मॅक्सिन बर्नसन – शिक्षणातील दीपस्तंभ (Maxine Berntsen – Life long efforts for model school)

1
413

मॅक्सिन बर्नसन या नॉर्वेजिअन अमेरिकन विदुषी तरुण वयात भारतात आल्या आणि भारताच्याच झाल्या. त्यांचे शिक्षण क्षेत्रात काम मोलाचे समजले जाते. मॅक्सिन बर्नसन या त्यांच्या पीएच डी च्या अभ्यासाची तयारी करत असताना त्यांच्या कॉलेजमध्ये इरावती कर्वे व्याख्यान दौऱ्यावर आल्या होत्या. मॅक्सिनबाईंनी त्यांच्याशी ओळख करून घेतली. मॅक्सिनबाई यांना भाषाशास्त्रात पीएच डी करायची होती. त्यांनी त्यांच्या पीएच डी चे काम मराठीत करण्याचे ठरवले. इरावती कर्वे यांनी त्यांना पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील फलटणला जाण्यास सुचवले. इरावती कर्वे यांची मुलगी जाई निंबकर तेथे राहत असे. तिच्या स्थानिक ओळखीमुळे अभ्यासाचे काम सुकर होईल म्हणून मॅक्सिनने तेथे जावे. म्हणून त्या फलटण या गावी 1966 साली आल्या. तीच मॅक्सिनबाईंची कार्यभूमीही झाली ! त्यांचा पीएच डी चा विषय ठरला, Social variation in the Marathi speech of Phaltan. त्या अभ्यासासाठी त्यांना फुलब्राइट ही फेलोशिप मिळाली.

मॅक्सिन बर्नसन यांचे काम फलटणच्या मंगळवार पेठ या दलित वस्ती असणाऱ्या झोपडपट्टीत सुरू झाले. तेथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या होत्या. (1973) निवडणुकीनंतर नेत्यांची मिरवणूक निघाली होती. मॅक्सिनबाई चौकात उभ्या राहून मिरवणूक पाहत होत्या. पाच-सहा छोटी मुले शेजारी उभी राहून मॅक्सिनबाई यांना निरखत होती. मॅक्सिनबाईंनी त्यांना विचारले, ‘शाळेत जाता का रे ?’ पोरे म्हणाली, ‘नाही’. मॅक्सिनबाईंनी पुन्हा विचारले, ‘शिकायचंय का?’ पोरे पळून गेली ! पण त्या पोरांनी मॅक्सिनबाई यांना चार-सहा दिवसांनी गाठले. ती म्हणाली, ‘आम्हाला शिकायचंय’. मॅक्सिनबाईंनी स्वत:च्या घरी त्यांना बोलावले. ती मुले मंगळवार पेठेतील होती. मॅक्सिनबाई यांना काही दिवस त्यांना घरी शिकवल्यावर वाटले, की त्यांनी स्वत: मुलांच्या घरी जाण्यास हवे. त्या स्वत: मंगळवार पेठेत गेल्या. तेथे शालाबाह्य मुले खूप होती. त्यांच्या पालकांना त्यांना शिकवावेसे वाटत होते. मुले तयार झाली.

झोपडपट्टीतीलच अक्काबाई शेख नावाच्या महिलेने तिच्या झोपडीसमोरील जागेत खाट टाकून दिली. शिक्षिका खाटेवर आणि मुले अंगणात बसत. मॅक्सिनबाई वासंती दांडेकर नावाच्या मैत्रिणीसोबत मुलांना शिकवू लागल्या. पावसाळा सुरू झाला. फलटण महाबळेश्वरच्या पर्जन्य छायेत आहे. त्यामुळे तेथे पाऊस कमी पडतो. परंतु तेवढ्या पावसानेही झोपडपट्टीत सारा चिखलाचा राडा होई. त्यामुळे वर्ग कोठे भरवावा हा प्रश्न उपस्थित झाला.

झोपडपट्टीपासून जवळच एक पडकी, मोडकी व घाण असलेली धर्मशाळा होती. मॅक्सिनबाईंनी ती नगरपालिकेकडून वर्ग भरवण्यासाठी मिळवली. तिची डागडुजीही करण्यास लावली. नगरपालिकेने ती तीन हजार रुपये खर्चून वापरण्यायोग्य केली. वर्ग भरू लागले. परंतु शिकणाऱ्या मोठ्या मुलांबरोबर त्यांच्यावर सोपवलेली छोटी पोरेसुद्धा येऊ लागली. ती छोटी मुले मोठ्या मुलांना शिकू देत नसत. तेव्हा त्यांच्यासाठी बालवाडीचा प्रस्ताव पुढे आला. मीना महामुनी या ढोलकी-खंजिरी वाजवून मुले गोळा करून आणत. बालवाडी म्हणजे नुसता धिंगाणा होता. त्या मुलांचे हात-पाय-तोंड धुणे, तेल लावून वेण्या घालणे हे ओघाने आलेच.

मॅक्सिन बर्नसन यांना भारतीय नागरिकत्व 1978 मध्ये मिळाले. त्यांनी ‘प्रगत शिक्षण संस्थे’ची स्थापना केली आणि शिक्षणाच्या कामाला संस्थेचे अधिष्ठान दिले. संस्थेची नोंदणी मुंबई सार्वजनिक न्यासाखाली 1984 साली झाली. मॅक्सिन बर्नसन यांना शालाबाह्य मुलांना अनौपचारिक शिक्षण देणे हा काही खरा मार्ग नव्हे असे वाटू लागले. मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात काहीही करून सामील झाली पाहिजेत. म्हणून त्यांनी मुलांना नगरपालिकेच्या शाळांमध्ये भरती करण्याचे काम हाती घेतले. पण ती एक अडथळ्यांची शर्यतच ठरली. बहुसंख्य मुलांकडे जन्मतारखेचे दाखले नव्हते. त्यांना पालकांच्या प्रतिज्ञापत्रावर दाखल करून घेण्यासाठी थेट जिल्हा अधिकाऱ्यांपर्यंत वाऱ्या कराव्या लागल्या, परंतु त्या प्रयत्नांना यश आले. मुले एकदाची दाखल झाली. तरीही जिल्हा अधिकारी बदलले तर नियम फिरण्याची शक्यता होती. म्हणून मुलांचे दाखले तयार करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली. ती प्रक्रिया बरीच कटकटीची, वेळखाऊ व खर्चिक असल्याने कित्येक पालक कंटाळून मध्येच सोडून देत व मुले पुन्हा शाळेबाहेर राहत.

झोपडपट्टीतील मुले शाळेत दाखल केली, की जिंकले असे नव्हते. मुलांना अभ्यास जमत नसे. घरी त्यासाठी कोणी मदत करत नसत. कधी कधी वह्या-पुस्तके-गणवेश नाही म्हणून गुरुजी घरी पाठवून देत. कधी पालकांच्या आजारामुळे मुले दीर्घकाळ गैरहजर राहत. त्यामुळे त्यांचे नाव पटावरून कमी केले जाई. कधी कधी तर पोलिस मुलांना उचलून कोठल्याशा चोरीच्या गुन्ह्याखाली रिमांड होममध्ये नेऊन टाकत. रोज नवा प्रसंग उभा राही. मॅक्सिन बर्नसन यांनी मुलांना अभ्यासात मदत करण्यासाठी पूरक वर्ग सुरू केले. गावातील धनिक मंडळींना भेटून मुलांच्या वह्या-पुस्तके, गणवेश यांची सोय केली.

क्षय रोगाचे प्रमाण मंगळवार पेठेत जास्त होते. त्याच्याबरोबर दारू आणि लिव्हर सिरोसिसचेही प्रमाण अती होते. मुलांचे शिक्षण घरातील कर्ता पुरुष अथवा महिला आजारी पडल्याने थांबते. मुलांची गरज घरी कामाला किंवा बाहेर कमावण्यासाठी असते. मुले शाळेत येण्याबरोबर टिकणे महत्त्वाचे असते आणि ती टिकवण्यासाठी पालकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, हे जरा विचित्र वाटले तरी किती महत्त्वाचे असते हे लक्षात घेऊन मॅक्सिनबाईंनी त्यांच्या संस्थेत तीही तरतूद करून ठेवली.

शालेय वयाच्या मुलांबरोबर पेठेत काम करणारी मोठी मुलेही होती. त्यांनाही शिकण्याची इच्छा होती. त्यातून रात्रीचे साक्षरता वर्ग सुरू झाले. मॅक्सिनबाईंनी प्रौढ साक्षरता संस्कार वर्ग आणि शिवण वर्ग शाळा सोडलेल्या मोठ्या मुली व निरक्षर असणाऱ्या महिला यांच्यासाठीही सुरू केले. लोक त्यांना प्रेमाने मॅक्सिनमावशी म्हणत. त्या सायकल घेऊन सर्वत्र फिरत. त्या मंगळवार पेठेत सर्वांच्या परिचयाच्या झाल्या. एखादे मूल शिकत नसले तर ते मंद आहे किंवा शाळेत येत नसेल तर त्याच्या आईवडिलांना मुलांच्या शिक्षणात रस नाही अशी सवंग विधाने होतात. मॅक्सिन यांनी त्या सवंग विधानांमागील कारणे शोधून ती दूर करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे मजुरी करणाऱ्या मुलांनीही शिकण्याची इच्छा व्यक्त केली तरी त्यांच्यासाठी प्रौढ साक्षरता वर्ग असे.

मॅक्सिनबाई या भाषाशास्त्रज्ञ. इंग्रजी ही तर त्यांची मातृभाषा. त्या मराठी शिकल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले, की मराठीतील अक्षरचिन्हांचा व स्वरचिन्हांचा उच्चारांशी एकास एक असा संबंध असतो. म्हणजे कान्याचा उच्चार ‘आ’ आहे, तो कोणत्याही शब्दात कोठल्याही अक्षरापुढे आला तरी त्याचा उच्चार ‘आ’ च होतो. मॅक्सिनबाईंनी त्याचा वापर करून ‘प्रगत वाचन पद्धत’ विकसित केली. त्यांनी सिल्विया अॅश्टन वॉर्नर या न्यूझीलंडमधील एका शिक्षिकेच्या माओरी मुलांना शिकवण्याच्या अनुभवाचाही उपयोग करून घेतला. त्यांनी ‘आपण वाचूया’ या प्रगत वाचन पद्धतीच्या पुस्तिकेत अक्षरे व स्वरचिन्हे यांचा एकेक गट बनवला आहे. पहिला पाठ आहे- म, ह, झ, T (काना) आणि  ि (वेलांटी). त्याबरोबर आई हा शब्द म्हणून वाचण्यास शिकवले जाते. त्यामागील कारणमीमांसा अशी, की मुलांच्या अनुभवविश्वाशी जवळीक साधणारे शब्द म्हणजे मी, माझा, आई, मामा आणि मामी. मुले ते शब्द लिहिण्या-वाचण्यास पटकन शिकतात. शिवाय, पहिल्याच पाठात मुले हा ‘मी’, ‘हा माझा’, ‘ही माझी आई’, ‘ही माझी मामी’ यांसारखी लहान लहान वाक्येही वाचू-लिहू शकतात. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. प्रगत वाचन पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुलांना बोली भाषा आणि लेखी भाषा यांचा संबंध दाखवून दिला जातो. तसेच, मुलांच्या स्वत:च्या अनुभवांना त्या पद्धतीत महत्त्वाचे असे स्थान आहे.

मॅक्सिन यांचे कार्य प्रथम सुरू झाले ते शालाबाह्य, गरीब, दलित, मुली यांना शाळेत भरती करणे व टिकवणे यांपासून. परंतु त्यांच्या लक्षात फलटणमधील शाळांचे सर्वेक्षण करताना असे आले, की मध्यमवर्गीय मुलांना मिळणारे शिक्षणही त्यांची सृजनशीलता व ऊर्मी दाबणारे आहे. म्हणून त्यांनी कमला निंबकर बालभवन ही पूर्णवेळ मराठी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या शाळेत समाजातील सर्व स्तरांमधील मुलांना जाणीवपूर्वक प्रवेश दिला जातो. शाळा बालवाडी ते दहावीपर्यंत आहे. वर्गातील बसण्याच्या रचनेपासून शिकवण्याच्या पद्धतीपर्यंत सगळीकडे प्रायोगिकता दिसून येते. वर्गातील मुलांची संख्या मर्यादित आहे. शाळेचे वातावरण निधर्मी, आनंदी व मोकळे आहे. मॅक्सिन बर्नसनस यांचे स्वप्न त्यांची शाळा फलटण तालुक्यातील इतर शाळांसाठी एक साधन केंद्र म्हणून असावी असे आहे. तिचे काम जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वाचन-लेखन प्रकल्प, स्लाइड शोज् व विज्ञान जत्रा यांच्या स्वरूपात चालते. त्या म्हणतात, “माझ्या देशात शिक्षणापासून वंचित मुले आहेत तोपर्यंत माझे कार्य चालू राहील.” प्रगत शिक्षण संस्था फलटणसारख्या तालुक्याच्या ठिकाणी स्थित असली तरी तिचे काम जिल्हा परिषदेच्या शाळांमध्येही चालते.

मॅक्सिन बर्नसन यांनी जाई निंबकर यांच्यासह इंग्रजी मातृभाषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्यासाठी दोन पुस्तके, एक चित्र कोश, व्याकरणाचे एक पुस्तक व एक शब्दकोश तयार केला आहे. त्या व्यतिरिक्त त्या वेळी त्या ‘असोसिएटेड कॉलेज ऑफ मिडवेस्ट इंडिया स्टडीज प्रोग्राम’साठी (ए सी एम) काम करत होत्या. मॅक्सिन बर्नसन यांना त्यांच्या शिक्षणविषयक कामासाठी अभिजात साहित्य संमेलन (सातारा), साने गुरुजी राष्ट्रीय पुरस्कार, पद्मजा राणी बंग राष्ट्रीय पुरस्कार, फलटण स्वयंसिद्धा महिला पुरस्कार, कमला व प्रभाकर पाध्ये पुरस्कार आणि आय एम सी प्लॅटिनम ज्युबिली एण्डोमेंट ट्रस्ट अॅवॉर्ड असे विविध पुरस्कार-सन्मान प्राप्त झाले आहेत. ‘डॉटर्स ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात त्यांच्यावर लिहिला गेलेला लेख आहे.

मंजिरी निंबकर 9822040586 manjunimbkar@gmail.com

(जीवनज्योत दिवाळी 2007 अंकावरून उद्धृत-संस्कारित-संपादित)

————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. खूपच प्रेरणादायी माहिती आहे.परदेशातून येऊन इथल्या
    मातीशी एकरूप होणे सोपे नाही.अनेक भारतीयही परदेशात जाऊन लक्षणीय कार्य केल्याचे दाखले आहेत.अशा प्रेरणादायी कथा समोर यायला हव्या.मंजिरी मॅडमचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोठे आहे.लेखिका मंजिरी निंबकर आणि थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे अभिनंदन आणि आभार सुद्धा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here