आषाढ महिन्यात पडणारा पाऊस, झडीचे वातावरण आणि त्या महिन्याची पौर्णिमा – गुरुपौर्णिमा, तिला विदर्भात ‘आखाडी’ म्हणून संबोधतात. तेथे पुरणपोळी या पदार्थाला खास असे महत्त्व आहे आणि तेथे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पोळी करण्याची पद्धतही निराळी आहे…
आषाढ महिन्यात पडणारा पाऊस, झडीचे वातावरण आणि त्या महिन्याची पौर्णिमा – गुरुपौर्णिमा, तिला विदर्भात ‘आखाडी’ म्हणून संबोधतात. विदर्भात त्या सणाला महत्त्व आहे. नववधू आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी पतीच्या घरी राहत नाहीत, तर त्या माहेरी येतात. त्या काळात पेरणी, पेरणीची कामे आटोपलेली असतात. त्यादिवशी घरोघरी सणाला काही गोडधोड केले जाते, विशेषकरून पुरणपोळी. विदर्भात पुरणपोळी या पदार्थाला खास असे महत्त्व आहे आणि तेथे उर्वरित महाराष्ट्रापेक्षा पोळी करण्याची पद्धतही निराळी आहे. विदर्भातील पोळी घट्ट, गोड, पूर्ण पुरण भरलेली आणि फक्त तव्यावर राहवी एवढेच कणीक लावलेली असते. पूर्वी आषाढीला मोहाच्या पुरणपोळीचा बेत आमच्याकडे असे. त्यादिवशी आमची आजी मोहाची पोळी करे, जर आषाढीला ती करता आली नाही तर मात्र ती पावसाळ्यात एखादी झड पाहून नक्की करत असे. मला ती पुरणपोळी आवडत नसे, मात्र मी मोहाची पुरणपोळी आवडीने दोन-चार दिवस खात असे.
मोहाचे नाव काढले तर समोर येतात ती मोह फुले- त्या फुलांपासून तयार होणारे मद्य हे सर्वश्रुत आहे. मात्र, त्या मोह फुलाचे गुणकारी (औषधी) असे उपयोगही आहेत. मोह फुलापासून अनेक पदार्थ तयार होतात. त्यामुळे आदिवासी समाजात मोहाच्या झाडास कल्पवृक्षाचे स्थान आहे. मोह फुलातील पोषक तत्त्वांचा उपयोग मानवी आहारात जास्तीत जास्त कसा करता येईल याकरता औषधी कंपन्या व शासकीय पातळीवर अनेक प्रयोग सुरू आहेत. विदर्भात पूर्वापार मोह फुलांचा उपयोग आहारात केला जात असे. मोह फुलापासून सरबत बनवले जाते. मोहाची फुले भाजून त्यात गूळ मिसळून लाडू तयार करतात. मोह फुले नुसती भाजूनही खाल्ली जातात. मोहाच्या फळाला टोळ म्हणतात आणि त्यापासून तेल काढले जाते.
मोहाची पुरणपोळी तयार करण्यासाठी चणाडाळ व गुळ हे प्रत्येकी अर्धा किलो, दीड वाटी सुकलेली, साफ केलेली मोहाची फुले असे साहित्य लागते. चणाडाळ शिजवताना त्यात मोहाची फुलेही टाकतात. ती शिजल्यावर पाट्यावर वाटतात. त्यामध्ये साखरही टाकत, पण पुरणपोळी म्हटले, की ती गुळाचीच! आणि ती चवीस छानही लागते. पुरणपोळीला तूप वापरतात तसे तूप न वापरता जवसाचे तेल वापरून मोहाची पुरणपोळी तयार केली जाते. ती पुरणपोळी खाताना तुपाऐवजी छोट्या वाटीत जवसाचे तेल खाणाऱ्याला दिले जाते.
त्या मोहफुलापासून तयार केलेल्या पुरणाच्या पोळीची चव ही अप्रतिम अशी असते. शिळी पुरणपोळी दह्यासोबत खाण्यासही छान लागते. कित्येक वर्षे मी मोहाची पोळी खाल्ली नाही, परंतु तिची चव अजूनही माझ्या जीभेवर रेंगाळत असते.
– श्रीकांत धोटे 8087332593 shrikantdhote29@gmail.com
——————————————————————————————————————————————–