सोलापूरचे पक्षिवैभव

14
125
carasole

सोलापूर जिल्ह्यातील बराच भूभाग ओसाड व माळरानी आहे. शिवाय नद्या व ओढे तसेच तळी मुबलक आहेत. जिल्ह्यात सुमारे शंभरएक किलोमीटरपेक्षा अधिक लांब वाहणारी भीमा, सीना, माण व बोरी या प्रमुख नद्यांसह अनेक उपनद्यांचे काठ स्थलांतरित पक्ष्यांना हिवाळ्यात आकर्षित करत असतात. लहानमोठे ओढेही विपुल प्रमाणात जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. जिल्ह्यातील एकूण सहा मध्यम जलप्रकल्प व एकावन्न लघुजलप्रकल्पांतील पाणस्थळे स्थलांतरित पक्ष्यांना नंदनवन ठरले आहेत. अपूर्व भौगोलिक स्थिती लाभलेल्या सोलापूर परिसरात हिवाळ्यात अनेक प्रकारचे स्थलांतरित पक्षी दरवर्षी न चुकता हजेरी लावतात. त्यामुळे जिल्हा पक्षी वैभवाने नटलेला आहे.

प्रख्यात पक्षितज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनी सोलापूर शहरातील संभाजी (कंबर) तलाव तसेच शहरालगतच्या हिप्परगा तलाव, होटगी तलाव आणि नान्नज येथील माळढोक अभयारण्याला भेट देऊन पक्षिनिरीक्षण केले आहे. त्यावेळी असंख्य स्थलांतरित पक्षी शहरातील तसेच, शहरालगतच्या पाणस्थळांवर येत असल्याचे मत नोंदवून डॉ. अली यांनी सोलापूरला ‘पक्ष्यांचे माहेरघर’ अशी उपाधी दिली होती. शहर व शहराच्या आसपास बुलबुल, विविध प्रकारचे बगळे, नाना प्रकारच्या घारी, पोपट, चिमणी, कावळे, शिंपी, वटवट्या, तांबट, मैना, दयाळ, कोतवाल (रामोशी, कोळशा), सातभाई, पाणकावळे, धनेश, भारद्वाज, साळुंखी, पिंगळे, हुप्पो, कोकीळ इत्यादी स्थानिक पक्षी वर्षभर नेहमी आढळतात. स्थानिक पक्ष्यांबरोबर परदेशी पक्षीही दरवर्षी विविध मोसमांत जिल्ह्यात नेमाने वारी करत राहतात.

येथे सामान्यपणे वर्षाऋतू संपून शरदऋतूला प्रारंभ झाला, की अनेक विदेशी पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात होते. त्या दिवसांत हे पक्षी जिल्ह्यातील विविध पाणवठ्यांवर त्यांचा डेरा टाकतात. तेथील पक्वान्नांची चव चाखण्यासाठी खटाटोप करत असतात. त्याचे मुख्य कारण म्हणजे त्या दिवसांत येथील निसर्गात निर्माण होणारे पोषक वातावरण! त्या दिवसांत खरीप पिकांची जोमाने वाढ होऊन पक्ष्यांना मुबलक खाद्यान्न उपलब्ध होते. निसर्ग हिरव्या पिकांनी लपेटून असणे, वनसंपदा बहरून येणे, खोपे व घरटे बनवण्यासाठी सुरक्षित जागा मिळणे, नद्या, नाले व तलाव पाण्याने भरणे यामुळे त्या कालावधीत विविध प्रकारचे पक्षी सर्वच गोष्टींमध्ये सक्रिय होतात व पक्ष्यांच्या विस्मयकारक जगताशी पक्षिनिरीक्षकाची ओळख होते.

सोलापूर शहराला लागूनच असलेल्या हिप्परगा तलाव (एकरुख मध्यम प्रकल्प) तसेच, शहराच्या मध्यवर्ती असलेल्या संभाजी (कंबर) तलाव या ठिकाणी स्थलांतरित पक्षी वर्षानुवर्षे थंडीच्या दिवसांत जगाच्या विविध भागांतून येऊन त्यांचा डेरा टाकतात. करमाळ्याजवळच मांगी जलाशय, मोहोळ तालुक्यातील ऐतिहासिक आष्टी मध्यम प्रकल्पाचे जलाशय, अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरण परिसर तसेच, माळशिरस तालुक्यातील निमगाव (मगराचे) येथील लघुजलप्रकल्पाचा तलाव परिसर, पंढरपूर शहरातील ऐतिहासिक यमाई (पद्मावती) तलाव इत्यादी जलस्थाने विविध प्रकारची बदके व इतर पाहुणे पक्ष्यांच्या गर्दीने फुलून जातात. सांगोला तालुक्यातील अचकदाणी व चिंचोळी तलाव, मोहोळ तालुक्यातील पोखरापूर तलाव, मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी, पडोळकरवाडी, शिरनांदगी, तिसंगी या गावांच्या शिवारातील तलाव परिसरात शेकडो प्रकारचे पाणपक्षी हिवाळ्यात भेटी देतात.

सोलापूर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्दळ करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी आणखी एक बाब म्हणजे जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी जलाशय! उजनी धरण परिसराला विविध स्थलांतरित पक्ष्यांनी त्यांची पंढरी केली आहे. त्या ठिकाणी अनेक परदेशी पक्षी हंगामी भेटीच्या त्यांच्या नित्य वाऱ्या करतात. हजारोंच्या संख्येत हे पक्षी दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत एखाद्या पोस्टमनने पत्ता शोधत यावे तद्वत उजनी धरण परिसरात येऊन दाखल होतात; मग त्यांच्या सोयीनुसार भराऱ्या घेत सोलापूर जिल्ह्यातील तलाव-माळरानावर चरण्यासाठी फेऱ्या मारत असतात.

परदेशातून हवाई प्रवास करून हिवाळ्यात सुमारे तीनशेहून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती भारतात येतात. त्यांपैकी, बऱ्याच प्रजाती महाराष्ट्रात विशेषकरून सोलापूर जिल्ह्यात वावरतात. युरोप, उत्तर आणि मध्य आशिया, मंगोलिया, रशिया, सायबेरिया, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ इत्यादी ठिकाणाहून अनेक पक्षी सोलापूरात येतात. कच्छचे रण व हिमालयासह शेजारच्या बर्मा, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदिव, भूतान, तिबेट आदी ठिकाणांहून सीमा ओलांडून ‘हिवाळी पाहुणे’ म्हणून सोलापुरात उतरतात. सुमारे चोवीस प्रकारच्या बदकांच्या जाती, करकोचे( स्टॉर्क), बगळे (हेरॉन), रोहित (फ्लेमिंगो), सुरय (टर्न), समुद्र पक्षी (गल्स), तुतुवार (सॅण्डपायपर), पाणलाव्हा (स्नाईप), धनछुवा (प्लवर), धोबी (वॅगटेल), नीळकंठ (रोलर), पाकोल्या (स्विफ्ट), भोरड्या (स्टर्लिंग/पॅस्टर), हळद्या ( ओरियल), थिरथिरा (रेडस्टार्ट) ह्या पक्ष्यांच्या विविध प्रजाती वर्षानुवर्षे सोलापूर जिल्ह्यात येऊन धडकतात. यांपैकी बहुतांशी पक्षी हिवाळा संपला, की त्यांच्या मूळ स्थानी परत जातात, तर काही येथेच ‘अनिवासी भारतीय’ म्हणून तळ ठोकून राहतात. नाकावर टेंगूळ असलेला नटका बदक व झोळीचोच (पेल्किन) या पक्ष्यांचे सोलापूर परिसरात आढळणे म्हणजे वैशिष्ट्यच ठरत आहे.

जिल्ह्यात स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांपैकी प्रमुख आकर्षण म्हणजे रोहित पक्षी (फ्लेमिंगो)! नजाकतदार रंगसंगती लाभलेला हा ‘राजहंस’ हिप्परगा जलाशयावर न चुकता दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान हजेरी लावतो. माळशिरस तालुक्यातील मगराचे निमगाव, पंढरपुरातील यमाई तलाव तसेच, मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावात हे पाहुणे पक्षी दरवर्षी बहुसंख्येने त्यांचा डेरा टाकतात.

जिल्ह्यात मोठ्या संख्येने येणारा आणखी एक पक्षिवर्ग म्हणजे करकोचा! चित्रबलाक/ रंगीत करकोचा (पेन्टेड स्टॉर्क), मुग्धबलाक/उघडी चोच (ओपन बिक स्टॉर्क), पांढऱ्या मानेचा करकोचा (व्हाइट/वूली नेक्ड स्टॉर्क), चमचे चोच/दर्वीमुख (स्पून बिल) व कांड्या करकोचा (डोमिसाइल क्रेन) हे सामान्यपणे जिल्ह्यातील सर्व जलाशयांवर आढळतात. त्यांपैकी बरेच करकोचे हिवळा संपला की देशात इतरत्र न जाता वर्षभर जिल्ह्यातच वावरतात. ज्वारी (शाळू) पिकण्यास सोलापूर जिल्हा प्रसिद्ध आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. त्याचप्रमाणे पक्ष्यांनाही ज्वारीची विलक्षण ओढ आहे. त्या पिकाबरोबर करडी हे पीकपण अमाप प्रमाणात होते. त्या दोन्ही पिकांना हानी पोचवणारे भोरड्या व कांड्या करकोचे प्रचंड प्रमाणात जिल्ह्यात येऊन दाखल होत. परंतु अनियमित पाऊस, बागायत शेतीत वाढ या कारणांमुळे जिल्ह्यातील ज्वारीचे व करडीचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे कांड्या करकोच्यांनी आता सोलापूर जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. सांगोल्याजवळील राजमार्गावर असलेल्या, ब्रह्मी ओढ्यात हजारोंच्या संख्येत येऊन हमखास दाखल होऊन ‘हुरडा पार्टी’ करणाऱ्या करकोच्यांनी गेल्या दहा-बारा वर्षांपासून त्यांची सफारी रद्द केली आहे. ज्वारीचे पीक कमी असले तरी जिल्ह्यात लक्षणीय प्रमाणात लागवड झालेल्या द्राक्षफळावर डल्ला मारण्यासाठी भोरड्या मात्र लक्षावधी संख्येने दरवर्षी नेमाने येतात. पंढरपूर, माळीनगर, सदाशिवनगर, मंगळवेढा व अक्कलकोट या परिसरातील गर्द हिरव्या झाडांच्या दाटीत भोरड्या थव्याच्या थव्याने दोन-तीन महिन्यांसाठी मुक्कामाला असतात.

हे पक्षी थंडी-वाऱ्याला तोंड देत, खाद्याचा शोध घेत, त्यांच्या पिलावळींना संरक्षण देण्‍यासाठी धडपडत असतात. दूर देशांतून येथे स्‍थलांतरित होणारे ते पक्षी त्‍यांच्‍या अस्तित्‍वाने मनुष्यास आनंद देतात. बदलत्‍या हवामानाच्‍या परिस्थितीत या पक्ष्‍यांच्‍या अस्तित्‍वाला धोका उत्‍पन्‍न झालेला असताना त्यांना संरक्षण देणे ही मानवाची जबाबदारी आहे.

– प्रा. डॉ. अरविंद कुंभार

About Post Author

Previous articleकर्णबधिरांसाठी – व्‍हॉईस आफ व्‍हॉईसलेस
Next articleसचिन केळकर – डिजिटल द्रष्टा
अरविंद कुंभार हे मूळचे कर्नाटकातील विजापूर जिल्‍ह्याचे. नोकरीच्‍या निमित्‍ताने गेली चाळीस वर्षे ते महाराष्‍ट्रात वास्‍तव्‍यास आहेत. ते सोलापूरच्‍या अकलूज गावातील 'शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालया'त प्राणिशास्‍त्र विषयाचे प्राध्‍यापक म्‍हणून कार्यरत आहेत. कुंभार यांनी भारतातील विविध पक्षी अभयारण्‍यांना भेटी देऊन तेथील पक्ष्‍यांचा अभ्‍यास केला आहे. त्‍यांच्‍याकडे पक्ष्‍यांची दहा हजारांहून अधिक छायाचित्रे संग्रहित आहेत. ते सोलापूर विद्यापीठाचे पीएच.डी. मार्गदर्शक असून त्‍यांच्‍या मार्गदर्शनाखाली सात विद्यार्थी पक्षीशास्‍त्र आणि पर्यावरणशास्‍त्र या विषयांवर संशोधत करत आहेत. कुंभार यांनी पक्षी आणि पर्यावरण या विषयांवर महाराष्‍ट्र-कर्नाटक राज्यातील नियतकालिकांमध्‍ये मराठी-कन्‍नड भाषेतून लेखन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9822124191, 02185 224191

14 COMMENTS

  1. कुंभार सर लेखातून छान माहिती
    कुंभार सर, लेखातून छान माहिती दिली आहे.

  2. सर खूपच छान माहिती आहे.
    सर खूपच छान माहिती आहे.

  3. आपल्या जिल्ह्यात एव्हड़े
    आपल्या जिल्ह्यात एवढे निसर्गवैभव आहे याची प्रचिती या लेखावरून आली. नवीन पिढीसाठी वाचनिय लेख आहे.

  4. अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण
    अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. खूप खूप धन्यवाद सर.

Comments are closed.