ख-या देवाचा शोध करायला नको का?

4
37
14

देव या संकल्पनेबद्दल आजवर बरेच लिहिले गेले आहे. तरीसुद्धा मला वाटते, की गंगेमधून इतक्या सर्व लेखनाचे पाणी वाहून गेल्यावरदेखील देव हा विषय अनिर्णितच राहिलेला आहे!

आस्तिक माणसे देव मानतात. देवावर श्रद्धा, विश्वास ठेवतात. नास्तिक माणसे देव मानत नाहीत. पण तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक असा, देव ही अत्यंत मूलभूत अशी संकल्पना आहे आणि ती जगातल्या एकूण सर्व लोकांच्या मनामधे खोलवर पोचलेली आहे हे प्राथमिक सत्य आहे. म्हणजे तुम्ही ठार नास्तिक असलात आणि देव मानत नाही असे निक्षून सांगत असलात, तर ‘तूम्ही काय मानत नाही म्हणालात?’ अशा प्रश्नाचे उत्तर देण्याकरता तरी निदान तुम्हाला देव ही संकल्पना मनात आणावीच लागेल.
सकृद्दर्शनी असे दिसते, की आस्तिक आणि नास्तिक या दोन्ही प्रकारचे लोक देव ही संकल्पना बरीचशी गृहीत धरूनच चालत असतात. जे नास्तिक आहेत, या संकल्पनेशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही असे दाखवतात व ती उडवून लावतात. उलटपक्षी जे आस्तिक आहेत, देखील देव अमुक अमुक असा असतो आणि आपण त्याची भक्ती, उपासना वगैरे करायची असते असे गृहित धरून चालत असतात, तो दयाळू वगैरे असतो, त्याची प्रार्थना केली तर तो भक्तांवर कृपा करतो असे लहानपणापासूनच  त्यांच्या मनावर बिंबवले गेलेले असते आणि सर्व आस्तिक माणसे त्यावर विश्वास ठेवून वागत असतात. अर्थात सर्व आस्तिक माणसे देवाची भक्ती करतात असे नाही, पण कधीमधी देखल्या देवा दडवंत असे म्हणून देवाला नमस्कार करण्याची त्यांची तयारी असते.
पण मुळात देव नावाचे गौडबंगाल आहे तरी काय बुवा? याचा विचार केला जातो का? नास्तिक माणसे आपण काय नाकारत आहोत याचा खोलवर विचार करून ते नाकारत असतात का? आणि आस्तिक माणसे तरी आपण नेमकी कशावर श्रद्धा ठेवत आहोत, ज्याच्यावर श्रद्धा ठेवत आहोत ते आपल्याला नीट समजले आहे का? या प्रश्नाचा विचार करतात का?
यावर कुणी असेही म्हणतील, की मुळात श्रद्धेचे स्वरूप, जे समजले नाही त्यावर फारसा विचार न करता, ते आहे असे मानणे असेच असते. पण ते कितपत बरोबर? तो शुद्ध वेडेपणाच नव्हे का ? ज्याची आपल्याला सुतराम कल्पना नाही, त्यावर विश्वास ठेवणे गैर नव्हे का?
माझे म्हणणे देवावर श्रद्धा जरूर ठेवा त्यात काहीही गैर नाही पण आपण कशावर श्रद्धा ठेवत आहोत, त्याची प्राथमिक स्वरूपाची ओळख तरी करून घ्यायला हवी की नाही? पण बहुसंख्य आस्तिक लोक असे करताना दिसत नाहीत!
मी नास्तिक नाहीच; उलट शंभर टक्के आस्तिक आहे. मी अध्यात्मवादी देखील आहे. हे मुद्दाम सांगण्यामागचे कारण असे, की मी अध्यात्मवाद आणि आस्तिकता या दोहोंमधे फरक करत आहे.
मी आयुष्यभर अध्यात्मातली ध्यानसाधना करत आलो. गेली अडतीस वर्षे(१९७३ पासून) विपश्यना केली आणि त्याचबरोबर समांतर रीतीने तेहेतीस वर्षे (१९७८ पासून) सिद्धयोगामधली कुंडलिनी जागृतीची उपासना केली. सिद्धयोगी असायला भगवी वस्त्रे अंगावर घालावी लागतात असे बिलकुल नव्हे. मी सुटाबुटात वावरतो म्हणून मी स्वत:ला सुटाबुटातला सिद्धयोगी समजतो.
माझा आस्तिकतावाद यापेक्षा वेगळा आहे. आम्ही अमेरिकेत न्यू जर्सी राज्यात राहतो. तिथे ब्रिजवॉटर शहरामध्ये मोठे भव्य देऊळ आहे. त्या देवळाच्या स्थापनेपासून मी त्याच्याशी संबंधित आहे. मी देवळामधे अनेकदा स्वयंसेवक म्हणून काम केले आहे. इतकेच नव्हे तर अमेरिकेतल्या कुठल्याही मोठ्या चर्चला लागून त्या चर्चची सेमिनरी असते, त्याप्रमाणे मी आमच्या या देवळाशी संबंधित असे अभ्यासवर्ग असावे असा मुद्दा मांडून त्याचा पाठपुरावा देखील सतत करत आलो आहे.
या पाठपुराव्याचा एक भाग म्हणून आमच्या देवळामधे पाच-सहा वर्षे “हिंदूइझम स्टडी ग्रूप” चालवला. त्यामध्ये दर महिन्यातून एका रविवारी दुपारी बैठक करायची व त्यामधे वेदांमधला काही भाग किंवा एखादे उपनिषद किवा इतर तशाच काही विषयावर चर्चा करायची. तसेच, वर्षांतून दोन वेळा अशीच एखादी थीम घेऊन एक दिवसाची कॉन्फरन्स भरवायची. तो अजूनही चालू आहे. मी याला आस्तिकता वाद म्हणतो.
थोडक्यात, पुन्हा स्पष्ट करतो, की वैयक्तिक स्वरूपाची ध्यानसाधना केली तो अध्यात्मवाद आणि देवळामधे स्टडी-ग्रूप चालवला तो आस्तिकतावाद. या दोहोंपेक्षा आणखी एक तिसरा प्रकार असतो. तो म्हणजे अॅग्नॉस्टिक लोकांचा. हे अॅग्नॉस्टिक लोक धड आस्तिक नसतात आणि धड नास्तिकही नसतात. ते घटकेत देव नाही असे तर दुसर्‍या घटकेत देव आहे असे म्हणतात.
मी आस्तिक लोकांना विरोध करणे शक्य नाही. पण मी नास्तिकांना देखील विरोध करत नाही. कारण असे, की माझ्या मते नास्तिक असणे हेदेखील मुळीच वाईट नाही. उलट, नास्तिक लोक देवाधर्मांच्या बाबतीत आस्तिक लोकांच्यापेक्षा जास्त प्रामाणिक असतात असे मला दिसते. कारण जे पटत नाही, ते पटत नाही असे स्पष्ट सांगण्याचे धैर्य त्यांच्यापाशी असते.
मी अनेक वर्षांपूर्वी सहज गंमत म्हणून एक प्रयोग केला. देवळाच्या प्रवेशद्वाराशी उभा राहिलो आणि देवदर्शन करून बाहेर पडणार्‍या प्रत्येक व्यक्तीला विचारू लागलो, की “काय देवदर्शन झाले का?” सर्व माणसे ‘हो’ असेच उत्तर देऊन पुढे जात. तुम्हाला खराखुरा देव भेटला का? असा माझ्या प्रश्नाचा मथितार्थ होता. आणि तो दर्शवण्याकरता मी मुद्दाम ‘देवदर्शन’ या शब्दावर जोर देऊन प्रश्न विचारत होतो. पण प्रश्नातल्या देवदर्शन शब्दातली खोच कुणाच्याच लक्षात आली नाही!

माझी खरी तक्रार आहे ती आस्तिक लोकांच्याबद्दल. हे आस्तिक लोक देवावरच्या तथाकथित श्रद्धेखातर अनेक प्रकारचे विविध स्वरूपाचे चाळे करताना दिसतात. उदा. अमिताभ बच्चन अनवाणी पायाने पाली हिलपासून दादरपर्यंत चालत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायला लागल्यावर अनेक लोक तोच प्रकार करायला लागले. आणि कित्येक लोक पाच-पाच, सहा-सहा तास रांगेत उभे राहून, स्वत:चे पाय दुखवून घेऊन दर्शन घेत असतात. इतरही अनेक मोठ्या व प्रसिद्ध देवळांमधे हाच प्रकार होताना दिसतो. शिर्डी साईबाबांच्या दर्शनाबद्दल तर बोलायलाच नको. इतके नव्हे, तर गणपती दूध पितो अशी आवई कुणीतरी उठवल्यावर लाखो भाविकांनी तिच्यावर विश्वास ठेवला होताच की!
मी अनेक वर्षे हिंदू धर्मशास्त्राचा अभ्यास करत आलो म्हणून सांगतो, वर जी उदाहरणे दिली त्यातले काही करावे असे हिंदू धर्मशास्त्रामध्ये कुठेही सांगितलेले नाही. देवदर्शनाकरता कुठेही अनवाणी पायानी चालत जावे लागत नाही, किंवा रांगेत उभे राहून पाय दुखवूनही घ्यावे लागत नाहीत. मग असा हा सर्व आचरटपणा कशासाठी?
पण हे सांगूनसुद्धा बहुसंख्य लोकांना ते अजिबात पटत नाही. त्यांचे म्हणणे एकच असते, की देवावरच्या श्रद्धेपोटी आम्ही असे सर्व करतो. म्हणजे आपले हे असे करणे बरोबरच आहे हीदेखील त्यांची आणखी श्रद्धा असते. देवावरची श्रद्धा ही श्रद्धेची एक पायरी झाली आणि त्या श्रद्धेच्या पोटी जे करतो ते बरोबर आहे ही त्या श्रद्धेवरची श्रद्धा ही श्रद्धेची दुसरी पायरी झाली. अशा एकाच श्रद्धेच्या कितीतरी पायर्‍या असू शकतात. पण मुळात आपण नेमकी कशावर श्रद्धा ठेवत आहोत? हा मूलगामी विचार करताना कुणीच दिसत नाहीत.
मी एक सिद्धयोगी या नात्याने सांगतो, की ध्‍यानसाधनेच्‍या दरम्यान मला ईश्वराचे अस्तित्व अनेकदा प्रत्यक्ष जाणवले आहे.
ती खरोखरीची प्रत्यक्षानुभूती असते आणि ती घेताना माझी वैज्ञानिक, तंत्रवैज्ञानिक, इंजिनीयर ही वैचारिक भूमिका मी सोडलेली नसते. मग मी स्वत: जितेजागतेपणी टकटकीतपणे जे अनुभवले ते खोटे कसे म्हणायचे? म्हणूनच मला इच्छा असो ना नसो, मला देवाचे अस्तित्व मानणे भाग पडते.
म्हणजे मी देव मानतो तो केवळ श्रद्धेच्या पोटी बिलकूल नव्हे. किंबहुना श्रद्धा या गोष्टीला मी काडीइतकी- देखील किंमत द्यायला तयार नाही. मी फक्त प्रत्यक्षानुभूती महत्त्वाची मानतो आणि श्रद्धेला कडाडून विरोध करतो. एवढंच, मी आस्तिक, नास्तिक किंवा अॅग्नॉस्टिक या तिन्हीपैकी कुठल्याच प्रकारामध्ये मोडत नाही. मग माझ्या या चवथ्या प्रकाराला काय म्हणायचे?
देव शोधायच्या अनेक पद्धती अस्तित्वात आहे. मी माझ्या ध्यानसाधने करता त्यातल्या काही पद्धती वापरल्या. त्याव्यतिरिक्त अनेक थोर लोकांनी ख-याखु-या देवाचा शोध कसा घ्यावा हे अनेकविध प्रकारे सांगून ठेवले आहे. या पद्धती आपण शिकून घ्याव्यात आणि कुठल्यातरी काल्पनिक देवावर श्रद्धा ठेवण्याऐवजी ख-याखु-या देवाचा शोध घ्यावा असे नाही का आस्तिकांना वाटत? असा प्रश्न मला पडतो.
देवावरच्या श्रद्धेपासून मन:शांती मिळते असाही एक मोठा प्रवाद आहे. तो सांगणार्‍या माणसांना ख-याखु-या देवाचा शोध करायचा नसतो. त्यांना फक्त त्यांच्या मनातला देव या संकल्पनेवरच्या श्रद्धेचा उपयोग काऊन्सेलिंग करणा-या एखाद्या सायकॉलॉजिस्टप्रमाणे करून घ्यायचा असतो. ही माणसे अध्यात्म करतच नसतात. अध्यात्मवाद आणि आस्तिकतावाद या दोन्हींपैकी कशाशीच त्यांना कर्तव्य नसते. त्यांची श्रद्धा म्हणजे फक्त मनाला शांती मिळवण्याकरता एखाद्या सायकियाट्रिस्ट डॉक्टरशी केलेला व्यवहार असतो. पण प्रत्यक्षातल्या सायकियाट्रिस्ट डॉक्टरला फी म्हणून पैसे द्यावे लागतात. ही माणसे अनवाणी पायांनी देवदर्शनाला जाण्यासारखे चाळे करतात, ती त्यांच्या मनातल्या श्रद्धा नावाच्या मन:शांती मिळवून देणा-या डॉक्टराची फी असते.
तर इतर काही श्रद्धावान आस्तिक माणसे देवाला नवस बोलून काही मिळवण्याचा प्रयत्न करतात. तो तर चक्क देण्याघेण्याचा व्यवहार असतो.
मुद्दा असा की या दोन्ही प्रकारांमधे ध्यानसाधना करून ख-याखु-या देवाचा शोध घेण्याचा कुठे पत्ताच नसतो. हे अध्यात्म नव्हे.
त्यांना फक्त देवाचा उपयोग करून घ्यायचा असतो.
त्यामुळेच त्यांच्यापेक्षा नास्तिक माणसे अधिक प्रामाणिक वाटतात. देव कधी पाहिला नाही, ध्यानसाधनेमधले विविध अनुभव कधी घेतले नाहीत. देवाचे अस्तित्व कधीही जाणवले नाही. देवाबद्दल काहीच ठाऊक नाही, हे सर्व प्रामाणिकपणे कबूल करणे, हीच ख-याखु-या देवाचा शोध घेण्याच्या धडपडीची पहिली पायरी असते.
विपश्यनेमधे देव नसतो, तरीसुद्धा विपश्यना करून देवाबद्दलच्या खर्‍याखुर्‍या सत्याला सामोरे जाता येते ही वस्तुस्थिती आहे.
आस्तिक मंडळींना माझे आग्रहाचे सांगणे आहे, की त्यांनी त्यांच्या देवाबद्दलच्या सर्व कल्पना, श्रद्धेसकट सर्व पूर्वग्रह बाजूला सारून मनाची पाटी धूऊन पुसून लख्ख कोरी करावी, अशाकरता, की ख-याखु-या देवाची खरीखुरी प्रतिमा मनाच्या कोर्‍या पाटीवर उमटावी.
डॉ. अनिलकुमार भाटे

निवृत्त प्राध्यापक. विद्युत अभियांत्रिंकी,
संगणक विज्ञान, आय-टी आणि मॅनेजमेन्ट,
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका.

About Post Author

4 COMMENTS

  1. स्वानुभवातून आपण देव या
    स्वानुभवातून आपण देव या संकल्पने विषयी जे विचार मांडले व आपल्याला आलेली अनुभूती येथे विषद केली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. देव आहे अथवा नाही हे सांगणे कठीण! परंतु साधनेद्वारे साधक जी अनुभूती स्वतः अनुभवतो ती निःसंदेह सत्य असते.

  2. it is fact without vipassana
    it is fact without vipashyana u cant see reality of nature i.e. power of nature.

  3. देवाच्या शोधविषयीचे विवेचन…
    देवाच्या शोधविषयीचे विवेचन चांगल्या प्रकारे मांडले आहे, परंतु प्रत्यक्षानुभूती विषयी फारसे सांगितले नाहीत.

Comments are closed.