सिंदखेड राजा (Sindkhed Raja)

5
180
_sindkhed_raja_2.jpg

सिंदखेड राजा हे गाव आणि तालुकाही बुलढाणा जिल्ह्यात आहे. ते गाव शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाबाई भोसले यांचे जन्मगाव आहे. त्यामुळे सिंदखेड राजा या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गाव मुंबई-नागपूर हायवेपासून जवळ आहे. गावात एसटी जालन्यातून येते.

गाव सोळा हजार लोकवस्तीचे आहे. गावात पाहण्यासारख्या पुरातन काही गोष्टी आहेत. त्या म्हणजे जिजाबार्इंचे वडील लखुजीराजे यांचा वाडा, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा, बारव-सजना बारव-गंगासागर-बाळसमुद्र या नावाच्या विहिरी आणि चांदणी तलाव व मोती तलाव. बारव म्हणजे चौकोनी विहिरी असतात. त्याला चारही बाजूने पायर्‍या असतात. त्या विहिरी पाण्याने पूर्ण भरलेल्या असतात. मात्र हल्ली त्या विहिरीही उन्हाळ्यात आटतात.

गावाच्या एका बाजूला डोंगर आहे. तेथे मात्र हल्ली पाऊस सरासरी पडतो. पंधरा किलोमीटर अंतरावर पूर्णा नदी आहे. नदीवर संत चोखामेळा धरण आहे. त्यातून गावाला आणि परिसराला पाणीपुरवठा होतो.

गावात सोमवारी आठवडा बाजार असतो. गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. साठ टक्के लोक शेती करतात. दहा टक्के लोक राजकारणात आहेत. तसेच, काही शिक्षक आहेत. ते आजूबाजूच्या गावांतील शाळांतून शिकवण्यास जातात. गावात माध्यमिक शाळेपर्यंत सोय आहे. तेथील चारशे विद्यार्थी रोज देऊळगाव राजा या, तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसर्‍या तालुक्याला पुढील शिक्षणासाठी जातात.

_sindkhed_raja_1.jpgत्या गावात रामेश्वर, हनुमान, लिंगायत-वाणी समाजाचे, बालाजी, श्रीकृष्ण, खंडोबा, मोठा महादेव अशी मंदिरे आहेत. पुरातन रामेश्वर मंदिराजवळ महाशिवरात्रीला जत्रा भरते. दसर्‍याला बालाजी मंदिरात मोठा उत्सव असतो. गावात तीन मशिदी आहेत.

‘मराठा सेवा संघा’ने सिंदखेडराजा येथे स्वतःच्या जागेत जिजाऊ धर्मपीठ व जिजाऊ मंदिर अशा सामुहिक ‘जिजाऊ सृष्टी’चे निर्माण कार्य सुरू केले आहे. ‘जिजाऊ सृष्टी’ची जागा नागपूर-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर मोती तलावाच्या बाजूच्या पठारावर आहे. त्या पठार शिवारात राजमाता जिजाऊ घोड्यावरून फेरफटका मारत असे सांगितले जाते. त्या तेथेच युद्धकलेचे, राजकारणाचे शिक्षण घेत असेही म्हणतात. ते जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र व्हावे असा त्यामागील ‘मराठा सेवा संघा’चा विचार आहे.

गावातील लस्सीवाला आणि कचोरीवाला प्रसिद्ध आहे. लोक विदर्भ व मराठवाडा येथील मिश्रित भाषा बोलतात. गावाच्या आजूबाजूला चार-पाच किलोमीटर परिसरात शिवनी टाका, सावखेड तेजण, नाईकनगर, गोराखेडी बावरा ही गावे आहेत.

माहिती स्रोत: अमोल राठोड 

संकलन – नितेश शिंदे

Last Updated On – 14th July 2017

About Post Author

5 COMMENTS

  1. फारच छान माहिती शिंदे सर…
    फारच छान माहिती शिंदे सर…

  2. सुंदर माहिती लिहिली आहे…
    सुंदर माहिती लिहिली आहे. लिहीत जावे.

  3. खूपच छान माहिती आहे सर. …
    खूपच छान माहिती आहे सर. अशीच जर माहिती देत रहा.

  4. तालुका निर्मीती कधी झाली
    तालुका निर्मीती कधी झाली

  5. सिंदखेदराजा मधील जेव्हढेही…
    सिंदखेदराजामधील जेव्हढेही पुरातन वास्तू आहेत लखुजीराजे यांचा वाडा, जिजामाता जन्मस्थळ, रंगमहाल, सावकारवाडा, काळाकोट, लखुजी राजांची समाधी, पुतळा-बारव, सजना-बारव, गंगासागर-बाळसमुद्र या नावाच्या विहिरी आणि चांदणी तलाव व मोती तलाव यांची मुख्य,विस्तारित माहिती पाठवण्याचा प्रयत्न करा. बाकी सर तुम्ही गोळा केलेली माहिती चांगली वाटली. धन्यवाद.

Comments are closed.