– विद्याविलास पाठक
– विद्याविलास पाठक
गणेशोत्सव तर साजरा व्हावा मात्र त्यातून नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी पुण्याच्या पोलिसांनी यंदा सुरुवातीपासून काही वेगळ्या योजना आखल्या होत्या. गणेशोत्सवाच्या काळात होणार्या ध्वनिप्रदूषणाला आळा कसा घालता येईल यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन दरवर्षी केले जात असले तरी त्याला आजपर्यंत कोणी भीक घातली नाही. यंदा मात्र पुण्याच्या पोलिसानी एक-दोन नव्हे तर तब्बल अठ्ठेचाळीस गणेश मंडळांवर कारवाईचा बडगा उगारून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी कायदा मोडणार्यांविरुद्ध करवाई करण्याचे धाडस यंदा प्रथम दाखवल्याबद्दल सामान्य माणसांनी त्यांना दुवा दिला तर गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपल्या प्रतिष्ठेवर हा घाला असल्याचे वाटत आहे. गणेश मंडळांनी पोलिस कारवाईचा निषेध महाआरतीने करावा अशी भावना व्यक्त केली आहे.
पोलिसांनी गणेश मंडळांवर केलेली कारवाई चुकीची आहे का? याचे उत्तर ‘मुळीच नाही’ असे आहे. पुण्याच्या गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत पोलिसांनी त्यांना या सर्व नियमांची कल्पना दिली होती. गणेशोत्सवाच्या मंडपांमुळे रस्त्यावर पडणारे खड्डे, रस्त्यावर उभारल्या जाणार्या कमानी, मिरवणुकीत गुलालाचा होणारा स्वैर वापर, ध्वनिवर्धकांच्या भिंती आणि त्यातून होणारे प्रदूषण, मिरवणुकीसाठी तयार केले जाणारे रथ, दीर्घकाळ चालणारी विसर्जन मिरवणूक, काही मंडळांकडून होणारा बैलांचा वापर या सर्व मुद्यांवर चर्चा करून नियम मोडणार्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळांच्या प्रमुखांना सांगण्यात आले होते. तरीही नियम न पाळणार्या मंडळांवर कारवाई करण्यात आली असेल तर ती चुकीची कशी म्हणता येईल? ‘आपण कसेही वागलो तरी उत्सवाच्या वातावरणात ते खपून जाते’ या कार्यकर्त्यांमधे निर्माण झालेल्या भावनेला यामुळे धक्का बसला आहे.
पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले त्यात मिरवणुकीत बैलांच्या अतिरेकी वापराच्या गुन्ह्यांचे प्रमाण अधिक आहे. प्राण्यांना क्रूर वागणूक देण्यास प्रतिबंध करणारा कायदा आहे. कायद्यानुसार बैलांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन वाहण्यास न लावणे, पाच तासांपेक्षा अधिक तास सलग कामास न जुंपणे, पाच तासांनंतर त्याला विश्रांती देणे, त्यांना ध्वनिवर्धकांचा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आदी तरतुदी आहेत. गणेश मंडळांनी त्यांच्या रथांना जोडलेल्या बैलांबाबत अशी काळजी न घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच रात्री बारानंतर ध्वनिवर्धकांचा वापर थांबवला नाही, मिरवणूक वेळेत संपावी यासाठीच्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला नाही, अशा मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, पुण्यात यंदा विसर्जनाची मिरवणूक 27 तास 47 मिनिटे चालली. या काळात ‘लक्ष्मी’, ‘कुमठेकर’ आणि ‘टिळक’ या तिन्ही रस्त्यांवरील सर्व व्यवहार बंद ठेवणे भाग पडते. जवळपास अठ्ठावीस तासात मंडई ते लकडीपूल या भागात राहणार्या नागरिकांना ध्वनिवर्धकांच्या आवाजाने किती त्रास झाला असेल याची कल्पनाच न केलेली बरी! गणेशोत्सव साजरा करण्याचा या मंडळांचा हक्क मान्य करताना नागरिकांच्या शांततेत राहण्याच्या हक्कावर गदा आणली जाते याचा विचार कोणी करायचा?
पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीबाबत सर्वत्र उत्सुकता असते. या मिरवणुकीत काही चांगले पायंडेही पडत चालले आहेत. मात्र ध्वनिप्रदूषणाबाबत वारंवार नाराजी व्यक्त होत असूनही ते कमी करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. यंदा पोलिसांनी त्याबाबत पुढाकार घेतला. गणेश मंडळांविरुद्ध कारवाई करण्यास पोलिस सहसा धजावत नाहीत. कारवाई केलीच तर राजकीय दबाव आणून ती मागे घेण्यास भाग पाडले जाते. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये बेदरकारपणा वाढतो आणि मिरवणूक दीर्घ काळ लांबवणे, पोलिसांना न जुमानणे असे प्रकार घडतात. पोलिसांनी अशा मंडळांवर गुन्हा दाखल करून गणेशोत्सवाला विधायक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे कौतुक करण्याऐवजी त्याला विघातक वळण देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी चालवला आहे.
(‘प्रहार’ दैनिकातील लेखातून संक्षिप्त करून उद्धृत केलेले टिपण)