कै. हरी रामचंद्र साठे शिल्पकलेकडे लहानपणीच आकृष्ट झाले. ती गोष्ट 1906 सालची. त्यांनी ‘सर जे.जे. कला महाविद्यालया’त प्रवेश घेतला. त्यांनी तेथे यशस्वी झाल्यानंतर कल्याणच्या साठे वाड्यात गणपती तयार करण्याचा कारखाना 1920 साली काढला. तेथेच त्यांचे पुतणे प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव ऊर्फ भाऊ साठे ह्यांचा जन्म 1926 साली झाला. भाऊरावांना त्यांच्या काकांकडून शिल्पकलेचे बाळकडू मिळाले. भाऊराव साठे यांनी ‘सर जे.जे. स्कूल अॉफ आर्ट्स’मधून शिल्पकलेचे शिक्षण 1947-48 साली पूर्ण केले. ते शिल्पकार म्हणून घडले, नावारूपाला आले. त्या साठे घराण्याचा तिसऱ्या पिढीचा शिल्पकार म्हणजे सिद्धार्थ वामन साठे. ते भाऊ साठे यांचे पुतणे. सिद्धार्थ यांचा जन्म 1975 चा. त्यांचे प्राथमिक शिक्षण बालक मंदिर (कल्याण) व माध्यमिक शिक्षण सुभेदार वाडा हायस्कूल (कल्याण) येथे झाले. त्यांनी चित्रकलेत आवड होती म्हणून एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. सिद्धार्थ इंटरमिजिएटमध्ये महाराष्ट्रात पहिले आले. सिद्धार्थ यांनी शिल्पकलेत शिक्षण घेण्याचे ठरवले. त्यांनी ‘ठाणा स्कूल ऑफ आर्ट्स’ला एक वर्षाचा फाऊंडेशन कोर्स केला, त्यानंतर त्यांनी ‘सर जे.जे. स्कूल अॉफ आर्ट्स’मध्ये प्रवेश घेतला आणि स्कल्प्चर व मॉडेलिंग या विषयांतील पदवी कॉलेजमध्ये दुसर्या क्रमांकाने 1997 साली मिळवली. सिद्धार्थ यांना ‘जे.जे. स्कूल अॉफ आर्ट्स’च्या शिल्पकला विभागात एक वर्षाची फेलोशिप मिळाली. त्या सुमारास भाऊ साठे यांच्याकडे शिवाजी महाराज यांच्या पंधरा फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम अाले होते. सिद्धार्थ यांना त्या तऱ्हेचे मोठे शिल्प तयार करण्याचा अनुभव घ्यायचा होता. सिद्धार्थ यांनी ते संपूर्ण शिल्प घडवण्यामध्ये भाऊ साठे यांना सहकार्य केले. ते शिल्प ग्वाल्हेर येथे बसवण्यात अाले अाहे. सिद्धार्थ यांनी त्या शिल्पाच्या कामासाठी ‘जे.जे. स्कूल अॉफ आर्ट्स’ची ती फेलोशीप स्वीकारली नाही.
सिद्धार्थ यांनी गोरेगाव येथील रामचंद्रशेठ यांचा पुतळा 1998 ला साकार केला. ते त्यांचे पहिले काम. ते यशस्वी झाले. त्यानंतर सिद्धार्थ यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सिद्धार्थ म्हणतात, “मी प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकत असतो. कोणतेही शिल्प साकारताना अभ्यास करणे गरजेचे आहे. शिल्पकाराला डॉक्टरप्रमाणे शरीरशास्त्राचा अभ्यास करावा लागतो, स्त्री व पुरुष यांच्या शरीराचे बारकावे सूक्ष्म रीतीने अवलोकन करावे लागतात. शिल्पकाराला इंजिनीयरींगचे कौशल्यदेखील अवगत असावे लागते.”
सिद्धार्थ यांनी सांगितले, की ”कलेमध्ये नाविन्य आणणे, कलेला पुढे नेणे हा माझा प्रयत्न राहील. मान्यवर जेव्हा माझ्या कामाची स्तुती करतात तेव्हा सार्थक झाल्यासारखे वाटते. प्रत्येक शिल्पात जिवंतपणा असणे, ते शिल्प ज्या व्यक्तीचे आहे तिचे शौर्य, कार्य, चेहऱ्यावरचे भाव साकारले जाणे आवश्यक आहे.”
सिद्धार्थ यांनी कामगार नेते दादा बोऱ्हाडे यांचे शिल्प, भीमाशंकर येथे उभारले. त्यानंतरचे त्यांचे ‘डेस्टिनी’ हे वास्तववादी शिल्प कलात्मक चर्चेचा विषय ठरले. ते मानवी शीर व हाताचा मोठा पंजा यांची सांगड घालून तयार केलेले प्रतिकात्मक शिल्प आहे. त्यांच्या त्या प्रतिकात्मक शिल्पावर ‘रोदा’ या जगप्रसिद्ध फ्रेंच शिल्पकाराचा प्रभाव असल्यासारखे वाटते. त्यांची गुराखी, आजोबा, कारगिल, सर्फिंग करणारा कसरतपटू, क्रिकेट खेळणारे तरुण, डॉन ब्रॅडमन, बाबासाहेब पुरंदरे अशी एकामागोमाग एक सरस शिल्पे घडत गेली. त्यांनी अभिनेता किरण करमरकर यांचे शिल्प तर दोन तासांत तयार केले. GLAM AWARD चे मानचिन्ह (2008), सम्राट चौक (डोंबिवली) येथील शिल्प, वाडेघर चौक (कल्याण) येथील आरमार शिल्प, कल्याण स्टेशनबाहेरील वेदर मॉनेटरचे शिल्प, चिखलगाव (दापोली) येथील भारतरत्न पां.वा. काणे, महर्षी कर्वे व आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांची शिल्पे, अलिबागचे कलेक्टर ऑफिस येथील आरमार हे शिल्प, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांचे पेण येथील शिल्प, उद्योगपती दीप आनंद यांचे दिल्ली येथील शिल्प, परशुरामाचे कुरुक्षेत्र (हरियाणा) येथील शिल्प, विनोबा भावे यांचे सवदीय आश्रम (नागपूर) येथील शिल्प, न्यायमूर्ती तात्यासाहेब आठल्ये यांचे देवरुख येथील शिल्प, बारड (नांदेड) येथील शंकरराव देशमुख यांचे शिल्प. ही सारी शिल्पे म्हणजे सिद्धार्थ यांची आतापर्यंतची उत्तमोत्तम कामगिरी. त्यांचा माती, दगड, स्टील, फायबर, धातू या माध्यमांतून शिल्पे साकारण्याचा अखंड प्रवास चालू आहे. त्यांना स्टील जास्त आकर्षित करते.
सिद्धार्थ शिल्पकलेचा विचार खोलवर जाऊन करतात. शिल्पकलेला वाव एकविसाव्या शतकात जरी राहणार असला तरी समस्याही तेवढ्याच आहेत. त्या कलेकडे येण्यास लोक उदासीन आहेत. म्हणून सिद्धार्थ यांचा एक मोठी कायम कार्यशाळा उभारण्याचा मानस आहे. तेथे ती कला जोपासली जाईल-वाढवली जाईल. ते म्हणतात, ‘सरकार टेंडर मागवून शिल्पे घडवण्याची व्यवस्था करते. त्यात ज्याचे पैसे कमी त्याला काम मिळते. कलेमध्ये दर्जा पाहणे महत्त्वाचे असते हे सरकार विसरते. तशा कामात दर्जा राहतोच असे नाही. अशा ठिकाणी ज्येष्ठांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर शिल्पकला क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांना एकत्र येऊन नवीन शोध, काम करतानाचे अनुभव यांसारख्या विषयांवर चर्चा करणे आवश्यक आहे. त्यातूनच नवीन आणि उत्तम दर्ज्याची शिल्पे घडू शकतील असा मला विश्वास वाटतो.’ ते त्यांच्या कामाचा पुढील टप्पा या एकत्रीकरणासाठी प्रयत्न करणे हा असेल असेही आवर्जून सांगतात.
शिल्पकार सिद्धार्थ साठे – 9820502409, sculptorsiddharth@gmail.com
– सुमन कढणे
ग्रेट ! साठेंचा स्टुडिओ बघता…
ग्रेट ! साठेंचा स्टुडिओ बघता येइल का ?