सोमनाथची जलश्रीमंती!

8
53
carasole

सोमनाथ म्हणजे दुसरे ‘आनंदवन’च! परंतु ‘आनंदवना’पेक्षा तेथे काही खास आहे.  ते म्हणजे, वाहून जाणाऱ्या पाण्याचा वापर करण्यासाठी कल्पकतेने अमलात आणलेल्या उपाययोजना. विकास आमटे यांच्या प्रयोगशीलतेतून अस्तित्वात आलेले जलसंधारणाचे विविध प्रयोग आणि त्या माध्यमातून लाभलेली जलश्रीमंती हे ‘सोमनाथ’चे शक्तिस्थान. विकास आमटे हे ‘सोमनाथ प्रकल्पा’चे आधुनिक भगीरथ आहेत.

प्रकल्पाच्या एक हजार तीनशेएकाहत्तर एकर परिसरात पूर्वी शेती होती, पाणीदेखील उपलब्ध होते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्यालगतचा तो परिसर. तो विपुल पावसासाठी प्रसिद्ध आहे. बाबा आमटे यांनी त्या परिसरातील एका नाल्यावर दहा मीटर उंचीचा बंधारा उभारला; पाणी साठवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे ‘सोमनाथ’ म्हणजे ‘आनंदवन’ आणि अन्य बाबा आमटे प्रेरित प्रकल्प यांच्यासाठी धान्याचे कोठार ठरले. ‘सोमनाथ’ म्हणजे आमची तांदळाची खाण असे साधना आमटे म्हणत. कुष्ठमुक्तांनी त्यांच्या घामातून उभारलेले, आदर्श असे स्वयंपूर्ण गाव! तशी ख्याती ‘सोमनाथ’ने निर्माण केली.

‘आनंदवना’तील कुष्ठरोग्यांची संख्या 1970 पर्यंत खूप वाढत गेली. प्रकल्पाला दहा वर्षें होऊन गेली होती. जो कुष्ठरोगी ‘आनंदवना’त आला, तो ‘आनंदवनात’च राहिला! कुष्ठमुक्तांचे विवाह आणि पर्यायाने परिवारवृद्धी असा सिलसिला सुरू झाला. त्यामुळेही संख्या वाढली. बाबांनी ठरवले, की कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर बनवले पाहिजे, त्यांचा प्रतिपाळ करायचा तर संस्थेकडे उत्पादन पाहिजे. शासनाकडे जमिनीची मागणी करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात सोमनाथजवळील जमीन ‘महारोगी सेवा समिती’स मिळाली. त्या परिसरात सोमनाथचे प्राचीन मंदिर असल्यामुळे प्रकल्पाला सोमनाथ हे नाव रुढ झाले. तो परिसर आनंदवनापासून सुमारे शंभर किलोमीटर अंतरावर आहे. ‘सोमनाथ प्रकल्पा’साठी मिळालेली जमीन डोंगरउताराची. खडकाळ. बरड. त्यात परिसरातील स्थानिक आदिवासींनी त्या जमिनीवर हक्क सांगितला. त्यासाठी मोठे आंदोलनही झाले. विनोबा भावे यांच्या मध्यस्थीमुळे त्यावर तोडगा निघाला. सुमारे सातशे एकर जमीन स्थानिक आदिवासींना दिली गेली. बहुतांश जलस्रोत व तलाव त्या सातशे एकरांच्या परिसरात राहिले. कालौघात जलचक्रही बिघडले. पावसाची सरासरी तळाशी येऊ लागली. शेती उत्पन्नातील घट चिंता वाढवणारी ठरली.

बाबांनी ‘आनंदवना’तील काही कुष्ठमुक्तांना सोबत घेऊन 1967 मध्ये मुक्कामासाठी ‘सोमनाथ’ला झोपडी उभारली. त्या ठिकाणी ‘श्रमसंस्कार छावणी’च्या निमित्ताने देशभरातील युवकांचा राबता वाढला. दरवर्षी विशिष्ट कालखंडात ‘सोमनाथ’ला मोठ्या संख्येने येणाऱ्या तरुणाईने शेतीयोग्य जमिनीसाठी जंगल साफ करणे, तलाव खोदणे, विहिरी खणणे, लहान बंधारे बांधणे अशी अनेक मूलभूत कामे करण्याचा सपाटा लावला. ‘सोमनाथ’मध्ये ‘आनंदवन’ निर्माण होऊ लागले! सुमारे तीनशे एकर नांगरटीखाली आणली गेलेली शेती बहरु लागली!

बाबांच्या भ्रमंतीमुळे विकास आमटे यांच्यावर ‘सोमनाथ प्रकल्पा’ची जबाबदारी 1977-78 च्या सुमारास आली. दरम्यान, ‘आनंदवना’ची लोकसंख्या वाढली होती. भरीस भर ‘हेमलकसा’, ‘अशोकवन’ या प्रकल्पांचीदेखील धान्याची गरज वाढली. शेती आणि त्यापासून उत्पन्न वाढवायचे असेल तर पाण्याची कायमस्वरुपी सोय करणे गरजेचे होते. विकास यांनी ‘सोमनाथ प्रकल्पा’वर त्यांचा मुक्काम वाढवला. शंकरदादा जुमडे, हरी बढे, अरुण कदम यांच्यासमवेत परिसराचा अभ्यास आणि चर्चा सुरू झाली. परिसरातून वाहणाऱ्या नाल्यांना ठिकठिकाणी बांध घातले गेले. पावसाचे वाहून जाणारे पाणी ठिकठिकाणी अडवले गेले. तरुणाईच्या श्रमशक्तीतून साकारलेले चौदा तलाव त्या परिसरात होतेच. ते खोल करण्यात आले. त्यामुळे नाल्यातून वाहून, मूळ गावाजवळील उमा नदीतून वैनगंगेला जाऊन मिळणारे पाणी सोमनाथ परिसरात थांबण्यास सुरुवात झाली. तलाव ओव्हरफ्लो झाले. बांधबंदिस्तीमुळे पाणी वाया जात नाही. वर्षभर तलाव भरलेले दिसतात. भूजल पातळी वाढल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनाही लाभ झाला.

‘सोमनाथ प्रकल्पा’च्या संदर्भात 2008-2009 हे वर्ष महत्त्वाचे ठरले. ‘सोमनाथ प्रकल्पा’ची मूहूर्तमेढ त्या वर्षी रोवली गेली. विकास आमटे यांचे ‘सोमनाथ प्रकल्पा’वरील दोन खंदे शिलेदार म्हणजे अरुण कदम आणि हरीभाऊ बढे. हरीभाऊ पाटील यांनी सोमनाथची जडणघडण पूर्वीपासून बघितलेली. कुष्ठरुग्ण ते कुष्ठमुक्त निरोगी व्यक्ती असा त्यांचा प्रवास. ते सोमनाथच्या जलश्रीमंतीबद्दल भरभरुन बोलतात.

‘भाता’साठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात सुमारे साडेबाराशे मिलिमीटर पाऊस पडतो. पाऊस गेल्या काही वर्षांपासून ऑगस्टनंतर पडतो. भाताची लावणी जुलै अखेरपर्यंत केली तर बऱ्यापैकी उत्पन्न मिळते. पण पाऊसच पडत नव्हता. त्यात 2009 मध्ये मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली. पाऊस केवळ साडेतीनशे मिलिमीटर झाला. सत्तावीस तळी कोरडी राहिली. दरवर्षी साधारण साडेचार हजार क्विंटल तांदूळ होत असे, त्यावर्षी केवळ सव्वाशे क्विंटल भात झाला. तोपर्यंत खटले चार हजारांचे झाले होते ते पोसायचे कसे! परिसरात बारमाही वाहणारा ओढा आहे. पावसाचे पाणी त्या ओढ्यातून टेकडीला वळसा घालून, उमा नदीला निघून जायचे. त्याचवर्षी मुंबईपुण्यात आनंदवनातील ‘स्वरानंदन’ ऑर्केस्ट्राचे सोळा कार्यक्रम झाले होते. त्या माध्यमातून पैसा उपलब्ध झाला. ओढ्यावर चेक डॅम बंधारा बांधण्याचे ठरले. बंधारा टिकावा म्हणून मजबुतीसाठी सात फुटांचा पाया खोदण्यात आला. दगड फोडण्यात बराच पैसा खर्च झाला. बंधाऱ्यासाठी टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर केला तर खर्च कमी होऊ शकेल असा विचार विकास आमटे यांच्या डोक्यात घोळत होताच. त्यांनी ट्रकसारख्या मोठ्या वाहनांचे वापरलेले जुने टायर त्या ठिकाणी उपयोगात आणण्याचे ठरवले.

बंधाऱ्यासाठी काँक्रिट ओतून दोन भिंती उभारण्यात आल्या. त्या दोन भिंतींच्या मधल्या पोकळीत पाच-सहा ट्रक भरून गोळा करून आणलेले प्लॅस्टिक तुकडे करून टाकण्यात आले. सिमेंट, प्लॅस्टिक, रेती, खडी आणि फोडलेले दगड यांचे मिश्रण दोन भिंतींमधील पोकळीत ठासून ठासून भरण्यात आले. नैसर्गिक उतार असल्यामुळे पाण्याला वेग जास्त आहे. त्या वेगाने बंधाऱ्याला झळ पोचू नये, भिंत पडू नये म्हणून, त्यासाठी टायर्स लावून भिंतीची रुंदी बारा फुटांनी वाढवण्यात आली. बंधारा प्रामुख्याने पाणी वळवण्यासाठी बांधण्यात आला आहे. त्यामुळे त्याची उंची केवळ दोन मीटर आहे.  त्याच्या उजव्या बाजूने एक्सप्रेस कॅनॉल काढण्यात आला आहे. त्या माध्यमातून साडेबाराशे एकर परिसरातील सतरा तळी भरण्यात येतात. विशेष म्हणजे त्यासाठी विजेचा खर्च अजिबात येत नाही.

त्या बंधाऱ्याच्या वर आणखी एक बंधारा आहे. तो बाबांच्या काळात बांधण्यात आलेला आहे. त्याची उंची दहा मीटर असल्यामुळे तो साठवणीसाठी उपयोगात येतो. बंधाऱ्याचे काम सुरू असताना भिंतीलगत नाल्याचा काही भाग खोदण्यात आला. तसेच, बंधाऱ्याची रुंदीही वाढवण्यात आली. त्या निमित्ताने ‘शिरपूर पॅटर्न’ची अमलबजावणी झाली. एक फुटाचे पाणी दहा फुटांत विभागले गेले. त्यामुळे बंधाऱ्याला इजा पोचत नाही. भाताची शेती बंधाऱ्यामुळे फुलली. बारमाही पाणी साठलेले राहते. उन्हाळ्यात जंगली श्वापदे पाणी पिण्यासाठी येतात.

टायर बंधाऱ्यापासून काही अंतरावर पुढे त्याच ओढ्यावर पूर्वीपासून मातीचा बंधारा होता. त्याची डागडुजी दरवर्षी करावी लागत असे. बंधाऱ्याचे नव्याने बांधकाम करण्यात आले. त्या ठिकाणी साठवण्यात आलेले पाणी विजेच्या सहाय्याने उचलण्यात येते, जवळच, एका शेतात उंचावर एक टाकी श्रमदानातून बांधण्यात आली आहे. त्या टाकीत ते पाणी साठवण्याचत येते. टाकीला चारही बाजूंनी पाईप काढण्यात आले आहेत. ते थेट दूर दूर पसरलेल्या शेतांपर्यंत पाणी पोचवतात. त्यावर भाताची शेती करण्यात येते.

पाण्याची हमखास उपलब्धी हे सोमनाथचे वैशिष्ट्य. त्यामुळेच, तीनशेआठ एकरांत भाताची शेती केली जाते. त्याशिवाय गहू, तूर, कापूस, हरबरा, हळद आणि विविध प्रकारचा भाजीपाला सोमनाथमध्ये पिकवला जातो. शेतीची कामे स्थानिक कुष्ठमुक्त आणि बाहेरच्या लोकांकडून केली जातात. सोमनाथ परिसरातील ज्या लोकांनी पूर्वी या प्रकल्पास विरोध केला होता ते तेथे येऊन काम करतात. त्यांना सोमनाथमध्ये रोजगार उपलब्ध झाला आहे. वर्षभर दीड-दोनशे मजूर कामावर असतात. शेतातील मुख्य पिकांच्या बाजूने जे आंतरपीक घेतले जाते, त्याचे उत्पन्न स्थानिकांना मिळते. मजुरीव्यतिरिक्त मिळणाऱ्या त्या उत्पन्नामुळे लोकांच्या राहणीमानात मोठा बदल झाला आहे. तेथील कुष्ठरोग्यांचा बऱ्यापैकी बँक बॅलन्स आहे.

– संजय श्रीराम झेंडे
9657717679

About Post Author

Previous article‘समर्थ दर्शन’ थीम पार्क
Next articleशहीद अशोक कामटे सामाजिक संघटना
संजय झेंडे हे धुळ्याचे. त्यांनी पुणे येथून M.Lib. अभ्यासक्रमाची पदवी घेतली. ते दैनिक ‘महाराष्ट्र टाइम्स’चे धुळे जिल्हा प्रतिनिधी 1993-2014 पर्यंत होते. त्यांनी पंचवीस वर्षे पत्रकारिता केली. संजय झेंडे यांच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रातील जलसंधारणविषयक प्रयोगांची माहिती देणारी कव्हर स्टोरी `जलसंवाद` मासिकाच्या माध्यमातून प्रसिध्द होत आहे. त्यांनी धुळे जिल्ह्याशी संबंधित विविध प्रश्नांवर, तसेच धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या समस्यांविषयी लिखाण केले आहे. त्यांना तडवी भिल्लांच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध घेण्यासाठी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई’ तर्फे आणि तापी खो-यातील जल वळण योजनांचा अभ्यासकरण्यासाठी ‘उत्तर महाराष्ट्र विद्यापीठा’ तर्फे फेलोशिप मिळाली. संजय झेंडे यांचे खान्देश इतिहास खंड -1 व 2 मध्ये ‘तडवी भिल्लांसंबंधी लेख’ व ‘समर्थ धुळे जिल्हा 2020’ या पुस्तकामध्ये ‘धुळे जिल्ह्याच्या प्रगतीचा वेध’ हे दोन लेख प्रकाशित झाले आहेत. त्यांनी नदीजोड प्रकल्पावर आधारित `मंत्र जल व्यवस्थापनाचा` हे पुस्तक (2008) लिहिले आहे. झेंडे यांना पां.वा. गाडगीळ पुरस्कार (1992), अतुलभाई जोशी विकास पत्रकारिता पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार (2002) असे सन्मान प्राप्त झाले आहेत. ते तापी खोरे गॅझेटिअर सदृष्य ग्रंथ निर्मिती प्रकल्पाचे समन्वयक आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9657717679

8 COMMENTS

  1. योग्य समयी माहीती समजली.
    योग्य समयी माहिती समजली. जलसंधारणाच्या कामात मदत होईल.
    धन्यवाद.

  2. श्रीकांत पेटकर, शेगाव ता .वरोरा जि.चंद्रपुर

    छान माहीति. अानंदवनात शिकताना
    छान माहिती. अानंदवनात शिकताना काॅलेजमधून अामचे कॅम्प सोमनाथला असत.

  3. लेख सुरेख अाहे।
    लेख सुरेख अाहे.

  4. Article is very nice, somnath
    Article is very nice, somnath project is very appreciated. I would like to emphasise that honey bee plays very Important role in farming. If boxes of honey bees are kept in a farm, yield increases considerably e.g.for pomegranate yield increases 21 times. We, Sahayog parivar, an NGO, provide a five day training for honey bee keeping, for last 20 years. We arrange it At Nashik or at Rajgurunagar.We manage it on your campus if requested.

  5. मी हे सर्व पाहिले आहे. फार…
    मी हे सर्व पाहिले आहे. फार सुंदर आहे. फार कष्ट केले त्या लोकांनी

Comments are closed.