भर उन्हाळ्यात कोकणात जायच्या नुसत्या विचारानं देखील घामाघूम व्हायला होते. पण तरीही उन्हाळ्यामध्ये आमची कोकणात वारी ठरलेली असते. मला जायला नाही मिळाले, तरी आमच्या घरची मंडळी हमखास कोकण गाठतात. निमित्त असते, हनुमान जयंतीला होणाऱ्या आमच्या गावच्या उत्सवाचे! म्हणजेच पालीच्या लक्ष्मी पल्लीनाथाच्या उत्सवाचे.
लक्ष्मी पल्लीनाथ हे रत्नागिरी जिल्ह्यातील पाली या गावचे दैवत. मुंबई-गोवा महामार्गावर कोल्हापूरकडे जाणारा फाटा जिथे फुटतो, तिथे पाली हे गाव आहे. पुण्यापासून साधारण दोनशे किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरीपासून बावीस किलोमीटरवर. दरवर्षी चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती) या कालावधीत ‘श्री लक्ष्मी पल्लीनाथा’चा उत्सव मोठ्या उत्साहात पण साधेपणाने साजरा होतो. भपका कमी असल्यामुळेच तो अधिक भावतो!
काही कऱ्हाडे ब्राह्मण मंडळींचे श्री लक्ष्मी पल्लीनाथ हे कुलदैवत आहे. त्यामुळे कऱ्हाडे मंडळींपैकीच एखाद्या कुटुंबाने किंवा दोन-चार कुटुंबे एकत्र येऊन तो उत्सव साजरा करण्याची जबाबदारी स्वीकारतात. म्हणजे उत्सवादरम्यान घेण्याचे कार्यक्रम, भोजन आणि इतर व्यवस्था, मनुष्यबळ आणि आर्थिक गणिते या सर्व गोष्टींची जबाबदारी संबंधित मंडळींना पार पाडावी लागते.
मंदिर व्यवस्थापनाने भक्तांना राहण्यासाठी सात-आठ खोल्या बांधलेल्या आहेत. येणाऱ्या भक्तांची तिथे व्यवस्था होते. मंदिराच्या आजुबाजूलाच राहणाऱ्या गुरव मंडळींच्या घरीही राहता येते. त्यापेक्षाही भाविकांची गर्दी वाढली तर मग नेहमी येणारी मंडळी ओळखीपाळखीतून गावातील घरे गाठतात.
उत्सवात दररोज सकाळी अभिषेक, रूद्र, पूजा, आरती आणि मग महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. त्यामुळे सकाळच्या आरतीला आणि भंडाऱ्याला येणाऱ्या मंडळींची संख्या अधिक. जेवणाला फार मोठा मेन्यू नसतो. साधा भात आणि आमटी, तोंडी लावायला मिक्स भाजी किंवा उसळ आणि ताक. मसाले भात असेल तर कढी आणि जिरा राईस असेल तर टोमॅटोचे सार. मिक्स भाजी आणि उसळ कायम. सकाळी आणि संध्याकाळी, बहुतेक वेळी यापैकीच काहीतरी मेन्यू असतो. शेवटच्या दिवशी मात्र, साग्रसंगीत पान असते. पुऱ्या-कुर्मा भाजी, उसळ, भात, आमटी, ताक आणि शिरा, जिलेबी किंवा गुलाबजाम यांपैकी एखादा गोड पदार्थ. अर्थात, जेवण साधे असले तरी त्या जेवणाचा स्वाद काही और असतो. महाप्रसाद घेतल्यानंतर येणारी तृप्तता अवर्णनीय म्हटली पाहिजे.
पण या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते, ते संध्याकाळी होणारी आरती आणि रात्रीचा प्रदक्षिणा तसेच भोवत्यांचा कार्यक्रम. जर तुम्हाला गणपती, शंकर, देवी, हनुमान, दत्त, पांडुरंग यांच्यासह आणखी तीन-चार देवांच्या आरत्या येत असतील तरी त्यांचा उपयोग नाही. कारण संध्याकाळी जेव्हा आरत्या सुरू होतात, त्यावेळी वेगवेगळ्या देवांच्यां तेवढ्याच वेगवेगळ्या आरत्या म्हटल्या जातात. त्यामध्ये गणपती, देवी, शंकर, सूर्यनारायण, महालक्ष्मी, पल्लीनाथ, लक्ष्मी रमणा, त्रिभुवन सुंदर दशावतार, श्रीकृष्ण आणि अशा अनेक देवांचा समावेश असतो. त्या आरत्या म्हटल्या म्हणण्यापेक्षा गायल्या जातात, असे म्हणणे जास्त योग्य ठरेल. तबला, पेटी आणि टाळ यांच्या संयोगातून निर्माण झालेला विलक्षण आवाज आणि सोबतीला पाच-पन्नास जणांच्या स्पष्ट पण उच्च रवातील आरती. तो कार्यक्रम ऐकून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. कानाची भूक कधी भागते ते कळतही नाही.
बरे, तेथे जवळपास प्रत्येक जण तबला, पेटी आणि टाळ वाजवण्यात अगदी माहीर. हे कोकणाचे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे. आपण पानावर जितक्या सहजतेने बसतो, तितक्या सहजतेने ती मंडळी पेटी किंवा तबला वाजवण्यास बसतात. आणि तेथे नुसती पेटी वाजवली जात नाही; काळी एक, काळी दोन वगैरेची चर्चाही रंगते. मग कुठला सूर कुठे कसा कमी पडला किंवा जास्त झाला, याच्या खाणाखुणा होत असतात. टाळ कुटणे हा वाक्प्रचार कसा पडला असेल, त्याचे उत्तर आपल्याला त्या आरतींच्या वेळी मिळते. ही मंडळी इतक्या खुबीने आणि इतके मन लावून टाळ वाजवतात, की धन्य व्हायला होते व टाळ नावाचे छोटेखानी वाद्य हे ताल, लय आणि आवाज यासाठी इतके आकर्षक असू शकते, हे फक्त कोकणातल्या आरत्यांच्या वेळी कळते.
आरत्या झाल्या, की मग रात्रीचे जेवण, त्यानंतर एखाद्या बुवांचे भजन किंवा कीर्तन आणि मग प्रदक्षिणा अन् भोवत्या. प्रदक्षिणा म्हणजे छबिना. देवाचा मुखवटा सजवलेल्या पालखीत ठेवण्यात येतो आणि मग मंदिराच्या प्रवेशव्दाराच्या समोरून प्रदक्षिणा सुरू होते.
‘‘धाव रे गणराया, पाव रे गणराया, मंगलमूर्ती तू मोरया, मूर्ती तू मोरया’’ या पारंपरिक गीताने प्रदक्षिणेची सुरुवात होते. सोबतीला टाळ आणि टिमकी असतात. त्यावेळी भजन, भक्तिगीत, देवादिकांवरील गाणी वगैरे म्हटली जातात. एक जण आधी सांगतो आणि मग बाकीचे लोक त्यामागून म्हणतात, अशी पद्धत. ती प्रदक्षिणा चार भागांमध्ये होते. मंदिरासमोरून ते डाव्या हाताच्या मध्यापर्यंत. तेथून मंदिराच्या मागेपर्यंत. मागपासून ते उजव्या भागाच्या मध्यापर्यंत आणि मग तेथून मंदिराच्या समोरपर्यंत. एका प्रदक्षिणेत चार भजने किंवा देवाची गाणी होतात. जेव्हा पालखी चार वेळा थांबते तेव्हा आपण नेहमी म्हणतो त्या देवांच्या आरत्या म्हटल्या जातात. प्रत्येक वेळी थांबल्यावर एक कडवे म्हटले जाते. म्हणजे देवळाच्या डावीकडे थांबल्यानंतर ‘सुखकर्ता दुःखहर्ता’, देवाच्या पाठीमागे थांबल्यानंतर ‘रत्नखचितफरा तुज गौरीकुमरा’ आणि उजवीकडे थांबल्यानंतर ‘लंबोदर पितांबर फणिवर वंदना’… प्रत्येक आरतीच्या वेळी अशीच पद्धत.
एक प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर भोवत्या होतात. भोवत्या म्हणजे देवळासमोरच्या मोकळ्या जागेत भक्तगण गोल रिंगण करून तालबद्ध फेर धरतात. एका रात्रीत पाच प्रदक्षिणा आणि पाच भोवत्या होतात. एखादे भजन किंवा एखादे गाणे किंवा एखाद्या मंत्रावर भोवत्यांसाठी ताल धरला जातो. म्हणजे ‘ओम गं गणपतये नमो नमः’ ‘श्री सिद्धीविनायक नमो नमः’ या मंत्रावरसुद्धा भोवत्या पार पडतात. त्यावेळी वेगवेगळ्या पदन्यासांद्वारे नृत्याचा फेर धरला जातो. प्रत्येक भोवतीचा खेळ लोकांच्या उत्साहानुसार वीस-पंचवीस मिनिटे चालतो. नृत्याचा वेगही कमी जास्त केला जातो. भोवत्यांचा फेर सुरुवातीला हळुहळू, नंतर वेगाने आणि नंतर पुन्हा हळुहळू… अशा क्रमाने धरला जातो. पंधरा-वीस मिनिटे मजबूत घाम निघाल्यानंतर मंडळी पुन्हा ताज्या दमाने नव्या प्रदक्षिणेसाठी तयार होतात. प्रदक्षिणा आणि भोवत्या हा खेळ पहाटे अडीच-तीनपर्यंत चालतो. ‘‘धन्य हो प्रदक्षिणा पल्लीनाथाची…’’ हे प्रदक्षिणेत म्हटले जाणारे शेवटचे भजन. त्यानंतर मग पल्लिनाथाची आरती आणि त्यानंतर मंडळी घरी जातात.
शेवटच्या दिवशी प्रदक्षिणा आणि भोवत्या झाल्यानंतर लळिताचे कीर्तन रंगते. ते पहाटे पाच-साडेपाचपर्यंत चालते. लहानथोरांपासून सर्व मंडळी या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. सर्व कार्यक्रमांमध्ये रवी भाट्ये यांची उपस्थिती उत्साहवर्धक असते. प्रचंड पाठांतर, तबला-पेटीची इतकी जाण, भजनाला लागणारा आवाज या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे उत्सवाचे नियोजन कोणाकडेही असले तरी सर्व उत्सवाचे कर्तेधर्ते ते असतात. आरत्या, प्रदक्षिणा किंवा भोवत्या यांपैकी कोणतीही गोष्ट त्यांच्याविना अपूर्ण वाटते.
उत्सवाचे तेच आकर्षण प्रत्येकाला दरवर्षी तेथे खेचून आणते. एखाद्या दिवशी तरी उत्सवाला हजेरी लावून जाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. कोकणातल्या प्रत्येक गावात असे उत्सव साजरे होत असतील, त्यामुळे त्या मंडळींना या उत्सवाचे फारसे अप्रूप नसणार. पण जन्मापासून आतापर्यंत घाटावर किंवा मुंबईत राहिलेल्या माझ्यासारख्या अनेक जणांना हा उत्सव म्हणजे पर्वणी वाटतो.
– आशीष चांदोरकर
Last Updated On – 26 April 2016
आमच्या पुण्यामध्ये पण असे
आमच्या पुण्यामध्ये पण असे ऊत्सव साजरे होत असतात आणी ते प्रत्यक्ष अनुभवतो.पण कोकणात असे असते वाचुन खुप आनंद झाला.तुम्ही ज्याप्रकारे वर्णन केले ते वाचुन अंगात एक रोमांच भरतो जणु काय हे प्रत्यक्षात अनुभवत आहे.छान खुपच छान.
यात्रेचे वर्णन इतके सुंदर आहे
यात्रेचे वर्णन इतके सुंदर आहे की वाचतानाच प्रत्यक्ष सहभागाचा अनुभव आला.
वाचून आनंद झाला. एकदा भेट…
वाचून आनंद झाला. एकदा भेट दिलीच पाहिजे.
Comments are closed.