माधव सावरगावकर : जिद्द, कष्ट व हुशारी

0
627

प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे… हा निबंधाचा विषय शाळेत असे. मुलांनी त्यांचे आयुष्य उमेद खचू न देता, यशापयशाला सामोरे जात घडवावे हा संदेश त्यात अभिप्रेत होता. तो काळ कष्टांचा, श्रमांचा होता. काही मुले तसे जीवन घडवतही व ‘रोल मॉडेल’ (आदर्श) बनून राहत. माधव सावरगावकर यांनी त्यांचे आयुष्य तसेच घडवले. ते होतेही हुशार, चिकित्सक आणि चौकस बुद्धीचे. ते नाशिक जिल्ह्यातील एका तालुक्‍याच्या गावी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात 16 जानेवारी 1952 रोजी जन्मले. वडिलांचे रेव्हेन्यू खात्यातील नोकरीचे तुटपुंजे पेन्शन, शेतीचे जेमतेम उत्पन्न… पण कुटुंब सुसंस्कृत होते. माधव यांचे शिक्षण नादारीवर झाले. त्यांची रवानगी मुंबईतील बहिणीकडे झाली. तेथे त्यांना साडेतीन रुपये रोजावर हेल्परची नोकरी मिळाली. तोच आधार घेऊन माधव यांनी कष्ट करण्याचा आणि दररोज नवीन गोष्टी शिकण्याचा ध्यास घेतला. तो शिक्षणाचा मंत्र माधव यांच्या पुढील यशाचे कारण ठरला.

माधव यांनी पडेल ते काम केले. फिटरचे काम शिकून घेतले. त्यांनी इंजिनीयरिंग ड्रॉइंगची, रस्त्यावरील रद्दीत मिळणारी पुस्तके विकत घेतली. त्यांनी भांडुप स्टेशनपासून रेडिएटरसाठी लागणारा कच्चा माल हातगाडीवरून ढकलत आणण्याचे काम, श्रमाची लाज न बाळगता केले. त्यांचे राहणे मुलुंडला, वर्कशॉप भांडुपला आणि पी.डब्ल्यू.डी. वायरमनचा कोर्स ठाण्याला, अशी त्रिस्थळी यात्रा त्यांची रोज चाले.

माधव पी.डब्ल्यू.डी.चे वायरमनचे लायसेन्स मिळाल्यामुळे क्रॉम्प्टन ह्या मोठ्या कंपनीत फिटर म्हणून टेम्पररी नोकरीस लागले. पण कंपनीत संप झाला आणि दुर्दैवाने ते पुन्हा बेरोजगार झाले. ते त्या बेकारीच्या काळातही हताश झाले नाहीत. त्यांनी त्यांच्या गावात तयार होणाऱ्या हिमरू शाली आणून, ठाणे-मुलुंड भागात घरोघरी जाऊन विकल्या. त्याच काळात त्यांनी स्मॉल स्केल इंडस्ट्रियल इलेक्ट्रिशियनचा तीन महिन्यांचा कोर्सही केला. त्या जोरावर त्यांना तळोजा येथील इंडियन अल्युमिनियम कंपनीत फर्नेस ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली. ती नोकरी इंडाल कंपनीची होती. ते सहाशे डिग्री तापमानाच्या भट्टीवरील काम. माधव वर्षभरात परमनंट झाले. त्यांनी पुढील शिक्षणासाठी कायम रात्रपाळी कंपनी व्यवस्थापनाकडे विनंती करून मागून घेतली. रात्रभर भट्टीवर काम, दिवसा मुलुंड कॉमर्स कॉलेज आणि मुंब्रा ते तळोजा ह्या कंपनीच्या बसप्रवासात व कामातून सवड मिळेल तेव्हा अभ्यास… अशी चार वर्षे काढल्यावर ते बी कॉम परीक्षा उत्तम मार्कांनी उत्तीर्ण झाले व त्याच कंपनीत क्लार्कच्या जागेकरता निवडले गेले. त्यांनी दोन वर्षांनंतर ठाणे कॉलेजमध्ये संध्याकाळचे शिक्षण घेऊन एलएल बी ही पदवी मिळवली. पण माधव सावरगावकर तेथेच थांबले नाहीत. त्यांनी एक पायरी खाली उतरून, व्यवस्थापनाला पुन्हा विनंती करून परत एकदा सहाशे डिग्री तापमान असणाऱ्या भट्टीवर फर्नेस ऑपरेटर म्हणून काम सुरू केले. त्यांचे राहणे होते मुलुंड स्टेशनपासून सहा किलोमीटर दूर असलेल्या सिंधी कॉलनीत. त्यांनी त्या काळात दररोज सहा- साडेसहा तास प्रवास, साडेपाच तास कॉलेज आणि रात्री आठ तास सहाशे डिग्री तापमान असणाऱ्या भट्टीवर नोकरी असा दिनक्रम आरंभला आणि मुंबई विद्यापीठाचे पर्सोनेल मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना घरी संध्याकाळचे फक्त चार तास मिळत. केवढी ही जिद्द म्हणावी !

माधव सावरगावकर गेली सुमारे तीस वर्षे वेगवेगळ्या कंपन्यांत पर्सोनेल डिपार्टमेंटच्या विविध अधिकार पदांवर यशस्वी रीत्या काम करत आहेत. ते फायझर या अमेरिकन कंपनीत सुमारे एकोणतीस वर्षे कार्यरत असून ते डायरेक्टर (प्लँट पर्सोनेल) ह्या पदाची जबाबदारी गेली पंधरा वर्षे सांभाळत आहेत.

त्यांनी कष्टमय जीवनप्रवासात स्वतःवरील आणि चांगल्या कामावरील विश्वास कधी ढळू दिला नाही. नैतिक मूल्ये आणि माणुसकी जपली. असंख्य चांगली माणसे जोडली. माधव सावरगावकर यांना वाचनाची आवड आहे. त्यांनी कंपनीत काम करत असताना कामगारांसाठी वाचनालय सुरू केले. ‘तळोजादर्शन’ ह्या मासिकात कामगारविषयक कायदे, सुरक्षेसंबंधी आणि शब्दकोडी असे लेखन केले. त्यांनी ललित लेखन मात्र कोरोनाच्या बंदपर्वात प्रथमच केले. त्यांची वेगवेगळ्या कारखान्यांतील कार्यकाळात पाहिलेल्या माणसांच्या कथा, गावगोतासंबंधी आणि आत्मचरित्रविषयक अशी तीन पुस्तके लिहून झाली.

त्यांचे व्यक्तिगत आणि कौटुंबिक आयुष्यही मुद्दाम सांगावे असे वेगळे आहे. माधव सावरगावकर यांचे लग्न अगदी वेगळ्या तऱ्हेने जमले. एकदा ते त्यांच्या बंधूंबरोबर पायी चालत जात असताना, त्यांना समोरून गोरी-घारी, सोज्वळ चेहऱ्याची एक मुलगी येताना दिसली. माधव भावाला म्हणाले. “ही माझी बायको होणार. मी हिच्याशी लग्न करीन.” भावाला नवल वाटले नसते तरच नवल ! तिची आणि माधवची ओळखदेख काहीच नाही. रस्त्यात दिसलेली ती मुलगी. परंतु माधव पक्के जिद्दीचे. त्यांनी तिच्याशी (संध्याशी) ओळख काढली, त्यांच्याकडून प्रेम तर प्रथमदर्शनी जुळले होतेच. त्यांनी ठरवून लग्नही केले. संध्यानीही माधव यांच्या नऊ वर्षांच्या विद्यार्जनाच्या खडतर काळात समजूतदार पत्नी, वेळोवेळी मानसिक धैर्य देणारी शक्ती आणि प्रसंगी घर एकटीच्या बळावर सांभाळणारी गृहिणी बनून राहिल्या. त्या पतीला पुढील शिक्षणासाठी उद्युक्त करताना ‘तू लंबी रेसका घोडा आहेस, खचून जाऊ नकोस !’ असे सतत म्हणत असत. सावरगावकर यांचा वक्तशीरपणा आणि संतापी स्वभाव ह्यांमुळे त्यांचा एक दबदबा सर्वत्र असतो. पण त्या दबदब्याचा आब राखून सर्वांना आपलेसे करणाऱ्या संध्या ह्यांच्या सोशिकतेचे आणि सुहास्याचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. त्यांची दोन अपत्ये- मिताली आणि अमित ही. त्यांनी त्यांच्या बाबांचे कमावलेले मोठेपण समजून घेतले. अमित विशेष प्राविण्यासह बी ई करून अमेरिकेत गेला. त्याने टेक्सास युनिव्हर्सिटीत स्कॉलरशिप मिळवून एमएस पूर्ण केले. जनरल मॅनेजमेंटमध्ये एमबीए केले. तो सध्या नॉर्थ कॅरोलिना स्टेटची राजधानी असलेल्या रॅली येथे आहे. कन्या मिताली हिला जात्या गरीब व पीडित यांच्याविषयी कळवळा आहे. तिने पदवी परीक्षेनंतर हट्टाने विशेष मुलांसाठीच्या कोर्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. ती पती विक्रम यांच्या कंपनीत डायरेक्टर म्हणून काम बघते; आठवड्यातून एक दिवस, विशेष मुलांच्या शाळेत विनामूल्य शिकवण्यास जाते. सावरगावकर यांचे जावई – विक्रम ह्यांची स्वत:ची ‘मेडिकल इव्हेण्ट मॅनेजमेंट’ ही नावाजलेली कंपनी गेल्या वीस वर्षांपासून आहे. पन्नास माणसे त्यात काम करतात.

सावरगावकर दाम्पत्याला त्यांची मुले आणि भाचे कंपनी (आणि आता नातवंडेही) ह्यांच्याबरोबर सुट्टीत मौजमजा करण्यात रमणे, घरात मित्रमंडळींना आमंत्रित करून संगीताच्या/गप्पांच्या मैफली जमवणे, देशोदेशीच्या प्रवासाचा आनंद घेणे, पुस्तकांशी घनिष्ट मैत्री असणे… हे सगळे मनापासून आवडते.

माधव सावरगावकर 9820301035 madhav.sawargaonkar@pfizer.com

अनुपमा उजगरे 9920102089 anupama.uzgare@gmail.com

————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here