कबीर हे निर्गुणी भक्तिपरंपरेचे शिखर गाठलेले हिंदी भाषिक थोर संत होत. त्यांनी अवास्तव कर्मकांडावर घणाघाती हल्ला चढवून, ढोंगी लोकांचे बेगडी बुरखे फाडून टाकण्याचे काम केले. संत कबीर यांचे जन्मगाव, विवाह, त्यांचे गुरू, आई-वडील, त्यांचे निर्वाण या कोणत्याही बाबतीत अभ्यासकांचे एकमत नाही. गोरखपूरजवळील मगहर हे त्यांचे जन्मगाव मानतात. अभ्यासकांच्या मतानुसार त्यांचा कालखंड इसवी सनाचे पंधरावे किंवा सोळावे शतक असावा. भारतात तो कालखंड राजकीय व सांस्कृतिक स्थित्यंतराचा आहे. कबीर यांची नेमकी जात, धर्म कोणता याबद्दल एकवाक्यता नाही. त्यांचे वास्तव्य काशी येथे होते, त्यांचा व्यवसाय कोष्ट्याचा होता; तसेच त्यांचा मृत्यू मगहर गावीच झाला यांविषयी मात्र सर्वांचे एकमत आहे.
कबिरांचा जन्म विक्रम संवत १४५५ (इसवी सन १३९८) ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमेस, सोमवारी झाला असे मानतात. मात्र त्यांच्या मृत्यूसंबंधी पुढील तीन तिथी सांगितल्या जातात : १. माघ शुद्ध ११, संवत्सर १५७५ (इसवी सन १५१८), २. संवत्सर १५५२ (इसवी सन १४९५) आणि ३. मार्गशीर्ष शुद्ध ११, संवत्सर १५०५ (इसवी सन १४४८). कबीर ब्राम्हण विधवेच्या पोटी जन्मास आला. तिने त्याला लोकलाजेस्तव काशीजवळील लहरतारा तलावापाशी सोडून दिले. नीरू नावाच्या मुसलमान कोष्ट्याने त्याचा प्रतिपाळ केला अशी दंतकथा प्रसिद्ध आहे. तो नाथपंथी ‘जुगी’ किंवा ‘जोगी’ जातीचा असावाअसेही एक मत आहे. कबीर अविवाहित होता असे काहीजण मानतात, तर काहीजण तो विवाहित होता (पत्नी लोई) आणि त्याला दोन मुले होती असेही मानतात. कमाल हा त्याचा पुत्र व शिष्य असल्याचेही सांगतात. काहींच्या मते, तो रामानंदांचा शिष्य होता, तर काहींच्या मते तो शेख तकींचा शिष्य होता.
कबिरांच्या साहित्यावर व विचारांवर हिंदू, मुसलमान, सुफी, योगमार्गी, नाथपंथी या सर्वांचा प्रभाव आढळतो. तरी त्यांनी भक्तिमार्गावर अधिक भर दिलेला आहे. कबीर यांनी अद्वैत वेदान्ताचा पुरस्कार, योग व भक्ती यांच्या माध्यमातून केला. त्यांचा अवतारवादावर विश्वास नव्हता तर ते निर्गुण-निराकाराचे भक्त होते. दृश्यमान जगत माया असून, कनक आणि कांता यांच्या रूपाने माया साधकाला छळते असे ते म्हणतात. मात्र कबीर यांनी ईश्वर प्रेम व भक्ती यांमधून प्राप्त करून घेता येतो या विश्वासाने निर्गुणाला सगुण साकार स्वरूप दिलेले काही ठिकाणी दिसते. संत कबीर साऱ्या चराचराला व्यापणाऱ्या परमात्म्याचे एकच चिद्विलासी तत्त्व मान्य करतात, म्हणूनच त्यांना राम आणि अल्ला हा भेदभाव मान्य नाही. माणसाने त्याच्या मनात शोधल्यास राम सापडेल आणि रहीमही, असे ते सांगत असत. मानवी मन हेच त्याच्या बंधनास किंवा मोक्षास कारणीभूत होते अशी त्यांची धारणा होती.
कबीर यांची नामस्मरणाबद्दलची मते स्पष्ट होती. नामस्मरणाच्या जोडीला आत्मचिंतनाची जोड दिल्यास व्यक्तीची साधना अधिक सफल होते असे ते सांगत. ते जपमाळ हातात नुसती फिरवणे उपयोगाचे नाही, त्यासाठी मन ताब्यात ठेवणे अत्यावश्यक असल्याचे म्हणत. ते साधनेत संयम असावा, ती अखंडित असावी आणि साधनशुचिताही हवी, याबद्दल आग्रही होते. डोळ्यांना ईश्वराचे दर्शन व्हावे, कानांना ईश्वराचे वर्णन ऐकायला मिळावे, वाणीने त्याचे गुणगान व्हावे आणि हृदयात त्याचेच स्थान असावे असे त्यांचे सांगणे होते. अशा साधनेने ईश्वरप्राप्ती दूर नाही असे कबीर सांगत असत.
शिष्य गुरुकृपा झाल्यावर कृतार्थ होतो. ब्रम्हप्राप्तीसाठी सत्संगती व गुरुप्रसाद आवश्यक असतो यावर त्यांचा विश्वास होता. तसेच, ते गुरू आणि बुवाबाजी यांतील भेद जाणीवपूर्वक सांगत. संत कबीर यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी कोणत्याही एका धर्माचा किंवा संप्रदायाचा पुरस्कार केला नाही; इतकेच काय, त्यांनी स्वत:चा संप्रदायही तयार केला नाही.
कबिरांचा जातपात, कुलाभिमान, धर्मभेद, रूढी, व्रतवैकल्ये, कर्मकांड इत्यादींवर काडीमात्र विश्वास नव्हता. त्यांनी हिंदू अगर इस्लामी धर्ममार्तंडांच्या दोषांवर, विसंगतींवर व चारित्र्यहीनतेवर कडाडून हल्ले केले आहेत. त्यांच्या काव्यातील दृष्टांतांतून, प्रतीकांतून, युक्तिवादांतून व प्रामाणिक अनुभूतींतून त्यांच्या असामान्य प्रतिभेची साक्ष पटते. तत्कालीन समाजाबाबतचे त्यांचे निरीक्षण सूक्ष्म असून, त्यांच्या निर्भय, साहसी आणि कलंदर व्यक्तिमत्त्वाचे विलोभनीय दर्शन त्यांच्या काव्यरचनेतून घडते. कबिरांनी तत्कालीन धार्मिक मतभेदांची तीव्रता कमी करून वैष्णव आचार्यांचा भक्तिमार्ग सामान्य जनतेपर्यंत आणून पोचवला. त्यांनी बाह्य कर्मकांडात रुतून बसलेली धर्माची मूळ मानवतावादी तत्त्वे शोधण्याचा व त्यांचा पुरस्कार करण्याचा यशस्वी प्रयत्नर केला. त्यांनी अद्वैती, सुफी, योगमार्गी,भक्तिमार्गी या सर्वांनाच आपलासा वाटेल असा भक्तिमार्ग रूढ केला. अनेक हिंदू-मुस्लिम कबीर पंथाचे अनुयायी झाले. कवी म्हणून हिंदी साहित्यात कबिरांचे स्थान श्रेष्ठ आहे.
कबीर निरक्षर असले, तरी ज्ञानी व बहुश्रुत होते. त्यांची सर्व रचना मौखिक होती व ती त्यांच्या अनुयायांनी लेखनबद्ध केली. कबीर ग्रंथावली व कबीर-बीजक वा बीजक हे त्यांच्या रचनेचे अधिकृत संग्रह मानले जातात. तथापि त्यांतही पाठभेद आढळतात. कबिरांची काही पदे शिखांच्या ग्रंथसाहिबातही समाविष्ट आहेत.
कबिरांची भाषा पूरबी हिंदी असल्याचे त्यांनीच नमूद करून ठेवले आहे. तथापि तीत व्रज, अवधी, खडी बोली, भोजपुरी, फार्सी, अरबी इत्यादी बोलींतील व भाषांतील शब्दही आढळतात. त्यांच्या भाषेला ‘सधुक्कडी’ असे म्हटले जाते आणि ती संमिश्र स्वरूपाची आहे. त्यांच्या काव्यात रूपक, उत्प्रेक्षा, दृष्टांत इत्यादींचा वापर सर्रास दिसतो. त्यांनी ‘उल्टवाँसी ’ (विरोधी भासणारी शब्दरचना) प्रकारातही रचना केलेली आढळते.
संत कबिरांनी नामदेव महाराजांविषयी म्हटले की,
दख्खन म्याने नामा दरजी उनोका बंदा विठ्ठल है।
और सेवा कछु नहि जाने अंदर बाहर केशव है ॥
– टिम ‘थिंक महाराष्ट्र’
thinkm2010@gmail.com
Mahiti aavadli
Mahiti aavadli
Comments are closed.