हिंदू राष्ट्र असेल तरी कसे ?

‘हिंदू राष्ट्राची’ चर्चा 2014 पासून म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून अधिकच जोमाने झाली. अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल, ट्रिपल तलाक सारखे कायदे रद्द होणे आणि नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती यामुळे तर अधिकच व्यापकपणे ही चर्चा होऊ लागली. पण ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे काय? याबद्दल सामान्य माणसाच्या मनात प्रचंड गोंधळ आहे.

मला असे वाटते, की ‘हिंदू राष्ट्र व्हावे’ असे म्हणणाऱ्यांनी एकत्र यावे. अशा संघटनांनी त्यांचे त्यांचे प्रतिनिधी नेमून एक ‘घटना समिती’ बनवावी आणि एकत्र बसून ‘हिंदू राष्ट्राची’ नेमकी आणि स्पष्ट कल्पना मांडावी. ‘हिंदू राष्ट्र’ म्हणजे नेमके काय हवे ते लोकांना (फक्त अहिंदूंना नव्हे तर हिंदूंनाही) समजणे गरजेचे आहे. या हिंदू राष्ट्राचे कायदे कसे असणार आहेत? त्यातील लोकशाही रचना कशी असणार आहे? सरकार निवड कशी असणार आहे? न्यायालयांचे अधिकार काय? त्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कसे असणार आहे? त्यातील लैंगिक स्वातंत्र्य, आहार स्वातंत्र्य कसे असणार आहे? अंधश्रद्धांविषयी कायदे काय असणार आहेत? त्यात इतर धर्म मानणाऱ्यांना किंवा कोणताही धर्म न मानणाऱ्यांना स्थान काय असणार आहे? जातनिर्मुलनासाठी नेमका काय विचार आहे? आरक्षण धोरण काय असणार आहे? आदिवासी समाज- त्यांच्या संस्कृती, प्रथा यांच्याविषयी काय म्हणणे आहे? भाषाविचार काय आहे या हिंदू राष्ट्राचा? हे आणि असे अनेक प्रश्न ज्यावर स्पष्टता हवी.

यामुळे होईल असे, की एखादी व्यक्ती हिंदू राष्ट्र म्हणते तेव्हा काय अभिप्रेत आहे हे स्पष्ट होईल. हिंदू राष्ट्राचा उद्घोष करणाऱ्या संघटना- मंडळींनी सहमतीने तसा काही सविस्तर दस्तऐवज बनवला आहे काय? तो बनवायला हवा. म्हणजे मग, आत्ता आपले अंमलात असलेले दोन-अडीच वर्षे खपून, प्रचंड चर्चा करून जे भारताचे संविधान बनवले गेले आहे ते; आणि हे हिंदूराष्ट्राचे संविधान यांची थेट तुलना करून बघता येईल.

कल्पनेतील हिंदू राष्ट्र किमान कागदावर तरी लोकासंमोर स्पष्टपणे आणि नेमके मांडण्याचे धारिष्ट्य या हिंदू राष्ट्रविचार मांडणाऱ्या संघटनांनी दाखवले पाहिजे. नाहीतर होते काय, की या संघटनांची मंडळी कधी मुस्लिमविरोधी बोलतात, कधी काँग्रेसच्या चुकांबद्दल बोलतात, कधी राष्ट्रप्रेमाविषयी बोलतात, कधी डाव्यांना शिव्या घालतात. कधी अमेरिकन भांडवलवादाला नावे ठेवतात, कधी कम्युनिस्ट आणि कॅपिटलिस्ट एकत्र येत हिंदूविरोधी कारस्थान कसे रचतायत याच्या गंमतीदार कहाण्या सांगतात. हे सगळे फार तात्कालिक आणि प्रतिक्रियावादी होत राहते. शिवाय हिंदूराष्ट्राचे तयार झालेले एखादे संविधान नसल्याने वेगवेगळे लोक वेगवेगळे बोलत राहतात. कोणी एक उठून काहीतरी मत व्यक्त करतो, दुसरा उठतो आणि या पहिल्याला मनातून कधीच माफ करणार नाही असे म्हणतो. तिसरा उठतो आणि अमुक कायदा देशभर लागू करणार म्हणतो. पण चौथा येतो आणि म्हणतो, की आम्ही असे काही कधी म्हटलेले नाही. नेहमीच पळवाट उरते. हिंदू राष्ट्राची संकल्पना धूसर दिसते.

कुजबूज, भाषणबाजी, अफवा, थापा, प्रचार यांपलीकडे जाऊन बुद्धीचा वापर करत, विचारविनिमय करत सर्व प्रमुख हिंदू राष्ट्रवाल्या संघटनांनी एकदा एक संविधान बनवावे. अगदी सगळ्या संस्थांना एकत्र येणे शक्य नसेल तर किमान मोठ्या एकेका संस्थांनी हे संविधान बनवायला घ्यावे. भारतीय संविधान बनवताना घटनासमितीत काय चर्चा झाली हे आजही वाचता येते. तसे हे हिंदूराष्ट्र संविधान बनवताना होणाऱ्या चर्चा वाचता याव्यात, डिजिटल इंडियाच्या जमान्यात तर लोकांना थेट बघता याव्यात. खुल्या असाव्यात. पारदर्शकता ठेवत ‘हिंदू राष्ट्राची’ स्पष्ट, सविस्तर, नेमकी आणि लेखी कल्पना लोकांसमोर मांडली गेली पाहिजे; या अपेक्षेत गैर काय?

तन्मय कानिटकर 9823431138 tmkanitkar@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

Previous articleघुमान – नामदेवांचे तीर्थक्षेत्र (Saint Namdev in Punjab)
Next articleशालेय शिक्षणक्रमात नैतिक मूल्ये !
Member for 6 years 8 months तन्मय कानिटकर यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी (LLB) आणि कम्युनिकेशन स्टडीज या विषयांत पदव्युत्तर (MSc) शिक्षण पूर्ण केले आहे. ते सुशासनासाठी कार्यरत असणाऱ्या परिवर्तन संस्थेचे संस्थापक विश्वस्त आहेत. ते पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशन या पुण्यातील थिंक टँकचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी उत्तराखंड, पश्चिम महाराष्ट्र येथे पूरग्रस्त भागात जाऊन मदतकार्य केले. त्यांनी ग्रीनअर्थ सोशल डेव्हलपमेंट कन्सल्टन्सी येथे ‘शासनव्यवस्था’ या विषयातील तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले आहे. त्यांनी सकाळ, लोकमत, महाराष्ट्र टाईम्स यासारखी दैनिके; लोकप्रभा, विवेक, माहेर, प्रपंच आणि ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन (ORF) सारख्या ऑनलाईन पोर्टल्सवर सामाजिक-राजकीय विषयांवर विपुल लेखन केले आहे. त्यांचा कथासंग्रह आणि लग्न-नातेसंबंध विषयावरील लेखसंग्रह अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच, त्यांनी लिहिलेली एक वेबसिरीज प्रदर्शित झाली असून, एक राजकीय कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. त्यांच्या व्यक्तिगत ब्लॉगवर दोन लाखपेक्षा अधिक वाचक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here