काळेबाईंची पदवी बी.कॉम. आणि त्यानंतर बीएड. कॉमर्समधील शिक्षण असूनही शिक्षिका होणा-या शाळेत त्या एकमेव. इंग्रजी हा त्यांचा आवडता विषय. त्या नोकरी करता करता स्वामी विवेकानंद शाळेच्या मुख्याध्यापक झाल्या.
“१९८३ चा सुमार असेल तो. माझी सुरुवात शाळेतली नाटकं बसवून झाली होती. पण मुलांसाठी त्यांचं स्वतःचं असं व्यासपीठ उपलब्ध करावं, असं आमच्या सरांनी, पांडुरंग घांग्रेकर यांनी सांगितलं. आणि मग काय, बालनाट्य चळवळीला सुरुवात झाली. त्यात मला कै.सुधाताई साठे आणि कै. मेहेंदळे ह्यांची मदत झाली.”
अनुभव हेच काळेबाईंचे नाट्यशिक्षण ठरले. कारण शाळा, घरचे करता करता नाट्यप्रशिक्षणासाठी त्यांना म्हणावा तसा वेळ मिळाला नाही. पण त्या म्हणाल्या, की “कॉलेजमध्ये असताना नाटकात कामं केलेली असल्याने नाटकाचा पाया भक्कम आहे. त्यातून स्पर्धेतली वेगवेगळी नाटकं बघून स्वतःमधलं दिग्दर्शनाचं कौशल्य वाढवलं ”.
काळेबाई त्यांचा प्रवास भरभरून उलगडत होत्या. बाई ऑगस्ट २०१३मध्ये शाळेतून निवृत्त झाल्या. त्या निवृत्त झाल्यानंतर नवीन उत्साह घेऊन पुन्हा एकदा कामाला लागल्या आहेत.
त्या मुलांसाठी वाजवी दरात शिबिरे आणि स्पर्धा घेतात. कुठल्याही मुलाला किंवा शाळेला शिबिरात, स्पर्धेत सहभागी होता आले पाहिजे हे बाईंचे मत. त्यामुळे शिबिराच्या शुल्काने अजून हजार रुपयेदेखील पार केलेले नाहीत. उन्हाळी शिबिराला असलेली संख्या दीडशेच्या घरात असते. तोच प्रकार स्पर्धेच्याही बाबतीत. दोन वयोगटांत बालनाट्य स्पर्धा घेतली जाते. पहिली ते चौथी आणि पाचवी ते दहावी. स्पर्धा डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होते. पनवेल, वसई, विरार, दादर, ठाणे, मुलुंड अशा ठिकठिकाणांहून शाळा त्यांनी योजलेल्या स्पर्धेत भाग घेतात. अवघे शे-दोनशे रुपये शाळांकडून प्रवेश शुल्क स्वीकारले जाते. ती डोंबिवलीतील मानाची बालनाट्य स्पर्धा समजली जाते. त्यामुळे अख्ख्या डोंबिवलीतील शाळा स्पर्धांमध्ये सहभाग घेतात. स्पर्धेत भले पहिले-दुसरे क्रमांक काढले जात असले तरी सहभागी होणा-या प्रत्येक शाळेला उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह दिले जाते. शिबिरात एकेकाळी हजेरी लावलेली आणि काळेबाईंच्या हाताखाली अभिनयाचे व अभ्यासाचे धडे गिरवलेली ‘पल्लवी’ म्हणजे ‘ऐश्वर्या नारकर!’, बाईंनी बालनाट्य चळवळीच्या माध्यमातून फक्त कलाकार नाही तर अनेक चांगली व्यक्तिमत्त्वे घडवण्याचे काम केले आहे.
का
बाई निवृत्त मुख्याध्यापक असल्या तरी विद्यार्थ्यांना त्यांची आठवण ‘बाईंनी आमची खूप छान नाटकं बसवली होती’ अशीच येते. बाईंची विद्यार्थ्यांबरोबर, त्यांच्या पालकांबरोबर असलेली नात्यांची घट्ट वीण उसवली गेलेली नाही. ‘नाटकाच्या या कलेनं मला जास्त समृद्ध केलं’ असे त्या म्हणतात. त्यांना ऐश्वर्या नारकरचा एक प्रसंग हमखास आठवतो. त्यांनी शाळेतील मुलांचे ‘हुतात्मा’ हे नाटक बसवले होते. त्यात ऐश्वर्या नारकरची प्रमुख भूमिका होती. नाटकाचा शेवट भावनाशील होता. “ ऐश्वर्या नारकर तो प्रसंग छान करायची आणि त्यावरच आम्ही बाजी मारायचो. ती दुःखाच्या आवेगाने कोसळते आणि रडायला लागते असे ते दृश्य आणि त्यावरच पडदा पडतो. नाटक संपल्यावरही ती रडतच असायची. आणि तिला त्या भूमिकेतुन बाहेर काढण्याची जबाबदारी माझी असायची. नाटक संपले, की मी तिला कुशीत घ्यायला तयारच असायचे. पण तिचे रडणे मला सहन होईना. शेवटी, मी स्वतः ते नाटक बंद केले.” ऐश्वर्या मोठी अभिनेत्री होऊनही बाईंशी नाटकामुळे जुळला गेलेला तिचा जिव्हाळा कमी झालेला नाही. बाईंच्या संस्कारांची, त्यांच्या प्रती असलेल्या ओढीची कल्पना अशी येते.
त्यांच्या बोलण्यात, कामात ऊर्जा दिसत राहते. काळेबाईंच्या कार्याचे तेच गमक असावे. त्यांच्या संस्थेला आणि कामाला धंदेवाईकपणाचा गंध नसल्याने ती मुलांना, पालकांना आपली संस्था वाटते.
त्यांना ‘नाट्यदर्पण’ पुरस्काराने व ‘आदर्श डोंबिवलीकर’ म्हणून गौरवण्यात आले आहे.
मुलांकडून प्रेमळतेने ‘काळेबाई’ अशी मारली जाणारी हाक हेच त्यांच्या कार्याचे खरे गमक आहे असे त्या मानतात.
श्रीकला संस्कार, डोंबिवली
दीपाली काळे
९८७०४०२१९४
मधुरा आपटे
९८२०२२५९५४
madhuraapte92@gmail.com
great devotion.
great devotion.
Comments are closed.