्थिती या दोहोंची भूमिका महत्त्वाची असते. पूर्वानुभव बदलता येत नाहीत मात्र ते विचारात घेऊनच अपेक्षित असलेले शिकणे घडून येण्यासाठीची परिस्थिती निर्माण करावी लागते. महाराष्ट्रात यासाठीचे प्रयत्न निश्चितपणे होत आहेत. त्या प्रयत्नांना निर्विवाद प्रगतीची दिशा देण्याची ताकद TEACH Tool मधे आहे.

-सुजाता लोहकरे 9922442065 sujata.saloni@gmail.com

About Post Author

Previous articleउच्च शिक्षण, संशोधन – काही प्रश्न काही उत्तरे…
Next articleअखंड कार्यरत हसरे चेहरे
सुजाता अरुण लोहकरे या पुण्याच्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या भाषा विभागाच्या सेवानिवृत्त विभाग प्रमुख आहेत. त्या राज्यस्तरीय शिक्षक प्रशिक्षण आणि पाठ्यपुस्तक निर्मिती व संपादन यामध्ये वीस वर्षे कार्यरत होत्या. त्या ऑगस्ट 2019 मध्ये स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतल्यानंतर मतिमंद मुलांचे शिक्षण, पुनर्वसन व जाणीवजागृती यासाठी पती अरुण लोहकरे यांच्यासोबत ‘मैत्र फाउंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून काम करतात. त्या करकंब, जिल्हा सोलापूर येथे ‘दिशा’ हे प्रौढ मतिमंद व्यक्तीसाठी उद्योगकेंद्र व विशेष मुलांच्या शाळांमधून ‘मर्यादांच्या अंगणात वाढताना’ हा पालक जाणीव जागृतीचा कार्यक्रम करतात. त्यांचे दोन कवितासंग्रह आणि ‘मर्यादांच्या अंगणात वाढताना’ ही विशेष मुलीला वाढवताना केलेल्या प्रयत्नांची गोष्ट, अरुण लोहकरे यांचेसोबत सहलेखन. या ग्रंथाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक मंडळाचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here