चहुबाजूंनी डोंगर आणि त्यांच्या मध्यात वसलेले गाव म्हणजे पिसई. अठरापगड जातीचे लोक गावात राहतात, तरी त्यांच्यामध्ये सामाजिक एकोपा आहे. हे गाव लोककलेच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. पिसईच्या गावकऱ्यांनी त्यांची लोकसंस्कृती टिकवून ठेवली आहे…
पिसई हे गाव दापोली–मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर आहे. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात येते. ते तालुक्यापासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. गावाचे क्षेत्रफळ आठशेछत्तीस हेक्टर एवढे आहे. गावात साडेतीनशे कुटुंबे वास्तव्यास आहेत. गावाची लोकसंख्या पंधराशेच्या जवळपास आहे. पिसई गावात आठ वाड्या आहेत. पहिली काटकर वाडी. त्या वाडीत जवळपास पंच्याऐंशी घरे आहेत. तेथे कुणबी आणि कुंभार लोक गुण्या गोविंदाने नांदतात. दुसरी येसरे वाडी. त्या वाडीत पंचवीस-तीस घरे आहेत. तेथे कुणबी आहेत. तिसरी कासार वाडी. त्या वाडीत तीस-पस्तीस घरे आहेत. तेथे राहणारे लोक गवळी समाजाचे आहेत. चौथी आणि पाचवी, वझर वाडी-बिवळा वाडी. तेथेही गवळी समाजाचे लोक राहतात. सहावी बौद्ध वाडी. तेथे बौद्ध समाजाचे लोक आहेत. सातवी मूळ वाडी. तेथे वाणी, मराठा आणि नाभिक समाज यांची वस्ती आहे. त्या वाडीत वीस-पंचवीस घरे आहेत. आठवी कुंभार वाडी. त्या वाडीत चाळीस-पंचेचाळीस घरे आहेत. तेथे कुंभार आणि गोपाळ या दोन समाजांचे लोक राहतात. वाडी तेथे देवाचे मंदिर आहे. सर्वांचा व्यवसाय शेती हाच आहे. निरनिराळ्या समाजाचे लोक गावात राहतात, तरी त्यांच्यामध्ये सामाजिक एकोपा आहे.
पिसई गावाला इतिहास आहे! शिवाजी महाराजांच्या सैन्याचे येणे-जाणे दापोली बंदरात असे. त्या सैन्याचा मुक्काम त्या आधी पिसई गावी असे. त्याची साक्ष देणारी घोडेविहीर आणि मुस्लिम-मावळ्यांना विश्रांतीसाठी व अजान पढण्यासाठी उभारलेली मशीद तेथे अस्तित्वात आहे. महाराजांच्या मावळ्यांमधील हिंदू मावळे महामाई देवीच्या मंदिरात विश्रांती करत असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. गावाचे नाव ‘पिसई’ असे पेशव्यांच्या काळात रुढ झाले. पेशवाईचा ऱ्हास झाला अन् राज्यात इंग्रज आले. त्या काळात दापोलीचे नाव ‘कॅम्प दापोली’ असे होते. तेथे इंग्रजांचा दबदबा होता. त्यामुळे उच्च शिक्षणाची सोय केवळ दापोलीत होती.
पिसई गावाचा संदर्भ साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकात आहे. पिसई गावाचे आणि तेथील नदीचे वर्णन त्यात आहे. साने गुरुजी त्यांच्या पालगड गावातून दापोलीला चालत जात असत. ते गाव पिसईच्या पूर्वेकडे आहे. त्यांना पावसाळ्यात पिसई गावातून वाहणारा ‘पिसईचा पऱ्या’ नेहमी पार करून जावे लागत असे. त्यामुळे पिसई गावाला नावलौकिक मिळाला आहे.
पिसई गावात कुणबी, गवळी, कुंभार, वाणी, बौद्ध, मराठा, गोपाळ, नाभिक, तेली या जातींचे लोक राहतात. गावकऱ्यांमध्ये कमालीची एकी आहे! पिसई गावाला तालुक्यात ‘तंटामुक्त गाव’ हा राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
गावातील शिमगोत्सव म्हणजेच गावदेवीचा उत्सव. गावाच्या दक्षिणेकडे, रहाटाच्या डोंगरावर महामाई देवीचे भव्यदिव्य मंदिर आहे. तेच पिसई गावाचे ग्रामदैवत होय. आई डोंगरावर बसून गावातील आठ वाड्यांचे रक्षण करते अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. होळीची सुरुवात झाली, की देव खेळण्यास, त्याच्या लेकरांना भेटण्यास, गावातील अघोरी अविचारी अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करण्यास बाहेर पडतो अशी आख्यायिका आहे. महामाई माता म्हणजेच शिवाची सती. शिमगोत्सवात देवीची मिरवणूक पालखीतून काढली जाते. देवी घरोघरी पाहुणचाराला येते. त्या काळात गावात कोणी कोणाशी भांडत नाही, चोऱ्यामाऱ्या होत नाहीत. ती परंपरा आजतागायत कायम आहे.
गावात मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जाणारा दुसरा सण म्हणजे ‘गणेशोत्सव’ होय. त्याची लोकांना चाहूल जून-जुलैपासूनच लागते. शेतीची कामे कधी एकदा संपतात आणि गणपतीच्या तयारीला कधी एकदाचे लागतो असे तेथील माणसांना होते. दरवर्षी, नव्या पद्धतीची सजावट कशी करता येईल याचे ‘प्लॅनिंग’ जवळजवळ वर्षभर तेथील लोक करत असतात. प्रत्येकाचा मानस दरवर्षी ‘यंदाचे गणपती एकदम धूमधडाक्यात आणुया’ असा असतो. गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन घराघरात होते. गणेशाच्या मूर्तीची स्थापना घरात केल्यानंतर, घरातील कर्ता पुरुष घरच्या देवाची आणि बाप्पाची मनोभावे पूजा करतो. घराघरातून सुगंधी अगरबत्त्यांचा गंध वातावरणात मिसळून जातो आणि गावाला प्रसन्नतेचे रूप प्राप्त होते. सगळीकडे मंगलमय वातावरण असते. दुपारी सर्व गावकरी मिळून घराघरात जाऊन बाप्पाची आरती म्हणतात. संध्याकाळी गावातील लोकशाहीर त्यांचा नृत्यसंच घेऊन, घराघरात जाऊन बाप्पाच्या समोर त्याची कला सादर करतात. त्या कलाप्रकारास जाखडी म्हणजेच शक्ती-तुरा असे म्हटले जाते. गावातील सगळ्या घरांत जाऊन बाप्पापुढे कला सादर करत असताना सकाळ कधी होते ते कळतच नाही! स्त्रियासुद्धा त्यांचे नृत्य पारंपरिक पद्धतीने देवापुढे सादर करतात. त्यावेळी पुराणकथांवर आधारित अनेक गाणी ऐकण्यास मिळतात. गावकरी उत्सवाच्या त्या चारपाच दिवसांत वर्षभराचा आनंद मनात साठवून घेतात.
त्या व्यतिरिक्त दसरा, तुळशीचे लग्न, गावात असणाऱ्या इतर देवतांचे उत्सव भक्तिभावाने साजरे होत असतात. ते सण साजरे होतात म्हणून तेथील लोकांमध्ये कमालीची एकता बघण्यास मिळते. सणांसाठी बहुसंख्येने लोक एकत्र जमतात आणि आपल्या प्रथा, परंपरा, संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतात. माणसे देवभोळी असल्यामुळे गणपती, शिमगोत्सव आणि हे सण मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने साजरे करतात.
पिसई गावचे लोक त्यांना त्यांच्या कामातून सवड मिळताच भजन-कीर्तनही मोठ्या भक्तिभावाने करतात. ते करत असतानाच, एकदा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती ह.भ.प. शेबाजी येसरे महाराज यांनी पांडुरंगाची माघ वारी करण्याची कल्पना काढली आणि पहिल्यांदा माघ वारी करण्याचे 1991-92 साली ठरले. ती वारी सफल झाली. येसरे महाराजांच्या प्रयत्नांनी वारीच्या छोट्या वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर झाले आणि ‘पिसई ग्रामस्थ वारकरी सांप्रदायिक मंडळ’ उदयास आले. पुढे, येसरे महाराजांनी पंढरपूर येथे मंडळाच्या नावाने जागा विकत घेतली. तेथेच, त्यांच्या गावातील वारकऱ्यांचे वास्तव्य वारीस असते. मंडळाची माघ वारी दरवर्षी असते. वारीकरता पंचक्रोशीतून अडीचशेच्या वर लोक जातात. सर्व व्यवस्था मंडळाची असते. मंडळाचे अध्यक्ष शेबाजी महाराज आहेत. त्यांच्या गावात भजन, कीर्तन, हरिपाठ मोठ्या भक्तिभावाने चालतो.
पिसई गाव हे वनसंपत्तीने समृद्ध आहे. पिसईमध्ये पावसाचे प्रमाण दरवर्षी सरासरीपेक्षा जास्त असते. त्यामुळे शेतीला मुबलक पाणीपुरवठा होतो. चहुबाजूंनी डोंगर आणि त्यांच्या मध्यात वसलेले गाव डोंगरावरून पाहताना अतिशय सुंदर दिसते. गावच्या काही सीमांवर डोंगर उभे आहेत, तर काही सीमा दाट जंगलांनी वेढलेल्या आहेत. चहूबाजूंना छाती पुढे काढून उभ्या असणाऱ्या डोंगरांची नावे कमालीची समर्पक आहेत. त्यामध्ये पूर्वेकडे ‘साजेरी’ आणि ‘दुर्गाडी’ हे दोन उत्तुंग पर्वत तीन गावांच्या सीमेवर उभे आहेत. पिसई, शिरशिंगे आणि पोयनार ही तीन गावे. गावाच्या उत्तरेकडे ‘येसरे टोक’ व दक्षिणेकडे ‘पारणे टेप’ हे पर्वत आहेत. पिसईतील हवामान उन्हाळ्यातही थंड असते. भरपूर पाऊस पडल्यामुळे तेथील लोकांना पाण्याची कमतरता जाणवत नाही. गावात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. पावसाळा सुरू झाला, की गावाच्या पूर्वेकडे असणाऱ्या कामत या स्थानातून उगम पावणारी नदी पोयनारमार्गे खेडमधील नारंगी नदीला मिळते. दुसरी नदी उत्तरेकडे असणाऱ्या तळाच्या माळावरून वाहत-वाहत पाचवली, वडवली, माटवण, बानतीवरेमार्गे अंजर्ल्याच्या खाडीला जाऊन मिळते.
पिसईतील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हा आहे. त्यामध्ये भात, नाचणी, वरी ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. शेतकरी प्रगत नसले तरी बलाढ्य/धनाढ्य असे शेतकरी अमाप शेती करतात. तेथे रोजगाराचे साधन नसल्यामुळे तरुण वर्गाला नोकरीसाठी मुंबईची वाट धरावी लागते. गावात बाजार भरत नाही. गावातील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे कोंबडी वडे, परंतु हल्ली लोक गावरान कोंबडी खाणे विसरून गेले आहेत. पण जेव्हा जेव्हा पाहुणे येतात, तेव्हा तेव्हा जबरी गावरान बेत आखला जातो. शेतीला जोडधंदा सर्वच दृष्टिकोनांतून महाग पडतो. त्यामुळे गावकरी बांधकाम क्षेत्राकडे वळतात. कारण त्यातून त्यांचा उदरनिर्वाह होईल एवढी कमाई होते. परंतु त्या कामांमध्ये सातत्य नसल्याने गावकऱ्यांना शेतीवरच अवलंबून राहवे लागते.
गावातील सरस्वती विद्या मंदिरात इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर मुलांना पुढील शिक्षणासाठी करंजाणी, वाकवली किंवा दापोली या कोणत्या तरी गावी जावे लागते. तेथील लोकांची बोलीभाषा कोकणी मराठी आहे. गोव्यामध्ये बोलली जाणारी कोकणी आणि गुहागर, दापोली, रत्नागिरीमध्ये बोलली जाणारी कोकणी यांत फरक आहे.
पिसईतील महामाई देवीच्या स्थानामागे पुराणातील एक कथा आहे. विष्णू आणि महादेव यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद वैष्णव आणि शैव पंथीय लोकांमध्ये होता. श्रेष्ठत्वावरील त्या वादातून महादेवांनी गाव तेथे स्वत:चे मंदिर स्थापन करून त्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे प्रत्येक गावची ग्रामदेवता माया म्हणजेच पार्वती बनली. त्यातीलच एक आई म्हणजे महामाया म्हणजे महामाई या नावाने पिसई गावात स्थित आहे. शंकराचे स्थान महामाई मातेच्या मंदिराच्या बाजूला आहे.
पिसई हे गाव लोककलेच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. पिसई गावाचे नाव कलगीतुरा (शक्ती-तुरा), तमाशा, भारूड, नमन, भजन, कीर्तन या सर्व क्षेत्रांत दापोलीसह आसपासच्या सर्व तालुक्यांत प्रसिद्ध आहे. तेथे शिवाला मानणारे काही लोक, तर मायेला म्हणजेच पार्वतीला मानणारे काही लोक असल्यामुळे शक्तिवाले आणि तुरेवाले हे दोन्ही प्रकार जोपासणारी मंडळे तेथे आहेत. तुरेवाले शाहीर गणपत उजाळ आणि महादेव काटकर या गुरूंचे अनेक शिष्य तेथे त्यांची कला जोपासत आहेत. बाळाराम काटकर, सहदेव येसरे, अनंत येसरे, दत्ताराम येसरे आणि मुंबईसह सबंध महाराष्ट्रात नावलौकिक असलेले शाहीर उदय काटकर यांचा नामोल्लेख त्या संदर्भात करण्यास हवा. तेथील होतकरू शाहीर गणपती सणात घरोघरी नाचून गणपतीपुढे त्यांची कला सादर करतात, तर स्त्रिया झिम्मा, फुगड्या हे पारंपरिक खेळ खेळतात. होळीमध्ये देवीचे खेळे बनून तमाशा स्वरूपात लोकांचे मनोरंजन केले जाते.
गावाचे सध्याचे सरपंच वसंत लक्षण येसरे यांच्या कार्याचा ठसा गावावर उमटलेला दिसतो. देशाला अनेक सैनिक या गावाने दिले आहेत.
– निलेश उजाळ 7045398561 nilesh.ujal16@gmail.com
———————————————————————————————————————-
लेख आवडला. पिसई गावची परीपुर्ण माहिती मिळाली.