‘रणांगण’च्या निमित्ताने…

carasole

प्रचंड गाजलेली कादंबरी ‘रणांगण’विश्राम बेडेकरांची एक कादंबरी. खूप खूप गाजलेली. राष्‍ट्रीयत्व आणि राष्‍ट्रीय अस्मितेची चिकित्सा हा मूळ आशय घेऊन १९३९ साली विश्राम बेडेकरांनी जन्माला घातलेल्या या कादंबरीला प्रकाशित होऊन तब्बल सत्त्याहत्‍तर वर्षांचा काळ लोटला. परंतु ‘रणांगणा’मधील आशय ताजा आहे. वाचकांची ह्रदये काबीज करण्यात सातत्याने यशस्वी व साहित्यक्षेत्रातील मैलाचा दगड ठरलेली ही कादंबरी वाचताना मन अस्वस्थ, विदीर्ण होते.

असे काय आहे हे रसायन? ही प्रेमकथा आहे? रूढ अर्थाने म्हटले तर नाही. प्रेम-मानवी प्रेम, स्वार्थी-नि:स्वार्थी प्रेम, अर्भकाच्या निरागस स्मितासारखे केवळ प्रेम हा या कादंबरीचा मूळ गाभा असला तरी दुस-या महायुध्दाची पार्श्वभूमी, जागतिक राजकारणाचे संदर्भ, नफेखोरीचा हव्यास आणि मानवी जीवन व्यवहाराचे यश-अपयश यांचा एकूण आलेखदेखील या कादंबरीत चपलखपणे मांडण्यात आला आहे. ही कादंबरी म्हणजे निळ्याशार अथांग सागरात अकरा दिवस हिंदकळत प्रवास करणा-या बोटीवर फुललेल्या विभिन्न देशांतील, वेगवेगळ्या धर्मांत जन्मलेल्या व परस्परविरोधी संस्कृतीच नव्हे तर पराकोटीच्या आर्थिक विषम स्तरांत वाढलेल्या दोन वेड्या प्रेमी जीवांची दारूण शोकांतिका आहे. चित्रदर्शी वर्णन, कारुण्य व मानवी जीवनाची हतबलता यांचे विदारक चित्र यथार्थपणे सादर करणारी ही कादंबरी जशी प्रेमकथा आहे, तशीच ती युद्धकथाही आहे. दोन संहारक युध्दांच्या दरम्यान घडलेली मानवी मनांची द्वंद्वकथा. हे द्वंद्व साधेसुधे नव्हते. महायुध्द होते ते! जीवनातील सर्व सौंदर्याला, पावित्र्याला, मांगल्याला जाळून टाकणारे! जर्मनीतून द्वेषाचे वणवे धुमसत होते व त्याने युरोपातला बर्फ केव्हाच काळवंडून गेला होता आणि त्याच घुसमटवणा-या वातावरणातून पळ काढून चक्रधर विध्वंस हा हिंदुस्थानात परतण्यासाठी निघाला होता.

चक्रधर विध्वंस! प्रेमात झालेल्या प्रतारणेचे दु:ख उराशी कवटाळून उद्विग्‍न अवस्थेत कथानायक इंग्लंडला जाऊन पोचतो. उमेने केलेल्या प्रेमभंगामुळे चक्रधरला प्रत्येक स्त्री ही फसवी वाटू लागते. म्हणूनच की काय, इंग्लंडच्या वास्तव्यात अनेक स्‍त्र‍ीयांशी शरीरसंग करुनही तो मनाने कुठेच गुंतत नाही. युध्दाचे वारे वाहू लागल्यानंतर चक्रधर हिंदुस्थानात परतण्यास निघतो. तो ज्या बोटीतून प्रवास करत असतो त्याच बोटीवर हॅर्टासुद्धा असते. हिटलरशाहीमुळे ज्या ज्यूंची त्‍यांच्‍या देशातून हकालपट्टी होते, त्यातीलच हॅर्टा एक होती. त्या बोटीवर आणखीही माणसे होती. शिंदे होता, लुई होता, हॅर्टावर एकतर्फी प्रेम करणारा मन्नान होता, शिंदेकडे आपुलकीने पाहणारी लुईची आई होती आणि कोळसा व सोन्याची दलाली करणारा लतीफही होता. हिंदू, मुस्लिम, इटालियन, जर्मन, ख्रिश्चन असे विविध धर्मांचे, वंशांचे आणि देशांचे लोकही होते आणि त्याच बोटीवरील पाण्यात ‘रणांगण’ घडले. राष्‍ट्राराष्‍ट्रांतून वर्णद्वेषाचे डोंब उसळत असताना, अथांग – निळ्याशार वादळी पाण्यातून निघालेली बोट. जणू युरोपातल्या रणांगणापासून पळणारी माणसे व स्वत:च्या पोटात एक वेगळे ‘रणांगण’ घेऊन निघालेली बोट. तीवर हॅर्टाचे चक्रधरवर प्रेम जडते. चक्रधरचेही हॅर्टावर प्रेम बसते. हॅर्टा आणि चक्रधरचे प्रेम! प्रेम म्हणता येईल का त्याला? चक्रधरचे उमेवर निरतिशय प्रेम असते. परंतु तिने दुस-याशी लग्न केले. हॅर्टाचाही प्रियकर होता. परंतु तो दुर्दैवाने जर्मन सैन्याकडून मारला गेला. खरे प्रेम एकदाच होते अशी आपल्याकडची कल्पना. परंतु आपापल्या जोडीदारांवर भरभरुन प्रेम करणारे हॅर्टा व चक्रधर हे परस्परांवर देखील तितक्याच आवेगाने प्रेम करतात. हॅर्टा द्वेष, कौर्य, वेदना, स्वार्थ यांमुळे थकून गेली होती. म्हणूनच तिला चक्रधरच्या रुपाने प्रेमाचा ओलावा मिळाल्यावर बोटीवरल्या दहा दिवसांमध्ये तिने स्वर्गसुख अनुभवले. आपल्या आयुष्यात पुढे काय लिहून ठेवले आहे, आपण या बोटीवरुन उतरल्यानंतर खरेच पुन्हा एकदा नवजीवनास सुरुवात करु शकू की नाही? अशा आशंकांनी हॅर्टाचे मन थकून गेलेले असते. परंतु तिची चक्रधरशी भेट होते आणि काही काळासाठी का होईना हॅर्टाच्या आयुष्यात सुखाची झुळूक येऊ पाहते. हॅर्टाला ती झुळूक परतवून लावायची नसते. म्हणूनच चक्रधरच्या प्रेमात न्हाऊन निघण्यासाठी आतूर झालेली हॅर्टा कोणताही संकोच, भोवतालच्या लोकांची तमा न बागळता चक्रधरपुढे समर्पित होण्याची तयारी दर्शवते. आपण ज्यू असल्या कारणाने आपल्याशी चक्रधरला कधीही लग्न करता येणार नाही याची पुरेपुर जाण तिलाही असते. परंतु तरीही चक्रधर तिच्यापासून कायमचा दुरावण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असताना, त्याचे दु:ख करत वेळ न घालविता ती त्या परमोच्च सुखाच्या क्षणासाठी धडपडते. अखेर ती बोट मुंबईच्या किना-याला लागल्यानंतर चक्रधरला हॅर्टापासून कायमचे दूर जावे लागते. कधीही न परतण्यासाठी. हॅर्टाला आपली आपल्या बॉबशी पुन्हा कधीही भेट होणार नाही याची जेव्हा जाणीव जेव्‍हा होते तेव्हा मात्र ती उन्मळून पडते. बोटीवरून चक्रधरला पत्र पाठवूनही हॅर्टाला मनाचा कोंडमारा सहन करता येत नाही आणि ती बोटीवरुन उडी घेऊन आत्महत्या करते आणि चक्रधर…! तो मुंबईतल्या एका हॉटेलात आपल्या वेदना उराशी कवटाळत नुसताच पडून राहतो…

अशी होते दोन वेड्या प्रेमी जीवांच्या प्रेमाची शोकांतिका… शोकांतिकाच म्हणायला हवी ही! रणांगणावर फुललेले फूल असेच सुकून जाणार. पण त्याचा सुवास नाही सुकणार. हॅर्टाला हे नाही उमजले. म्हणून त्‍या प्रेमाची शोकांतिका झाली. प्रेमाचा गूढार्थ जर तिला समजला असता, तरहे ‘रणांगण’ नक्कीच घडले नसते. प्रेम खोटे-खरे करता येत नाही. प्रेमाचे तुकडे करता येत नाहीत. प्रेम विभागता येत नाही. ते सलग असते. तितकेच संयत असते. म्हणूनच हॅर्टा आणि चक्रधरने आपल्या प्रियकर – प्रेयसीवर केलेले प्रेम आणि परस्परांवर केलेले प्रेम यात डावे-उजवे नाही करता येणार.

आपल्याकडे प्राचीन काळापासून जो मधुरा भक्तीचा प्रकार पाहवयास मिळतो त्याच्याशी या प्रेमाचे खूप साम्य आहे. मधुरा भक्ती! राधा-कृष्णाचे प्रेम अलौकिक होते. जर हॅर्टाला हे प्रेम कळले असते तर? तर तिने तिच्या आजारपणात तिची सुश्रूषा करणा-या मन्नानची विनंती न अव्हेरता त्याच्याशी लग्न केले असते. मग चक्रधरचे काय झाल असते? अर्थात शेवटच्या श्वासापर्यंत तो तिचा सखाच राहिला असता. पण हॅर्टा-चक्रधरच्या प्रेमाला लौकिकाचा शाप होता. संस्कृतात एक सुभाषित आहे. त्याचा अर्थ असा होतो, की दोन ओंडके समुद्रात वाहत-वाहत एकत्र येतात, काही काळ एकत्र वाहतात आणि मग पुन्हा… हॅर्टा-चक्रधरचे नातेदेखील असेच होते. ते नाते जुळले तेव्हाच त्यातील दूरता अधोरेखित होती. अखेर हॅर्टाने आत्महत्या केली. बिचारी हॅर्टा! तिने तसे करायला हवे होते की नव्हते, याबाबत मनात मोठा संभ्रम आहे. परंतु तिने तसे केले नसते तर बरे झाले असते. कारण कुणाचे कुणावरचे प्रेम कधीच संपत नाही. दूरता आल्यानंतर प्रेमातील आवेग कमी होत असेल, परंतु प्रेम काही संपत नाही. संपणारही नाही. कारण प्रेमाचे उपभोगलेले क्षण हे केव्हाच कालकुपीत गुडूप झालेले असतात. त्याचे सोने झालेले असते. हॅर्टाने जीवनातील संकटांना घाबरून आत्‍महत्‍या केली, की चक्रधरशी लग्न होऊ शकणार नाही या दु:खाने, हे एक कोडे आहे. पण असे वाटते, की तिला जर सखी हे नाते माहित असते तर तिने नक्कीच ते पाऊल उचलले नसते. सखी ही प्रेयसी, पत्नीपेक्षा खूप काही अधिक देते. शब्दांच्या पलीकडल्या त्‍या नात्यात कधी प्रणय असतो, कधी माया असते, तर कधी आधारही असतो. तसेच एक बंध आणि निर्बंधही असतो. खरेच, हॅर्टाला हे नाते कळले असते तर?

पुस्तकाचे नाव : रणांगण
लेखक : विश्राम बेडेकर
पृष्ठे : १२० पृष्ठे
प्रकाशक : देशमुख आणि कंपनी प्रकाशन
मूल्‍य : १०० रुपये

– अनुप्रिता करदेकर
9819356339,
anu_7s@rediffmail.com

Last Updated On – 19th Nov 2016

About Post Author

2 COMMENTS

  1. khupach sunder lihilay..
    khupach sunder lihilay…pustak parichaypeksha hi mala te pustak anubhavun sangaw tas watal…anuprita kardekar apan khup chhan mandalay…सखी ही प्रेयसी, पत्नीपेक्षा खूप काही अधिक देते. शब्दांच्या पलीकडल्या त्‍या नात्यात कधी प्रणय असतो, कधी माया असते, तर कधी आधारही असतो. तसेच एक बंध आणि निर्बंधही असतो. he tar vishesh awadale..

  2. खूप छान विश्लेषण करून तुम्ही
    खूप छान विश्लेषण करून तुम्ही रणांगण बद्दल माहिती दिली आहे.

Comments are closed.