स्थलांतर ऊर्फ घरवापसी! एक टर्निंग पॉइंट (Migration can be a Turning Point)

कोरोना व्हायरसमुळे लोकांची घरवापसी/स्थलांतर मोठ्या प्रमाणावार होत आहे. तो फार मोठा प्रश्न होणार आहे. मी त्या प्रश्नाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. वास्तवात इट्स रिस्टोरेशन इन रिअॅलिटी. मला मराठवाड्याच्या परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांची माहिती आहे. या जिल्ह्यांच्या प्रत्येक गावातून लोक कामासाठी पुण्या-मुंबईकडे गेलेले आहेत. मी पाहतो, की पुण्यातील काही भाग विशिष्ट जिल्ह्यांसाठी राखीव ठरले गेले आहेत- काही जिल्ह्यांच्या छोट्या छोट्या गावांतील प्रत्येकी चारशे-पाचशे तरुण रोजगारानिमित्त पुण्या-मुंबईत आहेत. उदाहरणार्थ, सिंहगड रोड, त्यातही माणिकबाग परिसरात आमच्या परभणी जिल्ह्याचे हजारो लोक सापडतील. कोरोनानंतर हा प्रवास उलट सुरू झाला. परभणी जिल्ह्याच्या पालन तालुक्यातून आठ हजार पाचशे लोक परत आल्याचे तहसीलदार सांगत होत्या. मी त्यांपैकी काही लोकांना भेटलो. ऑटोमोबाईल इंजिनीर झालेला एक तरुण (पुण्याच्या डी वाय पाटील कॉलेजमधून) सांगत होता,त्याचे पुण्यात वाकडला छोटे हॉटेल आहे. तेथे रोज सुमारे पाच हजार रुपयांचा धंदा होतो, त्यात दीडदोन हजारांचा फायदा मिळतो.” दुसरा तरुण पुण्यात गाडी चालवतो. तो सांगत होता, की “त्याच्या स्वतःच्या दोन गाड्या आहेत. महिना साधारण पस्तीस हजार रुपये मिळतात. त्यातून बँकेचा हप्ता जाऊन बारापंधरा हजार रुपये स्वतःच्या खर्चासाठी राहतात“.परत आलेले तरुण पुण्यात असे विविध उद्योगांत, नोकऱ्यांत गुंतलेले आहेत. ते आता कसे जगतात? पैसे कोणाकडेच शिल्लक नाहीत. सध्या ते उसनवारी करून भागवत आहेत. पण त्यांचे असे हे किती दिवस चालेल? अजून त्यांच्या खिशात दहा-पंधरा रुपये असतात आणि घरी, दोनतीनशे रुपये. मग काही इमर्जन्सी ली तर ते काय करणार? त्यांचे उत्तर सरळ असते, गावातील कोणा धनवानाकडून कर्ज घ्यायचे! हे असे किती दिवस चालेल? –पुढे काय होईल? कोणालाच काही माहत नाही. कोणी म्हणतात, पुढे परिस्थिती बिघडेल, आतापेक्षा  खूप वाईट दिवस येतील. कोणी म्हणतात, दोन-चार महिन्यांत सारे पहिल्यासारखे नियमित होईल.
          एकूण अंदाज असा आहे, की पुढील वर्ष-दोन वर्षांत परिस्थिती पूर्वपदावर येईल आणि सारे पहिल्यासारखे होईल असे शक्य नाही. अनेक कंपन्यांनी त्यांचे कामगार कमी करण्याचे सत्र सुरू केले आहे. गावाकडे रेंज नसते म्हणून ऑनलाईन काम करता ये नाही, त्यामुळे कंपनीने पन्नास टक्के पगार गेल्या महिन्यात कापला, असे ए सॉफ्टवेअर इंजिनीयर सांगत होता. मोठमोठ्या कंपन्या तीस ते पस्तीस टक्के कामगार कपात करत आहेत. त्या मोठ्या कंपन्या सध्या घरी बसून पगार देत आहेत, पण तो अजन किती दिवस देतील? फार तर एखादा महिना असे कामगारांच्याच बोलण्यात येते. आणि लहान कंपन्या तर कोणालाही घरी बसून पगार देत नाहीत आणि देणारही नाहीत. म्हणजे नोकऱ्या असणार्‍यांचा हा एखादा महिना बरा जाईल. पण सारी अनिश्चितता आहे. ज्यांना नोकरी नाही त्यांची तर याहून वाईट परिस्थिती आहे. यावर उपाय काय? पुढे कसे जगावे? याचे उत्तर सर्वांनी शोधायला हवे.
         मी गावाकडील तरुणांना, विशेषतः मराठवाड्यातील ड्रायव्हरांना ते भेटले, की त्यांना गावाकडे कसे राहता येईल, याबाबत वेगळा विचार करण्यास पूर्वीपासून सांगायचो. पण मला दाद मिळत नसे. दोन-तीन वर्षांत मला केवळ दोन-तीन जन ‘असा विचार करू’ असे नुसते म्हणणारे तरी भेटले, बाकीच्यांना माझे म्हणणे पटतच नसे. त्यांना शहरातील नोकरी-व्यवसाय याशिवाय दुसरा कोणता विचार सुचतच नसे. उलट, त्यांना वेगळे काही करणे चुकीचे वाटे. भारतात आपली मानसिकता आहे त्या परिस्थितीत अडचणी सहन करत जगायचे अशीच होऊन गेली आहे. ते त्या अडचणींबद्दल तक्रारी मात्र मोठ्या तोंडाने करतील.
          पुण्या-मुंबईत काम करणारे लोक कसे राहतात? काय दर्जाचे जीवन जगतात? याचा विचार त्यांनी कधी केलाच नाही. ते किती दिवस असे कोठेतरी झोपडपट्टीत आणि कसेतरी घाणेरड्या ठिकाणी राहू इच्छितात? एका खोलीत साताठ जणांनी किती वर्षे राहायचे? लग्ने कधी करायची? बायकोला ठेवायला जागा नाही म्हणून लग्न करायचे नाही. बऱ्या वस्तीत खोली घ्यायची तर सात-आठ हजार रुपये भाडे लागते, ते परवडत नाही. मग लग्न करून बायको घरी आईवडिलांकडे आणि नोकरदार पुण्यात राहणार… असे हे किती दिवस चालणार? याचा विचार त्यांनी वेळीच करायला हवा होता. हा वेगळा विचार करणे सोपे नाही, हे मला मान्य आहे. पण आता, कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीत ते शक्य आहे. त्यांनी गावी राहून तेथेच काही उद्योग करावा. गाव सोडून, बाहेर राहून जे जीवन त्यांच्या वाट्याला आले आहे, त्यापेक्षा कितीतरी चांगले जीवन ते गावात राहून, तसाच काही व्यवसाय करून जगू शकतील. कारण त्या साऱ्यांनाच परिस्थितीशी झगडण्याचे माहिती आहे; कष्ट तर ते करतातच. म्हणून ते गावाकडे काहीही करू शकतील. गरज आहे ती वेगळा विचार करण्याची.  गाव, त्यांचा परिसर न सोडता तेथेच काही व्यवसाय करण्याची.
       गावाकडे आलेल्या तरुणांपैकी बरेच जण शहाणे आहेत, थोडेबहुत शिकलेले आहेत. त्यांच्या अंगात धमक आहेच. जर परिस्थिती आलीच आहे तर त्या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वतःचे जीवन सुधारण्याचा हा जुगार त्यांनी निश्चित खेळावा. खेड्यातील जीवनमान, राहणीमान हे फारसे सपोर्टिव नाही. गावात काम करताना लाईट व इंटरनेट उपलब्ध असणे हा मोठा विषय आहे. परंतु, गावात शिकलेले तरुण बहुसंख्येने राहण्यास आले तर जीवनातील आवश्यक त्या अनेक गोष्टींची तेथील मागणी वाढेल. लाईट, पाणी, कनेक्टिव्हिटी इंटरनेटची आणि रस्त्यांची, स्वच्छता इत्यादी सगळ्याच गोष्टींची मागणी वाढेल. राजकारण्यांनाही लोकांची ती गरज कळे. मागणी तीव्र झाली, की पुरवठा सुरू होतो. गावात वेगवेगळे व्यवसाय सुरू होत असतील तर शासनातील अधिकाऱ्यांनाही तेथे पूर्णवेळ वीज पुरवावी लागेल. तेव्हा गावाकडे परत आलेल्या तरुणांनी तिकडेच राहून काही उद्योग करता येईल का असा विचार करावा. पुढे लवकरच सारे व्यवस्थित झाले, तरी तिकडे पुण्या-मुंबईत जाऊन बकाल घाणेरडे आयुष्य पुन्हा का जगावे? एक संधी म्हणून गावोगावी परतलेल्या तरूणांनी आताच्या परिस्थितीकडे पाहवे. म्हणजे परत गावी येऊन तिकडे अडकून पडावे लागले असे त्यांना वाटणार नाही. उलट, त्यांचे आयुष्य चांगले होऊन जाईल.
        आई-बाप आणि त्यांचे नातेवाईक अशा लोकांना सोडून शहरात राहणे किती जणांना मनापासून आवडते?बहुसंख्यांना ते बकाल आयुष्य नाईलाजाने जगावे लागते. ते गावी राहू लागले, की त्यांचे त्यांना नवे मार्ग मिळतील. शेकडो उद्योग सुचतील. शेती हा एक विषय घेतला तरी प्रत्येक जिल्ह्यात काही हजार तरुणांना शेतीशी निगडित व्यवसाय करता येतील. माझे सर्व तरुणांना सांगणे आहे, की तुम्ही तुमच्या गावाचा आणि आसपासच्या गावांचा विचार करावा. शेतीत पिकणाऱ्या कोणत्या मालावर तेथे प्रक्रिया होऊ शकते? तूर, हरभरा, मूग याची डाळ गावात किती लोक करतात? सारे शेतकरी ती कडधान्ये पिकवतात आणि व्यापाऱ्यांना विकतात. तूर 4050 रुपये किलोने विकायची आणि त्याची डाळ 90100 रुपये दराने आपणच विकत घ्यायची. त्यात शेतकऱ्यांची किती लूट होतेत्यापेक्षा डाळ करण्याचे काम गावच्या तरूणांनीच का नाही करायचे? गावची सारी तूर गावातील गावात भरडून तिची डाळ  केली आणि डाळ विकली तर? तुरीची डाळ करण्यासाठी किलोला दोन-तीन रुपयांपेक्षा अधिक खर्च येत नाही. तेव्हा चाळीस रुपयाची तूर व दोन-पाच रुपये खर्च करून, पंचेचाळीस रुपयात डाळ घरच्या घरी तयार होते. तयार झालेली डाळ घाऊक दरानेही सत्तर-पंच्याहत्तर रुपयांना विकली जाते. पुन्हा डाळीचा चूर आणि तुरीचा कोंडा (फोलपट) हे सारे शेतकऱ्यांना उपयोगी आहे, त्याची जनावरांना पेंड होते. ग्लोबल ट्रस्ट नावाचा एक ट्रस्ट चार वर्षापासून शेतकऱ्यांच्या सोबत काम करत आहे. त्यांनी आधी बीड जिल्ह्यात परळीला काही शेतकऱ्यांसोबत काम सुरू केले. त्यांनी शेकडो शेतकऱ्यांना फळबागा लावण्यास शिकवून वर्षाला पाचसहा लाख रुपये दर एकरी मिळवून दिले. आता तो ट्रस्ट परभणी, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यातही काम करू लागला आहे. त्यांना हजारो शेतकरी सामील होत आहेत. शहरातून परत आलेल्यांपैकी ज्यांना शेती असेल त्यांनीही फळबागा करून श्रीमंत होणे, हा एक उत्तम मार्ग आहे. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. असे शेती व शेतीशी संबंधित अनेक व्यवसाय आहेत, जे थोड्याशा भांडवलात व थोड्याशा अकलेने करता येऊ शकतील. पण गावी येऊन उघड्या डोळ्यांनी पाहिले तर! अन्यथा शहरी बकाल जीवन जगण्याचेच या तरूणांनी पुन्हा स्वीकारले तर ते त्यांचे त्यांना लखलाभ.
 सूर्यकांतकुलकर्णी 98220 08300 suryakantkulkarni@gmail.com
सूर्यकांत कुलकर्णी मुलांसोबत पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम गेली चोवीस वर्षें करत आहेत. त्यांनी सामाजिक आर्थिक विकास संस्थेची स्थापना 1976 साली केली. त्या संस्थेद्वारे मुले, महिला,पर्यावरण, स्वच्छता आणि पाणी या विषयांना केंद्रस्थानी ठेवून काम चालते. (पत्ता : स्वप्नभूमी, केरवाडी, तालुका – पालम, जिल्हा परभणी ४३१७२०) त्यांनी स्वप्नभूमीया नावाने अनाथ निराधार मुलांसाठी घर, खेड्यात प्रत्येकाच्या घरी संडास, युनिसेफ, महाराष्ट्र शासन, ग्रामीण विकास विभाग आणि उद्योगपती यांच्या सहकार्यातून परिसरातील खेड्यांतून हजारो संडास, पन्नास गावांतून रात्रीच्या शाळा, बालकामगारांसाठी विशेष कार्यशाळा, मराठवाडा इको ग्रूप, पिण्याचा पाणी-प्रश्न सोडवण्याचे चाळीस गावांतून पथदर्शी प्रकल्प असे अनेक उपक्रम केले आहेत. ते सर्वांत आधी शिक्षणया फोरमच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी शंभर संस्थांना सोबत घेऊन युनिसेफ, सेव्ह दि चिल्ड्रेन, क्राय यांच्या सहभागाने 2002 साली बाल हक्क अभियान या फोरमची स्थापना केली. कुलकर्णी यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध समित्यांवर तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले आहे. कुलकर्णी यांना फाय फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे.
[youtube=https://www.youtube.com/watch?v=wOfduSF0bjU&w=320&h=266]

———————————————————————————————————————————

About Post Author

Previous articleदुबईतील ईद झाली व्हर्च्युअल (Dubai, EId Goes Virtual)
Next articleबडोद्यातील विनाशकारी प्लेग, 1896 (KILLER PLAGUE 1896 IN VADODARA)
सूर्यकांत कुलकर्णी मुलांसोबत पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम गेली चाळीस वर्षे करत आहेत. त्यांनी ‘सामाजिक आर्थिक विकास संस्थे‘ची स्थापना 1976 साली केली. त्या संस्थेद्वारे मुले, महिला, पर्यावरण, स्वच्छता आणि पाणी या विषयांना केंद्रस्थानी ठेवून काम चालते. ते ‘सर्वांत आधी शिक्षण’ या फोरमच्या संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी शंभर संस्थांना सोबत घेऊन युनिसेफ, सेव्ह दि चिल्ड्रेन, क्राय यांच्या सहभागाने ‘बाल हक्क अभियान’ या फोरमची स्थापना 2002 साली केली. कुलकर्णी यांनी राज्य व केंद्र शासन यांच्या विविध समित्यांवर तज्ज्ञ सल्लागार म्हणून काम केले आहे. कुलकर्णी यांना ‘फाय फाउंडेशन’चा पुरस्कार मिळाला आहे. Member for 6 years 5 months लेखकाचा दूरध्वनी - 9822008300

1 COMMENT

  1. लेखातील विचार पुढच्या पिढीने वाचले पाहिजेत.लेख विचार करण्यासारखा आहे.याला अनेक सामजिक आर्थिक बाजू आहेत.अनेक कंगोरे आहेत या विषयाला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here