ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतील सौंदर्यभाव जसा खुलवून सांगितला, तितक्याच महात्म्याने साहित्यातील विवेकमूल्याची निकड प्रतिपादन केली. त्यांच्यानंतरच्या संतपरंपरेने मराठी साहित्याला व विचारविश्वाला विवेकाचा पाया घालून दिला. म्हणूनच सदानंद मोरे त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून ज्ञानेश्वरीमधील बाराव्या अध्यायातील नमनाच्या काव्यपंक्तींना ‘मराठी भाषेचा जाहीरनामा’ म्हणत आहेत…
सदानंद मोरे यांनी घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणात ज्ञानेश्वरांच्या साहित्यातील एका वेगळ्या पैलूकडे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी ज्ञानेश्वरांनी ‘मराठी भाषेचा जाहीरनामा’ प्रकट केला असेच म्हटले आहे. म्हणजे ‘आता विश्वात्मके’ हे पसायदान हा त्यांचा मानवी कल्याणाचा जाहीरनामा; तसा मराठी भाषेचा ज्ञानेश्वरांचा जाहीरनामा म्हणून मोरे यांनी पुढील ओव्या त्यासाठी उद्धृत केल्या आहेत. त्या ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायाच्या सुरुवातीला येतात –
‘नवरसी भरवी सागरु । करवी उचित रत्नांचे आगरु ।
भावार्थाचे गिरीवरु । निफजवी माये ।।
साहित्य सोनियाचिया खाणी । उघडवी देशियेचिया आक्षोणी ।
विवेकवेलीची लावणी हो देई सैंध ।।
संवादफलविधाने । प्रमेयाची उद्याने । लावी म्हणे गहने । निरंतर ।।
पाखांडाचे दरकुटे । मोडी वाग्वाद आव्हाटे ।
कुतर्काचि दुष्टे । सावजे फेडी । इये मराठीचिये नगरी ।
ब्रह्मविद्येचा सुकाळु करी । घेणे देणे सुखचि वरी ।
हो देई या जगा ।।’
सदानंद मोरे म्हणतात, की ज्ञानेश्वरांना ते ‘साहित्य’ निर्माण करत आहेत याचे आणि त्यांना कोणत्या प्रकारची साहित्यनिर्मिती अभिप्रेत आहे याचे स्वच्छ भान आहे व तेथे ते प्रतिबिंबित झाले आहे. ज्ञानेश्वरांची साहित्याची संकल्पना व्यापक व म्हणून समावेशक आहे. ज्ञानेश्वरांना मराठीच्या या नगरीत ब्रह्मविद्येचा सुकाळ आणायचा आहे. त्यांनी ही देशी-मराठी भाषा म्हणजे एक सुपीक जमीन आहे असे रूपकात्म विधान केले आहे. त्यांना एकीकडे तिच्या पोटातील साहित्यरूपी सोन्याच्या खाणी उघडल्या जाव्यात असे वाटते, तर दुसरीकडे तिच्यातून विवेकाधिष्ठित प्रमेयांचे पीकही निघावे असे वाटते. तिसरीकडे त्यांना जिच्यात ब्रह्मविद्येचा व्यवहार सुखेनैव चालेल अशी नगरीही वसवायची आहे! वेगळ्या शब्दांत, ज्ञानेश्वरांना ज्ञानाचा व्यवहार आणि साहित्याचा व्यवहार यांच्यात विरोध मान्य नाही.
सदानंद मोरे ज्ञानेश्वरांच्या या काव्यपंक्तींना मराठी भाषेचा जाहीरनामा का म्हणतात? ज्ञानेश्वरांनी नमनाच्या या ओव्यांमधून साहित्यमूल्यांचा आग्रह तर धरलाच आहे; पण त्याचबरोबर, त्यांनी ‘विवेकवेलीची लावणी’ साहित्यातून होणे आवश्यक आहे हा विचारही मांडला आहे. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा ही साहित्यनिर्मिती करताना सौंदर्यमूल्ये सर्जनशीलतेने धारण करू शकते, तितक्याच सामर्थ्याने विवेकमूल्यांचे अवधारणही करू शकते हा विश्वास व्यक्त केला आहे; आणि म्हणूनच सदानंद मोरे त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून या काव्यपंक्तींना ‘मराठी भाषेचा जाहीरनामा’ म्हणत आहेत!
ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काव्यातून व्यक्त केलेले साहित्याचे हे स्वरूप, पुढे, संतांच्या मांदियाळीने अंगिकारले व त्यांच्या त्यांच्या साहित्यातून ज्ञानेश्वरांनी सुचवलेल्या साहित्यमूल्यांचा परिपोषही केला. संतांचे स्वत:चे ‘विवेक’ हे जसे अनन्यसाधारण लक्षण होते, तसेच संत साहित्याचे ‘विवेकनिष्ठ मांडणी’ हे अनन्यसाधारण लक्षण ठरले. त्यातून विवेकनिष्ठ, पुरोगामी महाराष्ट्राचा पाया रचला गेला. महाराष्ट्राने ‘विवेकबुद्धी’चा तो आत्मा शाहू–फुले–आंबेडकर यांच्या विचारसरणीपर्यंत जपला, तळागाळापर्यंत पोचवला. तो ‘आत्मा’ हे खरे तर महाराष्ट्राच्या प्रवाहीपणाचे लक्षण होय. जेथे तो ‘आत्मा’ हरवला जाईल, तेथे मराठी समाजाला डबक्यातील साचलेपण येईल. ते ‘साचलेपण’ नको असेल तर ‘विवेकनिष्ठ आत्मा’ जपणे हाच आजच्या व भविष्यकाळातील पुरोगामी महाराष्ट्रासाठीचा तरणोपाय आहे. तेच मराठी भाषेचा जाहीरनामा सूचित करत आहे.
ज्ञानेश्वरांनी पुढे जाऊन, मुदलात संत कोणाला म्हणावे, याचे लक्षण सांगून ठेवले आहे – “चंद्र तेथे चंद्रिका । शंभू तेथे अंबिका । संत तेथे विवेका । असणे जेरी ।।” जेथे चंद्र आहे तेथे चंद्रिका आहे, जेथे शंभू आहे तेथे अंबिका म्हणजे पार्वती आहे. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती ‘संत’ आहे म्हणजे तिच्या ठायी ‘विवेक’ हा गुण आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या एकूण साहित्यात ‘विवेक’ तत्त्वाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. ‘विवेकनिष्ठ’ समाज निर्माण करायचा असेल, तर त्या समाजाचे नेतृत्व ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे ‘विवेक’ असणे आवश्यकच आहे. अन्यथा तो समाज त्याचा आत्माच हरवून बसतो आणि अंदाधुंदीचे वातावरण निर्माण होते. खरोखरीच, ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे त्याप्रमाणे ‘संत’ हे केवळ ‘संत’ नव्हते तर समाजाला दिशा दाखवणारे ‘विवेकनिष्ठ नेतृत्व’ होते.
ज्येष्ठ अभ्यासक गं.बा. सरदार यांनी असे विधान केले आहे, की “संतांनी महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाही आणली !” त्याचा अर्थ संतांनी जातीपातीच्या, उच्चनीचतेच्या, स्त्रीपुरूष असमानतेच्या भिंती पाडून, आध्यात्मिक परिमाणाच्या माध्यमातून ‘सामाजिक लोकशाही’ आणली. अध्यात्म हे केवळ ग्रंथांमधील बोजड ज्ञान न राहता ते सर्वसामान्य माणसाच्या आचरणाचा, दैनंदिन जीवनाचा भाग बनले. ते ‘ज्ञानदेवे रचिला पाया । तुका झालासे कळस ।’ या बहिणाबार्इंच्या काव्यपंक्तींमध्ये म्हटल्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी घालून दिलेल्या विवेकनिष्ठ पायामुळेच होय!
ज्ञानेश्वरांचे विवेकाचे मूल्य एकनाथ, नामदेव, तुकाराम व समस्त संत मांदियाळीने आत्मसात केले आणि त्यांच्याही साहित्यातून मांडले. त्यातून ‘विवेकनिष्ठ समाजा’ची उभारणी झाली. त्या विवेकाने अनेकांना बळ दिले. जातीने महार असणारा, समाजाचे फटके झेलणारा चोखोबाही आत्मविश्वासाने म्हणू शकला, “जोहार, मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ।”. जनाबाई जरी स्वतःला ‘नामयाची दासी’ म्हणत असली तरी तिच्यात एक बंडखोर कवयित्रीही दडलेली आहे. ती समाजाची तमा न बाळगता म्हणते – ‘डोईचा पदर आला खांद्यावरी’.
समाजातील या शोषित वर्गाला स्वतःचा ‘आत्मस्वर’ का गवसू शकला? त्याला कारणीभूत होते ते त्या काळातील ‘विवेकनिष्ठ नेतृत्व’ ! त्या नेतृत्वामुळे शोषित समाजाच्या मनातील चीड, राग, संताप या भावनांना सर्जनशील (constructive) दिशा मिळाली. संतांनी केवळ साहित्यनिर्मिती केली नाही. त्यांच्या साहित्यनिर्मितीला महत्त्वाचे अंग होते ते म्हणजे सामाजिक दायित्वाचे. त्यामुळे संतांनी सदसद्विवेकबुद्धी कायम जागृत ठेवून त्यांच्या साहित्यातून ‘विवेकनिष्ठ मूल्य’ दिले, त्यात कोणत्याही अंधश्रद्धेला, पूर्वग्रहदूषित विचारांना, विघातक कृतींना थारा ठेवला नाही. एक विवेकनिष्ठ समाज घडण्याची-घडवण्याची प्रेरणा संत साहित्यात सामावलेली आहे. त्या प्रेरणेतून पुरोगामी महाराष्ट्राचा व मराठी साहित्याचाही मजबूत पाया रचला गेला!
अश्विनी भोईर 8830864547ashwinibhoir23@gmail.com
————————————————————————————————————————
‘ मराठी भाषेच्या जाहिरनामा ‘ सुंदर शब्दांत, संत ज्ञानेश्वरांचा ओवी स्पष्ट करीत , सुंदर स्पष्ट केलाय.!✍️👌👌👌जय जय ज्ञानराज माऊली!💐🙏