राजुल ट्रीट्स ब्रेन क्युअर्स

0
39
carasole1

राजूल वासामुंबईतील मालाडच्या मध्यमवर्गीय कुटुंबामधून राजुल वासा मलबार हिलवरील कारमायकेल रोडच्या अतिश्रीमंत वस्तीत राहाण्यास आली ती तिची बुद्धिप्रतिभा, तिचा आत्मविश्वास आणि तिची हिंमत यांच्या जोरावर. तिचा तेथील नवव्या मजल्यावरील बारा-पंधराशे चौरस फुटांचा फ्लॅट निवडक, चोखंदळ वृत्ती दाखवणा-यास कलात्मक वस्तूंनी सजलेला आहे. तिने ही नवी जीवनशैली गेल्या पंधरा-वीस वर्षांत सहजतेने स्वीकारली आहे. ती लहानपणापासून साधनसंपन्न जगाचाच विचार करत असे. त्याबरोबर, तिचा तेव्हापासूनच विश्वास असा होता, की ती स्वत: तशा जगात एके दिवशी राहण्यास जाईल! आपल्या फ्लॅटमधून दूर अंतरावरील अरबी समुद्रातील चमचमणारे पाणी दाखवताना, ती सूर्याचे उत्तरायण आपल्याला आठवड्या-आठवड्याने कसे जाणवते हे स्वाभाविक जिज्ञासाबुद्धीने सांगते. तिच्याजवळ अशा प्रकारची आभिरुची आहे.

राजुलने विवेक सहस्त्रबुद्धे नावाच्या तिच्या योगशिक्षकाशी ब-याच उशिरा लग्न केले. त्यावेळी ती स्वतंत्र बुद्धीची व बाण्याची फिजिओथेरपिस्ट; नव्हे संशोधक-अभ्यासक म्हणून सिद्ध झाली होती आणि तिचे स्वत:चे कारमायकेल रोडवरचे घर विकत घेतले होते. ती स्वच्छ मनाने सांगते, की मी व विवेकने लग्न केले ते एकमेकांच्या सर्व अटी सांभाळून. त्यामध्ये प्रत्येकाने आपापले व्यक्तिमत्त्व शाबूत ठेवायचे, एकमेकांची ‘स्पेस’ सांभाळायची, तरी परस्परपूरक जीवन जगायचे हे अभिप्रेत होते. विवेकदेखील मध्यमवर्गीय कुटुंबामधून आला आहे. तोही बुद्धिमान व कर्तबगार आहे. विवेकचा ठाणे जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात छपाईची शाई बनवण्याचा कारखाना आहे. त्या अर्थाने, त्यांचा विवाह म्हणजे ती ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’च म्हणायची! राजुल सांगते, की तिच्या तरुण वयात तिचे लग्न जमवण्याचा तिच्या आई-वडिलांनी, तिच्या हितचिंतकांनी प्रयत्न केला. पण तिला मुलगा पटला नाही तर ती सरळ उठून जाई. तिथे ती नसत्या औपचारिकता जपत बसत नसे. किंबहुना ती म्हणते, “कुटुंबातसु्द्धा दोन भावांबरोबर राहताना मी बंधने सर्व पाळली, घरात मुलीचे काम म्हणून जे जे जरुरीचे मानले जाते, ती सर्व कामे मी केली. पण भावांइतक्याच स्वतंत्र बाण्याने जगले.”

तिच्या अंगी धाडस आणि आत्मविश्वास आला, तो या स्वतंत्र बाण्यामधून. तिने डॉक्टर व्हायचे म्हणून सायन्स सब्जेक्ट घेऊन जयहिंद कॉलेजमधून बारावीची परीक्षा दिली, पण तिला मार्क थोडे कमी पडले आणि फिजिओथेरपी अभ्यासक्रमास जी.एस.ग्रॅंट मेडिकलला अॅडमिशन मिळाली. तिने तो कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. नंतर काही वर्षे, तिने फिजिओथेरपिस्ट म्हणून प्रॅक्टिस केली; परंतु तेव्हाच, तिच्या त्या उपचारपद्धतीच्या मर्यादा ध्यानी आल्या. हाडाची दुखणी उद्भवल्याने ती ठीक करायचे व्यायामप्रकार योग्य असतीलही, परंतु मतिमंदांच्या, विशेषत: सेरिब्रल पाल्सी मुलांच्या संबंधात जी रोगशामक उपचारपद्धत अवलंबली जाते ती राजुलला रोग मुरवणारी व म्हणून तो वाढवणारी वाटली. रोगाचे केवळ शमन करून किंवा रोग्यांच्या केवळ पुनर्वसनाचा विचार करून कोणतीही उपचारपद्धत शांत, थंड कशी राहू शकते? असा प्रश्न तिला पडला.

सेरिब्रल पाल्सी हा रोग गर्भावस्थेत, जन्मताना किंवा जन्म झाल्यानंतर पहिल्या काही महिन्यांत मेंदूला इजा झाली तर होऊ शकतो. नवजात अर्भकाचे बिलिरुबीन ब-याच वेळा वाढले. ते नियंत्रित केले नाही तरी मेंदूवर परिणाम होऊ शकतो. रोगी उपचाराने बरा व्हायला उपचारांचा रोख रोगांच्या मूळ कारणावर असायला हवा आणि ते पक्षाघाताच्या, सेरिबल पाल्सी आजाराच्या किंवा तत्सम काही मेंदुआघात विकारांबाबत घडत नव्हते. उलट, डॉक्टरांचा कल, मेंदू त्याचे काम करत नाही म्हणून त्यास शांत ठेवण्याच्या अधिकाधिक प्रभावी औषधांचा उपयोग करण्याकडे आहे. मेंदूत बिघाड झाला तर तो मेंदूमध्येच दुरुस्त करायला हवा, उलट डॉक्टरांचा रोख निदान दूर करण्यावर असतो. विद्यमान उपचारपद्धतीच्या मर्यादा जगभर ध्यानी येऊ लागल्याही आहेत. म्हणून तर २००९ मध्ये नेदरलॅंडमध्ये ‘सीपी रोगावरील उपचारांत आपण अडकून पडलो आहोत का?’ अशा विषयावर जागतिक परिषद झाली!

राजुलने जगात हा विचार सुरू होण्याच्या कितीतरी आधीपासून तशी मांडणी केली होती व भविष्यवेध घेतला होता. तिने मेंदू व स्नायू आणि अन्य अवयव यांच्या परस्परसंबंधांचा अभ्यास सुरू केला. त्यामधून तिला शरीरनियंत्रणाच्या अनेक गमती कळून चुकल्या. प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट ती होतीच. त्या तंत्रपद्धतीतील अधिक प्रशिक्षण घेण्यासाठी ती स्वीत्झर्लंडला गेली. तेथे तिचा जगातील या क्षेत्रातील नामवंतांच्या अभ्यास-संशोधनाशी, आधुनिक ज्ञानाशी परिचय झाला. बर्टा बोबोथ व कारेल बोबोथ यांची ‘बोबोथ थेरपी’ आणि एडवर्ड टाऊब यांची ‘कंस्ट्रेड इंड्युस्ड मूव्हमेंट थेरपी’ या उपचारपद्धती सेरिब्रल पाल्सीवर प्रचलीत आहेत. ती त्या दोन्ही तज्ज्ञांना भेटली आहे. मुळात मेंदूला इजा होणे व त्यामुळे शरीरावयव निकामी होणे या प्रकाराचा-सेरेब्रल पाल्सीच्या निदानाचा-शोध लागून शंभर-दीडशे वर्षे होत आहेत. परंतु त्यांवरील उपचारांचा शोध मात्र मुळात जाऊन झाला नाही. म्हणून राजुल वासाच्या संशोधनाचे महत्त्व.

ती शरीर नियंत्रणासाठी मेंदूला सजग करण्याची उपचारपद्धत सेरिब्रल पाल्सी विकारावर वापरू लागली. हे तिचे अभ्यास-संशोधन काही वर्षांचे होते व ते अजून चालू आहे. त्याला ती ‘वासा कन्सेप्ट’ म्हणून संबोधते. त्यानुसार औषधोपचार घेणारे तिचे जगभरचे रोगी आहेत. त्यांच्या कहाण्या ‘साईबाबांनी डोक्यावर हात ठेवला आणि लंगडा पाय व हात चालवू लागला’ अशा प्रकारच्या, चमत्कार वाटाव्या अशा आहेत. खरोखरीच, ती १९९५ सालाच्या आसपास फ्रान्स, स्वीडन येथे जाऊन महिन्या-महिन्याच्या कार्यशाळा घेत असे. पण त्यांचा पाठपुरावा अवघड होऊ लागला. त्या काळातील तिचा सेलिब्रिटी भारतीय रुग्ण म्हणजे धीरुभाई अंबानी. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली ती राजुलच्या ट्रीटमेंटमुळे.

वासा कन्सेप्टचे दोन मूलाधार आहेत, ते म्हणजे सेंटर ऑफ मास (शरीराचा तोल) सांभाळणे आणि त्यामध्ये स्वाभाविक उद्भवणारा ‘पोस्चरल कंट्रोल’  (म्हणजे शरीर हालचालींवर नियंत्रण). ती स्पष्ट असे करते, की इतर प्राण्यांमध्ये, जसे की गाय, शेळी वगैरेंमध्ये पिल्लू जन्माला येताच चार पायांवर उभे राहते, पण माणसाच्या बाबतीत, अर्भकाला प्रथम मान सांभाळण्यास शिकवली जाते, मग उपडा होणे, रांगणे, दोन पायांवर उभे राहणे आणि त्यानंतर एकेक पाऊल टाकत चालण्यास शिकणे. हे वर्ष-दोन वर्षांचे प्रशिक्षण आहे. त्यात मानवी बालकाचा मेंदू सर्व अवयवांवर नियंत्रण प्राप्त करतो व त्याचबरोबर त्याला त्रिमिती जगाचे अवधान येते. म्हणजे बालक रांगत खुर्चीखाली गेले तर त्याला कळू लागते, की डोके एकदम वर केले तर डोक्याला खुर्ची लागेल वगैरे. यामधून त्याच्या शरीराच्या वेगवेगळ्या अवस्था (पोस्चर) होऊ शकतात व त्या प्रत्येक अवस्थेत त्याला शरीराचा तोल कसा सांभाळायचा (सेंटर ऑफ मास) याचे भान येते. तो उभ्या अवस्थेत डाव्या बाजूस तिरका झाला तर त्याचा उजवा हात उजव्या बाजूस शरीराचा तोल सांभाळण्यासाठी वर येतो. मेंदू हे सारे नियंत्रण प्रतिक्षिप्तपणे करत असतो. तसे त्याचे प्रशिक्षण बालपणी झालेले असते. परंतु त्या मेंदूलाच अर्भकावस्थेत इजा झाली तर मेंदू स्वाभाविकपणे प्रथम आपल्या संरक्षणाच्या मागे लागतो. इजा झालेला भाग त्याचे काम थांबवतो, परिणामत: शरीराचा संबंधित भाग आवळला जाऊन निकामी बनवतो. राजुल सांगते, की पक्षाघातामध्ये शरीराचा हात आवळला जातो, मूठ मिटली जाते. भीमशक्तीदेखील तो हात सरळ करू शकत नाही वा मूठ उघडू शकत नाही. मेंदूच्या नियंत्रणाची ताकद एवढी जबरदस्त असते. पण मेंदूवर झालेला आघात दूर केला व त्यास पूर्ववत केले तर शरीरावयव व त्यांवरील नियंत्रणदेखील सरळ होते. अवयवांच्या हालचालींत सहजता येते. अर्थात, ती बजावते की हे फार कष्टसाध्य आहे. त्यासाठी अपार मेहनत करावी लागते. रोज सहा ते आठ तास व्यायामप्रकार करूनच सुधारणा काही वर्षांत हळुहळू होऊ शकते. पालकांना एवढा धीर नसतो. त्यांना मूल लगेच चालायला लागावे असे वाटते.

राजुलचे अभ्यास-संशोधन घरच्या अभ्यासिकेत आठवडाभर चालते. तिचा तो जीवनभराचा ध्यास झाला आहे. ती जागेपणीचा प्रत्येक क्षण फक्त सेरिब्रल पाल्सीचा आजार आणि त्यावरील उपाय यांचा विचार करण्यात व त्यासंबंधी बोलण्यात घालवते. ती अखंड बोलते; ब-याच वेळा, तेच ते बोलते, पण प्रत्येक वेळी, तिच्या कथनात दाखले नवे येतात, आर्जव नवे असते, कारण तिच्या मेंदूचा व मनाचा कोपरा न कोपरा सेरिब्रल पाल्सी विचाराने व्यापलेला आहे. तिचे स्वप्न एवढे मोठे आहे, की या जगात २०८० नंतर सेरिब्रल पाल्सीचा एकही रुग्ण असता कामा नये हे तिचे तिने स्वत:ला दिलेले वचन आहे! तिचे त्या निष्ठेने काम चालते.

राजुल रविवार रोगी व नातेवाईक यांच्याबरोबर घालवते. ती मोठ्या इमारतीतला हॉल भाड्याने घेते. तेथे रोगी व त्यांचे पालक जमतात. राजुलबरोबर तिचे साथीदार असतात. राजुल रोग्याला व्यायामप्रकार शिकवते आणि त्याला आहारविहार सुचवते. रोग्याने आवश्यकतेनुसार ते महिना-दोन महिने दररोज घरी करत राहून परत यायचे असते. अर्थात वेळ ठरवून (अॅपाइंटमेंट घेऊन) यायचे असते. राजुलचे रोगी रत्नागिरी ते लाहोर, कोठूनही आलेले असतात!

राजुलला रविवारी रोग्यांबरोबर पाहणे हा अपूर्व अनुभव असतो. हॉलभर पंधरा-वीस रोगी व त्यांचे पालक त्यांना लिहून दिलेला व्यायामप्रकार कसोशीने करण्याचा प्रयत्न साधत असतात. त्यांना राजुलचे सहाय्यक मदतीला असतात. राजुलचा बांधा आडवा आहे, ती थो़डी स्थूलही आहे. त्यामुळे रविवारच्या त्या कसरतींमुळे ती घामाने डबडबलेली असते, त्यात तिच्या तोंडाचा पट्टा – वेगवेगळ्या सूचना, उभारी धरू पाहणा-या रोग्यास धीर देणे वगैरे – चाललेला असतो. परंतु ती स्वत: रोग्याला शरीर हालचाली करून दाखवते तेव्हा तिचे पदन्यास व कमनीयता पाहावी. नर्तिकेला लाजवेल असा तो आविष्कार असतो! आपले डोळे एका बाजूला तेथील  रोग्यांच्या व्यथावेदनांनी, पालकांच्या दर्दभ-या कहाण्यांनी डबडबलेले असतात आणि दुसर्याक बाजूला मन राजुलचा जिव्हाळा, तळमळ, कार्यनिष्ठा पाहून भरून येत असते. मी माधुरी दीक्षितच्या लयबद्धतेने आणि तिच्या अदांनी अनेक वेळा फिदा झालेलो आहे, परंतु राजुलचे ते रूप पाहून माझे मन भरून पावते. मला मानवी जीवनाची सार्थकता कळते. सर्वसामान्य जीवनात निष्ठा, परिश्रम व आत्मबळ यांतून अलौकिक वैभव प्राप्त होऊ शकते याचीच ती प्रचीती होय.

राजुल मानवी भावभावनांनी ओतप्रोत भरलेली आहे. ती कधी रुसते-रागावते-कष्टी होते तेव्हाही तिचा तो आविष्कार विलोभनीय असतो, कारण तो मनापासून असतो. तिच्याजवळ आतबाहेर काही नाहीच. तिचा हा विश्वास आहे, की तिचे अभ्यास-संशोधन हे परमेश्वराने तिला दिलेले वरदान आहे. “ये कुदरत की देन है! उसने मुझे इस काम के लिये चुना और यहॉ भेजा” असे ती सांगते. त्यामुळे मग ती प्रत्यक्ष परमेश्वरास मानते की नाही हे मला विचारावेसेच वाटले नाही, इतकी ती निसर्गाशी एकजीव आहे! त्यासाठी तिला डोंगरद-यांत, नदीकाठी जावे लागत नाही की ‘इकॉलॉजी’, ‘निसर्गपरिसर’ असे शब्द उच्चारावे लागत नाहीत. तिला हे नक्की माहीत आहे, की मानवी जीवन हा निसर्गाचा खेळ आहे. तो त्याच नियमांनी खेळला गेला पाहिजे. परंतु तिला याचीही जाणीव आहे की त्या निसर्गाचे नियम समजावून घेतच मानव प्रगती करत आहे, विकास साधत आहे. त्यामध्ये जितके सखोल जाऊ तितका माणूस अधिक उंच होणार आहे!

तिची रुष्टता असते ती माणूस प्रयत्नांत, कष्टात कमी पडतो तेव्हा! रोगी व त्याचे पालक जेव्हा पुरेसे श्रम घेत नाहीत व लगेच फळाची अपेक्षा करतात तेव्हा ती नाराज होते. तिने तिच्या उपचारव्यवस्थेत आणखी एक महत्त्वाचे सूत्र राबवले आहे, ते म्हणजे ‘रोग्याला सक्षम करणे’(Empower The  Patient). आजचे डॉक्टर रोग्याला अधिकाधिक परावलंबी (डॉक्टरावलंबी) व म्हणून असहाय्य बनवत असतात. उलट, राजुल तिच्या रोग्यांना (तिच्या रोग्यांच्या बाबतीत त्यांच्या पालकांना) बजावत असते, की “मी काय सांगते ते समजावून घ्या. मी सुचवते ते व्यायामप्रकार करा, तसा आहार घ्या आणि गरजेप्रमाणे महिन्या-दोन महिन्यांनी मला येऊन भेटा.” मेंदू सक्षम करणे हा तिच्या उपचारपद्धतीचा गाभा आहे आणि मेंदू गहाण टाकणे हा आधुनिक जीवनपद्धतीचा आधार आहे. खरे तर, तंत्रविज्ञानातील सर्व साधने माणसाने स्वयंपूर्ण, स्वंतत्र व्हावे यासाठी बनवली जातात, परंतु माणूस त्यांच्याच अधीन होऊन आपल्या जीवनातील अर्थपूर्णता संपवतो.

मी शीव येथील ‘पॅऱॉप्लेजिक फाऊंडेशन’साठी काही पुस्तकांचे संपादन करत असताना मला अनेक अपंगांच्या कहाण्या ऐकायला-वाचायला मिळाल्या होत्या. त्या अपंगांच्या पालकांचे हाल ऐकून कमालीचे व्यथित व्हायला होई. डोंबिवलीची नाहीतर वसईची आई आपल्या अपंग-अवजड मुलाला घेऊन भायखळा नाहीतर चर्नीरोडला उपचारांसाठी जात असे, तिथे तिची तासन् तास रख़डपट्टी होई. पुन्हा परतीचा प्रवास! ती रोग्याच्या व त्याच्या पालकांच्या सहनशीलतेची सीमा असे. त्यांचे कहाणी संपवताना शेवटचे वाक्य उमटे, ‘आलिया भोगासी!’

राजुलच्या उपचारपद्धतीमध्ये रोग्याने महिना-दोन महिने अशा अंतराने तिच्याकडे यायचे असते. ती तेथे पालकांना रोग्याकडून व्यायाम कसे करून घ्यायचे हे शिकवते. त्यानुसार पालकांनी घरी तालीम करत राहायचे, रोग्यात हळुहळू सुधारणा होत असते. सेरिब्रल पाल्सी रुग्णाने दर दिवशी किमान सहा तास व्यायाम करायचेच असतात. खरे तर, तो व्यायाम नसतो-ते खेळच वाटतात, पण मेंदूला जागा करण्यासाठी ते गरजेचे असतात. राजुल काही वेळा घरी कॅमेरामन पाठवून रोग्याचे व्यायाम ठीक चालले आहेत ना याचे शूटिंग करवून घेते व ते पाहून पालकांना सूचना करते. सध्या तिच्याकडे बेल्जियममधील एक पेशंट व्हिडिओ, ऑन लाइनने उपचार घेत आहे. तिच्या पेशंट्सची नावे, त्यांची प्रगती, त्यांचा आहार, सारे तिच्या डोक्यात असते. तिला भक्कम साथ आहे ती तृप्ती सिंघाना आणि डॉ.वैशाली जाधव यांची. त्या दोघींजवळ सर्व रोग्यांचे सर्व रेकॉर्ड आहे. तृप्तीची मुलगी राजुलच्या उपचारांनी पक्षाघातातून पूर्णत: सावरली व ‘लॉ’ करत आहे.

राजुलला आयुर्वेद विचारांची महती कळते. शरीरप्रकृतीचा पित्त-कफ-वात या त्रिदोषांनी विचार करायचा आणि ते दोष गुणकारीदेखील ठरू शकतात; त्यासाठी तसा आहारविहार योजायचा असे आयुर्वेदातील प्रतिपादन शरीराचे मूळ स्वास्थ्य सांभाळणारेच होय ही तिची खात्री पटली. कफ शरीरात स्निग्धता निर्माण करतो. त्यासाठी तो शरीराला आवश्यक, पण कफविकार दुष्ट होतो तेव्हा तो शरीरावयांना आवळून टाकू लागतो. तीच क्रिया पक्षाघातात घडते. हे तिचे आकलन ध्यानी ठेवून आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्याने रोग्यास आहारविहारात बदल सुचवते.

सेरिब्रल पाल्सी (सीपी) हा विकार जरी तिच्या अभ्यासोपचाराचे केंद्र असला तरी मेंदूवरील कोणत्याही प्रकारचा आघात आणि त्यामुळे आलेले अपंगत्व यावर तिची मात्रा चालते असे दिसून आले आहे. वैद्यकशास्त्रात “डॉक्टर ट्रीट्स ‘ही’ क्युअर्स” असे सूत्र वाक्य असते. तेथे ‘ही’ म्हणजे परमेश्वर असे गृहित आहे. राजुलच्या ‘वासा कन्सेप्ट’चे सूत्रवाक्य ‘राजुल ट्रीट्स ब्रेन क्युअर्स’ असे सांगता येईल.

राजुलच्या जीवनातील महत्त्वाची कामगिरी होती धीरुभाई अंबानींवरील उपचार. त्यांना जेव्हा पक्षाघाताचा झटका आला तेव्हा फिजिओथेरपिस्ट म्हणून ती अंबांनींच्या दरबारी दाखल झाली. तिने तिच्या पद्धतीने त्यांच्यावर उपचार केले. धीरुभाईंना त्यांचा परिणाम जाणवला. तेथून राजुलला मोठे क्षितिज लाभले. राजुलने उपचार केलेले व नॉर्मल जीवन जगू लागलेले सीपी रुग्ण आहेत; त्याचबरोबर मेंदू आघाताने जायबंदी झालेले रोगीदेखील आहेत. त्यात मी इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर होऊन अमेरिकेत जाण्याचे नक्की ठरलेली, पण अपघातात सापडून लोळागोळा झालेली तरुण मुलगी पाहिली. ती वर्षभरात खुर्चीत बसू लागली, घरात रांगत हिंडू लागली. रत्नागिरीची चौदा वर्षांची मुलगी… तिने तर अचंबित व्हावे अशी प्रगती केली. तिचा जन्म मुंबईच्या महापालिका रुग्णालयात होत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिच्या मेंदूला इजा झाली. त्यामुळे गोंधळ असा झाला, की ती जन्मत: अंध होती, सारे अवयव दुर्बल होते, तिला मान सावरता येत नव्हती. तोंडात घालायला म्हणून हाताने उचललेला अन्नाचा घास हातात ठेवून  हात वेगळ्याच दिशेला भरकटे. हात व तोंड यांचा मेळ जुळत नसे. तिचे पालक जन्मापासून अकरा वर्षे वणवण फिरले. शेवटी, निराश होऊन रत्नागिरीला जाऊन स्थिरावले. त्याच ठिकाणी, त्यांना राजुलचे नाव कळले. त्या मुलीवर तीन वर्षे उपचार सुरू  आहेत. तिचे शरीरावयवांवर पूर्ण नियंत्रण आहे. तिला ढोबळ रंग ओळखण्याइतपत दृष्टी आली आहे.

राजुलच्या पंचवीस रुग्णपालकांचा एक गट गेल्या वीस वर्षांत तयार झाला आहे. ते पालक तिच्या कामात मदत करायला तयार असतात, अगदी नवीन रुग्णाच्या पालकांना त्यांच्या घरी जाऊन मार्गदर्शन करण्याची त्यांची तयारी असते. त्यांच्या आधारे, मोठे नेटवर्क उभे करून ‘वासा कन्सेप्ट’ (तिची उपचारपद्धत) सर्वत्र पोचावी अशी तिची इच्छा आहे. जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन ४ सप्टेंबरला येतो. त्या दिवशी ‘पेरेंट्स ऑफ द वर्ल्ड सीपी पेशंट्स…’अशी उद्घोषणा करून ती नव्या मोहिमेस आरंभ करणार आहे. तिला उद्या सीपीमुक्त समाज झाला तरी हवा आहे, पण तिचे लक्ष्य २०८० हे आहे. त्यावेळी तिच्यासहित हा लेख वाचणा-यांपैकी काहीच जण कदाचित जिवंत असतील, पण सध्या आपल्याबरोबर जगत असलेल्या एका व्यक्तीचे एवढे मोठे स्वप्न पाहून आजच्या सर्व वाचकांना अचंबा वाटेल हे नक्की.

मी राजुलच्या रविवारच्या उपचारसत्रात एक-दोन वेळा गेलो. मी त्रयस्थ आलेला पाहून तेथील पेशंटचा जवळजवळ प्रत्येक नातेवाईक मला सांगत असे, की राजुल मॅडमना पद्मश्री किंवा कोणतातरी पुरस्कार द्यावा. सरकार तो देत नसेल तर आपण एकत्र  जमून तो त्यांना देऊ! जनपुरस्कार!  या एवढी मोठी दुसरी कोणती गोष्ट सद्यकालात असू शकेल?

राजुल वासा
rajul@brainstrokes.com

– दिनकर गांगल

Updated On – 8 Mar 2016

About Post Author

Previous articleअक्षयवट अर्थात वडाचे झाड
Next articleपांढरीचे झाड अर्थात कांडोळ
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.