मी दापोलीत 1996 मध्ये (मुंबई सोडून देऊन) स्थिरावलो, तेव्हा जानेवारीतही ‘ककूकॉल’ ऐकू यायचा. दोन नर कोकीळ परस्परांमध्ये ‘स्पर्धा’ करत. कोकिळा (मादी), त्याचीच निवड करेल यासाठी त्या प्रत्येकाची चढाओढ ‘उंच’ आवाजात चालायची, काही वेळा त्यात चीडही जाणवायची. कावळे काही वेळा या कोकीळ पक्ष्यांना पिटाळून लावण्याचा प्रयत्न करायचे.
वसंत ऋतूमध्ये पहाटे, दयाळ पक्ष्याची लकेर मोठी सुखद वाटायची. खेड्यात, खरे तर, कोंबडा आरवतो. पण मी तो ‘मुर्गास्वर’ पहाटे, गेल्या दहा वर्षांत तरी, ऐकलेला नाही. मध्यरात्री ओरडणारा कोंबडा तर भुताचा म्हणून कापला जातो असे माझ्या कानावर होते. ‘कोंबडे कापायला एक कारण !’
मी राहतो त्या दापोलीच्या ‘वडाचा कोंड-लालबाग’ परिसरातील पाखरांची संख्या व विविधता गेल्या पंचवीस वर्षांत कमी होत गेली आहे, कारण झाडांची संख्या कमी झाली आहे ! आमच्या सोसायटीच्या आवारातील शिवणीचे गारवा, सावली देणारे झाडही माझ्या विरोधाला न जुमानता पाडण्यात आले ! त्यामुळे मी कितीतरी पक्षी व त्यांचे स्वर यांना मुकलो ! ‘रातवा’ (रात्रिचर) तर पहाटेपूर्वीच येऊन जायचा. ‘कापू कापू कापू’ असा त्याचा आवाज ! ‘मोठा तांबट’ पक्षी पहाटे ‘कुटरूक कुटरूक’ असा आवाज करू लागायचा. मुनिया, फुलचुखी, शिंपी, नाचण हे छोटे पक्षी ‘किलबिल’ करत असत. तेही कमी झाले आहेत. बाहेरच्या मोठ्या आवाजांचे आक्रमण सतत होत असतेच; त्यामुळेही पक्षी नाराज असावेत. केवळ फटाके व वाजप नव्हे; पण व्यावसायिक आवाज व वाहनांचे कर्णे… एकूण मानवी वर्दळ पक्ष्यांना मानवणारी नाही. दापोली ‘कोकणासारखी’ न राहता ‘मुंबईसारखी’ बनत चालली आहे. केवळ पक्षी नाहीत; तर सर्प, घोरपड, मुंगूस, खारकुंड्या ही ‘मंडळी’ही सुखरूप राहणार नाहीत. म्हणूनच ‘निसर्ग मंडळा’ची गरज प्रत्येक शाळेत आहे.
पावसाळ्यात धीट बनलेले (म्हणजेच जोडीदारासाठी आतुरलेले) पाणकोंबडीसारखे पक्षी तर घराच्या अगदी जवळ आलेले मला आठवतात. पण पाणपक्ष्यांनीही आसपासचे गवतरान व त्यात साठणारे पाऊसपाणीच नाहीसे झाल्यावर पलायन केले आहे. खंड्या पक्षी गटारातील किड्यांसाठी आलेला पाहून मलाच (फक्त) वाईट वाटले ! टिटवीचा स्वतःचेच नाव वाजवणारा ‘टिटिटवी, टिटिटवी’ हा स्वरही क्वचित ऐकू येतो. आमच्या परिसरावरून पूर्ण दापोलीची कल्पना करणे बरोबर नाही, पण कमी-जास्त प्रमाणात पक्ष्यांसारख्या निसर्गरूपांवर संक्रांत येत चालली आहे हे उघड आहे. दापोलीतील म्हणजे तालुक्यातील काही परिसर (सारंग, कळंबट या गावांच्या आसपासची रानगर्द रूपे) पक्ष्यांसाठी अनुकूल आहेत, पण भविष्यात?
पक्ष्यांबद्दलचे पारंपरिक संकेत दापोलीतही आहेत. घुबड, टिटवी अशुभ तर पहाटे होणारे ‘कोकमकावळ्या’चे (भारद्वाज) दर्शन शुभ ! हिवाळ्यात आढळणारा चाण (नीलकंठ) पक्षीही शुभलक्षणी असल्याचे एका ज्येष्ठ नागरिकाने मला सांगितले होते. ‘गरूडा’सारखा मोठा शिकारी पक्षी झाडावर येऊन ‘झपकन्’ बसला की झाड कसे हलते-‘गोंधळते’, ते मी दापोली शहरात ‘पाहुणा’ म्हणून ऐंशीच्या दशकात यायचो तेव्हा पाहिले होते, पण गरूड पहाटे येत नाहीत ! तो राजस पक्षी आहे. त्याला कोण बोलणार? तो त्याच्या ऐटीत, त्याच्या मूडप्रमाणे सगळे करणार. माइट इज राइट ! ससाणे, घारी यांचेही अस्तित्व मला जाणवत आले. त्या तुलनेत गिधाडे कमी !
माझा आवडता पक्षी बुलबुल ! त्याचा मधुर स्वरही ऐकण्यासारखा. ‘लालबुड्या’ आणि तुरेवाला ‘शिपाई बुलबुल’ हे दोन्ही प्रकार आमच्या आसपास अजूनही अधूनमधून दिसतात. ‘शिपाई’ जास्त दिसतो. आम्ही हिरवे बुलबुलही पाहिले आहेत. सुमारे वीस वर्षांपूर्वी तर राखी टीट, टोईपोपट (तुईया) आप्तपक्षी (हळद्या) निखार, मैनेचे दोन-तीन प्रकार (‘पहाडी मैना’ मात्र कधीच नाही !), कोवळ्या उन्हात त्यांच्या ‘पप्पा-मम्मी’बरोबर येणारी पोपटांची गोजिरी पिल्ले; मात्र, ‘कोतवाल’ पहाटे सर्वांच्या आधी हजर असे. कोतवाल नंतर म्हशीच्या पाठीवर ऐटीत व विनामूल्य बसून गवतरानात फिरायचा; मधूनच, हवेत व गवताच्या दिशेने झेप घेऊन गवती कीटक पकडून फस्त करायचा. तो म्हशीच्या अंगाला चिकटून तिला त्रास देणाऱ्या किड्यांचा बंदोबस्त करतो.
‘लव्हबर्ड’सारखे पाळीव, विशेषतः विदेशी जातीचे पक्षी, अगदी झेब्राफिंच, ऑस्ट्रेलियन फिंच, ‘केकाटू’ हे दापोलीत विकत मिळतात. त्यामुळे अनेक नवश्रीमंत मंडळींची पहाट या ‘केजबर्ड्स’चे आवाज ऐकत उगवत असणार ! ‘सूर्यपक्षी’ हा तर माझ्या तळमजल्यावरील छोट्या सदनिकेत गॅलरीत येतोच; पण मी सकाळी साडेसातला कॉलेजकडे अध्यापनासाठी जाऊ लागताच, घरी कोणी नाही असे पाहून, तो आत शिरल्याचेही मी पाहिले आहे ! मी उन्हाळ्यात या पाखरांसाठी पाण्याचे पसरट भांडे भरून ठेवायचो, तेव्हा चिमण्या हमखास यायच्या. (त्याही संख्येने कमी झाल्या आहेत. किराणा मालाच्या दुकानापाशी धान्य उधार मागायला कोणी यावे तशा दोन-तीन चिमण्या मला मध्यंतरी एकदा दिसल्या !) सुतारपक्षीही मी आमच्या परिसरात गेल्या काही वर्षांत पाहिलेला नाही.
उंच, मजबूत चिवट झाडे हे दापोलीचे वैशिष्ट्य असे ललित लेखक रवींद्र पिंगे मला सांगत. पण, आता, कोणतीही झाडे चालतील, पण अधिकाधिक झाडे व उत्तम वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन हवे आहे ! मी पूर्वी दापोलीतच ताडभिंगऱ्या आणि भृंगी (Bee eater) म्हणजे वेड्या राघूच्या कसरती ‘एन्जॉय’ केल्या आहेत. दापोलीच्या आसपासच्या गव्हे, मौजे दापोली, गिम्हवणे येथे मात्र पक्ष्यांना अजूनही वाव आणि त्यांचा काही प्रमाणात वावर आहेच !
कावळे तडजोडवादी असतात. बगळ्यांची वसाहत असते. पाणबगळा मला अगदी जवळून दर्शन देतो. गायबगळे दापोलीत टिकून आहेत. पक्षी की प्राणी अशा वटवाघळांनी एखादे विशिष्ट झाड पूर्णपणे ‘आत्मसात’ करून ताब्यातच घेतलेले दिसते. तेही भरवस्तीत ! कर्रे, हर्णे, दाभोळ, केळशी, मुरूड अशा किनाऱ्यांवर पाहुणे पक्षी, त्यांचे सामूहिक स्थलांतर जाणवणे स्वाभाविक आहे. त्यात समुद्रपक्ष्यांबरोबर धोबी, तुतवार यांसारखे पक्षीही सापडू शकतात.
दापोलीलगतच्या गावात मला ‘हुप्पी’ म्हणजे हुदहुद पक्षीही दर्शन देई. त्याची ती जपानी पंख्यासारखी विशेषता मस्तच ! सुकत ठेवलेल्या मासळीवर झेप घेणारे शिकारी पक्षी, एखादा सरडा मारून ‘लटकावून’ ठेवणारा ‘खाटीक पक्षी’, नेहमी बडबड गडबड करत आल्यासारखे सातच्या संख्येत दिसणारे ‘सातभाई’ (इंग्रजीत Seven Sisters), सुबक घरट्यासाठी झाड शोधणाऱ्या सुगरणी (बया) अशा गमतीजमती दापोलीत दिसतात; ‘नर्सरी’तील एखाद्या लहान झाडावरही घरटे बांधण्याचा प्रयत्न करणारी मनोली (चॉकलेटी किंवा लाल मुनिया) ‘केशवराज’सारख्या देवस्थानापाशी मी काही वेळा पाहिलेली आहे. दापोली तालुक्याच्या एका परिसरात मला आढळलेले इतर काही पक्षी -मोठा धीवर, तुरेवाली आकोळी (Swift), धनेश (हॉर्नबिल), छोटा तांबट (Berbet), चिरकुट (Swallow), भेरा (ट्री पाय), डोमकावळा, वटवट्या, चीरक (जंगली दयाळ), पाणकावळा (करढोक)… केवढी सुंदरता व वैविध्य आहे दापोलीतील या पाखरांमध्ये ! पण त्यांची नावांसह नीटशी माहिती तरी विद्यार्थ्यांना आहे का? असा प्रश्न पडतो.
हरणटोळ (याला कोकणात नानेटी म्हणतात) सारखा झाडावर वावरणारा हिरवा पोपटी साप छोट्या पक्ष्यांच्या अंड्यांना, पिल्लांना घातक ठरू शकतो. मोठे शिकारी पक्षी तर राघूचाही जीव घेऊ शकतात. पाणपक्ष्याला कोटजाई नदीतील मगर धरू शकते. पक्ष्यांना शत्रू अनेक आहेत. त्यात माणसाची भर पडू नये !
छायाचित्रे – तुषार भोईर
– माधव गवाणकर 9765336408
————————————————————————————————————————————