संस्कृत महाकवी कालिदास (Great Sanskrit Poet)

0
278

कालिदास हा महाकवी मानला जातो. त्याच्या कार्यकाळाविषयी विद्वानांमध्ये एकवाक्यता नाही. इसवी सनपूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंतचा वेगवेगळा कालावधी, कालिदासाचा कार्यकाळ म्हणून वेगवेगळ्या विद्वानांनी नोंदवलेला आहे. त्याच्या जन्मस्थानाविषयीही ठोस अशी माहिती उपलब्ध नाही. बहुतांश विद्वानांच्या मते, उज्जयिनी ही त्याची जन्मभूमी होय. कालिदासाने चाळीसहून अधिक ग्रंथांची रचना केली, पण त्या सर्व रचना करणारा कालिदास हा एकच नव्हता तर, कालिदास नावाचे अनेक कवी असल्याचाही एक मतप्रवाह आहे. निर्विवादपणे, कालिदासाच्याच मानल्या गेलेल्या सात रचना प्रसिद्ध आहेत. त्या अशा-

महाकाव्ये दोन – रघुवंशम्, कुमारसंभवम्.

नाटके तीन – मालविकाग्निमित्रम् (सर्वात पहिली रचना), अभिज्ञानशाकुन्तलम् (दुसरी रचना) व विक्रमोर्वशीयम्.

खण्डकाव्ये दोन – मेघदूत, ऋतुसंहार (त्यांना ‘गीतिकाव्ये’ असेही म्हणतात)

कालिदासाला, कालिमातेच्या कृपेने ज्योतिःशास्त्राचे ज्ञान प्राप्त झाले होते. त्याने ‘उत्तरकालामृतम्’ आणि ‘ज्योतिर्विद्याभरणम्’ असे ज्योतिःशास्त्रविषयक दोन ग्रंथ लिहिल्याचे म्हटले जाते. त्याच्या काही रचना ‘शृङ्गारतिलकम्’, ‘शृङ्गारशतकम्’ आणि ‘श्यामादण्डकम्’ अशाही आहेत.

कालिदासाने त्याच्या ‘मेघदूत’ या काव्याचा प्रारंभ ‘कश्चित्’ या शब्दाने केला आहे. त्याविषयी एक कथा सांगितली जाते. कालिदास हा गुराखी होता. तो मठ्ठ आणि निरक्षर होता. एका ऋषीने एका विदुषी, पण गर्विष्ठ राजकन्येची खोड मोडण्यासाठी एक कपटनाटक रचून गुराख्याचे तिच्याशी लग्न लावून दिले. ते कपट लग्नानंतर उघडकीस आले. राजकन्येने गुराख्याचा मठ्ठपणा लक्षात आल्यावर, त्याचा घोर अपमान केला. त्यामुळे तो संतापाने घराबाहेर पडला. तो भटकत, भटकत काही ना काही शिकत वाराणसीत पोचला. त्याने कालिमातेची उपासना, आराधना करून तिचा वरदहस्त मिळवला आणि तो महापंडित झाला. तो कालिदास हे नाव धारण करून स्वगृही परतला. पत्नीने त्याला ओळखले आणि विचारले, ‘अस्ति कश्चित् वाग्विशेषः?’ म्हणजे ‘तुझ्या वाणीत काही विशेष आहे का?’ म्हणजेच ‘तू काही ज्ञानप्राप्ती केली आहेस का?’ कालिदासाने तीन काव्ये पत्नीच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल रचली. तिच्या प्रश्नातील पहिला शब्द ‘अस्ति’, त्याने सुरू होणारे ‘कुमारसंभवम्’, दुसरा शब्द ‘कश्चित्’, त्याने सुरू होणारे ‘मेघदूत’ आणि तिसरा शब्द ‘वाक्’, त्याने सुरू होणारे ‘रघुवंशम्’. भाष्यकारांनी ‘कश्चित्’ शब्दाने मेघदूताचा प्रारंभ करण्याचे कारण शोधण्यासाठी या दंतकथेचा आधार घेतला आहे !

कालिदासाचे विद्वत्ता आणि रसिकता यांच्या जोडीला आणखी काही विशेष आहेत- सूक्ष्म निरीक्षणशक्ती, मनोहारी सौंदर्यदृष्टी, मानवी भावभावनांचा अचूक अभ्यास आणि त्या काळच्या सामाजिक व भौगोलिक परिस्थितीचे सखोल ज्ञान. त्याच्या साहित्याचे वैशिष्ट्य म्हणजे अलंकारांनी नटलेली भाषा आणि त्यातही तरल अशा उपमा अलंकारांचे अनुपमेय सौंदर्यदर्शन हे होय. त्यामुळेच ‘उपमा कालिदासस्य’ असे गौरवोद्गार त्याच्याविषयी काढले जातात. पाश्चात्त्य विद्वानही कालिदासाचा उल्लेख ‘कविमुकुटमणि’ म्हणून आदराने करतात.

(‘मेघदूत (पूर्वमेघ) …’ या पुस्तकातील परिशिष्टातून)
———————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here