हरीश सदानीच्या कामाची एका वाक्यात नोंद करायची तर त्याने स्त्रियांच्या चळवळीला व्यापक विचार करण्यास भाग पाडले, स्त्री-संघटनांनी पुरुषांची मानसिकता बदलण्यासाठी काम करण्याची, पुरुषांबरोबर संवाद करण्याची गरज आहे हे ठसवले.
हरीशलाही ते काम सोपे नव्हते. त्याने स्वत:च्या घरातसुद्धा जेव्हा जेव्हा स्त्रियांची बाजू घेण्याचा, त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा ‘बायल्या’सारख्या विशेषणांनी त्याची संभावना झाली होती. पुढे व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता झाल्यावर, त्याने आपले मुद्दे पुढे रेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पुरुषांबरोबर वेगळे काम करण्याची गरज काय, असा प्रश्न त्याला स्त्री-संघटनांकडूनदेखील विचारला गेला.
“
स्त्रियांवर होणार्याय अत्याचाराच्या विरुद्ध आवाज उठवावा, असे ज्या पुरुषांना वाटते त्यांनी पुढे यावे, या हरीशच्या वर्तमानपत्रातल्या आवाहनाने त्याला पुढची वाट सापडली. प्रतिसाद देणा-या दोनशेपाच पुरुषांपैकी हरीशसह नव्वद मुंबईतील होते. त्यातील एका गटाने ‘मावा’ला आकार दिला. चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ आणि राजीव कालेलकर यांनी ‘मावा’ची वैचारिक बैठक पक्की करण्यास मदत केली.
पुरुषांच्या परंपरागत भूमिकेशी विद्रोह करत स्त्री-पुरुष समानतेची चळवळ सुरू करण्याचे आणि ती रुजवण्याचे काम करणारे काही पुरुष महाराष्ट्रात आणि बंगालात झाले. महात्मा फुले हे त्यांतील पहिले नाव. ज्योतीरावांनी समानतेच्या मूल्यावर आधारलेली आख्खी संस्कृतीच महाराष्ट्राला व पर्यायाने भारताला देऊ केली. आपल्याकडे १९७५ नंतर जोर धरला तो पाश्चिमात्य स्त्री-वादाच्या प्रभावाने स्त्रियांच्या चळवळींनी. स्त्री- चळवळींमध्ये समानतेचे मूल्य मानणाऱ्या काही सुजाण पुरुषांचा सक्रिय सहभाग राहिला. तरीही स्त्रियांचे प्रश्न मांडले जात होते, मुख्यत: स्त्रियांकडून. त्यामुळे प्रश्नांची आणि उत्तरांचीही मांडणी स्त्रीसापेक्ष होत राहिली. ‘स्त्रीवादा’चा म्हणून एक चष्मा हळुहळू तयार होत गेला. ते स्त्री चळवळीसाठी घातक होते. सर्वसामान्य पुरुषवर्ग स्त्री-चळवळीपासून अंतर राखून होता. हरीशला काम करण्यासाठी तेथे स्वत:ची जागा सापडली. तो काळ १९९० नंतरचा.
समानतेसाठीच्या चळवळीत नवे पुरुष, विशेषत: तरुण मुलगे जोडले जावेत यासाठी पुरुषांची फौज वाढवण्याकरता पुरुषांना निराळा अवकाश (स्पेस) मिळावा यासाठी प्रयत्न करणे. ‘मावा’ने समानतेच्या चळवळीची ‘मालकी’ ही पुरुषांनी घ्यावी आणि सुजाण माणूस होण्याच्या दिशेने मार्गक्रमण सुरू करावे यासाठी अनेक उपक्रम केले आहेत.
युवा मैत्री हा अलिकडचा वैशिष्टयपूर्ण उपक्रम. महाराष्ट्रातील शंभर तरुण मुलांना माणुसकीची वाट दाखवणारा!
‘युवा मैत्री’मधील शंभरातील एक गणेश फुले. महात्मा फुले यांच्या खानवली गावचाच, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. तो सांगतो, ‘आम्हाला दोन्ही बाजूंनी प्रश्न पडतात. आम्हा मुलांना पुरुषांसाठीच्या नियमांचाही त्रास होतो. आम्हीच केस बारीक का ठेवायचे? वाढवायचे का नाहीत? आणि घरात माझ्या बहिणींसाठी संध्याकाळच्या आत घरी परतण्याचा दंडक का? मुलींनी शर्ट-पँट घालणे आणि मुलग्यांनी कानांतील घालणे हे वरवरचे झाले. स्त्रिया आणि पुरुष, दोघांनीही घरात बाहेर जोडीने विश्वास आणि आदर ठेवून काम करणे व्हायला हवे. सर्व क्षेत्रांत मुली मोठ्या संख्येने चमकत आहेत, मेरिटमध्ये येत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर मुलांना अस्वस्थ, असुरक्षित वाटते. याचा अर्थ स्त्रियांनी मागे राहावे असे मुलांना वाटते का? तर तसेही नाही. पण स्त्रियांच्या पुढे येण्याने त्यांच्यात न्यूनगंडही तयार होऊ नये. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांचे स्पर्धक नसून ते जोडीदार आहेत याचे नीट भान त्या दोघांनाही येणे गरजेचे आहे. ‘मावा’ हे काम करू शकते, असा विश्वास गणेशसारख्या तरुणांना वाटणे हेच हरीश सदानी यांच्या कामाचे यश आहे.
संस्थेने चौदा वर्षावरील तरुणांसाठी युवा मैत्री हेल्पलाईन सुरू केली आहे. त्या वयात भेडसावणा-या लैंगिक समस्यांबाबत, प्रश्नांबाबत ‘बिनधास्त बोला आणि मोकळे व्हा’ अशी या हेल्पलाईनमागची कल्पना आहे. संस्थेचे प्रशिक्षित कार्यकर्ते तरुण आणि तरुणी यांचे विवाहपूर्व समुपदेशन करतात. संस्थेतर्फे मुलींसाठी स्वसंरक्षणाचे धडे देणा-या शिबिरांचे आयोजनही केले जाते. ‘मावा’ आणि ‘पुरुष उवाच’ या संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून ‘पुरुषस्पंदनं – माणूसपणाच्या वाटेवरची’ हे नियतकालिक प्रकाशित केले जाते.
अर्धे आकाश स्त्रियांचे असले तरी जगाचे नागरिक होऊ पाहणा-या स्त्री-पुरुष, दोघांनाही जोडीने भरा-या घेण्यासाठी पूर्ण आकाश मोकळे आहे. त्यांना त्या भरा-या घेण्यासाठी भान आणि बळ देण्याचा हरीश सदानी यांचा प्रयत्न आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ‘सावित्रींच्या लेकीं’प्रमाणेच ‘ज्योतिबांची लेकरे’ही निर्माण व्हावीत या भावनेतून त्याचे कार्य सुरू आहे.
मेधा कुळकर्णी
इमेल kulmedha@gmail.com
MAVA’s Counseling, Guidance and Resource Centre
रुम क्रं. ४, तळमजला, नित्यानंद म्युन्सिपलस्कूल,
गरवारे कंपनीसमोर, सहार रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०६९
(युवा मैत्री हेल्पलाईन – ०२२- २६८२६०६२)
हरीश सदानी
मोबाईल ९८७०३०७७४८
इमेल harsh267@rediffmail.com
www.mavaindia.org
(दै. सकाळ ९ जून २०१० अंकातील लेख संपादीत आणि सुधारीत स्वरूपात )
Last Updated On – 3rd May 2016
ग्रेट ! हरीशभाऊ
ग्रेट ! हरीशभाऊ
excellent job
excellent job
Well Done Sir,,,,,Great Job,,
Well Done Sir,,,,,Great Job,,,
Really Great …. NO words…
Really Great …. NO words…….
Well done.
Well done.
हरिशसर
खूपच छान उपक्रम
हरिशसर
खूपच छान उपक्रम
Comments are closed.