म्हातारपणी जिद्दीने फुलवली शेती!

मी शाळेत होतो तेव्हा माझ्या वझरे गावची लोकसंख्या अवघी तीनशे होती. शेती हा सगळ्यांचा प्राण होता. माझ्या वडिलांची शंभर एकर शेते होती. त्यामुळे पंचक्रोशीतील लोक त्या छोट्या गावातील प्रयोगशील, सधन शेतकरी म्हणून त्यांच्याकडे कौतुकाने पाहायचे. घरात माणसांचा मोठा राबता होता. वडिलांनी आम्हा चौघा भावंडांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, ते हयात असेपर्यंत त्यांचा शब्द प्रमाण असे. सगळी शेती इतर भाऊ, माझे पुतणे, वडील, आई एकत्रित करत होते. आमची सांगोल्यासारख्या दुष्काळी भागातसुध्दा चांगल्यापैकी शेती होती.

मी गावातला पहिला कृषी पदवीधर, पीएच.डी.धारक आणि अनेक देशांचा दौरा करणारा होतो. मला शिष्यवृत्ती मिळाली. त्यातून मी ऑस्ट्रेलियाला शिक्षणासाठी गेलो. तेथून परतल्यानंतर धुळ्याच्या कृषी महाविद्यालयात कृषी विस्तार शाखेचा प्राध्यापक म्हणून रुजू झालो.

मी सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानल्यामुळे माझ्या कामाला सतत झपाटलेपण येत गेले. त्यानंतर, मी कोल्हापूरच्या कृषी महाविद्यालयात; तसेच, राहुरी कृषी विद्यापीठात अनेक वर्षे काम केले. मी विस्तार शाखेचा विद्यार्थी होतो आणि शिवाय, अमेरिका-ऑस्ट्रेलियामध्ये कृषी पत्रकारिता कशी विकसित झालेली आहे हे पाहिले होते. त्यामुळे मी कृषी पत्रकार होण्याचे ठरवले. त्यासाठी शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केला. मी ‘दैनिक सकाळ’ पासून, ‘शेतीप्रगती’ मासिकापर्यंत अनेक माध्यमांमध्ये सातत्याने लेखमाला लिहिल्या; आकाशवाणीवरून ‘नभोवाणी शेतीशाळां’मध्ये सक्रिय भाग घेतला. पण त्या काळात माझा शेतीतील राबता, संपर्क तुटला होता. मी शहरी शेतकरी झालो! माझ्या नावावर जमीन होती, पण मी शेतात काम करत नव्हतो. दरम्यान, माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर धाकट्या भावाचे अपघाती निधन झाले. मधले भाऊ सांगोला तालुक्यातच नोकरी करत होते. त्यांची मुले मोठी झाली. ती स्थिरस्थावर झाली होती. त्यांना एवढ्या मोठ्या शेतीत एकत्रित राबता नको झाला. त्यांनी शंभर एकर जमिनीची वाटणी केली. ते सर्वजण गावात होते. त्यांचा मुलगा ती शेती बघू लागला.

 

माझी जमीन पड राहू लागली. माझ्या घरच्या मंडळींना, मी शेतीचा नाद सोडून द्यावा असेच वाटत होते. आहे त्या पेन्शनमध्ये आपण कुटुंब चालवू शकतो असे त्यांना वाटत होते. माझ्या दोन मुली अमेरिकेत आहेत. मुलगाही अमेरिकेत आहे. एक डॉक्टर मुलगी कोल्हापूरात असते. त्यामुळे माझे वर्षातून एक-दोन वेळा अमेरिकेत जाणे-येणे असते. मी माझ्या मुलीकडे 2004 साली गेलो होतो. तेथे सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिरायला जाण्याच्या तयारीत असताना मला अर्धांगवायूचा झटका आला. त्यात मी सहा महिने जागेवरून हलू शकत नव्ह्तो. फक्त माझ्या डाव्या डोळ्याची हालचाल होत होती. मला धड नीट बोलता येत नव्हते. आधाराशिवाय चालता येत नव्हते. या प्रत्येक ठिकाणी मला माझ्या पत्नीने आधार दिला. तीच माझ्या जगण्याची सारथी झाली. गेली चार-पाच वर्षे अशी संघर्ष करण्यात गेली. माझ्या मनाची जिद्द होती. त्या इच्छाशक्तीवर मी बरा झालो. प्राणायाम आणि योग यांमुळे आणखी सशक्त्त होत गेलो.

गावाकडील पंचवीस एकर शेती मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी अधुनमधून गावाकडे जाऊ लागलो. पुतण्याशी चर्चा केली. निसर्गाशी हसलो-खेळलो तर माझ्या प्रकृतीत आणखी सुधारणा होईल असे माझे मन मला सांगू लागले आणि मी गावाची शेती फुलवण्याचा निर्धार केला. कॉलेजमध्ये, विद्यापीठात शिकवणे, पीएच.डी.चा गाईड म्हणून मार्गदर्शन करणे, शेतकरी मेळाव्यात भाषणे-पेपरात-मासिकात लेख लिहिणे, आकाशवाणीवरून टॉक आणि शेतीत राबणे यांत मोठे अंतर असल्याचे माझ्या लक्षात आले.

 

मी पुतण्याच्या, पत्नीच्या, गडी-माणसांच्या कलाने जाऊ लागलो. प्रथम माण नदीच्या पात्रात विहीर खोदली. तिला भरपूर पाणी लागले. नदी ते आमचे शेत यांमध्ये दहा हजार फूट अंतर आहे. तशी दहा हजार फूटांची पाईपलाईन करून घेतली. शेतात पाणी आल्याने पूर्वी कोरडवाहू असणार्‍या आमच्या शेतीला नवे अंकूर फुटू लागले. माझ्यात दुप्पट अवसान आले होते. एक पांगळा म्हातारा शेतात कसा पळतो याची चर्चा गावात रंगू लागली. पण मी त्या सर्वांकडे दुर्लक्ष केले. कारण मला माझी शेती फुलवायची होती!

एका तज्ञ्ज्ञाला घेऊन मी माझ्या पंधरा एकर शेतीचा पिकनिहाय आराखडा तयार केला. त्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक बनवले. माझे गाव छोटे असल्याने गावात बँक नाही. पण वाटंबरे या शेजारच्या गावात ‘बँक ऑफ महाराष्ट्रा’ची शाखा आहे. त्या बँकेला मी एकोणीस लाखांचा प्रस्ताव सादर केला. शेतकर्‍यांना एक प्रकरण होताना नाना अडचणींना सामोरे जावे लागते. तो अनुभव माझ्या वाट्याला आला.

बुलडोझर लावून जमीन लेव्हलिंग करून घेतले. रानाचे वेगवेगळे प्लॉट तयार केले. ‘शेतीप्रगती’चे रावसाहेब पुजारी यांना घेऊन दापोलीला गेलो. तेथे आंबा, आवळा, नारळ रोपांची खरेदी केली. कुलगुरू विजय मेहता यांनी मदत केली आणि गेल्या जुलैमध्ये तीन एकरांवर आंबा लागवड केली. त्याच वेळी रानाच्या बांधावरून तीनशे नारळांची लागवड केली. हैदराबादला गेलो, तेथून तीनशेसाठ बाळानगरी सिताफळाची रोपे आणली. त्याची लागवड केली. बाजूला दोन एकरांचा चिकूचा प्लॉट तयार केला. दोन एकर डाळिंबीची लागवड केली. तळसंदेच्या ‘सीमा बायोटेक’कडून केळीची रोपे आणली. माझ्या रानात केळीच्या घडांनी भरलेली बाग पाहिल्यानंतर माझ्या कष्टांचे सोने झाल्याचा आनंद आहे. संपूर्ण क्षेत्राला ठिबक सिंचन केले आहे. एकर-दीड एकर ऊस केला आहे. एकाद्या शेतकर्‍याला आपली शेती फुलवताना किती दिव्यातून जावे लागते, याचा अनुभव एक सेवानिवृत्त प्राध्यापक घेऊ लागला आहे. शेतीत गोड गुलाबी स्वप्न रंगवणे आणि प्रत्यक्षात मातीत हात घालून राबणे यांत खूप अंतर आहे.

दापोली, वेंगुर्ला येथून आंब्याच्या अनेक व्हरायटी आणल्या आहेत. नारळाच्या बाणवली जातीची लागवड केली आहे. रत्नागिरीच्या डॉ. नागवेकर यांनी प्रत्यक्ष येथे येऊन त्याबाबत मला मार्गदर्शन केले आहे. उरलेल्या क्षेत्रावरही इतर फळपिकांची लागवड करणार आहे.

 

माझा पुतण्या परमेश्वर हाच माझा माझ्या शेतीतील मदतगार आहे. एक मजूर कुटुंब रानात ठेवले आहे. त्याच्यासाठी रानातच निवार्‍याची सोय केली आहे. पॅकिंग हाऊस तयार केले आहे. शेतीत मजुरांची मोठी समस्या आहे. जे मजूर येतात त्यांना आजुबाजूचे लोक टिकू देत नाहीत. आमच्या शेडवर रात्रीचे दगड मार असे प्रकार केले जातात.

माझ्या पस्तीस-छत्तीस वर्षांच्या प्राध्यापकीच्या काळात अनेक विद्यार्थी घडवले. ते विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांना व मला त्यांचा कॉलेजचा काळ आठवतो. माझी शिकवण्याची तळमळ त्यांच्या ओठावर येते. कुणी तालुका एनएचबीच्या कार्यालयात आहे, कुणी कुलगुरू आहे. त्या सर्वांनी या वेड्या, जिद्दी म्हातार्‍याची शेती फुलवण्यासाठी मदत केली आहे. त्यांच्यामुळे माझी उमेद वाढली आहे. माझे अनेक मित्र लांबलांबून शेती पाहायला येतात आणि तोंडात बोटे घालतात, तेव्हा धन्य धन्य वाटते!

(शब्दांकन–रावसाहेब पुजारी, कोल्हापूर)

रावसाहेब य.पाटीलपत्ता:- वझरे, व्हाया नाझेमठे, ता. सांगोला, जि. सोलापूर, भ्रमणध्वनी:- 9420779063

About Post Author

1 COMMENT

  1. pratekache hath yogyaprakare
    pratekache hath yogyaprakare yogyaveli rablyas yash hamkhas miltech. tumhala milaleya yashabadhal.khup abhinandan

Comments are closed.