ब्रिटिश भारतातून 15 ऑगस्ट 1947 रोजी परतल्यानंतर, निजामाने स्वतंत्र हैदराबाद राज्याची घोषणा केली. धर्मांध कासीम रिझवी यांच्या रझाकार संघटनेने हैदराबाद राज्यातील हिंदू आणि धर्मनिरपेक्ष मुसलमान यांच्यावर अमानुष अत्याचाराचे सत्र सुरू केले. उलट, संस्थानातील जनतेने भारतात विलीन होण्यासाठी लढा उभारला. लोक त्या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्वातंत्र्यवीरांनी रझाकारांच्या अत्याचारांचा प्रतिकार केला आणि त्यात त्यांच्या प्राणाची आहुती दिली. त्या यादीत जालन्याचे जनार्दन नागापूरकर ऊर्फ जनार्दनमामा यांचे नाव प्रकर्षाने घेतले जाते.
जनार्दन शंकरराव नागापूरकर यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ गावात 2 एप्रिल 1929 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण परळी येथेच झाले. निजाम राज्यातील सरंजामशाहीविरोधी वातावरण परळीमध्ये आधीपासून होते. जनार्दन त्याच वातावरणात मोठे झाले. त्यांच्या मनावर क्रांतिकारी भावनेची बीजे लहानपणापासून पेरली गेली. जनार्दन यांचे मतभेद गावातील निजामधार्जिण्या लोकांशी होत आणि त्याचे रूपांतर गंभीर संघर्षात होत असे. जनार्दन यांना त्या वातावरणापासून दूर नेण्याच्या उद्देशाने त्यांच्या वडिलांनी त्यांना पुढील शिक्षणासाठी त्यांच्या बहिणीकडे, जालन्याला पाठवले.
जनार्दनमामा हे जालना शहरातील ‘बडी सडक’ला असलेल्या डॉ. काळे यांच्याकडे कंपाउंडर म्हणून काम करत असत. काळे यांची मुले त्यांना मामा म्हणत, त्यामुळे त्यांना ‘जनार्दन मामा’ हे नामाभिधान जोडले गेले.
जनार्दन जालन्याला आले तरी देशप्रेम आणि क्रांतिकारी विचार यांपासून दूर झाले नाहीत. किंबहुना, त्यांच्या क्रांतिकार्याला तेथे अधिकच वेग आला. जनार्दन यांनी राधाकिसन लाला, उत्तमचंद जैन, प्रभुदास बद्रिनाथ आणि नाना जेधे वाहेगावकर या मित्रांसह जालना येथे एक क्रांतिकारी गट स्थापन केला. गटाचा मूळ उद्देश रझाकारांच्या कारवायांवर अंकुश ठेवणे आणि जशास तसे उत्तर देणे हा होता.
त्याच सुमारास काँग्रेसमधील जहाल गटाने रझाकार आणि निजाम यांच्याविरूद्ध सशस्त्र लढ्याचे धोरण अवलंबले. त्या गटाने निजामाची जुलमी सत्ता खिळखिळी करण्याच्या उद्देशाने भारत-हैदराबाद सीमेवर काही ‘बॉर्डर कॅम्प’ स्थापन केले. बॉर्डर कॅम्पचा उद्देश रझाकारांच्या सेनेवर आणि हैदराबाद पोलिस ठाण्यावर अचानक हल्ला करून दहशत निर्माण करणे, रेल्वे रूळ उखडून टाकणे, राज्यातील दळणवळण निकामी करणे अशा क्रांतिकारी कारवाया करणे हा होता. हैदराबाद राज्यातील क्रांतिकारी आणि रझाकारांच्या अत्याचाराला कंटाळलेले नागरिक या बॉर्डर कॅम्पमध्ये भरती झाले. तसाच एक बॉर्डर कॅम्प देऊळगाव येथे स्थापन झाला होता. जनार्दन आणि त्याचे मित्र त्या बॉर्डर कॅम्पमध्ये भरती झाले. जनार्दन यांचे वय त्या वेळेस जेमतेम अठरा वर्षांचे होते. परंतु देशप्रेमाने झपाटलेल्या जनार्दन यांना स्वतःच्या भवितव्याची पर्वा नव्हती. जनार्दन देशासाठी आत्मबलिदानाला तयार होते.
देऊळगाव केंद्रावर बातमी अशी आली, की रझाकारांचे केंद्र निजाम राज्यातील डोणगाव या गावी आहे. त्या केंद्रातील रझाकार सभोवतालच्या गावकऱ्यांना फार त्रास देत आहेत. गावकरी कंटाळून गेले आहेत. अनेक गावकरी गाव सोडून जाण्याचा विचार करत आहेत. देऊळगाव कॅम्पच्या सैनिकांनी डोणगावच्या रझाकारांचा बंदोबस्त करण्याचे ठरवले. तो विडा जनार्दन आणि इतर दहा-बारा तरुण यांनी उचलला. ते सारे जनार्दन यांच्या वयाचे होते. ते तरुण मोजके असले तरी त्यांची देशप्रेमाची भावना इतकी प्रखर होती, की ते शत्रूच्या हजार सैनिकांना पुरून उरणारे होते.
जनार्दन आणि त्यांचे साथीदार यांनी डोणगावकडे कूच केली. जनार्दन यांनी पोलिस चौकीपासून सुरक्षित अंतरावर पोचल्यावर सावधपणे परिसराचा शोध घेतला आणि हल्ल्याची योजना आखली. पोलिस कारवाईच्या आधी अवघ्या महिन्याभराचा काळ. देऊळगाव तुकडीने 12 ऑगस्ट 1948 रोजी रात्री दोनच्या सुमारास डोणगाव ठाण्यावर हल्ला केला. दोन्हींकडून गोळ्यांचा वर्षाव दोन-तीन तास झाला. मोठी चकमक उडाली. जनार्दन आणि त्याचे साथीदार यांनी हळूहळू पुढे सरकत रझाकार केंद्राचा ताबा मिळवला. त्यात रझाकार व पोलिस असे मिळून दहाजण ठार झाले. परंतु दैवाला काही वेगळेच मंजूर होते. ठाण्याचा ताबा मिळवल्यानंतर जनार्दन सावधपणे टेहळणी करत होते. तेवढ्यात अंधारातून एक गोळी ‘सूंऽ सूंऽऽ’ करत आली आणि जनार्दन यांच्या वर्मी लागली. जनार्दन जबर जखमी होऊन बेशुद्ध झाले.
ठाणे ताब्यात आले होते, रझाकारांचा बंदोबस्त झाला होता, पण जनार्दन मात्र जखमी झाले होते. सहकाऱ्यांनी जनार्दन यांना देऊळगाव कॅम्पमध्ये परत आणले. तेथून बुलढाण्याच्या दवाखान्यात नेले. उपचाराची शर्थ झाली, परंतु जनार्दन वाचू शकले नाहीत. ते मरण्यापूर्वी काही काळ शुद्धीवर आले. जनार्दन यांनी एवढेच विचारले, ‘आपले सर्व सैनिक परत आले ना? ते सुखरूप आहेत ना?’ त्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर मिळाले आणि जनार्दन यांनी अखेरचा श्वास घेतला !
जनार्दनमामांचे जालना शहरात स्मारक करण्यात आले असून, एका चौकात त्यांचा लष्करी पोषाखातील अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला आहे. त्या चौकाला त्यांचेच नाव देण्यात आले आहे.
(हैद्राबादचा स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा, लेखक अनंत भालेराव, आझादी का अमृत महोत्सव, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि मराठवाडा मुक्ती संग्रामातील जनार्दनमामांच्या योगदानाविषयी गणेश लाला चौधरी यांनी पुरवलेल्या माहिती आधारे.)
– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com