समाजाच्या गरजा भौतिक आणि भावबुद्धी अशा दोन प्रकारच्या असतात. संस्कार आणि संस्कृतीसंचित शाबूत असेपर्यंत भौतिक गरजा फारसा त्रास देत नाहीत. मात्र सुबत्तेचा काळ येत असल्यामुळे आपल्याला संस्कृतीची, मानवी वर्तनव्यवहाराची चिंता वाटत आहे. यांमधील समतोल साधण्याच्या प्रयत्नांतील एक प्रयत्न ‘व्हिजन महाराष्ट्र’चा आहे. आजच्या बकालतेवर ‘सोशल नेटवर्किंग’चे साधन वापरून समाजातील संवेदनशील व विचारी वर्गाचे सामर्थ्य एकवटवावे आणि सांस्कृतीकता अधिक प्रभावी करून लोकांमधील पुढाकार घेण्याची भावना जागृत करावी, या दिशेने ‘थिंक महाराष्ट्र’ प्रयत्नशील आहे.
समाजाच्या गरजा दोन प्रकारच्या असतात. एक- भौतिक. त्यात तुरडाळ, पेट्रोलपासून गटारे-फ्लायओव्हर्सपर्यंत सारे काही येते. त्या विवंचनेमध्ये समाजातील लोकांचे दिवसच्या दिवस जात असतात. दुसरी गरज भावबुद्धीची असते. त्यामध्ये वर्तमानपत्रे, टेलिव्हिजन, संगणक यांवरील माहिती-ज्ञानापासून शेजारधर्मापर्यंतच्या आणि संस्काराच्या व संस्कृतिसंचिताच्या गोष्टी येतात. हा जीवनाचा आधार असतो. ह्यामुळे जीवन सफल व संपूर्ण होते.
जोपर्यंत संस्कार व संस्कृतिसंचित शाबूत असते, तोपर्यंत भौतिक गरजा फार त्रास देत नाहीत. त्यामुळेच धर्म-अध्यात्म, संतपरंपरा यांच्या अवडंबरात आपल्याला शतकानुशतके दारिद्र्य जाणवले नाही. आता काळ सुबत्तेचा येत आहे, तर आपल्याला संस्कृतीची, मानवी वर्तनव्यवहाराची चिंता वाटत आहे.
हे ही लेख वाचा –
‘थिंक महाराष्ट्र’ प्रकल्प’
चांगुलपणाचा प्रभाव
‘थिंक महाराष्ट्र’: भविष्यकाळातल्या पत्रकारितेची ‘नवी तुतारी’!
‘थिंक महाराष्ट्र’: प्रगतीची पावले
यांमधील समतोल साधण्याचे प्रयत्न समाजात सतत होत असतात. ‘व्हिजन महाराष्ट्र फांउडेशन’ हे त्यातलेच एक पाऊल आहे. मात्र त्या कल्पनेची व्याप्ती एवढी आहे, की ती अठरा लक्ष पावलेदेखील ठरू शकतील!
भौतिक गरजांची पूर्ती पालिका-सरकार यांनी करावी अशी अपेक्षा असते. भावबुद्धीची गरज समाजातील सुजाण वर्गाने निभावावी असे अभिप्रेत असते. ‘व्हिजन महाराष्ट्र फांउडेशन’ची हाक या सुजाण वर्गाला आहे. त्यांचे ‘नेटवर्क’ झाले तर समाजात संकृतिसंपन्नतेचे राज्य येऊ शकेल अशी धारणा आहे. जगाच्या इतिहासात सुजाण माणसे प्रभावी ठरली तेव्हा समाजव्यवहार निकोप राहिला. म्हणूनच आजच्या बकालतेवर आजचे ‘सोशल नेटवर्किंग’चे साधन वापरून समाजातील संवेदनशील व विचारी वर्गाचे सामर्थ्य एकवटायचे आहे.
श्री. ग. माजगावकर यांनी सांगितलेली गोष्ट आहे. पूर्वीच्या खेड्यातदेखील दारूचा गुत्ता, मटणाचे दुकान अशा, त्यावेळी ‘दुष्ट’ मानल्या गेलेल्या गोष्टी होत्या. पण गावात दोन वारकरीदेखील असत आणि दारू प्यायलेला माणूस वारकर्यांच्या घरापाठीमागून लपतछपत स्वगृही जाई. ही दहशत नैतिक होती. समाजात सांस्कृतिक गोष्टी प्रभावी झाल्या तर असांस्कृतिकता, असभ्यता आपोआप निष्प्रभ होतात. ‘व्हिजन महाराष्ट्र फांउडेशन’चा प्रवास त्या दिशेने असणार आहे.
सांस्कृतिकता प्रभावी झाली तर भौतिक गरजांचे प्रश्नदेखील निवारता येतील. माणसे शिक्षणप्रसारासाठी , स्वच्छतेसाठी, अपंगांच्या पुनर्वसनासाठी , अंधश्रद्धानिर्मुलनासाठी अधिक निष्ठेने व जोमाने काम करू लागतील.
‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या नावाची सेक्शन-25 खाली ना-नफा कंपनी रजिस्टर करण्यात आली आहे व त्या भागधारकांकडे या सगळ्या व्यवहाराची कायदेशीर जबाबदारी असणार आहे. फाउंडेशनचे समाजात नीतिसंकेत, संस्कारसंकेत विकसित होत जावेत यासाठी काम करणा-या व्यक्ती व संस्था हे लक्ष्य असणार आहे.
-दिनकर गांगल