भाद्रपदात सर्वत्र जो होतो त्याला गणेश उत्सव म्हणायचे काय? प्रश्न खराच महत्त्वाचा आहे, पण त्याचे उत्तर मिळणे कठीण आहे. गणेश उत्सवाच्या दरम्यान जे काही बघण्यास मिळते; मग उत्सव घरगुती असो किंवा सार्वजनिक, तेव्हा खरेच असे वाटू लागते, की याला गणेश उत्सव म्हणायचे का?
गणेश उत्सवाला सुरुवात केव्हा आणि कशी झाली त्याला काही इतिहास नाही; पण त्या उत्सवाला सार्वजनिक रूप छत्रपती शिवाजीराजे यांनी पुणे येथे दिले. त्यांच्या काळात, 1630 ते 1680 पर्यंत उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरा केला गेला. त्या मागील त्यांचा उद्देश स्वराज्य संस्कृती लोकांना कळावी व त्यांच्यात देशभक्ती जागवावी हा होता. पेशव्यांनी शिवाजीराजांच्या पश्चात बंद पडलेली सार्वजनिक गणेशपूजा 1718 पासून पुन्हा सुरू केली. ती प्रथा 1818 पर्यंत कायम राखली गेली. पण सार्वजनिक गणपती पूजा पेशव्यांच्या पतनानंतर 1818 ते 1892 मध्ये बंद झाली. त्या काळात ती पूजा घरोघरी सुरू झाली. दहाव्या दिवशी गणेशाची उत्तरपूजा झाल्यानंतर गणेश मूर्तीचे त्या काळात काय करत असत त्याचा काही उल्लेख नाही.
भाऊसाहेब जावळे यांनी पेशव्यांच्या नंतर, 1892 मध्ये पुन्हा सार्वजनिक गणेश पूजेची सुरूवात केली. ती कल्पना टिळक यांना आवडली. त्यांनी दैनिक ‘केसरी’मध्ये तशी तारीफपण केली. नंतर टिळक यांच्या प्रयत्नांनी सार्वजनिक गणेश पूजा सुरू झाली. उद्देश हाच, की सर्व जातींच्या लोकांना एकत्र आणून, सामाजिक विषमता दूर करून, त्यांच्यात देशभक्ती जागवून, ती सगळी शक्ती ब्रिटिश सरकारच्या विरूद्ध वापरली जावी आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यावे! देश 1947 साली स्वतंत्र झाल्यावर गणेश उत्सव तर राष्ट्रीय सणासारखा साजरा होऊ लागला.
टिळक यांनी सार्वजनिक रीतीने पेंडॉल टाकून मोठी गणेशमूर्ती बसवण्यास 1893 पासून सुरुवात केली आणि टिळक यांनीच अनंत चतुर्दशीला उत्तरपूजेनंतर गणपतीचे विसर्जन नदी, तलाव किंवा समुद्र येथे करावे ही प्रथापण सुरू केली. त्याला धर्माचा आधार नाही. पण सार्वजनिक गणपती मोठेच असायला हवेत आणि त्यांचे विसर्जन नदी, तलाव किंवा समुद्र येथेच झाले पाहिजे ही कल्पना लोकांच्या मनात, ते धर्माचे काम म्हणून घर करून पक्की बसली आहे. गणेश विसर्जनाचा इतिहास जवळ जवळ सव्वाशे वर्षांचा, पण त्या कल्पनेला आधार काही नाही. शास्त्रात तसा उल्लेख नाही. आरंभी, गणपतीच्या मूर्ती तलावाच्या किंवा नदीकाठच्या मातीने बनायच्या, तलाव–नदी गावाजवळ असायचे आणि उत्तरपूजेनंतर तेच गणपती तलावात किंवा नदीत शिरवायचे; म्हणजे ती माती पुनःपुन्हा वापरता येते किंवा येऊ शकते हा त्यामागील साधा तर्क!
गणपती उत्सव आता खूप ‘मोठा’ झाला आहे. तो भारतात इतर काही राज्येपण साजरा करू लागली आहेत. महाराष्ट्रात सार्वजनिक मंडळे भरपूर झाली; घरगुती गणपतींमध्येपण प्रचंड वाढ झाली आहे. मूर्तींची संख्या वाढली, मातीच्या मूर्ती इतक्या तयार करणे हे कठीण काम आणि मातीच्या मूर्ती पण महाग. मग मातीच्या मूर्तींची जागा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनी घेतली. प्लास्टर ऑफ पॅरिस हे मानवनिर्मित मटेरिअल, त्याच्या मूर्ती तयार करण्यास सोप्या, हलक्या आणि मातीच्या मूर्तींपेक्षा स्वस्त. प्लास्टर ऑफ पॅरिस हे मटेरिअल नॉन बायोडिग्रेडिबल आणि पाण्यात न विरघळणारे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती, म्हणजे तेथूनच पर्यावरणाला धोका सुरू झाला.
गणेश ही बुद्धीची देवता. गणरायाची पूजाअर्चना दहा दिवस करून गणरायाला निरोप देण्याची वेळ येऊन ठेपते. मंडळाचे गणपती म्हणजे मोठेच, म्हणून मग शामियाने, रोषणाई, मोठाले आवाज, डी.जे.वरील गाणी… या सगळ्यांची उधळण असते. तितकेच नव्हे, तर पौराणिक, ऐतिहासिक देखाव्यांच्या परंपरागत जोडीनेच नागरिकांचे लक्ष ग्लोबल वॉर्मिंग, पाणीप्रदूषण, वायुप्रदूषण, जंगलकटाई अशा विषयांवरील देखाव्यांना स्थान देऊन बदलत्या काळातील आव्हानांकडे वेधण्याचा प्रयत्नसुद्धा केला जातो. पण दहा दिवसांच्या सर्व प्रयत्नांवर एका दिवसात पाणी पडते. विसर्जन मिरवणुकांचे सद्य स्वरूप भीषण आहे. त्या काळात, विशेषत: विसर्जनाच्या दिवशी सर्वच प्रकारच्या प्रदूषणाने कळस गाठलेला असतो. ध्वनिप्रदूषणाची स्थिती तर अतिशय गंभीर बनते. त्याला कोणतेही शहर किंवा कोणताही भाग अपवाद नाही. हृदयाचे ठोके वाढवणारे स्पीकर्स, डॉल्बी, डीजे या सर्व कर्कश्श वातावरणात कानांच्या पडद्यांचे आणि आरोग्याचे काय होते ते वेगळे सांगण्यास नको. रहिवासी क्षेत्रासाठी देण्यात आलेली पंचेचाळीस ते पंचावन्न डेसिबेलची मर्यादा तर कधीच पार झालेली असते. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आवाजाला कोणतीही मर्यादा उरत नाही. मुंबईतील कांदिवली, बोरिवली, घाटकोपरपासून पुणे, कोल्हापूर, सातारा, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, जळगाव, अमरावती अशा सर्वच ठिकाणी आवाजाची पातळी नव्वद डेसिबलपेक्षा वर जाते. काही ठिकाणी तर आवाज शंभर डेसिबलची पातळी ओलांडून अतिकर्कश्श बनतो. त्याची खरी तीव्रता घरातील ज्येष्ठ नागरिक, हृदयविकारासारख्या आजाराने त्रस्त व्यक्ती आणि लहान मुलांवर त्याचा होणारा परिणाम या गोष्टींमधून जाणवते. कर्कश्श ध्वनी प्रदूषणामुळे माणसाच्या स्वास्थ्यावर काय परिणाम होतो याचा विचार होत नाही. सगळे लोक उत्सव साजरा करण्याच्या मूडमध्ये असतात, त्यांचे देणेघेणे बाकीच्या गोष्टींशी नसते. तो त्यांना गणपतीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न असतो.
सगळे सार्वजनिक गणेश किंवा दुर्गा मंडळे कोठल्या न् कोठल्या पुढाऱ्यांचे असतात किंवा पुढारी मंडळांच्या अध्यक्षस्थानी तरी असतात. त्यांना अडवणार तरी कोण? हिंदीत एक म्हण आहे, ‘सैंया भये कोतवाल तो डर काहे का?’
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती, त्यासाठी वापरण्यात येणारे कृत्रिम रंग, सजावटीच्या इतर गोष्टी हे सर्व नद्या, तलाव, समुद्र यांमध्येच विसर्जनाच्या नावाखाली जात असते. परंतु ज्या मूर्तीचे विसर्जन पाण्यात भक्तिभावाने केले जाते त्या पाण्याची अवस्था काय होते ते वेगळे सांगण्यास नको. विसर्जनाच्या आधी आणि विसर्जनाच्या नंतर नद्यांची अवस्था पाहिली आणि पाण्याच्या दर्ज्याबाबतच्या नोंदी तपासल्या तर लोक या नैसर्गिक स्रोतांची अवस्था काय करून ठेवतात याची कल्पना येईल. मनुष्यजात पाण्यासह सर्व नैसर्गिक साधनांच्या कमतरतेच्या संकटाकडे वाटचाल करत असताना हे वागणे समर्थनीय आहे का? नद्यांची गटारे बनलेली असताना लोक अजूनही पूर्वापार चालत आलेल्या गोष्टींना चिकटून राहून आणि तशाच पाण्यात विसर्जन करून गणरायाचे तरी पावित्र्य टिकवतात का? आणि ते सर्व करत असताना त्याला भक्तीचा आणि श्रद्धेचा मुलामा लावणे हा तर सर्वात मोठा दिखाऊपणा! तो नेहमीच लोकांकडून केला जात आहे.
विसर्जनानंतर मूर्तीचे काय होते, याबाबत लोक अनभिज्ञ असतात असे नव्हे. तरीही लोक फक्त ओरड करतात, की अरेरे, काय ही देवाची अवस्था आणि पुन्हा शासनालाच दोषी धरतात! विसर्जित केलेल्या मूर्ती काय अस्ताव्यस्त स्थितीत नदी-समुद्र-तलावात पडलेल्या असतात! त्याला शासन जबाबदार आहे का? गणपती लोकांचे, त्याचे आशीर्वाद लोकांना, तो कल्याण करणार लोकांचे, त्याच्याकडून परिवार सुरक्षित राहवा म्हणून आराधना केली जाते; तर मग गणेश विसर्जनाची जबाबदारी शासनाची, हे कसे? विसर्जनासाठी जागा उपलब्ध करून देणे हे पण म्हणे शासनाचेच काम! ज्यांनी गणपती बसवला असेल त्यानीच ठरवायला हवे, की उत्तरपूजेनंतर मूर्तीचे काय करायचे! तलाव किंवा नद्या ह्या सार्वजनिक संपत्ती आहेत. लोकोत्सवांमुळे ती दूषित होऊ नये याची काळजीपण त्यांनीच घेणे आवश्यक आहे. अस्ताव्यस्त पडणाऱ्या आणि नद्यांच्या पात्रांमध्ये कशाही अडकलेल्या मूर्ती पाहिल्या, की लोकांची खरी श्रद्धा उघड होते. तलावे आणि नद्या उपलब्ध करून देणे हे शासनाचे काम आहे का? नक्कीच नाही. लोकांच्या भावना दुखावण्याचा तेथे प्रश्नच उद्भभवत नाही, कारण ती रुढी आहे, परंपरा नव्हे. त्यास शास्त्राचा आधार नाही. परिस्थिती बदललेली असताना व मानवनिर्मित वस्तू सामावून घेण्याची क्षमता निसर्गाची राहिलेली नसताना उगाचच जुन्या रुढींना चिकटून राहणे, हे जिच्यासाठी लोक अट्टहास करतात त्या बुद्धीच्या देवतेला तरी पटत असेल का?
गणेश उत्सव बाजारीकरणाखाली दडपून गेला आहे! आणि दिखाऊपणा हाच खरा उत्सव असल्याचा समज करून दिला जात आहे. लोक उत्सवकाळात आरोग्य, स्वास्थ्य आणि पर्यावरण यांची काळजी घेणार नसतील किंवा त्याचे नुकसानच करणार असतील तर तो ‘जनांचा उत्सव’ कसा राहील? गणेश मूर्ती दहा दिवस श्रद्धेने पुजायची आणि विसर्जनाच्या दिवशी एका साचलेल्या पाण्याच्या खाणीत ढकलून द्यायची. त्यावेळी मूर्तीची जी काय अवस्था होते, ती उघड्या डोळ्यांनी बघायची; तर त्याला गणेश विसर्जन तरी म्हणायचे का? मूर्तींची ती उघड उघड विटंबनाच होय! नंतर त्या मूर्ती जे.सी.बी.ने उचलून क्रशरमध्ये क्रश केल्या जातात किंवा बुलडोझरने तोडल्या जातात! तो देवाचा अपमानच आहे आणि त्याकरता देव लोकांना माफ करणार नाही.
पी.ओ.पी., प्लास्टिक, पेपर इत्यादी साहित्याने तयार केलेल्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याकारणाने आणि वापरलेले रंग चांगले नसल्यामुळे त्याचा पर्यावरणावर परिणाम विपरीत होतो. पी.ओ.पी.च्या मूर्तींमुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते. रंगरंगोटीकरता वापरण्यात येणाऱ्या रंगात मर्क्युरी, क्रोमियम व लेड असल्या कारणाने नदीचे पाणी दूषित होते व ते पाणी जलचर प्राणी आणि जलवनस्पती यांना मिळते. त्याचा परिणाम त्यांच्यावर विपरीत होऊ शकतो.
काही ठिकाणी इको-फ्रेंडलीच्या नावावर कागदाच्या मूर्ती बनवतात, पण त्यामुळे पाण्यातील प्राणवायू शोषून घेतला जातो आणि मिथेन गॅस तयार होतो. उदाहरण, कोल्हापूरजवळच्या इराणी खाणीचे. त्या खाणीत ट्युलिप माशांची मोठी पैदास होते; पण त्या खाणीत पी.ओ.पी.च्या मूर्तींचा रंग मिसळत गेल्याने खाणीतील पाणी दूषित झाले व हजारो मासे तडफडू लागले, तडफडून मेलेल्या माशांचा थर खाणीवर तरंगू लागला व एके दिवशी, त्या खाणीतील माशांचा वावरच संपून गेला! पुन्हा लोक हेच म्हणणार, की सरकार काय करते? इराणी खाणीसारखी स्थिती गणेश विसर्जनानंतर बऱ्याच ठिकाणी असते.
सण साजरे करताना इतर गोष्टींचे भानपण ठेवणे हे लोकांचे प्रथम कर्तव्य आहे.
• गणेशाच्या मूर्ती मोठ्या न घेता लहान घ्याव्या. मंडळांनी मोठ्या मूर्तींचा अट्टहास करू नये. मूर्ती मोठी म्हणजे आपली श्रद्धा मोठी असे नसते.
• उत्तरपूजेनंतर बाल्कनीत किंवा अंगणात टब किंवा बादली यात मूर्तीचे विसर्जन करावे. मंडळांनीपण तसेच करावे.
• मूर्ती विरघळल्यावर पाणी आणि माती झाडांना घालावे.
• घरोघरी प्रत्येकाने पितळ किंवा पंचधातूंच्या मूर्ती घेऊन पूजा करावी व उत्तरपूजेनंतर तिचे विसर्जन घरीच करून, स्वच्छ कापडात मूर्ती गुंडाळून व नीट बांधून ठेवावी. म्हणजे पुढील वर्षी वापरण्यास सोप्या मिळेल. गणपतीबरोबर गौरी बसवल्या जातात, त्यांचे मुखवटेपण मातीचे किंवा पितळेचे असतात. ते पण पूजेच्या आधी नीट पुसले जातात किंवा रंग खराब झाला असेल तर रंगरंगोटी करून त्यांची पूजा केली जाते. ते पूजा झाल्यावर नीट गुंडाळून ठेवले जातात. गणपतीचे तसेच करावे.
• निर्माल्यही तलावात किंवा नदीत न फेकता, झाडांच्या बुंध्याशी टाकावे; जेणेकरून लोकभावना जपल्या जातील व निर्माल्याचे खत होऊन त्याचा फायदा झाडांना होईल. तलाव किंवा नद्या दूषित होण्यापासून बचावतील.
लोकांची देवावरील वाढलेली श्रद्धा आणि त्या रूपाने हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या भाविकांकरता आयोजित होणारे महाप्रसादाचे वाढते प्रमाण बघता जणू काय त्याच्याशिवाय गणेश उत्सव पूर्णच होऊ शकत नाही! गणेश मंडळे हजारोंच्या संख्येने आहेत, त्यानंतर दुर्गापूजा येते, प्रकटदिन येतात आणि महाप्रसादाचे आयोजन कोठल्या न् कोठल्या कारणाने केले जाते. त्यातील अधिकांश अन्न नासाडीला कारणीभूत ठरते. लोक मुलांमध्ये संस्कार घडवण्याच्या गोष्टी बोलतात, पण त्यांच्यावरील संस्कार धर्माच्या नावावर सहजपणे विसरले जातात. देवाला महाप्रसादाची गरज आहे का? आधीच्या काळी प्रसाद थोडा राहत होता. हा थोडा प्रसाद सगळ्यांना मिळावा म्हणून थोडा थोडाच, न सांडवता सगळ्यांना मिळेल याची खबरदारी घेतली जात असे. जर कोणी पुनःपुन्हा मागितला तर, प्रसाद एकदा आणि थोडाच घ्यावा लागतो अशी समजपण दिली जात असे. पण आजचे चित्र एकदम वेगळे आहे. प्रत्येक महाप्रसादाला पाच ते सात हजारांवर किंवा त्याहून जास्त भाविकांची सोय केलेली असते. चित्र असे आहे की जणू महाप्रसादाशिवाय देव खूशच होत नाही! अशा सर्व गोष्टींमध्ये भक्तिभावनेचा लोप होत असून खोट्या उत्सवाची भावना लोकांच्या मनात घर करून बसत आहे. उत्सवी भावनेमुळे लोकांना सामाजिक उत्तरदायित्वाचा विसर पडला आहे.
जगात तीस टक्के अन्न उपयोगात न आणताच फेकले जाते. नुसते अन्न नाही तर त्या बरोबर ते उत्पन्न करण्याकरता लागणारे सगळे रिसोर्सेस – पाणी, वीज, जमीन, शेतकऱ्यांची मेहनत, वेळ, ट्रान्स्पोर्टकरता लागणारे डिझेल आणि प्रचंड पैसा वाया जातो. पैसा ही माणसाची निर्मिती; त्यावर त्याचा अधिकार आहे. त्यामुळे तो वाया घालवण्याचा अधिकार त्याला आहे, पण माणसाचा अधिकार नैसर्गिक रिसोर्सेसवर नाही. ‘गणेश मंडळे’ या सर्वांचा विचारच करत नाही. त्यांच्या डोळ्यांपुढे एकच उद्देश असतो आणि तो म्हणजे उत्सव साजरा करणे.
महाप्रसादामुळे पर्यावरणाचे व इतर किती नुकसान होते ते बघुया,
• अन्न शिजवण्यास लागणाऱ्या इंधनामुळे उष्णता निर्माण होते आणि ती ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर घालते.
• ग्लोबल वॉर्मिंगमुळे ऋतुचक्र बदलते.
• अन्न पिकवण्यास लागलेली शेतकऱ्याची मेहनत वाया जाते.
• शेतीमाल ट्रान्स्पोर्ट करण्यास लागणारा पैसा वाया जातो.
• ट्रान्स्पोर्ट करण्यास लागणारे डिझेल वाया जाते.
• अन्न पिकवण्यास लागलेली शेतीची जमीन वाया जाते.
• उरलेले अन्न उघड्यावर फेकले जाते, त्यातून मिथेन गॅस निर्माण होतो ( ग्रीन हाउस गॅस). तो कार्बन डाय ऑक्साईड(CO2) पेक्षा छपन्न पटींनी पर्यावरणाला हानिकारक आहे.
• म्हणजे पुन्हा त्या रूपाने ग्लोबल वॉर्मिंगमध्ये भर घातली जाऊन तापमान वाढते.
महाराष्ट्राला आणि देशाला नापिकीला सामोरे मागील दोन-तीन वर्षांमध्ये जावे लागत आहे. त्याचे कारण अवेळी आणि कमी किंवा जास्त पाऊस हे आहे. लोकांना खाण्यास अन्न पुरेसे नाही. परिणामी, सरकारला प्रचंड पैसा खर्च करून बाहेरच्या देशांतून अन्न, तेल आणि इतर खाद्यान्न पदार्थ आयात करावे लागतात आणि महाप्रसादातून ते वाया घालवले जातात! उद्या, इतर देशांमध्येसुद्धा निसर्गाच्या प्रकोपामुळे नापिकी होऊ शकते, तेव्हा माणूस काय करणार? असंतुलित झालेल्या पर्यावरणाचा फटका सगळ्यांनाच बसणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार उत्सव साजरे करणाऱ्यांनी करायला हवा. माणूस देवाची पूजा किंवा महाप्रसादाचे आयोजन देवांना खुश करण्याकरता किंवा त्यांची कृपादृष्टी संपादन करण्याकरता करत असला तरी बिघडलेल्या पर्यावरणाला आटोक्यात आणणे हे त्या देवाच्या हातात राहिले नसून ते मानवाच्याच हातात आहे. भारत नापिकीमुळे म्हणा की अवर्षणामुळे बाहेरच्या देशातून अन्नधान्य आयात करून लोकांची पोटे भरण्याच्या प्रयत्नात असताना, उत्सवाच्या आयोजकांना ह्या गोष्टीची जाणीव नसणे ही शोकांतिकाच होय!
प्रशासन व अनेक स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते गणेशोत्सवी मंडळींसमोर हतबल दिसतात; कोणीच त्यांची विनंती ऐकण्यास तयार नाही. लोक गणेशमूर्ती, निर्माल्य आणि इतर वस्तू सरळ तलावात शिरवतात. मुख्यमंत्री आणि महापौर यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करतात.
विशेष म्हणजे, काही गणेश मंडळांचे कार्यकर्ते त्यापुढे जाऊन इको विझन संस्थांना गतवर्षी विरोध करताना दिसले! त्यांच्या मते, गणपतीच्या मूर्ती व इतर साहित्य तलावात शिरवल्याने तलावांचे प्रदूषण काही टक्क्यांनी वाढते; मुख्य प्रमाणात तलाव दूषित होतो, तो सांडपाणी आणि कारखाने यांच्या दूषित पाण्याने. खरे आहे ते. आनंद आहे, की त्यांना हे कळले, की मूर्ती आणि इतर गोष्टी जलाशयात विसर्जित केल्याने ते दूषित होतात! मग इतके कळल्यावरसुद्धा, जलाशयात मूर्ती विसर्जनाचा हट्ट का? सांडपाणी आणि कारखाने यांच्या दूषित पाण्याने, दूषित झाले असताना, लोक त्यांच्या लाडक्या देवाला तशा पाण्यात का शिरवतात? सांडपाणी म्हणजे रोजच्या वापरातील नाल्यांद्वारे बाहेर पडणारे पाणी. मग अशा पाण्यामध्ये लोक घरातील गणपती विसर्जित का करतात? पाण्याची शुद्धता बघणे हे लोकांचे कर्तव्य नव्हे काय?
पूर्वी कोणत्या मंडळाचा देखावा सुंदर आहे, सरस आहे म्हणून होड लागायची. पण आता कोणाचा डी जे किती दमदार आहे यावर जोर असतो. मग काय पैशांची उधळण. नव्या हिंदी-मराठी सिनेमांतील आयटम साँगवर मद्यधुंद होऊन नाचणाऱ्या तरुण-तरुणींना आवर कसा घालणार हा प्रश्न निर्माण होतो. तेथे कोठे देवाचे पावित्र्य राहते? बुद्धीच्या देवतेचा उत्सव साजरा करताना आपण किती निर्बुद्ध होतो, त्याचेच हे उदाहरण. येथे एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो, की
पप्पी दे पप्पी दे पारुला… आवाज वाढव DJ तुला आईची… चिमणी उडाली भुर्रर्र… पोरी जरा जपून दांडा धर… झिंग झिंग झिंगाट… शांताबाई शांताबाई… अशी गाणी कधी मशिदींच्या भोंग्यांवर, ख्रिस्ती, जैन, बौद्ध, सीख, पारशी यांच्या धार्मिक स्थळांवर अथवा उत्सवांमध्ये वाजवलेली ऐकली आहेत का कधी? तेही सिनेमे बघतात ना? पण स्वतःच्या धार्मिक कार्यक्रमांत, मिरवणुकींत असली फालतुगिरी नाही करत ते. मग गणेश प्रेमीच का बेभान होतात?
बघा, लोकांना त्यांचे त्यांना सुधारता येते का? उलट, कोर्टाकडून आदेश मिळवल्यावर बोंबाबोंब करतात, की सगळे नियम हिंदूंनाच का? स्वतः असली फालतुगिरी करू नका व तुमच्या समोर होत असल्यास तिचा तत्काळ विरोध करा. माणसाने धर्माभिमानी असावे, धर्मांध नव्हे! कोर्टाचे आदेश पाळणे व ते जनतेकडून पाळून घेणे हे शासनाचे काम. मात्र शासन कोर्टाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत कोठेतरी कमी पडताना दिसते. पोलिसांनी काही गणेश मंडळांवर गतवर्षी (2017 साली) गुन्हे दाखल केले. तशा गणेश मंडळांना 2018 साली परवाना दिलाच नाही, तर बाकीच्या मंडळांनाही वचक बसेल.
गणेश उत्सवात पर्यावरणाचा ऱ्हासच होतो, त्याकरता शासनाने कडक कायदे करणे आवश्यक आहे. ज्या लोकांचा उत्सवाशी संबंध नसतो त्यांनापण त्याचे परिणाम भोगावे लागतात. गोवा शासनाने पी.ओ.पी.च्या मूर्तींवर बंदी आणली असून लोकांना मातीच्याच मूर्ती घेणे बंधनकारक केले आहे. तेलंगणा पोल्युशन कंट्रोल बोर्डाचेपण मातीच्याच मूर्ती तयार करण्यासाठी आवाहन आहे. महाराष्ट्र शासनानेसुद्धा पर्यावरण रक्षणार्थ कडक कायदे करून पी.ओ.पी.च्या मूर्तींवर बंदी आणावी आणि मूर्तींचे विसर्जन कोठल्याही जलस्रोतात होणार नाही याची दक्षता घ्यावी किंवा त्यावर सरळ सरळ बंदी घालावी. आजच्या परिस्थितीत जलस्रोताचे संवर्धन होणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
– विनोद हांडे
vkh0811@gmail.com
आता उत्सवाला बाजारू स्वरूप…
आता उत्सवाला बाजारू स्वरूप आले आहे
Comments are closed.