कोकणातील निसर्गरम्य गुहागर तालुक्याचे उत्तरेकडील शेवटचे टोक म्हणजे मौजे अंजनवेल. दाभोळची खाडी व वशिष्ठी नदी यांच्या मुखाशी वसलेले, कौलारू घरे आणि काजू-नारळ-सुपारी-हापूस आंब्याच्या बागा यांनी नटलेले. ते पर्यटकांना जास्त आकर्षित करते, गावातील गोपाळगड, दीपगृह व श्री टाळकेश्वर या स्थळांमुळे !
गावाचे ‘अंजनवेल’ असे नामकरण कधी, कसे झाले त्याचे पुरावे उपलब्ध नाहीत. गावात असलेले प्राचीन शिवमंदिर आणि त्यातील मुर्तीकाम, कोरीव काम पाहता अभ्यासकांच्या मतांनुसार मंदिर तेराव्या शतकातील असावे. गावाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे – गोपाळगड ! तो किल्ला सात एकर जमिनीवर पसरलेला असा गावाच्या माथ्यावर, मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व सत्ताधार्यांनी ओळखले होते. तो किल्ला तुळाजी आंग्रे यांनी याकूत खान या सरदाराकडून 1745 मध्ये जिंकून घेतला. तुळाजी कृष्णभक्त होते. त्यांनी ‘गोपाळगड’ असे त्याचे नामकरण केले. त्यापूर्वी तो किल्ला ‘अंजनवेलचा किल्ला’ म्हणून ओळखला जाई. तसा संदर्भ पेशवे शकावलीत आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर प्रथम आमराई आहे. डावीकडील बाजूस तटावर चढण्यासाठी बांधीव पायर्या आहेत. किल्ल्याच्या तटाला पंधरा बुरूज आहेत. त्यावर तोफांसाठी जांभ्या दगडाचे गोलाकार भक्कम चौथरे बांधलेले आहेत (तटावर 1707 मधील फारसी भाषेतील शिलालेख होता. तो अस्तित्वात नाही). गोपाळगड वरचा कोट, बालेकोट व पडकोट यांचा मिळून बनलेला आहे. पडकोटाचा भाग म्हणजे समुद्र किनार्यापर्यंत जाणारी दुहेरी तटबंदी. ती सिद्धी खैर्यत खान याने बांधली, तर तुळाजी आंग्रे यांनी किल्ल्यालगतचा बालेकोट बांधला. किल्ल्यावरील बुरूज, तटबंदी मजबूत आहेत. किल्ल्यावर धान्य कोठारे, कातळात खोदलेल्या विहिरी आढळतात. तटबंदीवरून आजुबाजूच्या परिसराचे दृश्य विलोभनीय दिसते. किल्ल्याच्या पायथ्याशी घोडे व इतर प्राण्यांसाठी दगडात बांधलेले पाणवठे सापडतात. दगडी तोफा देखील गावाच्या वेशीवर; तसेच, किल्ल्यामध्ये आढळतात.
कोकणातील वस्ती ही दुसर्या ठिकाणांहून येऊन वसलेली आहे. खुद्द अंजनवेलमध्ये व किल्ल्याच्या पायथ्याशी विविध जाती-व्यवसायांचे लोक येऊन राहू लागले. मासेमारीसाठी खारवी, कोळी लोकांची वस्ती झाली. राजे-महाराजे, दरबारातील उच्च पदांवरील व्यक्ती यांच्या पालख्या वाहण्यासाठी भोई समाज, तर नौका बांधणीसाठी सुतार-कारागीर, आरमारी कामासाठी भंडारी, सीमा रक्षणासाठी मराठा, शेतीसाठी कुणबी समाज; तसेच परीट, धोबी, सोनार, माळी अशा विविध व्यवसायाधिष्ठित जाती त्या त्या कामांसाठी अंजनवेल येथे येऊन राहू लागल्या. ब्राह्मण समाज पौरोहित्य, वैद्यकी करण्यासाठी अंजनवेल येथे वास्तव्यास आला. बाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्याकडे वैद्य असलेले अधिकारी – बच्छाजी बाळाजी यांना त्यांच्या उत्तम कामामुळे पेशव्यांकडून अंजनवेल, वेलदूर व रानवी ही गावे वतन म्हणून मिळाली होती.
गडाच्या समोरच्या बाजूस उंच डोंगर सड्यावर, कातळकड्याच्या टोकाला, समुद्र सपाटीपासून चारशे-पाचशे फूट उंचीवर शंकराचे देऊळ आहे. ते देऊळ म्हणजे अंजनवेलचा (उद्दालकेश्वर) श्री टाळकेश्वर ! मंदिराच्या गाभार्यावर पंचधातूंचा कळस आहे. तसेच, मध्यगृह व सभागृह यांच्या माथ्यावरील मनोर्यांवरही पाच कळस आहेत. देवळासमोरच्या माथ्यावरील मनोर्यांवर श्रीगणेश, कार्तिकस्वामी, नागदेवता इत्यादींच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. देवळासमोर तुळशी वृंदावन व दगडी दीपमाळ आहे. श्री टाळकेश्वर हे अंजनवेलवासीयांचे श्रद्धास्थान आहे. ते त्या परिसरातील अद्भुत शांतता, मांगल्य यांचा अनुपम अनुभव देते.
गावातील अजून एक आकर्षणाचे केंद्र म्हणजे दीपगृह ! ते टाळकेश्वराच्या जवळ आहे. दीपगृह संध्याकाळी चार ते सहा या वेळेत पाहता येते. टाळकेश्वराच्या उत्तरेला असलेल्या डोंगर सुळक्यांवर तटबंदी बांधून, आरंभी टेहळणीचा बुरूज तयार केला गेला. ब्रिटिश राजवटीत गुन्हा करणार्याला तेथून कडेलोट केले जात असे. म्हणून त्या बुरूजाला ‘इंग्रज कडा’ असे म्हणतात. देवळाची मागील बाजू, जेथून दूरवरपर्यंत समुद्र दिसतो, त्याच जागी ब्रिटिशांनी चौकी उभारली. पुढे, त्याच ठिकाणी समुद्रातील व्यापारी जहाजांना योग्य दिशा मोठ्या मशालीद्वारे दाखवण्यासाठी दगडी बांधकामाचा मनोरा ब्रिटिश राजवटीत उभारला गेला. ब्रिटिशांनी काही वर्षांनतर त्या छोट्या दीपगृहाच्या जागी विजेवर चालणारे नवीन दीपगृह बांधले. इतक्या उंचीवरून दिसणारा नयनरम्य, मनाला भुरळ घालणारा समुद्र व आजुबाजूचा परिसर यामुळे अंजनवेलची नयनरम्यता मनावर ठसून राहते ! अंजनवेलची ग्रामदेवता श्रीदेवी उत्राज काळेश्वरी असून गावात गणपती, विठोबा-रखुमाई, वेणुगोपाळ, श्रीक्षेत्रपाळ इत्यादी देवतांची मंदिरे आहेत. ही ग्रामदेवता रानवी, तेवे, वेलदूर यांसारख्या आसपासच्या ग्रामदेवतांची मोठी बहीण आहे असे मानले जाते. गावात दरवर्षी महाशिवरात्र, शिमगोत्सव, आषाढात अखंड हरिनाम, श्रावण महिन्यात रुद्र, भाद्रपद व माघ महिन्यांत गणेशोत्सव, कार्तिक महिन्यात तुलसी विवाह हे उत्सव साधेपणाने, परंतु उत्साहात साजरे केले जातात. शिमगोत्सवात येणार्या पालखीमध्ये टाळकेश्वराला व ग्रामदेवतेला मानाचे स्थान आहे. ग्रामदेवता व टाळकेश्वर अंजनवेलमधील प्रत्येक ग्रामस्थाच्या घरी वाजत गाजत येतात.
गावाची लोकवस्ती सुमारे सहा हजार असून गावात नऊ वाड्या, सात मोहल्ले आहेत; तसेच, एक मशीद व पीर बाबाचा दर्गाही आहे. काही वर्षांपूवी गावात माध्यमिक शिक्षणाची सोय नव्हती. ती अडचण, गावात सुरू झालेल्या ‘दुर्गाबाई हरी वैद्य’ या शाळेच्या रूपाने दूर झाली असल्याने मुलांना पूर्व माध्यमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजपर्यंतच्या शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. शाळेला भव्य पटांगण, ग्रंथालय, वाचनालय आहे. कॉम्प्युटर शिकण्याची व्यवस्थादेखील आहे. बारावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी गुहागर, शृंगारतळी, चिपळूण येथील महाविद्यालयांमध्ये जावे लागते.
अंजनवेलचे नाव पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांत कोरले जाण्याची शक्यता निर्माण झाली, ती साकारत असलेल्या एन्रॉन प्रकल्पामुळे ! तो प्रकल्प पूर्णपणे अपयशी ठरल्याने गावकर्यांना मात्र उद्योगधंद्यांच्या नवीन संधींना मुकावे लागले. अंजनवेलमध्ये पारंपरिक व्यवसाय हे लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन उरले आहे. मासेमारी, बोटबांधणी, मासे पकडण्याची जाळी, काजू-आंबा-फणस-नारळ-सुपारी यांसारख्या उद्योगांतून अर्थार्जन केले जाते. नाचणी, वरी, भातशेती हा व्यवसाय राहिला नसून कुटुंबापुरते उत्पन्न घेतले जाते.
आधुनिकीकरणाच्या या काळात, जुन्या गोष्टींचा साज सांभाळत अंजनवेल गावाने कोकणातील नकाशावर उमटवलेला त्याचा ठसा तितकाच जपला आहे !
(लेखातील काही संदर्भांसाठी दीपक वैद्य यांचे सहाय्य लाभले आहे)
– मेघना वैद्य 9819881331 callimegh@gmail.com
———————————————————————————————————————————————-