हळदीचे पेव – जमिनीखालचे कोठार!

4
110
हळदीच्या पेवात गोणींमध्येत भरलेली हळदीची खांडे रिते केले जातात.
हळदीच्या पेवात गोणींमध्येत भरलेली हळदीची खांडे रिते केले जातात.

हळदीच्या पेवात गोणींमध्येत भरलेली हळदीची खांडे रिते केले जातात.हळद ही कीडनाशक म्हणून ओळखली जाते, परंतु खुद्द हळदीचे पीक अत्यंत नाजूक आहे. हळकुंड उघड्यावर ठेवल्‍यास त्‍यास किडीची लागण पहिला पाऊस पडताच होण्‍याची शक्‍यता बरीच असते. हळदीला ओलसरपणा लागला तर ती आतून काळपट-लाल पडते. अशा हळदीला लोखंडी हळद असे म्‍हणतात. त्या हळदीचा दर्जा कमी असतो. त्‍यामुळे पावसाळ्यात हळद साठवण्‍यासाठी जमिनीमध्‍ये कोठार खणण्‍यात येते. त्या कोठारास ‘पेव’ असे म्‍हटले जाते. शेतकर्‍यांचा अनुभव आणि निरीक्षण यांमधून पेवांचे तंत्र शतकापूर्वी विकसित झाले. पेव ही हळकुंड स्‍वरूपातील हळद साठवण्‍याची शेतक-यांची पारंपरिक पद्धत आहे.

हळद साठवण्यासाठी पेवे खोदली जातात. सांगलीतील हरिपूर, सांगलवाडी या परिसरात १९६५ सालापर्यंत सुमारे आठशे पेवे खोदण्यात आली होती. अन्य राज्यांतून हळदीची मोठी आवक १९६५ साली झाल्याने, त्यावेळी आणखी बाराशे नवीन पेवांची निर्मिती करण्यात आली होती. त्या दोन हजार पेवांत दोन लाख पोती हळदीची साठवणूक होई. त्यानंतर पेवांची संख्या व हळद साठवणुकीची क्षमता वाढत गेली. २००४ सालापर्यंत हरिपूरात चाळीस हजार पेवे होती. त्‍यात चाळीस लाख पोती हळद मावत असे.

हळदीचे पेव हरिपूर गावची माती वैशिष्‍ट्यपूर्ण आहे. पेव खोदत असताना तेथील जमिनीत पाचेक फुटांपर्यंत काळ्या मातीचा थर लागतो. त्‍याखाली तांबड्या रंगाची माती लागते. ती माती नदीतील गाळासारखी घट्ट असते. त्‍या मातीला ‘माण माती’ असे म्‍हणतात. पेव माण मातीत खोदले जाते. माण माती केवळ हरिपूर गावात आढळते. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर जाऊन खोदले तरीही ती माती आढळत नाही. पेवाची खरी सुरूवात माण मातीच्‍या स्‍तरापासून होते. तेथे पेवाचे तोंड असते. पेवासाठी जमिनीत वीस ते तीस फुटांपर्यंत खोल व चौदा फूट रुंदीचा लंबगोलाकार आकाराचा खड्डा खोदला जातो. माण मातीचा घट्टपणा एवढा असतो, की त्‍यावर पहार किंवा कुदळ यांनी घाव घातला तरी केवळ टवका उडतो. या मातीच्‍या घट्टपणामुळे पेवात पाणी व हवा यांचा शिरकाव होत नाही. पेवात हळद हवाबंद राहते.

कामगार पेवामध्ये हळद भरत असतानापेव तळाच्‍या भागात रुंद असून तोंडाकडील बाजूस निमुळते होत गेलेले असते. पेवाचे तोंड साधारणतः दीड ते तीन फूट व्‍यासाचे असते. त्याचा आकार प्रयोगशाळेतील चंबूसारखा असतो. पेवाची आतील बाजू शेणामातीने सारवून घेतली जाते. त्‍यानंतर ते उन्‍हात सुकवले जाते. पेवात हळद भरण्‍यापूर्वी आतून ऊसाचा पाला आणि गवताच्‍या पेंड्यांचे थर लावले जातात. त्याला कट्टा बोरी लावणे असे म्हणतात. तसेच तळाला शेणाच्या सुक्‍या गोवर्‍या टाकल्‍या जातात. त्यामुळे पेवाच्‍या आतील हवामान उबदार राहण्‍यास मदत होते. त्‍यानंतर पेवात सुटी हळकुंडे ओतली जातात. पेव हळदीने भरले, की त्यावर पाला व गवताच्या पेंड्या टाकून पेवाचे निमुळते तोंड मातीने लिंपून बंद केले जाते. अथवा त्‍यावर फरशी किंवा एखादे झाकण ठेवले जाते. वरील पाचेक फुटांपर्यंतच्‍या खड्ड्यात पुन्‍हा काळी माती दाबली जाते. पेवाच्‍या तोंडावरील मातीचा हा थर सच्छिद्र असतो. वरून जमिन तापत असल्‍याने पेवात असलेली हवा हळूहळू गरम होते आणि पेवातून बाहेर पडू लागते. अशाप्रकारे बंद केलेल्‍या पेवातील प्राणवायू तीन-चार दिवसांत निघून जातो आणि पेव पूर्णपणे हवाबंद होते. जमिनीखालची गरम हवा बाहेर पडते, मात्र बाहेरची हवा जमिनीखाली जाऊ शकत नाही. प्राणवायू नसल्‍याने पेवाच्‍या आत जीवजंतू तयार होऊ शकत नाहीत. त्‍यामुळे पेवात ठेवलेली हळद पाच ते दहा वर्षांपर्यंत सुरक्षित राहू शकते. इतर ठिकाणी हळद टिकवण्‍यासाठी औषधांचे फवारे मारावे लागतात. मात्र हरिपूरला पेवांच्‍या आतील भागात कडेने कडुलिंबाचा पाला घातला की काम भागते. पेवातला कोरडेपणा आणि मातीची ऊब यामुळे हळदीला रंगगंध चढतो. त्याचा फायदा व्‍यापार्‍यांस होतो.

पेवात हळद भरणारे कामगार मोठ्या आकाराच्या पेवात सव्वादोनशे ते अडीचशे पोती अर्थात दोन-अडीच हजार किलो हळद मावते. तो आकडा पेवांच्‍या आकारानुसार कमी-जास्‍त होतो. हरिपूरमधील सर्वात मोठ्या पेवाची क्षमता चारशे पोत्‍यांची आहे. पेवामध्‍ये हळदीव्‍यतिरिक्‍त गहू, मका, ज्‍वारीसारखी धान्‍येही ठेवली जातात. जमिनीखाली मोठ्या संख्‍येने पेवे असली तरी पृष्‍ठभागावरून अवजड वाहनांची दळणवळण होऊ शकेल एवढा जमिनीचा पृष्‍ठभाग मजबूत असतो. म्‍हणून पेव बंद केल्‍यानंतर त्यावरून ट्रक फिरवला तरी पेवास किंवा आतील हळदीला धोका पोचत नाही.

पेव बंद केल्‍यानंतर पृष्‍ठभागावरील जमीन सपाट दिसते. बाहेरून पाहिले असता त्‍या जमिनीखाली पेव आहे हे कळतदेखील नाही. खुणेसाठी पेवाचे तोंड बंद करताना तेथे मालकाच्‍या नावाची लोखंडी पाटी लावली जाते. पाटीवर पेवाचा क्रमांक, पेवाच्‍या मालकाचे नाव, हळदीच्‍या मालकाचे नाव, हळदीचे प्रमाण, आणि त्‍यावर कर्ज काढलले असल्‍यास बॅंकेचे नाव लिहिलेले असते. बॅंकेचे नाव अशासाठी, की हळदीचे पेव बॅंकेकडे तारण म्‍हणून ठेवले जाऊ शकते. त्‍यामुळे जे पेव तारण म्‍हणून ठेवले आहे, त्‍याच्‍या पाटीवर बॅंकेचे नाव आढळते. पाटीवर लिहिलेली माहिती तीन चिठ्ठ्यांवर लिहिलेली असते. एक चिठ्ठी पेवाचे तोंड बंद करण्‍यापूर्वी झाकणाच्‍या आत ठेवली जाते, दुसरी चिठ्ठी हळदीच्‍या मालकाकडे राहते तर तिसरी चिठ्ठी बॅंकेकडे. पूर्वी शेतक-यांनी पेवांसाठी शेतीच्‍या जमिनी वापरल्‍या असल्‍याचे उल्‍लेख आहेत.

पेवे भाड्यानेही दिली जातात. पेवे भाड्याने देण्‍याचे प्रमाण मोठे आहे. पेवाचे भाडे पोत्‍यामागे तीस ते पनास रूपयांच्‍या दरम्‍यान आकारले जाते. पोत्‍यांचे भाडे हळदीच्‍या त्‍या त्‍या वेळच्‍या बाजार किमतीवर आधारलेले असते. पेवाचे भाडे चैत्र पाडवा ते चैत्र पाडवा असे वर्षाचे धरले जाते.

पेवातून हळद काढताना वा भरताना प्रथम एक-दोन दिवस पेवाचे तोंड उघडून ठेवले जाते. त्यामुळे आत साठलेली हळदीची दूषित हवा निघून जाते. प्राणवायूची कमतरता असलेल्‍या तेथील हवेमुळे माणूस गुदमरून मरण पावण्‍याची शक्‍यता असते. पेवातील दूषित हवा गेली आहे की नाही हे पाहण्यासाठी पेवात कंदील सोडला जातो. कंदील पेटता राहिला तर हमाल खाली उतरतो. मग हळद ओतली जाते. चारी बाजूंनी ऊसाचा पाला लावत पेव भरले जाते. एक पेव भरण्यास दोन हमालांना पाच-सहा तास लागतात. त्या उलट पेवातून हळद काढताना चेळे (छोटे पोते) भरून वर काढले जाते. त्यामुळे पेवातून हळद काढण्यास दोन-तीन तास लागतात. पेवात पूर्णपणे अंधार असल्‍याने कंदील लावूनच पेवातील काम करावे लागते.

हरिपूरमध्‍ये मोकळे प्‍लॉट दिसतात, परंतु तेथे केवळ पेवे खोदलेली असतात. हरिपूर-सांगली भागात शेतात, अंगणात हजारो पेवे आढळून येत असत. हरिपुरात सध्‍या नवीन पेव खोदण्‍यास जागा राहिलेली नाही. एकेका व्‍यक्‍तीच्‍या मालकीची हळदीची पन्‍नास-पंच्‍याहत्तर पेवे असतात. हळदीची गरज लागल्‍यावर पेव फोडले जाते. मग त्यातून पिवळाधम्मक रंग असलेली, घमघमाट सुटणारी हळकुंडे बाहेर पडतात. त्यावरूनच मराठीत ‘पेव फुटणे’ हा वाक्प्रचार आला.

हरिपूर गावात अडीच हजारांच्या- संख्येने पेव आढळतात. छायाचित्रात थोड्या अंतरावर असलेल्या दुस-या पेवात हळद भरली जात आहे कृष्णा नदीला २००५ साली आलेल्या महापुरामध्ये सांगलीच्या हळद बाजारपेठेचे आणि विशेषतः पेवांचे अतोनात नुकसान झाले. पेवांमध्‍ये पाणी जात नाही, मात्र त्या पुरामुळे पेवांच्‍या तोंडातून पाणी आत गेले आणि पेवे आतून ढासळली. हजारो पेवे कायमची खराब झाली. त्‍या पेवांच्‍या मालकांनी ती पेवे बुजवून, जमिनी सपाट करून कसायला घेतल्‍या. २००५च्‍या पुरापूर्वी हरिपूरात असलेल्या चाळीस हजार पेवांपैकी केवळ अडीच हजार पेवे शिल्‍लक राहिली आहेत. त्‍या महापुरात तब्बल दहा कोटी रुपयांची हळद पाण्याखाली गेली. त्‍या वेळी पेवांच्‍या स्‍वरूपातील हळद साठवण्‍याची शेतकर्‍यांची पारंपरिक व्‍यवस्‍था मोडकळीस आल्‍यासारखी झाली होती, कारण पुरानंतर व्‍यापारीही धास्‍तावले. त्‍यांनी आधुनिक तंत्रांचा वापर करून हळद साठवण्‍याचा प्रयत्‍न काही काळ केला. त्‍यामुळे पुरानंतर पेवांचा वापर कमी झाला होता. मात्र हळद साठवण्‍याच्‍या नवीन तंत्राला मेण्टेनन्‍स भरावा लागतो. तसेच हळदीवर औषध फवारणीचा खर्च होतो. त्‍या मानाने पेव बरेच स्‍वस्‍त आणि सुरक्षित वाटते. त्‍यामुळे पुन्‍हा पेवांचा वापर वाढत आहे. २०११ साली हळदीचा दर एकवीस हजार रूपये क्विंटलपर्यंत गेला. त्‍यामुळे २०१२ साली हळदीची लागवड वाढल्‍याचे निदर्शनास आले. त्‍या वर्षी पेवांचे भाडे वाढल्‍याले तरीही शेतकरी पेवांना पसंती देताना दिसले. २०१२च्‍या जून महिन्‍यापर्यंत हरिपूरातील अनेक पेवे फुल्‍ल झाली होती.

व्‍यापारी हळद विकत घेतात आणि पेवांमधून साठवतात. सीझनमध्‍ये भाव चढला, की त्‍याची विक्री करतात. विक्रीसाठी सगळी हळद बाहेर काढावीच लागते असे नाही. पेवातून हळदीचे किलोभर सॅंपल काढून ते बाजारात नेले जाते. त्‍या आधारे बाजारात हळदीचा लिलाव केला जातो. व्‍यापारी बाजारात हळदीचे व्‍यवहार करतात. पैशांची देवाणघेवाण होते. इकडे पेवांवर लागलेल्‍या केवळ चिठ्ठ्या बदलत राहतात. हळद पेवातच राहते! सोलापूर जिल्‍ह्यातील दारफळ या गावी ‘धान्‍याची बँक’ या नावाने धान्‍याच्‍या साठवणासाठी पेवांची व्‍यवस्‍था आढळते.

माहिती संकलन साह्य – अशोकराव मोहिते आणि अशोक मेहता
छायाचित्रे – अशोक मेहता आणि विकास सूर्यवंशी

– किरण क्षीरसागर

Last Updated On – 16th May 2016

About Post Author

Previous articleअभाव व्यंगचित्रांच्या साक्षरतेचा
Next articleचित्रकलेचे बाजारीकरण
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767

4 COMMENTS

  1. माझ्या आजोळी आईच्यामाहेरी
    माझ्या आजोळी आईच्या माहेरी, मध्यप्रदेशात मी धान्याचे पेव पाहिलेले. वाड्याच्या अंगणात खुप मोठ्ठे धान्याचे पेव होते. आजही आहे .त्याच्यातुन धान्ये पोती काढताना मी पाहीलेले. जुन्या पध्दती पांरपारीक किती शास्त्रीय होत्या न…

Comments are closed.