डॉ. सु.रा. चुनेकर यांच्या निधनाने मराठीत सूचिशास्त्राचा पाया रचणारा संशोधक-समीक्षक गेला. समीक्षक हा मुळात दुर्लक्षित असतो, त्यात चुनेकरसरांनी संशोधनाची, सूची तयार करण्याची वाट धरलेली. ती तर बहुसंख्य साहित्यिकांपासूनही दूरची. पण एखादी व्यक्ती व्रतस्थपणे संशोधन करत मराठी भाषेत किती मोलाची भर टाकू शकते हे समजून घेण्यासाठी चुनेकरसरांचे लेखनकार्य पाहण्यास हवे. त्यांना त्यांच्या कार्याला लोकप्रियता लाभणार नाही हे माहीत होते; पण त्यांच्या संशोधनाची, सूचिकार्याची, त्यांच्या मौलिक लेखनाची ज्या पद्धतीने दखल घेतली जायला हवी होती, तशी ती घेतली गेली नाही ही खंत कायम राहणार आहे.
ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख होते. चुनेकरसरांची समीक्षक, संपादक, संशोधक, सूचिकार, कोशवाङ्मयाचा अभ्यासक ही रूपे महत्त्वाची होती. त्यांची शिस्त त्या सगळ्या कामांत मोठी होती. कित्येक जण त्यांच्या शिस्तीच्या धाकापोटी त्यांच्यापासून दूर राहत. त्यांनी कधीही बेशिस्त, वरिष्ठाकडून काही प्राप्त करून घेण्यासाठी चालणारा लाळघोटेपणा खपवून घेतला नाही. मात्र शिस्त पाळणाऱ्यांना त्यांचे प्रेमच मिळाले. कोणी वाङ्मयीन क्षेत्रात काही चुकीचे वागत असेल तर ते त्याच्यावर संतापत असत. ते त्यांना होणारा ताप ते जाहीरपणे व स्पष्टपणे व्यक्त करत. त्यांचे ते वागणे सध्याच्या जगात ‘अव्यवहारी’ ठरवले जात असे, पण त्यांनी त्याची कधी तमा बाळगली नाही. एखादा चुकत असेल तर ते त्याला दुरुस्त करत, पण कोणी हितसंबंधापोटी मुद्दाम चुकू लागला तर त्याला त्यांच्या कोपाला सामोरे जावे लागत असे.
चुनेकरसरांचा स्वतःचा ग्रंथसंग्रह मोठा (सरांनी त्यांचा सर्व ग्रंथसंग्रह बदलापूर येथील श्याम जोशी यांच्या ‘ग्रंथसखा’ या संस्थेला देण्याचा निर्णय पूर्वीच घेतला आहे). त्यांच्याकडील प्रत्येक पुस्तकाला आवरण घातलेले असे. त्यांचे नाव व खरेदी केल्याची तारीख त्यावर असे. त्यांची त्या पुस्तकासंदर्भातील मते, त्यातील गुणदोष, त्यावर इतरांनी कोठे काय म्हटले आहे याविषयीचे एक सविस्तर टिपण त्या पुस्तकात सापडे. तेवढे वाचले की, वाचक-संशोधकाला त्या पुस्तकाचा उपयोग होणार की नाही, त्या पुस्तकाच्या अनुषंगाने काय वाचावे लागेल हे ठरवता येत असे. ते त्यांच्या घरी पूर्वपरवानगीने जाऊन, कितीही वेळ बसून पुस्तके वाचण्याची परवानगी देत असत. त्यांनी तो नियम पुस्तके वाचण्यासाठी घरी नेण्यास दिली की ती परत येत नाहीत, आली तरी त्यांची पाने नीट सापडतीलच अशी नसतात हे जाणून केला होता. फार थोडे जण या नियमाला अपवाद होते.
सरांशी गप्पा करण्याने महाराष्ट्रभरच्या अनेक गोष्टी कळत असत. त्यासाठी ‘कोको पिणे’ ही एक अट पाळावी लागे. ते स्वतः स्वयंपाकघरात ओट्याच्या कोपऱ्यावर बसत आणि कोको तयार करत. आपण समोर खुर्चीवर बसून गप्पा मारायच्या. त्या गप्पात गॉसिप डोकावतही नसे. त्यात साहित्यक्षेत्रात घडत असलेल्या घडामोडींची माहिती असे, एखाद्या पुस्तकाची चर्चा असे, त्यावरील परखड मते असत. जो वेळ मिळेल, तेवढ्या वेळात समृद्ध होऊन यायचे. त्यांचा नम्र-प्रेमळ स्वभाव, मनमिळाऊ वृत्ती, मित्रांविषयी आत्मीयता, साहित्याकडे-जगण्याकडे पाहण्याचे रसाळपण यांचे दर्शन त्यावेळी घडत असे. ते रा. ग. जाधव यांच्या अखेरच्या आजारपणाच्या काळात एक दिवसाआड मॉडेल कॉलनीतील त्यांच्या घरापासून ओंकारेश्वरापर्यंत चालत जात असत. जाधवसरांचे बोलणे बंद होत गेले तसे त्यांच्याकडील अनेकजणांचे नित्य येणे बंद झाले होते. मात्र चुनेकरसर त्यांच्याशी गप्पा करण्यासाठी अखेरपर्यंत जात होते (ते दोघे महाविद्यालयीन काळापासूनचे मित्र होते). चुनेकरसरांमधील ही स्नेहस्निग्धता मुग्ध करणारी होती.
त्यांच्यातील संशोधक संपादन करतानाही दिसत असे. त्यांनी ‘मराठी संशोधन पत्रिके’चे संपादन करताना अनेक प्रयोग केलेले दिसतात. आता पीएच. डी. प्रबंध विषयांची सूची उपलब्ध झाली आहे. पण त्याची सुरूवात चुनेकरसरांनी 1970 च्या सुमारास केली होती. सूचीचे महत्त्व संशोधकांसाठी खूप मोठे असते. सरांनी विश्लेषणात्मक सूचीची सुरूवात केली. सूचिशास्त्र तयार केले. त्यांनी सूचिविषयक तात्त्विक विचार मांडला. सुमारे पस्तीस हजारांहून अधिक नोंदी त्यांच्यामुळे उपलब्ध झाल्या आहेत. त्यांचे प्रदीर्घकाळ चाललेले सूचीविषयक कार्य त्यांनीच एका लेखात नमूद केले आहे. ते सूची करतानाही जागरुक असत. जी. ए. कुलकर्णी यांचा ‘कुसुमगुंजा’ हा कथासंग्रह आहे. त्याची नोंद करताना चुनेकरसर लिहितात, की कुसुमगुंजा या शब्दाला काही अर्थ नाही, तो शब्द ‘कुसुम्बगुंजा’ असा हवा. ते त्या शब्दाचा ‘मेघांचा कापूस’ असा अर्थ नोंदवत, बालकवींच्या एका ओळीचा संदर्भही देतात. त्यांचा हा व्यासंग वाचकाला लुभावतो. त्यांची साहित्याकडे पाहण्याची, त्या साहित्याच्या अंतरंगात शिरून धांडोळा घेण्याची, एखाद्या साहित्यकृतीतून दुसऱ्या साहित्यकृतीकडे जाण्याची त्यांची तऱ्हा पाहता सूचिकार्याचे महत्त्व स्पष्ट होत जाते. त्यांनी सूची म्हणजे केवळ यादी नव्हे, तर संशोधनाची प्रथम व आवश्यक पायरी आहे हे अधोरेखित केले.
चुनेकरसरांनी ‘मराठी संशोधन मंडळा’त असताना प्राचीन मराठी काव्याचे संपादक, कवी बाळकृष्ण अनंत भिडे यांच्या साहित्याचे संकलन व संपादन करण्यास सुरुवात केली होती. ते पुस्तक प्रकाशित होणार असल्याची जाहिरात 1969 मध्ये करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात पन्नास वर्षांनी ते ई-आवृत्ती स्वरूपात नुकतेच प्रकाशित झाले. तर ते छापील रूपात आता प्रसिद्ध होणार आहे. त्या कामासाठी प्रदीप कर्णिक यांनी खूप धावपळ केली, मेहनत घेतली. त्यांचा प्रयत्न सरांच्या हाती छापील पुस्तक द्यावे असा होता. पण ज्या दिवशी चुनेकरसर गेले, त्याच दिवशी त्या पुस्तकाच्या काही प्रती मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या हाती आल्या असे चंद्रशेखर बर्वे यांच्याकडून समजले. चुनेकरसरांचे ते अखेरचे पुस्तक म्हणावे लागेल.
सरांनी एका पत्रात लिहिले आहे, ‘क्वचितप्रसंगी निराशा येते. गाभ्यातून कटुता येते. पण स्नेह्यांच्या प्रेमामुळे ती कोठल्या कोठे विरून जाते. मनःवृत्ती प्रसन्न होते.’ निरभ्रपणे जगाकडे पाहत, अभ्यासकांविषयी नितांत आदर बाळगत, संशोधनात रमलेला व्रतस्थ आपल्यातून गेला.
– संतोष शेणई 9881099016, santshenai@gmail.com