अण्णा हजारे यांच्या चळवळीतील एक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी लोकपाल विधेयकाच्या सरकार पक्षाने केलेल्या मसुद्याची ‘जोक’पाल विधेयक अशी संभावना केली आहे. सरकार पक्ष आणि हजारे पक्ष यांच्यामध्ये सोळा बैठका झाल्यानंतरची ही टिप्पणी आहे. यावरून लोकशाही प्रक्रियेचाच उपहास चालला आहे असे नाही वाटत?
दुसर्या बाजूला, गोपीनाथ मुंडे यांची भाजप पक्षातील केविलवाणी अवस्था! ती सगळ्या जगासमोर उघड करून दाखवल्यावर त्यांना पक्षात सन्मानाचे स्थान मिळणार आहे. हे घरातले भांडण. मिडियाने ते दारात मांडून हास्यास्पद बनवले आणि आता, मुंडे देशामध्ये प्रमुख स्थाने भूषवण्यास मोकळे!
अण्णा हजारे मंडळींचे म्हणणे काय आहे ते तरी ठाऊक आहे. त्या संबंधात मतभिन्नता असू शकते. पण त्यातील व्यवहार्यतेचा मुद्दा दोन्ही पक्षांनी प्रथम मोकळा केला पाहिजे आणि तेथेच खरे घोडे अडले असावे. सध्या देशातील कारभार यंत्रणा पूर्णत: खिळखिळी झाली आहे आणि वातावरण अराजकसमान आहे. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिलेला नाही. अशा वेळी, (सुदैवानेच!) देशाची आर्थिक परिस्थिती बरी आहे आणि बरीच उपलब्धता (विपुलताच!) आहे. त्यामुळे सुजाण वर्गात असंतोष नाही. तो मिडियातून चाललेला लोकशाहीचा हा खेळ मनोरंजन पध्दतीने पाहत आहे. गरीब बिचार्या (मानवी हक्क संरक्षणाच्या युगात तसे (दुर्दैवाने) म्हणावे लागत आहे) वंचित वर्गाला सुखाची जाणीवच नाही, मग ईर्षा कोठून तयार होणार?
मुंडे यांना काय हवे आहे? आणि त्यांचे पक्षातील विरोधक काय इच्छितात? त्याबाबत वर्तमानपत्रांत तर्कवितर्क येतात तेवढेच. त्यामुळे ते लोकशाही नाट्य नव्हे, मानापमान नाट्य आहे, एवढाच अंदाज करता येतो. मुंडे यांचा अपमान झाला तर जनतेचा काय संबंध?
देशात उपलब्ध कायदेकानून आहेत. त्यांचा नीटपणे अंमल झाला तरी एवढ्या मोठ्या लोकसंख्येला सुखी ठेवता येईल अशी देशाची परिस्थिती आहे. अक्षरश:, अन्न-वस्त्र-निवारा या गरजांची सहा महिन्यांत देशातील दूरच्या कोपर्यापर्यंत पूर्तता करता येईल अशी सोय आहे. पण कारभारयंत्रणा प्रभावी नाही. त्या प्रश्नावर बुद्धिवंतांनी, विचारवंतांनी मांडणी केली पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी तोडगा राबवून पाहिला पाहिजे. पाणी -पर्यावरण–शिक्षण-संस्कृती हे मुद्दे घेऊन विचारमंथन व कृती व्हायला हवे.
लोकशाहीत मतभिन्नता असणार… ती दैनंदिन प्रश्नांबाबतही व्यक्त होणार… त्यातून ‘चर्चेचे गुर्हाळ’ सुरू होणार … त्याचा शेवट कधी न होणार…. लोकशाही व्यवस्थेतील हे नवे कर्मकांडदेखील धर्मातील जुन्या कर्मकांडाइतकेच जाचक होऊ लागले आहे. त्यातून उदभवणार्या निष्क्रियतेमुळे माणसांची मने मुर्दाड, संवेदनाशून्य बनत चालली आहेत. मिडियाच्या ‘करमणूक तंत्रा’च्या या गंभीर परिणामांची वेळीच दखल घेतली पाहिजे. मिडियाची गरजच गावगप्पांची आहे; पण गावातल्या (शिळोप्याच्या) गप्पा या फावल्या, विश्रांतीच्या वेळी असत. मिडियाचा तो चोवीस तासांचा उद्योग आहे!
दिनकर गांगल
thinkm2010@gmil.com