मिडिया आणि जनमताचा रेटा

0
58
मिडिया आणि जनमताचा रेटा
मिडिया आणि जनमताचा रेटा

मिडिया आणि जनमताचा रेटा ‘व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन’ व ‘साने केअर ट्रस्‍ट’ यांच्‍यावतीने दर महिन्‍याच्‍या चौथ्‍या रविवारी खोपोलीजवळच्‍या माधवबागेत दिवसभराच्‍या चर्चेच्‍या ‘विचारमंथन’ हा कार्यक्रम होत असतो. सद्यकालीन सामाजिक-सांस्कृतिक वेगवेगळ्या प्रश्नांवर सखोल चर्चा व विचारमंथन व्हावे यासाठी पनवेल-खोपोली रस्त्यावरील माधवबागेत (चौकच्या पुढे सहा किलोमीटर) पन्नास-साठ मंडळी एकत्र जमतात आणि निवडक विषयाच्‍या निरनिराळ्या बाजू तपासून पाहतात. ऑक्टोबरमध्ये विषय होता अभिजात वाचनाचा , नोव्हेंबरमध्ये चित्रकलेचा आस्वाद व सध्याचा बाजार असा. दोन्ही विषयांबाबतच्या प्रबंधात्मक मांडणीची व्हिडिओ फीत तयार होत आहे.

 आपण डिसेंबरमध्ये चर्चा करत आहोत ‘मिडिया’ची. एकेकाळी लोकशिक्षणाचे साधन म्हणून जनसंपर्क माध्यमांकडे पाहिले जाई. त्‍यामध्‍ये गेल्‍या पंधरा-वीस वर्षांत खूप बदल होत गेले. मिडियाविश्‍व एका बाजूला धनाढ्यांचे, राजकारण्‍यांचे अंकित झाले. दुस-या; बाजूला, तेच विश्‍व लोक आंदोलनास कारणीभूत ठरले. त्‍याचे प्रत्‍यंतर इजिप्‍त-ट्युनिशिया येथे जसे आले तसे अण्‍णा हजारे आंदोलनाबाबतही जाणवले. तरीसुद्धा प्रश्‍न कायम राहिला आहे, की गणपती दूध प्‍यायल्‍याची बातमी लंडनपासून गडचिरोलीच्‍या आदिवासींपर्यंत पोचली कशी? मिडियामधील माहितीचा ‘कंटेण्ट’ मनामध्ये गोंधळ व गलबलाच अधिक निर्माण करतो. दरम्यान तंत्रविज्ञानातील प्रगतीचा झपाटा व त्यातून गवसत असलेली ‘अॅप्लिकेशन्स’ आणखी अधांतरी अवस्था निर्माण करतात. मिडिया हा एकेकाळी लोकशाहीचा पाचवा स्तंभ मानला जाई. त्याचबरोबर माध्यमांवर लोकशिक्षणाची जबाबदारी असे. त्याऐवजी जास्तीत जास्त नफा गोळा करणे त्यासाठी साधनशुचितेचा अवलंब न करणे हा माध्यमांचा ‘उद्योग’ बनला आहे, हे काळजी निर्माण करणारे आहे.

 या सा-या घडामोडींचा, मुद्यांचा उहापोह दिवसभराच्‍या तीन सत्रांमध्‍ये होणार आहे. त्‍यामध्‍ये मिडिया क्षेत्रातील मात्तब्‍बर, ज्ञानी लोक सहभागी होणार आहेत. ते आहेत, भारतकुमार राऊत, जयराज साळगावकर , अमला नेवाळकर, अतुल फडणीस, उदय निरगुडकर, नितिन वैद्य आणि अवधूत डोंगरे.

 सर्व संवेदनाशील व विचारी माणसांनी या चर्चेस यावे असे आमंत्रण आहे. मात्र दिवसभराचा कार्यक्रम असल्याने व्यवस्थापनाच्या सोयीसाठी उपस्थित राहू इच्छिणार्‍यांनी येत असल्याचे कळवणे जरुरीचे आहे.

संपर्क महेश खरे – मोबाइल ९३२०३०४०५९.

– दिनकर गांगल
डॉ. यश वेलणकर

‘माधवबाग’ येथे पोचण्‍याचा मार्ग –

माधवबागेला पोहोचण्‍याचा नकाशा

About Post Author

Previous articleसंस्कृत आणि प्राकृत
Next articleहरमेन्यूटिक्सचे शास्त्र
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.