तळातले सत्तर टक्के लोक

0
47

– वसंत केळकर  

   पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्‍या मुलाखतीसंदर्भात तवलीन सिंह या पत्रकार महिलेने केलेली एक टिप्‍पणी ‘थिंक महाराष्‍ट्र’च्‍या संपादकांकडून जनतेसमोर मांडण्‍यात आली. सोबत ‘लोकसत्‍तेत’ राजीव मुळ्ये यांनी लिहीलेल्‍या त्‍याच आशयाच्‍या एका पत्राचा मजकूर प्रसिद्ध करण्‍यात आला. त्‍याला अमेरिकेतील प्राध्‍यापक डॉ. अनिलकुमार भाटे यांनी प्रतिक्रियाही दिली. मात्र मुळ्ये – भाटे यांच्‍या मतांशी वसंत केळकर सहमत झाले नाहीत. या दोघांच्‍या मतांवर केळकर यांनी केलेली ही टिकाटिप्‍पणी ….

– वसंत केळकर  

     राजीव मुळ्ये यांनी ‘वसाहतवादी वृत्ती’ या टिपणाखाली दिलेली टक्केवारी खरीही मानली तरी लक्षात घ्यावे, की भारतात हुकूमशहा सत्ता ताब्यात घेत नाही; हरलेला पक्ष जिंकलेल्या पक्षाला सत्ता देतो. राजकीय पक्षांच्या अंगवळणी लोकशाहीची पद्धत पडली आहे.  आमची सेना आपल्याच हातात सत्ता घ्यायचे ठरवत नाही. त्यामुळे लोकशाही आपल्या देशात रुजलेली आहे असेच म्हणावे लागेल. निवडणुकीच्या खर्चाबाबत चर्चा सुरू आहे. त्यात मार्ग निघेल.

     तळातले सत्तर टक्के लोक अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत हे मुळ्ये यांचे विधान तपासून घ्यायला पाहिजे. शासकीय अधिकारी चाळीस टक्के लोक गरिबी रेषेच्या खाली आहेत असे मानतात. ते चाळीस टक्के लोक एकत्र नाहीत; आपापसात भरपूर भांडतात.  त्यात मुसलमान आणि दलित प्रामुख्याने आहेत. राजीव मुळ्ये आणि डॉ. अनिलकुमार भाटे त्यांच्याच बाजूचे आहेत असे मी समजतो. हे लोक गरिबी रेषेच्या खाली आहेत, कारण त्यांना शिक्षण आणि आरोग्य यांचा अभाव आर्थिक विकासात सहभागी होऊ देत नाही.  प्रश्न गरिबांना मदत करण्याचा नाही.  प्रश्न गरिबांची गरिबी नष्ट करण्याचा आहे. गरिबांनी सतत गरीबच राहवे काय? तळातल्या लोकांबद्दल करुणा  आणि सत्ताधीशांबद्दल चीड या भावना व्यक्त करून गरिबांची गरिबी कधीच नष्ट होणार नाही. शिक्षण आणि आरोग्य यांचा अभाव दूर करणे हा तो मार्ग आहे.

     हे काम सोपे नाही. यांतले पहिले पाऊल पैसा हे आहे. भारत हा  देश संपत्तिवान होत चालला आहे हे सत्य, चाळीस टक्के लोक अतिशय हलाखीचे जीवन जगत आहेत असे असूनही सत्यच आहे! शिक्षण आणि आरोग्य यांसाठी गेल्या काही वर्षांत खूप जास्त पैसा ठेवता यायला लागला आहे. या निधीचा योग्य वापर करण्याचे कौशल्य आपल्याला शिकायला पाहिजे. महागाई जबरदस्तीने कमी केल्यास वस्तूंचा अभाव, साठेबाजी आणि काळाबाजार या प्रवृत्ती निर्माण होतात.

     वस्तूंच्या किमती ठरवण्याचे स्वातंत्र्य नीट चाललेल्या मार्केटलाच दिले पाहिजे. गरिबांना  वस्तू कमी दराने देण्याचा कार्यक्रम केवळ तात्पुरता आहे. तो नीट हाताळण्यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरून एक स्मार्ट ओळखपत्र भारतातल्या सर्व नागरिकांना देण्याची योजना क्रांतिकारक आहे. नंदन निलेकणी ही योजना कार्यान्वित करत आहेत. पण मुळ्ये आणि भाटे यांना त्याचे काय?  थोडे लोक सत्ता उपभोगत संपूर्ण राष्ट्राला विषमतेच्या आणि दारिद्र्याच्या खाईत लोटतात हे म्हणणे चुकीचे आहे. मनमोहन सिंग, कौशिक बसू, नारायण मूर्ती, रतन टाटा आणि असे अनेक लोक संपूर्ण राष्ट्राला विषमतेच्या आणि दारिद्र्याच्या खाईत लोटत नसून ते देशाला श्रीमंत बनवत आहेत आणि आर्थिक विकासाच्या या कार्यक्रमात सामील नसलेल्या चाळीस टक्के लोकांना त्यात आणण्यासाठी पैशाची गुंतवणूक कशी करायची यावर ते  विचार करत आहेत. ही माणसे चाळीस टक्के लोकांचे शत्रू नाहीत.

     अनिलकुमार भाटे यांचे, “छे, छे, इंग्रजांचे राज्य यापेक्षा अनेक, खरेतर शेकडो पट अधिक चांगले होते. मला इंग्रजांच्या राज्यात राहायला चालले असते” हे उद्गार अतिशय चुकीचे आहेत. “या परकीय लोकांनी आमच्यावर राज्य करावेच का”  याच  मुद्द्यावर जिवाचे बलिदान देऊन देशभक्तांनी स्वातंत्र्य मिळवले आहे. हलाखीच्या परिस्थितीत जगणारे भारतातील लोक आणि भाटे यांच्यासारखे हिंदू धर्म, संस्कृती, तत्त्वे, संस्कृत भाषा, मराठी भाषा आणि विशेषतः वेद आणि वेदांगे या सर्वांबद्दल कमालीचे प्रेम करणारे लोक यांच्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. आहे. “नको तो भारत” असे म्हणून, नाईलाज म्हणून काही दशकांपूर्वी देशांतर करणार्‍या लोकांनी भारतात राहणे नकोसे झाले असे वाटून घेतले तरी त्यांनी भारत इतका वाईट्ट देश नाही हे उमजून घ्यायला पाहिजे. अमेरिका आणि भारत यांची तुलना करणे बरोबर नाही. त्याही देशाचे अगणित दोष आहेत. आमचा देश आम्हाला प्रिय असलाच  पाहिजे.

वसंत केळकर– भ्रमणध्वनी – 9969533146, इमेल – vasantkelkar@hotmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous articleअग्निपुराण
Next articleमनोरंजनाच्या’ हव्यासापायी माणसांची अपमानजनक थट्टा
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.