जे वर्षानुवर्षे चालू आहे ते जातीचे मोठेपण आपण कधी घालवणार? ओबीसी, मराठा, कुणबी, धनगर, ब्राह्मण या सर्वांना त्यांच्या त्यांच्या जातींच्या पंखांखाली राहून सरकारी फायदे व राजकारणातील जागांवर डोळा ठेवणेच आवडते. त्यासाठी मोर्चे, धरणे करण्यावर त्यांचा भर जास्त असतो. निदान शिक्षणाच्या बाबतीत तरी सर्व जाती-धर्मांतील मुलांनी या व्याधीपासून दूर राहून स्पर्धात्मक परीक्षांत पुढे येण्यास पाहिजे. ते पथ्य असल्या गोष्टींना प्रसिद्धी देणाऱ्या माध्यमांनी पाळण्यास हवे. शालांत परीक्षा पास झाल्यावर विद्यार्थ्यांची जाती-धर्म यांवर विभागणी करून, त्यांच्या हुशारीचे विभाजन करतात. तसाच प्रकार ‘युपीएससी’ परीक्षेत पास झालेल्या यशवंतांच्या बाबतीत घडला ! अनेक जाती-संस्थांनी त्यांच्या जातीमध्ये किती मुले पास झाली याची यादी नावांनुसार प्रसिद्ध करून त्यांच्या त्यांच्या जातींची पाठ थोपटून घेतली. ही गोष्ट यशवंतांच्या यशावर पाणी टाकते. त्यांनी आयएएस, आयपीएस या परीक्षा ज्या परिस्थितीतून दिल्या व त्यात यश मिळवले, त्यांच्या कष्टाला व पुढील वाटचालीला यामुळे अपशकून केला गेला. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या भावी अधिकाऱ्यांना जातींच्या तराजूत जोखण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? ते देशभर काम करण्यास जातील, तेव्हा त्यांच्याकडे त्या त्या जातीचा म्हणून पाहिले जाईल. यासाठी परीक्षेला बसणाऱ्या व पास होणाऱ्या उमेदवारांची नावे प्रथम जाहीर करावी, आडनावे नको. म्हणजे ते कोठल्या जातींचे आहेत ते समजणार नाहीत व त्यांच्या कष्टाला आणि पुढील वाटचालीला यश मिळेल आणि जातींच्या राजकारणाला आळा बसेल.
– किरण राऊत 9969039871, 9867452332 editor_chalana@yahoo.co.in
(चालना, दिवाळी 2021; अंकातील संपादकीय)
———————————————————————————————-