लेकुरवाडी टेकडी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ आहे. संजय गुरव यांनी त्यांच्या पत्नीसह त्या टेकडीवर बीजारोपण, वृक्षारोपण, वनराई बंधारे, पक्षी निरीक्षण अशी कामे केली. त्यांचे काही मित्र त्यांच्या पत्नींसह या सामाजिक कार्यासाठी जोडले गेले. त्यांनी त्या ‘सत्संगा’चे नामकरण ‘नवरा-बायको फाऊंडेशन’ असे केले आहे. ती संस्था फक्त श्रमदानाकरता आहे …
मी लेकुरवाडी टेकडीवर बीजारोपण, वृक्षारोपण, वनराई बंधारे, पक्षी निरीक्षण, फुलपाखरू निरीक्षण हे काम कोणाची वाट न पाहता, सोबतीला बायकोला घेऊन चार वर्षांपूर्वी सुरू केले. केलेल्या कामाची चांगली पावती मिळण्यास सुरुवात झाली. काही मित्र त्यांच्या पत्नींसह या सामाजिक कार्यासाठी जोडले गेले. गंमतीदार गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या या ‘सत्संगा’चे नामकरण ‘नवरा- बायको फाऊंडेशन’ असे केले आहे. ती संस्था रजिस्टर्ड नाही; फक्त श्रमदानाकरता आहे हीच भावना आम्हा सर्वांची आहे, त्यामुळे कोणत्याही ताणतणावाला सामोरे जावे लागत नाही. लेकुरवाडी टेकडी ही बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळ आहे. ती आमच्या घरापासून पाच किलोमीटर अंतरावर येते.
मी व माझे आजी-माजी विद्यार्थी, सहकारी मित्र हे सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध कामे करत असतो, छंद जोपासत असतो. त्याचाच भाग म्हणून लेकुरवाडी टेकडीवर व नदीवर छोटेछोटे अनेक बंधारे गेल्या काही वर्षांपासून निर्माण करत आहोत. त्यात इयत्ता सातवी व आठवी या वर्गांमधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात. त्याचप्रमाणे ‘व्हॉटस् अॅप’ ग्रूपच्या माध्यमातून घरच्या घरी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’करता मित्र व नातेवाईक यांना प्रेरित करत आहोत. लेकुरवाडी टेकडीवर वनराई बंधारा बांधला आहे. सोबतच, बंधाऱ्याच्या लगतच्या परिसरात घरोघरी रोपवाटिका हा उपक्रम राबवला आहे. विद्यार्थ्यांनी त्या उपक्रमांतर्गत वड, पिंपळ, नीम, औदुंबर या वृक्षांची लागवड केली. त्या वृक्षांची लागवड कशी करावी व ती झाडे पावसाचे पाणी जमिनीत खोलवर पोचवण्यात कशी मदत करतात यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.
लेकुरवाडी टेकडीवरील या बंधाऱ्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक बंधाऱ्याला नाव दिले आहे. काही बंधारे वाढदिवसाच्या निमित्ताने तयार केले आहेत. त्यांना त्या अनुषंगाने जन्मदिन व्यक्तीचे नाव दिले जाते तर सामाजिक संस्थांतील व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचे योगदान मिळाल्याबद्दल त्या सामाजिक संस्थेचे नाव बंधाऱ्यास दिले जाते. या उपक्रमातून इतर व्यक्ती व सामाजिक कार्यकर्ते यांना प्रेरणा मिळते, ते कार्यप्रवृत्त होतात. दगडांच्या छोट्या आकाराच्या भिंतीची रचना दुतर्फा करून, बंधाऱ्याची लांबी लक्षात घेऊन त्यामध्ये तीन ते पाच फूट किंवा कधी कधी त्याहीपेक्षा जास्त अंतर ठेवून, त्यामध्ये उपलब्ध माती भरून तीन ते सात फूट उंच बंधारे दरवर्षी तयार करण्यात येतात. त्या कार्याकरता पंधरा ते सत्तर वर्षे वयाच्या लोकांचा सहभाग होतो. कामातच राम आहे म्हणून श्रमदान करताना कराओके साँगच्या साह्याने, थोडे का होईना गाणे म्हणून मरगळ घालवण्यास मदत होते.
बंधाऱ्याचे पाणी जेव्हा डोंगरावरून जमिनीत झिरपते त्याचे प्रमाण नजिकच असलेल्या विहिरींमध्ये दिसून येत आहे, डोंगराला लागून असलेले नाले किमान ऑक्टोबर महिनाअखेर झिरपताना दिसतात. बंधारे बांधण्याचे फायदे पाहून उपक्रमातील सहमागी कार्यकर्ते कामास दरवर्षी मोठ्या जोमाने पुन:पुन्हा तयार असतात. दरवर्षी किमान सात ते आठ बंधारे केले जातात. त्या बंधाऱ्यांलगतची झाडे फेब्रुवारीपर्यंत हिरवीगार दिसतात. तसेच, बंधाऱ्यात साचलेली रवेदार माती दरवर्षी वृक्षारोपण करण्यासाठी व रोपनिर्मितीकरता उपयोगात आणली जाते. बंधाऱ्यालगतच्या झुडपी वनस्पती छान बहरून येण्यास लागल्यामुळे फुलपाखरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जवळपास सात प्रकारची फुलपाखरे बघण्यास मिळतात. मोर, करकोचा, होला, दयाळ, मैना, सातभाई, पिंगळा, लालबुड्या, चिरक, सिंजिर, शिंपी, हरीण, निलगाय, रोही, रानडुक्कर, ससा, घोरपड, हिरवा सरडा, सरपटणारे प्राणी इत्यादींचा वाढता वावर दृष्टीस पडत आहे.
रानभाज्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामध्ये झुटेल, अंबाडी, फांजी, करूटले, रानपालक, रानदोळके, रानवांगे, रानकार्ले, शेरण्या, चाकोत, अबोई, आभाटा, मुरमटे, रानशेवगा, रानभोपळा, कुंजर, चिवळ, पिठपापडा, गोखरू, राजगीरा अशा काही रानभाज्या दृष्टीस पडतात. त्याची ओळख गावकऱ्यांना त्या ठिकाणी पटवून देण्यात येते. चार वर्षांपूर्वीचा डोंगर आणि त्यानंतरचा डोंगर बघितले असता डोंगराचे रूप पूर्णत: पालटलेले दिसून येते. पळसाची असंख्य झाडे, झुडपांमध्ये केलेल्या बीजारोपणाचे प्रत्यक्ष पुरावे टेकडीवर दिसून येतात. गावकऱ्यांचे मनही टेकडीसारखे हिरवेगार होते !
टेकडीचे नाव लेकुरवाडी असण्यामागील कारणही मजेशीर आहे. एक मोठी टेकडी व तिच्या अवतीभवती अनेक छोट्या टेकड्या असल्यामुळे एखाद्या लेकुरवाळ्या बाईसोबत तिची लहान लहान लेकरे असावीत; तशी या टेकडीची रचना आहे. अनेक उतार, खाचा नैसर्गिक रीत्या असल्यामुळे तेथे उपलब्ध दगडमातीचे वनराई बंधारे सहज व सोप्या पद्धतीने तयार करता येतात. तेथे टोड दगड (नदीतील गोटे) व मुरमाड माती आहे. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात जमिनीत मुरण्यास भरपूर मदत होते.
कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये उडी घेताना अनेक जण मोठ्या जोमाने सहभागी होतात. परंतु हळूहळू तो जोम, उत्साह कमी कमी होतो असा अनेकांचा अनुभव असतो. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून शुद्ध हेतूने जर आपण सुरुवात केली व कोणाकडून शाबासकीची किंवा पुरस्काराची अपेक्षा न ठेवता ते काम माझेच आहे ही भावना मनाशी बाळगून कार्य निरंकुश, अविरत सुरू ठेवले तर केलेल्या कार्याची पावती निसर्ग दिल्याशिवाय राहणार नाही ! लेकुरवाडी टेकडीवर सुरू असलेल्या कार्याची व्याप्ती जरी छोटी असली तरी मानसिक समाधान कोठल्याही तराजू किंवा टेप, मीटर यांनी मोजता येणार नाही !
(जलसंवाद, ऑगस्ट 2022 अंकावरून उद्धृत)
– संजय गुरव 9850664020
————————————————————————————————————————————
कौतुकास्पद उपक्रम! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
छान! आचरणात आणावा असा आदर्श उपक्रम!!
कलाकारी सुंदर, सामाजिक भान जपणारी
…