देऊळ चित्रपटावर समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी बालगंधर्व चित्रपटामुळे सुरू झालेली चर्चा नॉस्टॅल्जिक वर्तुळात अडकून पडली होती, मात्र देऊळसंबंधी वादप्रतिवादातून बौद्धीक खाद्य मिळत आहे. अशा चर्चां घडल्याने मराठी समाजाला आलेले बुद्धिचे मांद्य दूर होऊ शकेल.
‘थिंक महाराष्ट्र’कडून ‘देऊळ’ची अगाध लीला आणि ‘देऊळ, लवासा आणि विकास’ हे दोन लेख सादर करण्यात आले. त्यावरून मराठी समाजामध्ये वेगवेगळ्या पातळींवर चर्चा सुरू झाली. अशा प्रकारे वादचर्चा घडणे ही मराठी समाजाच्या बौद्धिकतेच्या दृष्टीने आवश्यक गोष्ट आहे. समाजाची बौद्धिकता वाढीस लागावी, अशी ‘थिंक महाराष्ट्र‘ची धारणा आहे. सुलक्षणा महाजन यांच्या लेखांवर डॉ. विश्वंभर चौधरी आणि प्रवीण महाजन यांनी सणसणीत मते व्यक्त केली. ती येथे पुर्नउद्धृत करत आहोत.
‘देऊळ’ची अगाध लीला हा दिनकर गांगल यांचा लेख चित्रपटकृती म्हणून देऊळसंबंधी अभिप्राय व्यक्त करतो आणि तेथे दिग्दर्शकाऐवजी लेखकच प्रकट होत आहे. असे मत मांडतो. हे चित्रपट माध्यमाशी विसंगत आहे. यासंदर्भात संजय भास्कर जोशी यांनी देऊळ चित्रपटाचे विश्लेषण आमच्याकडे पाठवले आहे, हे महत्त्वाचे वाटते. ‘देऊळ’मधील मुख्य व्यक्तिरेखेची दिग्दर्शक-लेखकाने केलेली मांडणी चित्रपटाचा परिणाम कशी मर्यादीत करते, हे यातून व्यक्त होते.
यापूर्वी बालगंधर्व या चित्रपटामुळे अशाचप्रकारची चर्चा सुरू झाली. मात्र नितिन देसाई यांची भव्य निर्मिती सा-यांच्या डोळ्यांचे पारणे फेडून निघून गेली आणि ती नॉस्टेल्जिक वर्तुळात अडकून पडली. यावेळी मात्र वादप्रतिवादातून बौद्धीक खाद्य मिळत आहे. समाजाला बुद्धिचे मांद्य आलेले आहे. या मराठीतील न्यूनाकडे ‘थिंक महाराष्ट्र‘ने आरंभापासून लक्ष वेधले आहे. अशा चर्चांमुळे यातून बाहेर येण्याची वाट दिसू लागेल.
– संपादक
संपर्क – info@thinkmaharashtra.com