सुश्रुताच्या वारसदारांची आधुनिक ज्ञानगंगा

0
26

डॉ. रविन थत्ते     निष्णात सुघटन शल्यचिकित्सक व ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक असे एका वाक्यात डॉ. रविन थत्ते ह्यांच्याबद्दल सांगता येईल. ते म्हणतात, की ज्ञानेश्वरी हे माझे प्रारब्ध आहे! डॉ. थत्ते यांनी ज्ञानेश्वरीवर सहा पुस्तके लिहून, त्या ग्रंथाचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले आहे. मात्र, ‘ज्ञानेश्वरी’च्या ध्यासाने ते विरागी अथवा अध्यात्ममार्गी झाले व त्यामुळे त्यांची सुघटन शल्यक्रियेशी असलेली नाळ तुटली असे घडले नाही. त्यांची बुद्धी तेथेही अद्यावत व तत्पर आहे. त्यांचे नवे venture आहे Shortnotesinplasticsurgery.wordpress.com हा ब्लॉग!

     गेली चाळीस वर्षे प्लॉस्टिक सर्जरीच्या क्षेत्रात मोलाचे काम करणार्‍या थत्ते ह्यांचा त्‍या क्षेत्रातला अधिकार वादातीत आहे. Association of plastic surgeon of India या संस्थेचे ते मान्‍यवर आहेत. त्यांनी प्लॅपस्, क्लेफ्टस आणि तत्सम इतर अनेक विषयांसाठी, लॅंडमार्क ठरतील असे अनेक संशोधन-पेपर सादर केलेले आहेत.

     प्लॅस्टिक सर्जरी ह्या क्षेत्रात १९६५ ते १९९५ ह्या काळात मोठी प्रगती झाली. त्यानंतर त्‍या क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊन नवनवीन सुविधा उपलब्ध झाल्या. नवीन तंत्रज्ञानाने पूर्वी अशक्य वाटणार्‍या गोष्टी सहजसाध्य झाल्या. ज्ञान अतिसूक्ष्म स्वरूपात प्राप्त होऊ लागले. अशा सर्व प्रभावातही मूलभूत तत्त्व व पायाभूत शास्त्र कायम राहिले आहे. त्या मूलभूत ज्ञानापासून आधुनिक तंत्रमंत्राची सर्व नोंद त्यांचा हा ब्लॉग घेत आहे आणि म्हणून ते म्हणतात, की आतापर्यंत वापरले जाणारे धर्मग्रंथ, पुस्तके ह्यांच्या मर्यांदा नसलेली, शिकणे आणि शिकवणे – दोन्ही साध्य करणारी, निरुपयोगी किंवा जुनी माहिती, तंत्र डिलिट करता येणारी आणि नवीन अद्ययावत माहिती अपडेट करणारी ही ‘ज्ञानगंगा’ आहे.

     ते म्हणतात, “जगातली पहिली प्लॅस्टिक शस्त्रक्रिया भारताच्या सुश्रुताने केली. त्याचा अभिमान बाळगत आम्ही नेहमी सुश्रुताचा उद्घोष करतो, पण आम्ही स्वत: मात्र कधी काही लिहीत नाही. मी अभिमानाने सांगतो, की online असा प्रयत्न करणारा मी पहिला भारतीय डॉक्टर आहे. वैद्यकीय क्षेत्रातला हा पहिला उपक्रम आहे. मूलभूत संशोधनात भारतीय नेहमीच मागे राहिले, पण उपलब्ध ज्ञानाची कॉपी करत, त्याचा उपयोग करून लहानमोठ्या गोष्टी, प्रयोग करण्यात आम्ही वाकबगार आहोत, हे समग्र ज्ञान सूत्रबद्धरीतीने व पद्धतशीरपणे, सचित्र ‘शॉर्ट नोट्स इन प्लॅस्टिक सर्जरी’ ह्या ब्लॉगवर एकत्रित होत आहे आणि हा खजिना विनामूल्य उपलब्ध आहे! नोट्स विनाशुल्क डाऊनलोड करता येतात.

     थत्ते यांच्या चौकस आणि सतत नावीन्याचा शोध घेणार्‍या स्वभावामुळे व अपडेट राहण्याच्या सवयीने स्वत:च्या वैद्यकीय शिक्षण व कारकिर्दीच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या (आजही ते काही प्रमाणात शस्त्रक्रिया करतात) नोंदींचे भांडार त्यांच्याकडे आहे. इतक्या वर्षांचा स्वत:चा अनुभव, सहकार्‍यांचे अनुभव शेअर करून मिळणारे ज्ञान, सातत्याने देशी-परदेशी मासिके, नियतकालिकांतील लिखाण, सेमिनार्स ह्या सर्व गोष्टी त्यांच्याकडच्या नोंदीचा स्रोत आहे. ते स्वत: ऐंशी-नव्वदच्या दशकात ‘ब्रिटिश जर्नल ऑफ सर्जरी’मध्ये लिखाण करत होते. त्यावेळी त्या जर्नलचे संपादक असलेले डॉ. टोनी वॅटसन थत्‍ते यांचे मित्र आहेत व ते ब्लॉगच्या उपक्रमामध्ये सहकारी मार्गदर्शक आहेत.

रविन थत्ते यांचा ब्लॉग      ब्लॉगचे पहिले प्रकरण तयार करतानाची प्रक्रिया सांगताना थत्ते म्हणाले, मी आराखडा तयार केला आणि तो स्कॉंटलंडला वॅटसनकडे पाठवला. त्यांनी त्यात सुधारणा करून पाठवलेला आराखडा मी पुन्हा लिहून काढला व तो मसुदा विविध ज्येष्ठ, श्रेष्ठ, विद्यमान विभागप्रमुख डॉक्टर यांच्याकडे पाठवून, त्यांची मते मागवली. ती सर्व मते काळजीपूर्वक वाचून;  ग्राह्य मते नोंदवून घेतली, तर जी मते वेगळी होती ती italics मध्ये मांडली. त्या फायनल मसुद्याला सुसंगत असे फोटो निवडून, मग ते प्रकरण संगणकावर मांडले. त्यांवर प्रतिक्रिया मागवल्या. सूचनांचे आणि online चर्चेचे ब्लॉगवर नेहमी स्वागत होते.

     आतापर्यंत एकवीस प्रकरणे अपलोड करण्यात आली आहेत. प्रकरणांचा क्रम ज्याप्रमाणे प्लॅस्टिक सर्जरी लिहिली गेली तसाच ठेवला आहे. प्लॅस्टिक सर्जरीचे स्वरूप, त्वचा, त्वचारोपणाची मूलतत्त्वे, त्वचारोपण, कूर्चा रोपण, हाडांचे रोपण, त्वचारोपणाचा मोठा भाऊ म्हणजे फ्लॅपस् वगैरे. अशा प्रकारे शंभरएक प्रकरणे लिहिण्याचा थत्ते ह्यांचा मानस आहे.

     प्रत्येक प्रकारची केस वेगळी असते. त्यातले सूक्ष्म बारकावे अनंत पैलू, उपाय, वेगळेपणा, संभाव्य प्रतिक्रिया ह्या सर्वांच्या नोंदी, चर्चा, जागतिक पातळीवरचे संशोधन, नवीन यंत्रणेचा वापर ह्या सर्वांची दखल घेत ही प्रकरणे तयार होत आहेत. स्थानिक आणि जागतिक पातळीवर सतत काहीतरी घडत असते आणि हे घडणे व घडवणे संबंधित क्षेत्रातील लोक एकमेकांपर्यंत आधनिक तंत्राच्या साहाय्याने सहज पोचवू शकतात. जसजसा ब्लॉगचा जास्तीतजास्त प्रचार आणि प्रसार होईल तसतसा संबंधितांचा व सामान्यजनांचाही सहभाग वाढेल असे ब्लॉगला भेट दिल्यावर जाणवते.

     थत्ते म्हणतात, “स्वत: कधीही संगणकासमोर न बसलेला मी आजच्या तरुण, टेक्नोसॅव्ही, आधुनिक तंत्राच्या जगात वावरणार्‍या पिढीला माझ्या अनुभवाची शिदोरी देऊ शकतो ही गमतीची गोष्ट आहे. अर्थात त्यासाठी आधुनिक तंत्रच उपयोगी पडत आहे. ह्या सर्व माहितीची रचना, तिचे सौंदर्यमूल्य कायम ठेवत मांडणे हे कौशल्याचे काम आहे” डॉक्टरांसाठी ते काम संदीप ओक हे संगणकतज्ञ करतात. 

     जन्मजात दोष, कुरूपपणा, व्यंग, अपघाताने आलेले व्यंग, भाजण्यामुळे त्वचेची झालेली वाईट अवस्था अशा अनंत कारणांनी देह विद्रूप होऊ शकतो आणि रोजचे जगणे अवघड बनते. बाह्यरूपाला नको इतके महत्त्व आलेल्या जगात अशी माणसे न्यूनगंडाची बळी ठरतात, तेव्हा प्लॅस्टिक सर्जरीने जीवन बदलू शकते व ती सर्जरी वरदान ठरते. पण सौंदर्यवर्धक शस्त्रक्रियांचा अतिप्रसार, अतिरेक, स्त्रियांचे त्यांमागे धावणे हे घातक आहे असे थत्ते ह्यांचे मत आहे.

     थत्ते ह्यांनी हे नवीन आधुनिक माध्यम निवडून हा क्लिष्ट विषय सुलभ करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या मते, हा ब्लॉग ज्ञानाची जपणूक ; जाणत्या, जुन्या लोकांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा नवीन, तरुण पिढीला उपयोग; अभ्यासक, शिक्षक व सामान्य जनांनाही माहिती मिळणे; ज्ञानी व जिज्ञासूंची online चर्चा आणि संशोधनाला व संशोधकांना चालना ह्या पाच दृष्टीनी महत्त्वाचा आहे. ह्या प्रयत्नात सातत्य राहण्यासाठी सर्व नव्याजुन्या डॉक्टरांचा, अभ्यासकांचा, संबंधित व्यक्तींचा सहभाग थत्ते ह्यांना अपेक्षित आहे; जेणेकरून ही ज्ञानगंगा विस्तारेल व प्रवाहीत होईल म्हणून, ह्या क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी Shortnotesinplasticsurgery.wordpress.com ह्या ब्लॉगला अवश्य भेट द्यावी असे थत्ते यांचे आवाहन आहे.

रविन थत्‍ते,
प्‍लास्टिक सर्जन,
भ्रमणध्वनी: 9820523616

ज्योती शेट्ये,
भ्रमणध्वनी : 9820737301,
इमेल : jyotishalaka@gmail.com

 

About Post Author

Previous article‘दि डर्टी पिक्चर’ – एक चांगला चित्रपट
Next article‘राजीव-रजन आधारघरा’चा आधार !
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्‍या राहणा-या. त्‍यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्‍यानंतर त्‍या ‘वनवासी कल्‍याणाश्रम‘ या संस्‍थेत काम करू लागल्या. ईशान्‍य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्‍यांच्‍यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्‍यांच्‍या आयुष्‍याचा भाग होऊन गेला आहे. त्‍यांनी ईशान्‍य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्‍येची‘ हे पुस्‍तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.