कांबी गावचे महालक्ष्मी मंदिर हेमाडपंथी स्थापत्यशैलीत बांधलेले आहे. गाभाऱ्यात छतावर कोरलेली महालक्ष्मीची मूर्ती हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य. महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या अंबाबाईनंतर कांबीच्या महालक्ष्मीची महती सांगितली जाते…
कांबी हे गाव नगरपासून एकशेपाच, तर शेवगाव या तालुक्याच्या ठिकाणापासून पस्तीस किलोमीटरवर आहे. ते महालक्ष्मी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. गंमत म्हणजे कांबी गाव नगर, बीड, जालना व औरंगाबाद या चार जिल्ह्यांच्या सीमेवर येते! महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या देवीनंतर कांबीच्या महालक्ष्मी देवीची महती सांगितली जाते. परिसरातील नवरात्रीत भाविक नऊ दिवस मंदिरात राहून कडक उपवास करतात. मंदिर ऐतिहासिक हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे.
गोदावरी काठच्या परिसराला काम्यक वन म्हणून ओळखले जाई. तसा उल्लेख ‘काशीखंड कथासार’ या पुराणग्रंथातही आढळतो (ज्या जंगलातून पांडवांनी वनवास काळात प्रवास केला होता, त्यास काम्यक वन म्हटले आहे. तसा उल्लेख महाभारतात आहे). काम्यक वनाच्या त्या परिसरात ॠषी, मुनी, साधू, तपस्वी यांनी आश्रम स्थापून वास्तव्य केल्याच्या कथा आहेत.
यादव घराण्याचा उदय महाराष्ट्रात बाराव्या शतकात झाला. दृढ प्रहार हा राजा यादव घराण्याचा संस्थापक होय. त्या घराण्याची राजधानी देवगिरी येथे होती. यादव राजांनी अनेक मंदिरांची निर्मिती कांबी व तेथील परिसर येथे केली आहे. हेमाडपंथी स्थापत्यशैली यादवांच्या काळात विकसित झाली असल्याने त्या पद्धतीची मंदिरे निर्माण केली गेली आहेत.
कांबीचे महालक्ष्मी मंदिर हे भव्य आहे. ते पूर्वाभिमुख आहे. मंदिरामध्ये अनेक ठिकाणी दगडांवर शिल्पकाम केलेले आढळते. मंदिरातील महालक्ष्मीची मूर्ती विलोभनीय आहे. ती दरवाज्यासमोर नसून, छतावर कोरलेली आहे. महालक्ष्मी मंदिरात एक शिवलिंगही आहे. त्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाजवळ नंदी नाही! मंदिरामध्ये आडव्या खांबावर एक शिलालेख कोरलेला असून, त्यात मंदिर निर्माण करणाऱ्या यादव राजाविषयी माहिती दिलेली आहे. त्या शिलालेखाचे वाचन ब्रह्मानंद देशपांडे यांनी केले आहे. खांबावर सुबक नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या बाहेर नवीन बांधलेल्या सभामंडपात काही वीरगळ उभ्या करून ठेवलेल्या दिसून येतात. मात्र, मंदिराची दुरवस्था झालेली आहे. पुरातत्त्व खात्याने या पुरातन वास्तूचे जतन व संवर्धन करावे व परिसर विकासाला चालना द्यावी, अशी मागणी कांबी ग्रामस्थांची आहे.
– भागवत डुकरे 9404419341 bhagawat2011@gmail.com
———————————————————————————————————————–